आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Swantrayaveer Savarkar Vishwa Sahitya Sammelan By Abhijit Kulkarni

थायलंडमध्‍ये सावरकर विचारांचा जागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा नि:संदेह असली तरी, त्यांची विचारधारा अत्यंत स्पष्ट आणि प्रखर असल्याने राज्यकर्त्यांकडून आजवर त्यांची उपेक्षाच झाली आहे. हे लक्षात घेता, शिवसंघ प्रतिष्ठानने सुरू केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचा चौथा अध्याय नुकताच थायलंड येथे लिहिला गेला. त्यामध्ये सावरकरांचे साहित्य, हिंदुत्वापासून विज्ञाननिष्ठेपर्यंतचे त्यांचे विचार याबरोबरच प्रस्तावित सावरकर विद्यापीठाची रचना या विषयांच्या अनुषंगाने सखोल मंथन झाले. त्याचप्रमाणे अंदमानात स्वातंत्र्यवीरांच्या काव्यपंक्ती पुन:स्थापित करण्यासह फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर सावरकरांचे स्मारक उभारण्याचा झालेला ठराव, ही या संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. थायलंडमधील पट्टायास्थित एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित या सोहळ्यास देश-विदेशातील जवळपास अडीचशे सावरकरप्रेमी उपस्थित होते.
प्रख्यात उद्योजक व संमेलनाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी उद‌्घाटन सत्रातच सावरकरांच्या मार्सेलिस येथील नियोजित स्मारकाच्या विषयाला हात घातला. वाजपेयी सरकारपासून या विषयाचे घोंगडे कसे भिजत पडले आहे, ते सांगताना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही त्यांनी सावरकरांचे नुसतेच गोडवे गाण्यापेक्षा याबाबत प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर सावरकरांच्या काव्यपंक्ती अंदमानात पुन:स्थापित करण्यास कुणाच्या परवानगीची गरजच काय, असा सवाल उपस्थित करत संमेलनाचे प्रमुख संयोजक कॅप्टन नीलेश गायकवाड यांना त्या दिशेने पावले टाकण्यास सांगितले. आपण सारे मिळून तिथे जाऊ आणि कार्यसिद्धीस नेऊ, असे सांगून त्यांनी उपस्थितांना अगदी ‘चार्ज’ करून टाकले. संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी अध्यक्षांनी लिखित स्वरूपातले भाषण वाचावे, या परंपरेचा आदर डीएसके यांनी केला खरा; पण तत्पूर्वी स्वभावानुसार त्यांनी आपल्यातल्या उत्स्फूर्तपणालाही मोकळी वाट करून दिली. सावरकर हे आपले आदरस्थान असल्याचे सांगणा-या पंतप्रधान मोदींनाही या व्यासपीठावरून रोखठोक सवाल करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
सावरकरांचे मार्सेलिसला स्मारक उभारण्यासाठी आम्ही सावरकरप्रेमी समर्थ आहोत. त्यासाठी सरकारपुढे हात पसरण्याची गरज नाही. पण परदेशात असे स्मारक व्हायचे असेल, तर त्याला केंद्र सरकारचा औपचारिक होकार हवा असतो. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून हा प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे. किमान मोदींनी तरी आता नुसतेच बोलत राहण्यापेक्षा त्याबाबत त्वरेने निर्णय घ्यायला हवा, ही त्यांनी व्यक्त केलेली भावना उपस्थित सावरकरप्रेमींना चांगलीच भावली. स्वातंत्र्यवीरांच्या घराण्यातील पुढच्या पिढीच्या प्रतिनिधी हिमानी सावरकर यांनी या व्यासपीठावरून ‘क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा त्याग’ या विषयावर व्यक्त केलेले मनोगत अंतर्मुख करणारे होते. अन्य मवाळ पुढा-यांच्या तुलनेत क्रांतिकारकांप्रति तत्कालीन सरकार किती आणि कशी कठोर पावले उचलत होते; देशसेवेसाठी, राष्ट्रनिष्ठेसाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृतीची एवढी गंभीर दखल सरकार घेत असे, कारण यापुढे कुणी परत तसे करणे धजावू नये, हा धडा घालून देण्याचा त्यांचा त्यामागे उद्देश असायचा. परिणामी, क्रांतिकारकांना प्रचंड यातना भोगाव्या लागायच्याच, पण त्यांच्या कुटुंबीयांना तर सामाजिक, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर पुढे कित्येक वर्षे आबाळ सहन करावी लागायची, हे स्पष्ट करताना हिमानी सावरकर यांनी दिलेली उदाहरणे आणि वर्णन केलेल्या घटनांनी वातावरण भारून गेले. अशा भावनिक मुद्द्यांबरोबरच संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर विस्तृत चर्चा झाली.
आजवर सावरकरांची राज्यकर्त्यांकडून झालेली उपेक्षा, सावरकरांच्या विचारांचा विविध घटकांनी आपापल्या सोयीनुसार करून घेतलेला वापर, अनेकदा संदर्भ सोडून दिले जाणारे त्यांच्या वक्तव्याचे दाखले, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आदी बाबींचा साकल्याने ऊहापोह करण्यात आला. दुस-या सत्रात, सावरकरांचे साहित्य, विज्ञाननिष्ठ सावरकर आणि प्रस्तावित सावरकर विद्यापीठ या विषयांच्या अनुषंगाने परिसंवाद झाला. त्या माध्यमातून सावरकरांच्या स्वभावाचे विविध पैलू साकल्याने उपस्थितांसमोर मांडण्यात आले. त्याचप्रमाणे प्रस्तावित सावरकर विद्यापीठाचा उद्देश, ते कसे असावे, त्याची ध्येय-धोरणे काय असावीत, रचना-कार्ये याची प्राथमिक संकल्पना विशद करण्यात आली. त्यावर येत्या काळात सखोल मंथन होऊन हा आराखडा निश्चित करण्यात येईल.

