आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Tamil Writer Perumal Murugan By Dr.Vishwambhar Chaudhari

'अस्मिता'नावाची असमृध्‍द अडगळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेणारी एक घटना तामिळनाडूत १५ दिवसांपूर्वी घडली. तामिळनाडूमधील नमक्कल या गावी सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, एक संवेदनशील लेखक असलेल्या पी. मुरुगन नावाच्या प्राध्यापक-लेखकानं आपण ‘मृत’ झाल्याचं घोषित केलं! घडलं ते असं की, पेरुमल मुरुगन यांनी ‘मधोरुबगन’ या नावाची एक कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीत तामिळनाडूच्या कोंगुनाडू भागातल्या गतकाळातील एका प्रथेची कथा आहे. त्यानुसार अपत्य जन्माला न घालू शकलेल्या स्त्रिया तिरुचेंगोड येथील ‘मधोरुबगन’ या यात्रेत येत आणि आवडेल त्या पुरुषासोबत समागम करून अपत्यप्राप्ती करून घेत. हे सगळं त्यांच्या नव-याच्या संमतीने चाले आणि ज्या पुरुषापासून गर्भधारणा झाली, त्याला देवाचा मान दिला जाई. ही प्रथा त्यांनी कादंबरीतून चित्रित केल्याचं निमित्त झालं आणि तामिळनाडूतील गौंडूर या प्रबळ समाजाच्या म्हणे, भावना दुखावल्या.
हिंदू धर्माच्या बदनामीची दवंडी पिटली गेली आणि छोटे-मोठे पक्ष अगदी भाजप, द्रमुक, अण्णा द्रमुकसह सर्वच पक्षांनी मतदारांचा अनुनय म्हणून मुरुगन यांची कोंडी केली. प्रकरण थराला गेलं, मुरुगन यांनी माफीनामा लिहून दिला आणि आपण लेखक म्हणून मृत झाल्याचं प्रसारमाध्यमांतून जाहीर केलं. ‘आता माझ्यातील लेखक मेला असे समजा, मी फक्त पगारी प्राध्यापक उरलो आहे,’ असं त्यांनी वेदनेनं सांगितलं.

ही प्रथा काही कपोलकल्पित नव्हे, ती अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होती. जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा धर्ममार्तंडांना ती खटकलीसुद्धा नसावी; पण आता त्यावर एका निष्पाप लेखकानं मनुष्य-स्वभाव-वेधी कादंबरी लिहिली, तर यांची अस्मिता दुखावली गेली आणि यांनी लेखकच मारून टाकला. हे म्हणजे, बायकांना सती देण्याची निर्लज्ज प्रथा आम्ही वर्षानुवर्षे पाळू; पण आता तुम्ही त्यावर कादंबरी लिहायची नाही, अन्यथा आमच्या धार्मिक भावना दुखावतील, असं म्हणण्यासारखंच आहे. बुद्धिदारिद्र्याची अनेक प्रतिभाशाली उदाहरणं आपला समाज नव्या पिढ्यांसमोर नित्यनेमानं ठेवत असतो, त्यात आणखी एका उदाहरणाची भर पडली. गेल्या काही दिवसांपासून हे जातीय आणि धार्मिक अस्मितांचं ढोंग आणि सोंग इतकं वाढलंय, की आपल्या समाजाचा मेंदू नष्ट झालाय आणि केवळ हृदय उरलंय की काय, असं वाटावं. ते हृदय तरी निरोगी आहे का? नाही! त्याला रक्तपुरवठा करणा-या वैचारिक, बौद्धिक धमन्या बंद पडल्यात आणि जाती-धर्माच्या विषारी धमन्यांमधूनच त्याला रक्तपुरवठा होत असल्यानं, ते हृदय केवळ तेवढाच विचार करतंय. विरोधाभास असा आहे की, हिंदू धर्म धोक्यात आहे, अशी हाकाटी जे पिटतात, त्यांना हिंदू धर्माचं आचरण स्वत: करावं असंदेखील कधी वाटत नसावं. त्यातील किती लोक रोज पूजा करतात किंवा मंदिरात जातात, हा संशोधनाचा विषय ठरावा. हीच बाब ‘इस्लाम खतरे में’ म्हणणा-यांना पण लागू पडते.

