आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Tale Of Indian Diamond By Dharmraj Mahulkar

भारतीय हि-यांची चमचमती गोष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सर्वोत्तम मानल्या गेलेल्या दहा हि-यांमध्ये भारतातील पाच हि-यांचा समावेश होतो. हे हिरे भारतात सापडले अाहेत. त्यापैकी काही हिरे चोरले गेले, काही मातीमोल किमतीत तर काही बळजबरीची भेट म्हणून दिले गेले. त्याचीच ही रंजक कहाणी... आपल्याकडे मराठीत रत्नांना ‘खडे’ म्हणतात. हिंदीत ‘पत्थर’, तर इंग्रजीमध्ये ‘स्टोन’ म्हटले जाते. रत्न हे खरोखरच दगड आहेत. हे दगड भृपृष्ठांतर्गत सापडतात. हिरा हा रत्नांचा राजा. भूतलावरील सर्वात कठीण पदार्थ. इतर रत्ने आणि हिरा यात फरक आहे. इतर रत्ने भूपृष्ठाच्या वरच्या थरामध्ये तयार होतात, तर हिरे मात्र भूगर्भात खूप खोलवर म्हणजे, १४५ कि.मी. ते १५० कि.मी. खोल असलेल्या मँटलमध्ये तयार होतात.
भूपृष्ठांतर्गत कार्बन असतो. प्रचंड दाबामुळे कार्बन द्रवरूप अवस्थेत असतो, जेव्हा या द्रावाचा संबंध ज्वालारसाच्या प्रचंड उष्णतेशी येतो, तेव्हा द्रवरूप कार्बनचे स्फटिकीभवन होऊन हिरे तयार होतात आणि भूपृष्ठांतर्गत घडामोडींमुळे ते वर येतात.

हिरा म्हणजे श्रीमंती, वैभव, ऐश्वर्य. हिरा म्हणजे, अप्रतिम सौंदर्याचे प्रतीक. हि-याचे मूल्य चार "C' वरून ठरते- clarily, colour, cut and carat. वजन, रंग, पैलू यावरून हि-याचे मूल्य ठरतेच, पण clarity- नितळपणा, स्वच्छता याला जास्त महत्त्व आहे. अतिशय स्वच्छ, आत रेघा व बुडबुडे नसलेला, िनतळ असा हिरा अतिशय दुर्मिळ समजला जातो.

फार पूर्वीपासून जगातील लोक संपत्तीची खाण म्हणून भारताकडे पाहात आले, आहेत. इ.स.पू. ८००पासून भारतात हिरे सापडत आहेत. सर्वात जास्त आणि सर्वोत्तम हिरे आंध्रप्रदेशात, गोवळकोंड्यातील कोलार या खाणीतून मिळत. नंतरच्या काळात परकियांची आक्रमणे झाली. शक, हूण, तैमूरलंग, महमूद, नादिरशहा, ग्रीक, पर्शियन, मोगल, इंग्रज वगैरे आले, आणि येथील संपत्ती लुटून घेऊन गेले.
ओरलोफ : जगात अस्तित्वात असलेल्या हि-यांमध्ये सर्वात सुंदर व सर्वोत्तम हिरा ओरलोफ आहे. आकाराच्या दृष्टीने पाहिले तर "The Great Star of Africa' ५३०.२० कॅरेटचा असून, तो जगातील सर्वात मोठा हिरा आहे. ओरलोफ, आहे फक्त ३०० कॅरेट. याचा हलका निळा रंग, त्यात हलकी हिरवी झाक आणि त्याचा नितळपणा डोळ्याचे पारणे फेडतो.

