आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sunil Shetty By Dharmendra Singh, DIvya Marathi

सुनीलचे प‍ितृप्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कोयलांचल’ चित्रपटाच्या बराच काळ आधी आणि कोयलाचंल प्रदर्शित झाल्यानंतर सुनील शेट्टी पडद्यावरून नाहीसा झाला. आपली मुलगी अतियाच्या ‘हीरो’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिताही सुनीलने विशेष उत्साह दाखवला नाही. आपल्या पित्याची शुश्रूषा हा एकमेव उद्देश आता सुनीलसाठी उरलेला आहे. सुनीलचे पिता वीरप्पा शेट्टी यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पित्यालाच आपले सर्व काही मानणारा सुनील त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करीत आहे. दक्षिण मुंबईतील आपल्या घराला त्यासाठी सुनीलने ‘आयसीयू’मध्ये बदलले आहे!

तुळू भाषा मातृभाषा असलेल्या कुटुंबात मंगलोर (कर्नाटक) येथे सुनीलचा जन्म झाला. लहानपणापासून वडिलांनी सुनीलला आवडेल ते करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे अभ्यासात फारसा रस नसलेल्या सुनीलने किक बॉक्सिंग आणि अभिनय हे दोन पर्याय निवडले. शाळा-कॉलेजमध्ये नाटकांमधून काम करणे, जाहिरातींच्या ऑडिशन्सना जाणे असे करत करत छापील माध्यमात मॉडेल म्हणून एका जाहिरातीत सुनील झळकला. अशाच जाहिरातींनी सुनीलला बॉलीवूडमध्ये प्रवेश दिला. त्याचा पहिला चित्रपट ‘बलवान’ प्रचंड हिट झाला आणि सुनीलने म्हणता म्हणता बॉलीवूडमध्ये पाय रोवले. ‘धडकन’सारख्या चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले. मात्र सुनील सांगतो, ‘माझ्या वडिलांचा कुटुंबासह मुंबईत आल्यानंतर संघर्ष सोपा नव्हता. त्यांनी सुरुवातीला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये प्लेट्स, टेबल साफ करण्याचे काम केले. मालकाने त्यांची मेहनत बघून त्यांना वेटरचे काम दिले. मात्र तरीदेखील स्वयंपाकघरापर्यंत त्यांना प्रवेश नव्हता. पण दिवसरात्र काम करत रेस्टॉरंटच्या मॅनेजरपर्यंत सुनीलचे पिता पोहोचले. मालकाची तीन रेस्टॉरंट्स होती. पुढे मालक गावी जाऊन स्थायिक होणार असल्याने मालकाने माझ्या वडिलांनाच ती रेस्टॉरंट्स चालवायला दिली.’ ही मोठ्या मेहनतीने पै-पै जमवून मालकाकडून विकत घेतलेली रेस्टॉरंट्स सुनीलनेदेखील त्यांचा विस्तार करत आजवर चालवली आहेत. वीरप्पा यांना आपल्या या पितृभक्त मुलाचा अभिमानच वाटत आला आहे. आपल्या माणसांच्या वर्तुळात सुनीलचे वडील नेहमी उद्गारतात, ‘मुलगा असावा तर सुनीलसारखा.’ सुनीललाही पित्याच्या आशीर्वादामुळेच आज आपण येथे आहोत, याची पुरेपूर जाणीव आहे. अमिताभ यांच्याप्रमाणे सुनील याची पितृनिष्ठा प्रचंड आहे. आज सुनीलची स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था आहे, ‘मिसचीफ’सारखे फॅशन बुटीकही आहे; कलाकारांच्या परदेशवा-या नियोजित करणारी ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’ आहे. या सगळ्यामध्ये सुनीलच्या अभिनयाचादेखील वाटा आहे. ज्यामुळे सुनील हे व्यवसाय स्थिरस्थावर करू शकला. पण स्वत: सुनीलसाठी त्याचे पिताच प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळेच सुनीलसाठी त्याचे पिताच भूत, भविष्य आणि वर्तमान आहेत. अलीकडेच सुनीलचा वाढदिवस होऊन गेला. पण त्या दिवशीही सुनीलने चाहत्यांकडे पित्यासाठीच शुभेच्छा मागितल्या. पित्यालाच आपल्या आयुष्याचा नायक मानणा-या सुनीलची दुसरी इच्छा तरी सध्या काय असणार?

dpsingh@dbcorp.in