आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हंजे...म्हंजे...वाघाचे पंजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा का हेतू मनात आला की, संपलंच सगळं. काही दिवसांपूर्वी सुंदरबनला गेलो. मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश अनेक ठिकाणांहून यूथ होस्टेलतर्फे आम्ही ५० जण जमलो. प्रत्येक जण आपल्याला आपल्या चक्रातून बाहेर काढायला आला होता. तिथला निसर्ग पाहूनच खूप नवं नवं वाटत होतं. वर्तमानपत्र, टीव्ही वगैरे काही नाही. लाँचमधून प्रवास करताना अनेकांचे कॅमेरे चालू होते. पाण्यात जाळं टाकून, चिखलातून ते खेचत जाणा-या स्त्रिया, मुली... सगळ्यांना ते नावीन्यपूर्ण होतं. पण त्यांचं ते दैनंदिन जीवन होतं. तसं नाही केलं तर संध्याकाळी जेवण नाही, इतकं साधं गणित होतं. पण, आमच्या दृष्टीने तो उत्तम फोटोग्राफ होता.

सुंदरबन म्हटल्यावर प्रत्येकाला वाघ बघण्याची उत्सुकता होती. त्याच ओढीने बहुतेक सगळे आले होते. एका बेटावर गेल्यावर सगळे धावले. सर्वप्रथम माकडांनी स्वागत केलं. कोप-यात उड्या मारत होती. इतक्यात एका पुणेकराच्या कॅमे-याला चिखलावर आलेले लाल खेकडे दिसले. सर्व मंडळी खेकड्याचेच फोटो काढू लागली. अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे खेकड्यांचे फोटोसेशन चालले होते.

फट् फट् आवाज करत लाँच चालत होती. इतक्यात आवाज बंद झाला. सर्व शांत झाले. समोरच एक भलीमोठी मगर सुस्तावून पडलेली होती. सर्वांनाच तिचे नवल. तिला काहीच नाही. तिने साधा डोळा उघडूनही बघितलं नाही. पण, सर्वांच्या कॅमे-याचे डोळे सतत उघडमीट करत होते. ‘मगर तर दिसली’, असे म्हणत प्रत्येक जण आपल्या कॅमे-याच्या स्क्रीनवर मगरीचे अवलोकन करत होता.

नदीतला प्रवास करताना आणि तोही सुंदरबनच्या आसपासचा, खूप बरं वाटत होतं. वारा भन्नाट होता. निसर्गाची विविध रूपं बघताना दोन डोळे अपुरे पडत होते. अनेकांनी तपशीलवार सुंदरबनवर लिहिलं आहे. परंतु, मला एक गोष्ट जाणवली की, माझं स्वत:चं तिथे जाणं निर्हेतुक होतं. समोर समुद्रात पक्षी होते, लाँचचा आवाज ऐकताच भुर्रकन उडून जात. तशी अनेक नजरा, कॅमेरे त्यांचा वेध घेत. मनात एक विचार आला, काय मस्त आयुष्य आहे, हवं तेव्हा उडायचं, हवं तेव्हा फिरायचं. पुढे समोर मोठा पाण्याचा पट्टा आणि पलीकडे बांगलादेश. या पक्ष्यांना, प्राण्यांना कधीच पासपोर्ट, व्हिसा लागला नसेल. पण, आम्ही आमचं आयुष्य कसं सीमित करून ठेवलं आहे. हे सीमित आयुष्य जगताना कुठे तरी सुटायचा आम्ही प्रयत्न नेहमीच करतो. सुंदरबनामध्ये तेच होतं. आमचं सीमित आयुष्य आम्ही विस्तारण्याचा प्रयत्न करत होतो...
तिथली माणसे, त्यांचे व्यवसाय, त्यांची छोटी छोटी दुकाने खूप लोभसवाणे होते. गावातले लोक, त्यांची दु:खं, त्यांचे विचार यांकडे नीट बघितले तर कुठेही त्रागा नव्हता. सगळं काही सहजपणे चाललंय, असं वाटत होतं.

आमची मुंबईची मंडळी तिथेही भाव करतच होती. निदान तिथे तरी करायला नको, अशी माझी साधी भूमिका. आपण प्रत्येक गोष्टीसाठी झगडत असतोच; मग इथे कशाला, असा माझा साधा सरळ विचार. दुस-या बेटावर लांबवर पाठमोरा वाघ बघितला, बसलेला. सगळे जण सावध झाले. पण हा सुट्टा कसा, तर नीट पाहिल्यावर ते वाघाचे मोठे टेडी बेअर होते. लोकांनी त्याच्याबरोबर फोटो काढायला सुरुवात केली. तेव्हा रखवालदाराने त्याला कडी-कुलपात ठेवले. तर दुस-या तळ्यात मधोमध एक भली मोठी मगर, ते पण असेच असणार. पाच-दहा मिनिटे गेली. दृश्य स्थिरच होतं. इतक्यात तिचं तोड उघडलं आणि मग कॅमेरे सुरू झाले. आपण सर्व प्राणी पिंज-यात पाहतो, पण इथे आपण वेगळ्या पिंज-यातून त्यांना पाहत असतो, कधी तो खरा असतो तर कधी भीतीचा... पण आम्हाला अजूनही व्याघ्रदर्शन झाले नव्हते. अनेक जण मनातल्या मनात, उघडपणे धुसफुसत होते. इतक्यात एका बेटावर वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या. अगदी, काही तासांपूर्वी येऊन गेला असणार. सगळे हळहळले. त्या खुणा एकदम ठाशीव होत्या, तशा नदीकाठीही दिसल्या. अर्थातच, वाघाची अवस्था वेगळी होती. तो मोकळा, आम्ही पिंज-यात म्हणजे, सुरक्षित. तो जर आम्हाला बघायला आला असता तर दिसला असता ना? पण इथे वेगळेच. आम्ही पिंज-यात बसून त्याची वाट बघत होतो... मग आमच्या नशिबी त्याची पावलंच असणार. तरीही वाघ दिसला नाही म्हणून, नाराज कशाला व्हायचं? इतर तर सगळं व्यवस्थित होतं. वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आमच्याकडे फोटोच्या स्वरूपात होत्याच. त्याचा आनंद मानत, आम्ही परत आपापल्या चक्रात जाणार होतो. आयटीवाले बिचारे भरपूर होते. त्यांना तो स्वच्छ प्राणवायू चार-सहा महिने टिकवायचा होता; परंतु त्यांना तो न दिसलेला वाघ मात्र शेवटपर्यंत अस्वस्थ करत राहिला...
खरं तर या अस्वस्थपणातच मजा असते, असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही, आपण... म्हणजे...
म्हणजे... म्हणजे... काय तर वाघाचे पंजे! त्याचीच आठवण घेऊन आम्ही निघालो, परत कधी तरी येण्यासाठी...

satishchaphekar5@gmail.com