आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमान : पर्यटनस्थळ नव्हे तीर्थस्थळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'काला पानी' अर्थातच सेल्युलर जेल, स्वा. सावरकरांबरोबर अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाची मूकपणे साक्ष देतोे. आज आपण वाचतो, अंदमान म्हणजे, निळेशार पाणी! त्या पाण्याने वेढलेली पाचूंची बेटे!! मग, याला एकेकाळी ‘काला पानी’ का म्हणत असावेत? तर सावरकरांबरोबरच इतर अनेक क्रांतिवीरांवर ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराचं प्रतीक आहे, अंदमान आणि तेथील सेल्युलर जेल, म्हणून 'काला पानी'!!

अंदमान, पोर्ट ब्लेऊर येथे पोहोचताच हा ऐतिहासिक तुरुंग आपलं स्वागत करतो. क्रांतिवीरांच्या असह्य यातनांची आठवण करून देत, मनात एक दहशतही निर्माण करतो आणि देशासाठी शहीद झालेल्या त्या वीरांबद्दल आदरदेखील!! आपण नेहमी सावरकरांचा उल्लेख करतो, पण त्यांच्याबरोबर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरणारे बटुकेश्वर दत्त, योगेंद्र शुक्ला, बरींदर कुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, हेमचंद्र दास, उल्हासकर दत्ता, इंदुभूषण रॉय, बिभूतीभूषण सरकार, हृषीकेश कांजीलाल, सुधीनकुमार सरकार, दिवाणसिंग कालेपानी, अबिनाश चंद्र भट्टाचार्यजी, बिरेंद्रचंद्र सेन, वामनराव जोशी, मौलाना अहमदुल्ला हे सर्व क्रांतिकारकदेखील याच सेल्युलर जेलमध्ये मरणयातना सहन करत होते. सावरकरांचे मोठे भाऊ गणेश सावरकरदेखील येथेच होते.

सेल्युलर जेलची रचना :
उद‌्ध्वस्त झालेल्या काही भागासकट सेल्युलर जेल आज देशभक्तांच्या यातनांची मूक साक्ष देत उभा आहे. यातली वीट न् वीट क्रांतिकारकांच्या यातनांची, त्यांनी ब्रिटिशांना केलेल्या विरोधाची, आणि त्यांच्या त्यागाची कथा सांगते. या जेलचे बांधकाम १८९६ला सुरू झाले आणि १९०६मध्ये पूर्ण झाले. परंतु कैद्यांना किंवा गुन्हेगारांना यापूर्वीपासूनच म्हणजे साधारण १८५७ पासूनच अंदमानात शिक्षा देण्यासाठी आणले जात असे. १८५७च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीयांचा छळ मांडला. ही क्रांतिवीरांच्या यातनामय, भीषण आयुष्याची सुरुवात होती. तेव्हापासूनच कैद्यांना शिक्षा म्हणून मुख्य भूमी भारतापासून दूर अंदमान येथे हद्दपार करण्यास किंवा फाशी देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला व्हायपर बेटावर एक तुरुंग होता, पण १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्य चळवळीला जोर आला व क्रांतिवीरांची, स्वातंत्र्यासाठी लढा देणा-यांची संख्या वाढली. त्यांना कैद करून ठेवण्यास व्हायपर बेटावरील तुरुंग अपुरा पडू लागला, त्यानंतर सेल्युलर तुरुंगाचे बांधकाम झाले. तुरुंग बांधण्यासाठी विटा, दगड हे सर्व साहित्य ब्रह्मदेशातून आणले जायचे. हा तुरुंग तीन मजली असून अशा सात इमारती आहेत. प्रत्येक कैद्याला एक, याप्रमाणे एकूण ६९६ सेल आहेत. यातील प्रत्येक सेलची लांबी १३.५ फूट व रुंदी ७ फूट एवढी असून त्याला समोरून एक लोखंडी दरवाजा आहे आणि त्याचा कडी-कोंडा असा बनवलेला आहे, की जो बाहेरूनच उघडला जाऊ शकतो. प्रत्येक सेलला वरती साधारण १० फुटांवर एक छोटी खिडकी आहे. एका खोलीतील कैद्याला इतर कोणाशी संवाद साधता येऊ नये, काही बोलता येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा संदेश देता येऊ नये, म्हणून प्रत्येक इमारतीची रचना अशी आहे की, एका इमारतीच्या समोरील भागासमोर दुस-या इमारतीचा मागील भाग असायचा, म्हणजे पूर्ण भिंत! या इमारतींमधील प्रत्येक खोली एका ओळीत शेजारी शेजारी आहेत, आणि सर्वांना मिळून सामाईक असा साधारण ४ फूट रुंदीचा एक व्हरांडा आहे. प्रत्येक मजल्याला एक कॉरिडॉर, असे तीन कॉरिडॉर आहेत.

