आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवजातीचे आशास्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्वदच्या दशकात जागतिक व्यापार संघटना आणि वर्ल्ड बँकेच्या मदतीने सर्व देशांची एकमेकांवर अवलंबून असणारी एकत्रित अर्थव्यवस्था उभारण्यात माणसाला यश आले. धार्मिक वा राजकीय मतभेद पाळूनही सर्व माणसे भांडवलशाहीच्या एका नव्या सभ्यतेत गुंफली गेली आणि मग माणसाचे वेगाने आधुनिकीकरण सुरू झाले. या प्रक्रियेत अर्थातच हजारो वर्षे जतन केली गेलेली संस्कृती, साहित्य, आणि पिढ्यान् पिढ्या मौखिकरीत्या हस्तांतरित केली गेलेली बौद्धिक संपदा काळाच्या उदरात वेगाने गडप व्हायला लागली. माणूस आपल्या पूर्वजांपेक्षा हुशार होण्याच्या नादात सार्वत्रिक भूतकाळाशी असलेले आपले नाते गमावून बसला आणि भांडवलवादाच्या आधुनिक जीवनपद्धतीवर विसंबून जगू लागला.
इथपर्यंत सगळे ठीक चाललेले होते. मग पुढे तंत्रज्ञान सोपे बनून सॅटेलाइटने बनविलेले नकाशे सामान्य नागरिकाला बघायला मिळाले.
गुगल अर्थ’सारख्या अ‍ॅपमध्ये आपले घर आकाशातून कसे दिसते, या स्वतःपुरत्या कुतूहलातून थेट चीनची भिंत आणि इजिप्तचे पिरॅमिड कसे दिसतात, या जागतिक कुतूहलापर्यंत पोहोचणे कुणालाही शक्य झाले. ‘गुगल अर्थ’वरून देशोदेशीच्या माणसांची घरे, प्रागैतिहासिक आणि आधुनिक इमारती, रस्ते, नगररचना बघता बघता माणसाची
नजर वळली ती वेगवेगळ्या जंगलांवर. कुतूहल म्हणून असे तपशीलवार नकाशे बघत असताना अचानकच गर्द जंगलात वस्ती करून राहणा-या काही आदिवासी जमातींचा शोध लागायला सुरुवात झाली. प्रगत जगातल्या लोकांना या जमातींकडे पोहोचण्यासाठी रस्ते उपलब्ध नव्हते, ना दळणवळण यंत्रणा. त्यामुळे या लोकांचे वर्गीकरण संपर्कविरहित जमातीमध्ये (Uncontacted Tribes) करण्यात आले.

आज जगभरात जवळपास १०० ठिकाणी अशा आदिवासी जमाती आहेत; ज्यांची एकूण लोकसंख्या केवळ वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. उपग्रह आणि हेलिकॉप्टरमधून मिळालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे लोक जंगलात झावळ्याची घरे बनवून राहताना दिसतात. धनुष्यबाण हे त्यांचे प्रमुख हत्यार. यातले पुरुष शिकार करण्याचे, तर स्त्रिया अन्नस्रोत जमा करण्याचे काम करतात. जगण्यासाठी लागणा-या सर्व गरजांची पूर्तता जंगलातच होत असल्याने या जमातींच्या वस्त्या स्वयंपूर्ण आहेत. बाह्यजगाशी त्यांना कसलेही देणेघेणे नाही, त्यामुळे आधुनिक युगातल्या जागतिक अर्थव्यवस्थेचा त्यांना उपयोग नाही. त्या अर्थव्यवस्थेत जिवंत राहण्यासाठी लागणा-या चलनाशी त्यांचा संबंध नाही. साधारण दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी माणूस जसा जगत असेल, त्या पद्धतीने जगूनही या जमाती आजही जिवंत आहेत. आणि जागतिक व्यवस्थांशिवाय जगत असल्यामुळे त्यांना ‘पृथ्वीवरची शेवटची स्वतंत्र माणसे’ हे विशेषण दिले गेले आहे. भारतात यातली ‘सेंटिनलीज’ नावाची एक जमात अंदमान बेटांच्या समूहातील एका दुर्गम बेटावर जगत आहे. त्यांची लोकसंख्या जेमतेम ४० ते ५०. ‘बीबीसी’ या आंतराष्ट्रीय वृत्तसमूहाने साधारण २००६च्या सुमारास मानववंशशास्त्राचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांसोबत सर्वप्रथम जेव्हा संपर्क न साधल्या गेलेल्या जमातींची माहिती पुढे आणली, तेव्हा अर्थातच प्रचलित जगात बरीच खळबळ उडाली. माध्यमे, संशोधक, अर्थतज्ज्ञ आणि धर्मगुरू या सगळ्यांनाच या नव्याने शोध लागलेल्या जमातींचा फायदा करून
घ्यायचा होता. या घडामोडीत अर्थतज्ज्ञांंना स्वयंपूर्ण अर्थव्यस्थेत मानव आनंदी राहू शकतो का, याबद्दल माहीत करून घ्यायचे होते आणि ट्रॅव्हल कंपन्यांना त्यांच्याशी पहिला संपर्क साधण्याच्या अनुभवाची पॅकेज डिल बनवून अ‍ॅडव्हेंचर शोधणा-या नवयुवकांना विकायची होती.