इ.स. १७००ची गोष्ट. एक फ्रेंच माणूस दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यात फिरत होता. जबर काहीतरी चोरी करावी, हा त्याचा उद्देश होता. श्रिंगम‌् येथील विष्णूच्या मूर्तीच्या डोळ्यात बसवलेल्या हि-यांवर त्याची नजर गेली. मोठ्या शिताफीने त्याने एक हिरा काढला. दुसरा काढण्याच्या तयारीत असताना काहीतरी गडबड, त्याला ऐकू आली. तो प्रचंड घाबरला आणि तेवढा एकच हिरा घेऊन त्याने पळ काढला. त्याने तो हिरा एका जहाजाच्या कॅप्टनला २००० पौंडात विकला. त्या कॅप्टनकडे तो बराच काळ राहिला. नंतर त्यानेही तो विकला. एक सुंदर हिरा अॅमॅस्टरमॅडला आलाय, तो अतिशय अप्रतिम हिरा आहे, हे रशियन राजदरबारातील एक उच्चपदस्थ ग्रेगरी ओरलोफ याला समजले. रशियाची तत्कालीन सम्राज्ञी कॅथरीनचे प्रेम
त्याला मिळावे, ही त्याची इच्छा होती. त्याने तो हिरा ९०००० पौंडला विकत घेतला. तेव्हापासून या हि-याला नाव पडले 'ओरलोफ'! त्याने तो राणी कॅथरीनला भेट दिला. याबद्दल तिने ओरलोफला संगमरवरचा महाल दिला; पण ओरलोफचे कॅथरीनशी काही सूत जुळले नाही.
या हि-याची ख्याती फ्रेंच राजा नेपोलियन बोनापार्ट याच्या कानावर गेली. तो रशियावर स्वारी करण्याच्या तयारीतच होता. नेपोलियनचे विशाल सैन्य मॉस्कोकडे चाल करून येत आहे, हे राजाला समजले. नेपोलियन ओरलोफ घेतल्याशिवाय जाणार नाही, म्हणून त्याने हा हिरा चर्चच्या घुमटामध्ये लपवला. नेपोलियनला हेरांकरवी ही गोष्ट समजली. पण पुढे असे सांगतात की, नेपोलियनचा सैनिक त्या हि-याला हात लावणार, तोच चर्चमधून पाद्र्याचे भूत प्रकटले आणि त्याने शाप दिला की, जर तू हिरा नेला, तर फ्रेंच सैन्य मायदेशी परत जाणार नाहीत. ज्या वेळी नेपोलियनला ही गोष्ट समजली, तेव्हा त्यानेसुद्धा हिरा न घेताच तेथून पळ काढला.
आज हा अतिशय सुंदर हिरा रशियातील मॉस्को शहरात असलेल्या शासकीय खजिन्यात पाहायला मिळतो.

रिजंट : ओरलोफ सुंदर तर आहेच; पण त्याची बरोबरी करू शकणारा किंवा त्यापेक्षाही सरस 'रिजंट' हा हिरा आहे, असे काही तज्ज्ञ मानतात. हा हिरा १४०.५० कॅरेट असून तो रंगहीन, स्वच्छ व पारदर्शक अाहे. सर्वोत्तम हिरा म्हणून त्याचा नावलौकिक आहे. हा हिराही भारतात सापडला. तो तत्कालीन मद्रास प्रांताचा गव्हर्नर थॉमस पीट या इंग्रज गृहस्थाच्या हातात आला. त्याने १७१७मध्ये त्याला पैलू पाडण्यासाठी तो लंडनला पाठवला. या अप्रतिम हि-याविषयी फ्रेंच राजा लुई याला समजले. पंधराव्या लुईने तो थॉमस पीटकडून राजमुकुटामध्ये जडवण्यासाठी घेतला. पुढे तो सोळाव्या लुईच्या राजमुकुटामध्ये, दहाव्या चार्ल्सच्या राजमुकुटामध्ये जडवला गेला. हाच मुकुट चार्ल्सने त्याच्या राज्यारोहणप्रसंगी घातला होता. त्यानंतर तो सम्राझी इगिनच्या राजमुकुटामध्ये विराजमान झाला. आज याच राजमुकुटामध्ये जडवलेला अप्रितम हिरा पॅरिसमधील ‘लुव्र’ या संग्रहालयात पाहायला मिळतो.

कोहिनूर : आपल्या सगळ्यात जास्त माहिती असलेला हिरा. फार पूर्वीपासून हा हिरा माळव्यांच्या राजाजवळ होता; पण नंतर तो मोगल राजांकडे आला. बरीच वर्षे तो मोगल राजांकडेच राहिला. पुढे तो शहाजहानने त्याच्या प्रसिद्ध ‘मयूर’ सिंहासनात बसवला. जेव्हा नादिरशहाने दिल्ली लुटली, तेव्हा कोहिनूर त्यात होता. कोहिनूर नादिरशहाच्या अंगरक्षकाजवळ होता. जेव्हा नादिरशहाचा वध झाल्याचे त्याला समजले, तेव्हा त्याने तो
पळवला. तो अफगाणिस्तानात गेला. त्याच वेळी त्याने पंजाबचे राजे महाराणा प्रतापसिंह यांची मदत मागितली. त्या मदतीप्रित्यर्थ नादिरशहाच्या अंगरक्षकाने कोहिनूर महाराणा प्रतापसिंहला हा हिरा भेट दिला. पण, १८५०च्या दरम्यान शीख आणि इंग्रज यांच्यात लढाई होऊन त्यात इंग्रजांचा विजय झाला. तत्कालीन इस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने रणजितसिंहना संरक्षण देण्याच्या बदल्यात कोहिनूर द्यावा, अशी अट घातली. म्हणून
महाराणा रणजितसिंहनी तो महाराणी व्हिक्टोरियाला १८५०मध्ये ‘भेट’ म्हणून दिला. सुरुवातीला हा हिरा १९८.६ कॅरेटचा होता. त्याला पैलू पाडल्यानंतर तो १०८.९३ कॅरेटचा झाला. तो राणीच्या बक्ललमध्ये जडवला गेला. नंतर मात्र तो इंग्लंडच्या राणीच्या राजमुकुटामध्ये जडवला गेला. हाच राजमुकुट राणी अलेक्झांड्रिया, मेरी यांनी परिधान केला. १९३७मध्ये महाराणी एलिझाबेथ हिने तिच्या राज्यरोहणाच्या वेळी तो परिधान केला.
कोहिनूर जडवलेला राजमुकुट ‘टॉवर ऑफ लंडन’ या स्थळी पाहायला मिळतो.

