आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटेन्शन प्लीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटनासाठीवेगवेगळ्या देशांत फिरणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मित्रपरिवार, सहकारी यांच्याकडून ऐकलेल्या रंजक कथा, अनुभव यामुळे विमान प्रवासाची अनेकांना धास्तीच असते. पण ब-याच वेळा या घटना घडण्याला कारण असते, ते म्हणजे योग्य नियोजनाचा आणि सुस्पष्ट माहितीचा अभाव. याकरिता आपला प्रवास सुनियोजित, आरामदायी व सुरक्षित कसा होईल, याकडे आपण लक्ष पुरविले पाहिजे.
विमान कंपनीची निवड
¾विमान कंपनीची निवड करताना प्रथम त्या विमान कंपनीची गुणवत्ता आणि मूल्यांकन पडताळणी करणे गरजेचे असते. त्याकरिता त्या विमान कंपनीची सेवा, नियमतालिका, आरामाचा स्तर या बाबी नीट तपासून घ्याव्यात. आपले तिकीट बुक करण्याअगोदर त्या संबंधित कंपनीची विश्वासार्हता वेगवेगळ्या स्रोतांकडून तपासून घ्यावी.
¾ तिकीट बुक केल्यावर प्रथम आपल्या संपूर्ण नावाचे स्पेलिंग आणि आपल्या पासपोर्टवरील नावाचे स्पेलिंग सारखेच आहे, याची खात्री करावी. त्यामध्ये काही चूक असल्यास संबंधित विमान कंपनीच्या तिकीट विंडोवर तत्काळ दुरुस्ती करून घेऊन नवीन तिकीट घेणे आवश्यक असते. तिकीट मिळाल्यावर आपल्या प्रवासाची तारीख आणि वेळ अचूक आहे, याची खात्री करावी.
¾ आपण ज्या विमानतळावरून प्रवास करणार आहात, त्या विमानतळाचा कोड पाहून त्याची खात्री करावी. विमानतळावर वेगवेगळे टर्मिनल्स असतात. त्या टर्मिनल नंबरची खातरजमा करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या विमानतळावर एकापेक्षा जास्त टर्मिनल्स असतील, तेव्हा आपण कोठे जाणार आहोत त्या टर्मिनलची खात्री करावी.
¾ आपल्याबरोबर प्रवासाला येत असलेले कुटुंबीय वा सहकारी यांची नीट माहिती घेऊन मगच तिकीट बुकिंग करावे. सोबत कोणी व्यक्ती अपंग असेल, तर विमान कंपनीला तिकीट बुक करतानाच तसे सूचित करावे. विमान निश्चित करताना ते प्रथम कोणत्या मार्गाने आपल्या इच्छित स्थळी जाणार आहे, तेही पाहावे. काही विमाने मध्ये थांबा (स्टॉप ओव्हर) घेऊन मगच पुढील प्रवास करतात.
¾ विमान प्रवासाला निघण्यापूर्वी आपण ज्या देशांना भेटी देणार आहोत, त्या सर्व देशांची नावे, तेथील भारतीय दूतावास, उच्चायुक्त याची संपूर्ण माहिती एका कागदावर लिहून ती आपल्यासोबत सुरक्षित अशा ठिकाणी ठेवावी. जेणेकरून आपल्याला प्रवासादरम्यान किंवा परदेशात गेल्यावर काही अडचणी आल्यास, आपण संबंधितांशी तत्काळ संपर्क करू शकतो.

विमा
विमान प्रवासाला निघण्यापूर्वी आपली विमा पॉलिसी करणे खूप गरजेचे आहे. बरेच जण नियमित प्रवास करत असल्यामुळे याकडे डोळेझाक करतात, परंतु ही अत्यंत आवश्यक बाब आहे. विम्याचा हप्ता फार जास्त नसतो. विमा पॉलिसी करत असताना ती विश्वासू कंपनीचीच असेल, याची खात्री करावी. पर्यटनादरम्यान आपणास कोणत्याही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासल्यास, विमा पॉलिसीची खूप मदत होते. परदेशामध्ये तेथील नागरिकांना वैद्यकीय सेवा विनामोबदला किंवा अल्प दरात उपलब्ध असली तरी आपल्याला ती खूप महाग व खर्चिक असते. अशा वेळी आपली व्यक्तिगत आणि आपल्या मौल्यवान सामानाचीदेखील विमा पॉलिसी असावी.

लेखी नोंदी
आपला विमान प्रवास व पर्यटन सुखरूप होण्याकरिता काही गोष्टी आधीच नियोजित करून ठेवाव्यात. आपण प्रवासाला निघण्यापूर्वी खालील गोष्टींची नोंद एका कागदावर करून तो नेहमी आपल्याबरोबर राहील अशा पद्धतीने ठेवावा. आपला पासपोर्ट नंबर, त्याची इश्यू डेट, एक्स्पायरी डेट, इन्शुरन्स पॉलिसी नंबर, आपण ज्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत त्या हॉटेलचे नाव, पत्ता, फोन नंबर, त्या देशाच्या भारतीय दूतावास, उच्चायुक्त यांचे नाव, पत्ता, फोन नंबर, तसेच आपल्यासोबत असलेल्या सामानाचे वर्णन, त्याचे टॅग, सीरियल नंबर, तसेच बॅगेजनुसार वेगवेगळी संपूर्ण सामानाची यादी, व्हिसा या गोष्टी नेहमी आपल्याबरोबरच राहतील, या दृष्टीने एक छोटा पाऊच करावा. हा पाऊच आपण कायम आपल्याबरोबर बाळगू शकू, असा असावा. त्यामध्ये चलन मात्र पाच हजार रुपयांपेक्षा जास्त ठेवू नये. कारण तोच पाऊच हरवला, तर खूप बाका प्रसंग येऊ शकतो.
nileshg.21@gmail.com