धार्मिक लोकांना त्यांच्या धर्माच्या मुक्तीचा संदेश या लोकांपर्यंत पोहोचवायचा होता आणि माध्यमांना त्यावर मसालेदार माहितीपट बनवायचे होते. प्रगत जगाने आदिवासींनी लोकांना दिलेला आजपर्यंतचा काळा इतिहास पाहता मात्र या प्रकारांतून अर्थापेक्षा अनर्थ ओढवण्याची शक्यताच जास्त होती. त्यामुळे या जमातींचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ‘सर्व्हायवल इंटरनॅशनल’सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि संयुक्त राष्ट्राने या जमातींच्या जीवनात वा निवासी भागात कुठलाही हस्तक्षेप न होऊ देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साडेसहाशे कोटी
लोकांच्या प्रगत जगाचे नेतृत्व करताना संयुक्त राष्ट्राने या जमातींकडेही स्वतंत्र राष्ट्राच्या नजरेतून पाहिले, हा आतापर्यंतचा सर्वात सुखद अनुभव होता. निरनिराळ्या स्वरूपांचे आजार जसे माणसाला होतात, तसे वनस्पतींनाही होतात आणि अशा आजारापासून बरे झाल्यानंतर वनस्पतींच्या खोडात आणि सालीत तयार झालेल्या रोगप्रतिकारक द्रव्यांच्या वनौषधींवर
आरोग्यपूर्ण जीवन जगणा-या या आदिवासींना पाहून सतत छोट्यामोठ्या व्याधींनी ग्रासलेल्या शहरी लोकांना त्यांचा हेवा वाटला, कमीत कमी गरजामध्ये जीवन व्यतीत करण्याची फॅशन काढणा-या शहरी निसर्गवाद्यांनाही हे आदिवासी प्रेरणादायी ठरले. अलीकडच्या वेगाने वाढलेल्या चंगळवादी समाजाकडे बघता या युगातही चलनी नोटा, क्रेडिट कार्ड, एअरकंडिशन आणि कारशिवाय जगता येऊ शकते; स्वयंपूर्ण वस्त्या बनविल्या जाऊ शकतात; महत्त्वाचे म्हणजे, यशस्वीरीत्या वाचविल्या जाऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे, या जमाती आहेत. मात्र आपण संस्कृती आणि परंपरांशी फारकत घेऊन जगण्याच्या उपजत ज्ञानाशीही फारकत घेऊ लागलो आहोत.
