Home »Magazine »Rasik» Article On Swami Vivekanand

स्वामी विवेकानंद : संत नव्हे, समाजवादी!

दत्तप्रसाद दाभोळकर | Jan 05, 2013, 20:39 PM IST

  • स्वामी विवेकानंद : संत नव्हे, समाजवादी!

विवेकानंद काळाच्या खूप पुढे आहेत. त्यांनी आपल्यासमोरच्या आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करून त्यांची उत्तरे सांगितली आहेत. विवेकानंदांनी शंभर टक्के आरक्षण मागितले आहे. सर्वधर्म परिषदेतील भाषण संपल्यावर कोलंबो ते अलमोरा अशी त्यांची विजय रथयात्रा सुरू आहे. ते कुंभकोणमला आलेत. तो सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला! तेथे भाषण देताना विवेकानंद म्हणाले, ‘ब्रह्मवृंदहो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्युघंटा वाजवायला मी येथे उभा आहे. आपण जर उच्चवर्णीय असू, तर आपण अर्थार्जनासाठी एकही नोकरी करता कामा नये. या सर्व नोक-या आपण आता दलितांसाठी मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. दलित आमच्याएवढे हुशार नाहीत, हे तुमचे म्हणणे खरे आहे; पण त्याचे कारण आपण त्यांना पाच हजार वर्षे ज्ञानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आज आपणाला एक शिक्षक लागत असेल, तर दलितांना सात शिक्षकांची गरज आहे. ते त्यांना देणे ही आपली जबाबदारी आहे.’ त्याच वर्षी त्यांचा मित्र राखाल (ब्रह्मानंद) याला पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आपणाला समाजात समता हवी असेल, तर दलितांसाठी सात नव्हे तर दहा शिक्षकांची सोय आपण केली पाहिजे.’ मात्र, हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद खेळत नाहीत. ते ‘शिवधर्मा’च्याही जवळ जात नाहीत. ते दलितांना सांगतात, आजची तुमची ब्राह्मणद्वेषाची जी दक्षिणेतील लाट आहे, ती थांबवा. समाजाच्या सर्व क्षेत्रांत ब्राह्मण तरुणांनी फार मोलाचे योगदान दिले आहे. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण करायचे नाही. आपण जातीअंताची लढाई लढणार आहोत. या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू- मुसलमानात सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा. त्यासाठी दोन गोष्टी प्रथम समजून घ्या. पहिली गोष्ट ही की, या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. धर्मांतरित मुसलमान हे आपण ज्यांच्यावर पाशवी अत्याचार केलेत, असे आपले अभागी भाऊ आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, इस्लाम हा एक श्रेष्ठ धर्म आहे. फक्त इस्लामने समता प्रत्यक्ष व्यवहारात आणली. हे विवेकानंदांनी केवळ भारतातच सांगितले नाही. अमेरिकेतील भाषणात त्यांनी हेच सांगितले. ‘तुम्हा ख्रिश्चन लोकांना पण हे अजून जमलेले नाही. तुमच्या चर्चमध्ये मला काळा ख्रिश्चन दिसलेला नाही. इस्लामने दिलेला समतेचा संदेश आपणाला व्यवहारात आणायचा आहे. मात्र, जेथे वेदही नाही, कुराणही नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र, हे कार्य आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करायचे आहे.’


रूढी, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार यांच्याविरुद्धची लढाई विवेकानंद अपरिहार्य मानतात; पण त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या शिष्यांना ते लिहितात, ‘ही लढाई लढण्याचे बुद्धदेवांपासून राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंतच्या सर्व परिवर्तनवादी मंडळींचे प्रयत्न फसले. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपणाला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तींवर आघात करावा लागेल. कारण विज्ञान माणसाचे शाश्वत अस्तित्व नाकारते. धर्म माणसाच्या अशाश्वत जीवनात, त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून उभा असतो. म्हणून तो माणसांना त्यांचा वाटतो. आपण धर्मावर आघात केला तर समाज मनाने आपणापासून दूर जाईल.’ विवेकानंदांनी हे फार विलक्षण ताकदीने मांडले आहे. राजर्षी शाहू महाराजांचे ‘वेदोक्त प्रकरण’ घडण्याच्या दहा वर्षे आधी मुदलियार आणि पूज्यपाद यांना पत्रे पाठवून विवेकानंदांनी सांगितले आहे, ‘आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. ती नंतर व्यासांनी आणि शंकराचार्यांनी खेळलेली खेळी आहे.’


पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना समान हक्क मिळणार नाहीत, तो समाज उभा राहू शकणार नाही, हे सांगणा-या विवेकानंदांनी अमेरिकेत पोहोचल्यावर आपल्या शिष्यांना पत्र पाठवून कळवले, ‘अमेरिका प्रगत आहे. कारण तेथील स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समर्थपणे उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मी जर मरणापूर्वी अशा शंभर स्त्रिया भारतात निर्माण करू शकलो, तर मी सुखाने मरेन.’
रजस्वलेने मंदिरात जाऊ नये, असे सांगत आजही धर्ममार्तंड आडवे येत आहेत. विवेकानंद मात्र काळाच्या खूप पुढे गेले आहेत. ते पत्रातून आपल्या शिष्यांना खडसावून विचारतात, ‘दक्षिणेश्वराच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही, हा भयावह प्रकार आहे. मग वेश्येकडे जाणा-या पुरुषांचे काय? मंदिर सर्वांसाठी आहे. थकलेल्या भागलेल्या या आपल्या अभागी बहिणींना तर देवाच्या आधाराची अधिक गरज आहे. मंदिर त्यांच्यासाठी मोकळे करा.’
मी समाजवादी आहे, मी संत नाही; असे स्पष्टपणे सांगणा-या विवेकानंदांनी येणा-या समाजवादाला कोणीच थांबवू शकणार नाही, हे सांगितले. समाजवाद येईल, तेव्हा शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. कामगारांना, दलितांना शिक्षण मिळेल, त्यांचे जीवनमान सुधारेल; हे सांगत असतानाच या रचनेत मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होईल, असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत, या रचनेतील त्रुटी शोधत नवी रचना आपणाला शोधावी लागेल, असेही सांगितले. माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म. त्यामुळे एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. एक धर्म नाकारलात तर सारे धर्म नाकारावे लागतील. मात्र, आजचे सारे धर्म स्थितीप्रिय आहेत, त्यांना गतिप्रिय बनवावे लागेल. सर्व धर्मांचा समावेश करणारा आणि विज्ञानाचा आदर करणारा नवा धर्म आज आपणाला हवा आहे. विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान पांगळे आहे. कारण विज्ञान फक्त ‘का व कसे’ हे सांगते. धर्म त्याला ‘का व कशासाठी’ हे शिकवेल, अशी मांडणी विवेकानंदांनी केली.


यंत्रे हवीत, पण यंत्रांनी मानवी सर्जनशीलतेला हद्दपार करता कामा नये. विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे वस्तूंची विपुलता येईल. त्यामुळे चंगळवाद येईल. माणसे आत्मकेंद्री बनतील. माणसांचे एकमेकांत गुंतणे संपेल आणि त्यामुळे कदाचित मानवी समाजरचना मोडकळीत निघेल, याची जाणीवदेखील विवेकानंदांनी करून दिली आहे. आपला विश्वासही बसत नाही, शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करून त्यांची उत्तरे शोधत हा दार्शनिक उभा आहे. विवेकानंदांना फक्त 39 वर्षांचे आयुष्य मिळाले. अथक भ्रमंती, अनेक व्याधी यामुळे त्यांच्या कार्यावर फार बंधने आली. मात्र, आपल्याला फार कमी यश का मिळाले? हे सांगताना ते म्हणाले, ‘या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो. मी विचारवंत, संघटक, नेता, कार्यकर्ता आणि खजिनदार ही सर्व कामे करत बसलो. एका माणसाला हे जमणार नाही. मी फक्त दार्शनिक आहे. हिमालयात बसून मला ही रचना मांडावयास हवी होती.’

Next Article

Recommended