निळा होप : आंध्रप्रदेशातील गोवळकोंड्याजवळ कोलारच्या खाणीत सापडलेला हा हिरा इतिहासात बराच गाजला. आतापर्यंत ज्याने ज्याने हा हिरा घेतला, त्याला निरनिराळ्या संकटांना तोंड द्यावे लागले. म्हणून या हि-यावर ‘अशुभ’ म्हणून शिक्का बसला, तो बसलाच. जेव्हा हा सापडला तेव्हा, तो ११२ कॅरेटचा होता. हा भारतातून युरोपात आला तो, १६४२मध्ये. फ्रान्सचा बादशहा चौदाव्या लुईने तो विकत घेतला आणि त्याला पैलू पाडून घेतले, तेव्हा तो ६७.५० कॅरेटचा झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धामधुमीत तो चोरीला गेला. होपसारखाच निळ्या रंगाचा हिरा १८३०मध्ये होप नावाच्या सावकाराला विकला गेला. त्यावरून याला ‘होप’ हे नाव मिळाले. जेव्हा तो होपच्या ताब्यात आला, तेव्हापासून त्याचा -हास सुरू झाली.
त्याला निरनिराळ्या संकटांना तोंड द्यावे लागले. म्हणून त्याने मिसेस एडवर्ड मॅक्लिन या विधवेला तो विकला. मॅक्लिनच्या ताब्यात हिरा येताच
तिच्यावर निरनिराळी संकटे कोसळू लागली. तिचा एकुलता एक मुलगा मारला गेला. कुटुंब विखुरले. तिच्याजवळचा सर्व पैसा गेला. नंतर तिने आत्महत्या केली. १९४९मध्ये न्यूयॉर्कमधील हिरे व्यापारी हॅरी विटंसनने तो खरेदी केला. आता तो वॉशिंग्टनमधील Smithsonian Instituteमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आला आहे.

आयडॉल्स आय : हा एक प्रसिद्ध आणि सर्वोत्तम दहा हि-यांच्या यादीत स्थान मिळवणारा हिरा. तो भारतातील एका मूर्तीच्या डोळ्यात बसवलेला होता, म्हणून त्याला ‘आयडॉल्स आय’ म्हणतात. याचे वजन ७०.२० कॅरेट. काश्मीरच्या सुलतानाची कन्या रशिदा तुर्कस्थानच्या सुलतानाने पळवून नेली, तिच्या सुटकेप्रित्यर्थ हा हिरा तुर्कस्थानच्या सुलतानाकडे गेला. बरीच वर्षे तो खजिन्यातच राहिला. पण तुर्कस्थानच्या शाही खजिन्याचा लिलाव १९०१मध्ये पॅरिस येथे होऊन हा हिरा १.१० कोटी डॉलरला विकला गेला. सध्या हा हिरा लंडन येथील हिरे व्यापारी लॉरेन्स ग्रॅफ याच्या ताब्यात आहे. आज संपूर्ण जगात बोटस्वाना, ऑस्ट्रेलिया, रशिया, कांगो, अंगोला या देशांत हिरे मुबलक प्रमाणात सापडतात. एकेकाळी द. आफ्रिकेत जास्त हिरे
सापडत. पण आता तिथला स्रोत मंदावला आहे. फार पूर्वी आंध्रप्रदेशातील कोलार, मध्यप्रदेशातील पन्ना येथे हिरे सापडत. पण आता येथेही हिरे सापडत नाहीत. ओरिसामध्ये एक मोठा हिराधारी खडक (Kimberlite) सापडला, अशी मध्यंतरी बातमी होती. येत्या काही काळात भारतातही मोठ्या प्रमाणावर हिरे सापडतील, आणि पुन्हा भारत हि-यांची राजधानी होईल, ही आशा.
- धर्मराज माहूलकर
(भूगर्भशास्त्र अभ्यासक)
dharmraj_mahulkar@yahoo.in