आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यावर होमिओपॅथीने करा मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाची चाहूल लागते. या दिवसात थंडी कमी होऊन हवा व उष्णता वाढते. साहजिकच याचे शरीरावर परिणाम होतात व ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यातील मुख्य तक्रार म्हणजे डोकेदुखी, अर्धशिशी किंवा संपूर्ण डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, चक्कर येणे, पित्त होणे, अस्वस्थ वाटणे, घबराट, रक्तदाब कमी किंवा जास्त होणे, अशांत झोप ही शारीरिक लक्षणे दिसून येतात. यासाठी पूर्वकाळजी म्हणून संपूर्ण अंग झाकलेले कपडे वापरा. कपडे शक्यतो सुती, सैलसर व फिक्या रंगाचे असावेत. डोक्यावर सुती रुमाल, टोपी किंवा छत्री वापरावी. बाहेर पडण्याअगोदर हलका नाश्ता व ताक घ्यावे. डोकेदुखीसाठी बेलाडोना, नकस, ब्रायोनिया, ग्लोनाइन, व्होनिका, नॅट्रममूर, स्पायनेलिया ही औषधी अतिशय वेगाने तर काम करतातच, पण जुनाट डोकेदुखीसुद्धा कायमस्वरूपी बरी होण्यास मदत होऊ शकते. उन्हाळ्यातील दुसरी मुख्य तक्रार म्हणजे सनबर्न किंवा सोलार डर्मेटायटिस. यामध्ये त्वचा कोरडी होऊन आग होणे, खाज येणे, त्वचेवर लालसर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात. सनबर्न टाळण्यासाठी शक्यतो दुपारी 12 ते 5 या वेळेत उन्हात कमीत कमी राहण्याचा प्रयत्न करावा. उन्हात जाण्यापूर्वी व उन्हात असतानाही चांगल्या व उच्च दर्जाच्या सनस्क्रीनचा वापर करावा.

सूर्याच्या सान्निध्यात येणारे शरीराचे अंग झाकावे. उन्हातून आल्या आल्या पाणी पिणे टाळावे. थंड पाण्याने अंघोळ करावी. मऊ कपड्याने त्वचा कोरडी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सनस्क्रीन वापरावे. याबरोबरच नायट्रस मूर, सल्फर, ग्रॅफायटिस, सोनायनम, कॅनथॅरिस, असन्निक अल्बम, बेलाडोना, एपिस मेलिफिका ही औषधी अत्यंत गुणकारी ठरतात. उन्हाळ्यातील लहान मुलांची समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे किंवा घोळाणा फुटणे. यासाठी लहान मुलांना शक्यतो उन्हात खेळू देऊ नये. गरम पदार्थ किंवा अतिउष्ण जसे गूळ, पपई वर्ज्य करावे. नाकात वारंवार बोट टाकणे किंवा जोराने शिंकणे टाळावे. नाक फुटल्यास घरी प्रथमोपचार करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे. थंड पाणी किंवा बर्फाचा उपाय करावा. विशिष्ट रक्त तपासण्या व औषधी यामुळे नाकातून रक्त येण्याचा त्रास कमी होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये हेमामॅलिस, मिलोफोलिअम, फॉस्फोरम, ट्रिलिअम आमोनियम कार्ब, व्हायपेरा, अरम ट्राफायम, एरोगेरॉन, थॅलाप्सी बर्सा यासारख्या औषधांचा प्रभावी उपयोग करू शकतो. उन्हाळ्यातील सर्वच वयोगटात दिसून येणारी पुढील तक्रार म्हणजे लघवीला आग, जळजळ होणे. वाढती उष्णता व तापमानामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीत होणारा असमतोल यास कारणभूत असतो. स्त्रियांच्या शारीरिक अवयवांमधील रचनेमुळे त्यांच्यामध्ये हा त्रास प्रामुख्याने दिसतो. त्यासाठी उन्हाळ्यात पाणी तर भरपूर प्यावेच, पण पाणीदार फळे उदा. टरबूज, खरबूज, काकडी तसेच ताक, लिंबू-सरबत, गुलकंद आवळा रस किंवा कोकम सरबत इत्यादींचा आहारामध्ये समावेश करावा. ते फायदेशीर ठरते. याचबरोबर एपिस, मेलिफिका, कॅन्थारिन, स्टॅफीसअ‍ॅत्रिआ, सल्फर, टेरेबिया, सार्सापरिला, बेबिरिस, व्हळगेरिस ही होमिओपॅथिक औषधी गुणकारी ठरतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही भिन्न आहे. व त्याची शारीरिक व मानसिक जडणघडणही वेगवेगळी आहे. यामुळे व्यक्तीविशिष्ट होमिओपॅथीमध्ये पत्येक व्यक्तिमत्त्वचा सर्वांगीण अभ्यास व विचार केला जातो. त्यामुळे वरील औषधी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊन आपला उन्हाळा सुसह्य करावा. कारण होमिओपॅथी ह्युमन फ्रेंडली आहे.