प्रत्येक कॉरिडॉरमध्ये एक वॉर्डन नेमलेला असे. असे एकाच वेळी २१ वॉर्डन ड्युटीवर असत. या तुरुंगातून पळून जाणे केवळ अशक्य असले, तरीदेखील १८६८मध्ये जवळजवळ २४० कैद्यांनी येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी ठरला नाही. इमारतीच्या सर्वात उंचावर अगदी मध्यभागी सगळीकडे लक्ष ठेवण्यासाठी एक उंच टॉवर आहे. सध्या ७ इमारतींपैकी फक्त ३ इमारतीच शिल्लक आहेत. त्यातल्या एका इमारतीतल्या तिस-या मजल्यावरील शेवटची कोठडी, ही सावरकरांची आहे. आत जाऊन पाहिलं की मनात प्रश्न येतो, अशा ठिकाणी माणूस राहू कसा शकतो? तिथेच राहायचं, तेथेच सर्व नैसर्गिक विधी, केवळ नरक!! तिस-या मजल्यावरून खाली आलो की, कैद्यांना जेथे राबवून घेतले जात असे, ती जागा आपणास बघायला मिळते. येथे कैद्यांकडून नारळ आणि मोहरीचे घाण्यावर तेल काढणे, नारळ फोडायला लावून त्यातील खोबरे काढून ते सुकविणे, बागबगीचा सांभाळणे, डोंगर फोडणे, वेत आणि बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे आदी कामे करून घेतली जात. येथे एक फाशी देण्याची जागादेखील आहे, ती बघून मनात ब्रिटिशांविरुद्ध चीड आणि क्रांतीवीरांची आठवण येऊन डोळ्यात पाणी न आले तर नवलच!!

सन १९४२मध्ये जपानी सैनिकांनी ब्रिटिशांना येथून घालवले, आणि मग तुुरुंगामध्ये ब्रिटिश कैद्यांना ठेवण्यात येऊ लागले. परंतु दुसरे महायुद्ध संपल्यानंतर १९४५मध्ये पुन्हा ब्रिटिशांनी या बेटावर वर्चस्व मिळवले. सन १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान-निकोबार ही बेटे भारताकडे सोपवण्यात आली. सेल्युलर तुरुंग ११ फेब्रुवारी १९७९ रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला.

सेल्युलर तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला अनेक क्रांतिवीरांची छायाचित्रे बघायला मिळतात. त्याचबरोबर येथे एक कायमस्वरूपी प्रदर्शनदेखील आहे. पहिल्या मजल्यावर एक आर्ट गॅलरीदेखील आहे, त्याचबरोबर येथे नेताजी गॅलरी आणि ग्रंथालय आहे. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील काही छायाचित्रेदेखील या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. सेल्युलरच्या जवळच सर्व क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ एक स्वातंत्र्य ज्योत अखंड तेवत असते.
साउंड अँड लाईट शो :
सेल्युलर तुरुंगातील राष्ट्रीय स्मारकाच्या आवारात २० ऑक्टोबर १९९०पासून लेफ्टनंट गव्हर्नर आर. एस. दयाल यांच्या हस्ते ‘साउंड अँड लाईट शो’ला सुरुवात झाली. हा शो सुरू होतो, अंदमानच्या ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांनी आणि सर्व वीरांची कथा सांगत पुढे सरकतो!! स्वातंत्र्यासाठी प्राण्यांची आहुती देणा-या वीरांची कहाणी ऐकल्यानंतर आपण नखशिखांत शहारून जातो आणि अंदमानला मनोमन पर्यटनस्थळाचा नव्हे, तर तीर्थस्थळाचा दर्जा देऊन टाकतो.

nileshg.21@gmail.com