आज प्रत्येकाच्या हातात इंटरनेट, मोबाइल फोन आले असले, तरी त्याचा वापर गेम खेळण्यासाठी किती आणि नवीन ज्ञान मिळविण्यासाठी किती होतो, याबद्दल साशंकता आहे. शिक्षणाने माणूस समृद्ध होईल, ही अपेक्षा फोल ठरवत इंग्रजी अक्षरओळख असणारी बोलक्या
पोपटांची एक नवी निरक्षर पिढी आपण तयार केली आहे. उद्या फुगवत नेलेली आभासी अर्थव्यवस्था कोसळल्यास, यातल्या किती लोकांना मूलभूत ज्ञानाचा वापर करून जिवंत राहता येईल, याबद्दल साशंकताच आहे. कारण, उपलब्ध क्षमतेपेक्षा दहापट उत्पादन घेणारी प्रचलित शेतीपद्धती ही भांडवलवादी अर्थव्यवस्थेवर आधारलेली आहे. उद्या अर्थव्यवस्था
कोसळल्यास ही शेतीपद्धती आपोआपच धोक्यात येऊ शकते. असे झाल्यास सातशे कोटींमधले किती लोक शेती वा शिकार करून आपले पोट भरू शकतात, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे हास्यास्पद येते. अर्थात, सातशे कोटी लोकांचा उदरनिर्वाह स्वयंपूर्णतेने चालण्यासाठी कितपत जमीन वा नैसर्गिक संपत्ती आपल्याजवळ उरलेली आहे, हाही प्रश्नच आहे. प्रगत जीव जन्माला घालणे ज्याप्रमाणे निसर्गाला नवीन नाही, त्याचप्रमाणे एक प्रगत जीव म्हणून जन्माला येत विकसित नागरी व्यवस्था उभारणेही माणसाला नवीन नाही. गेली पाच हजार वर्षे सभ्यतेचे वेगवेगळे प्रयोग माणसाने या पृथ्वीतलावर चालविले आहेत. या प्रयोगात त्याने इजिप्तचे पिरॅमिड‌्स, चीनची भिंत, अंगकोर वटसारखी मोठी देवळे, भानगढ आणि पेट्रासारखी मोठमोठी शहरे, तर भाक्रा नांगल आणि हुवरसारखी मोठमोठी धरणे बांधली. निरनिराळ्या कारणासांठी सभ्यता
जशी विकासाची परिसीमा गाठते, तशीच ती अवनत होऊन कोसळतेही. हराप्पा, मोहेंजोदरो, इन्का आणि अशा कितीतरी संस्कृती विकासाच्या परमोच्च बिंदूपाशी जाऊन नष्ट झाल्या. त्यांच्या मागे नैसर्गिक दगड-विटांच्या इमारती आणि जी काही चित्रे आहेत तीदेखील यथावकाश काळाच्या उदरात गडप होतील, कारण या सर्व संस्कृती ‘सेंद्रिय’ होत्या.
ज्या निसर्गात त्यांनी जन्म घेतला त्या निसर्गात परत सामावले जाण्याची क्षमता त्यांच्यात होती. आधुनिक मानवाच्या सभ्यतेकडे बघताना मात्र जो एक महत्त्वाचा फरक आपल्याला दिसतो तो आहे, ही सभ्यता असेंद्रिय असण्याचा. प्लास्टीकच्या कच-याचे वाढत जाणारे डोंगर, वातावरणात पसरविला जाणार कार्बन आणि पाण्यावर तरंगणारे थर्माकॉलचे थर आपल्या जाण्यानंतरही हजारो वर्षे या पृथ्वीवर असेच पडून राहतील. व्यापक दृष्टिकोनातून माणूस अमर नाही, पण त्याने निर्माण केलेला कचरा मात्र अमर राहणार आहे. या भयावह सत्यात मग अॅमेझॉनच्या जंगलात, आफ्रिका, इंडोनेशिया आणि भारताच्या अंदमानसारख्या प्रदेशात जगणारे संपर्करहित आदिवासी लोक मानवप्राण्याच्या पृथ्वीवरच्या अस्तित्वाची बीजे ठरतात. आजही नैसर्गिकरीत्या विघटित होऊ शकणारे जीवन जगून त्यांनी या पृथ्वीतलावर जिवंत
राहण्याची त्यांची पात्रता आधुनिक माणसापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सिद्ध केली आहे. भविष्यात साडेसहाशे कोटी लोकांची अत्याधुनिक प्रजाती पूर्णतः नष्ट झाली तरी या वीस हजार माणसांमध्ये त्यांची प्रजाती जिवंत राहील. यथावकाश त्यातून मानवतेचा नवा विकासक्रमही घडविला जाऊ शकतो. या ग्रहाच्या इतिहासातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, माणसासारखा हुशार प्राणी जन्माला येणे. या प्रजातीतल्या काही लोकांना निसर्गाने अजूनही पूर्णतः हुशार ठेवलेले आहे. निसर्गाने भविष्यासाठी काही तरतूद अगोदरच करून ठेवली आहे. आता वेळ आली आहे, ती आधुनिक माणसाने आपल्या भविष्यासाठी तरतूद करण्याची.

छायाचित्रे : ग्लिसन मिरांडा - सचिव प्रसारण विभाग, रिओ ब्रॅको ब्राझील
rahulbaba@gmail.com