जातीय अस्मिता ज्या पद्धतीने उतू जात आहेत, त्याला तर तोडच नाही. आमच्या जातीच्या रोजीरोटीचे, शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत तरी चालेल, पण आमच्या जातीत जन्मलेल्या राष्ट्रपुरुषाचे स्मारक झालेच पाहिजे, पुतळे उभे राहिलेच पाहिजेत, संस्थांना नावं दिलीच पाहिजेत, ही त्या त्या समाजाची (जातीची) मागणी आहे. (आजकाल अमुक जात न म्हणता अमुक समाज असं म्हणावं, म्हणजे मग ‘जातीयवादी’ असण्याचा दोष निघून जातो, अशी सर्वमान्य धारणा आहे). त्या त्या जातीतली ती ती माणसं भव्यदिव्य कामं करून गेली. आमची योग्यता फक्त त्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीची, त्यांच्या कामाला पुढे नेण्याची नाही! ही एकूण समाजाच्या दारुण बौद्धिक पराभवाची स्थिती म्हटली पाहिजे. आम्ही बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर होण्यातच ज्यांचे हित सामावले आहे, ते राजकीय पक्ष आणि सरकारदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा बाबतीत आम्हाला प्रोत्साहनच देत राहणार, त्यांना तेच हवंय.

प्रश्न असा आहे की, आपल्या समाजाला फक्त जातीय, धार्मिक, भाषिक किंवा प्रांतीय अस्मिताच का असाव्यात? वैज्ञानिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पर्यावरणविषयक अस्मिता का नसाव्यात? उदाहरणार्थ, भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव किती बिनबोभाट झाला! कल्पना करा, हीच वास्तू शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर, मौलाना आझादांच्या मालकीची असती तर? महाराष्ट्रात या लिलावावरून मुडदे पडले असते! पण आम्हाला वैज्ञानिक अस्मिताच नसल्यानं या वास्तूच्या लिलावाला फारच माफक वृत्तपत्रीय विरोध झाला. कारण होमी भाभा, सी. व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस आमच्या अस्मितेचे विषयच नाहीत! धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना पुण्यात स्वत:चं घरसुद्धा नसणं हा समाजाच्या जाणिवांचा भाग बनतच नाही कधी. आसपासच्या निसर्गाचा कितीही विध्वंस कोणी केला तरी आमच्या पर्यावरणीय अस्मिता जाग्या होत नाहीत, कारण त्या अस्मिता कधी तयारच झाल्या नाहीत. जातीचे टेंभे मिरवणारे आणि आमच्या जातीतील स्त्रियांनी अमुक तमुक प्रकारचे कपडे घालू नयेत वगैरे सांगणारे; ‘आमच्या जातीतील स्त्रियांना उघड्यावर जायला लागू नये म्हणून शौचालये बांधू’ असं कधीच म्हणताना दिसत नाहीत! त्याचं कारण ‘अस्मिता’ हाच मुळात रिकामटेकड्यांनी ऐतखाऊपणा सांभाळत करायचा उद्योग राहिला आहे. स्त्रियांनी अमुक असं वागू नये, असं म्हणायला श्रम आणि पैसा द्यावा लागत नाही, गावागावात शौचालयं बांधायला श्रम आणि पैसा द्यावा लागतो.

वास्तव हे आहे की, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता।’ तुकारामांच्या या बुद्धिप्रामाण्यवादाला आम्ही समाज म्हणून केव्हाच तिलांजली दिलीय. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं जिथं आगरकरांपासून कुरुंदकरांपर्यंत सगळ्याच विचारवंतांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा पराभव करून दाखवण्याचा चंग बांधलाय, तिथं तामिळनाडूसारख्या तुलनेनं कर्मठ राज्याची काय पत्रास? झुंडीपुढं विवेक हरतो, हेच मुरुगन यांच्या प्रकरणानं पुन्हा सिद्ध झालं. मुरुगन यांनी स्वत:ला नाही, विचार करणा-या, विवेकावर विश्वास ठेवणा-या समाजालाच मृत घोषित केलंय! आणि त्यांना प्रतिसाद म्हणून समाजानंदेखील आपल्या वैचारिक मृत्यूची अघोषित कबुलीच दिलीय. शेवटी ‘समाज’ हरला आणि ‘झुंड’ पुन्हा जिंकली, इतकंच!

dr.vishwam@gmail.com