कुटुंब रंगलंय सावरकर विचारांत...
मूळचे नाशिकनिवासी असलेले शिवसंघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड, आय. टी. व्यावसायिक असलेले त्यांचे थोरले बंधू प्रमोद गायकवाड व भगिनी अरुंधती डुंबरे ही तिन्ही भावंडे सावरकर विचाराने प्रेरित आहेत. त्यातूनच सावरकर विचाराचा प्रसार जगभर करण्याच्या उद्देशाने त्यांनी चार वर्षांपूर्वी अंदमान येथे पहिले सावरकर साहित्य संमेलन भरवले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षी श्रीलंका व गेल्या वर्षी नेपाळ येथे हे संमेलन झाले. यंदा त्यासाठी थायलंडची निवड करण्यात आली. अखंड भारत या संकल्पनेचा विचार त्यामागे आहे. कॅप्टन नीलेश हे सध्या व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले आहेत. आपल्या कमाईतील तब्बल ७५ टक्के वाटा सावरकर विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यानुसार आतापर्यंत गायकवाड बंधूंनी महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत.
‘वीर सावरकर’ चित्रपटाचा प्रत्येक महत्त्वाच्या शहरातील एक शो त्यांनी प्रायोजित केला होता. त्याचप्रमाणे सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’चे ऑडिओ बुक करून त्याचे मोफत वितरण त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे. आजवर त्यांनी त्या माध्यमातून तब्बल २५ हजारांहून अधिक सीडी वितरित केल्या आहेत. विविध पातळ्यांवर विखुरलेल्या सावरकरप्रेमींना एका हक्काचे व्यासपीठ असावे, ही मंडळी परस्परांशी जोडली जावीत आणि रचनात्मक पद्धतीने सावरकर विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने विवेकानंद केंद्राच्या धर्तीवर सावरकर केंद्र कार्यान्वित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. येत्या काळात संसदेच्या आवारात स्वातंत्र्यवीरांचा पुतळा उभारणे, अंदमानात सावरकर विद्यापीठ आकारास आणणे आणि मार्सेलिसला सावरकरांचे स्मारक उभारणे, हा त्यांचा संकल्प आहे.

abhikul10@gmail.com