आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तबंबाळ युक्रेन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका आणि रशिया. कंझ्युमरिझम आणि कम्युनिझम या दोन टोकाच्या विचारसरणींच्या बळावर अवघ्या जगाचा ताबा मिळवू पाहणारे आधुनिक इतिहासातले दोन मस्तवाल देश. दहशतवादाला विरोध करण्याच्या सबबीखाली इराक आणि अफगाणिस्तान उद्ध्वस्त करून झाल्यानंतरही जशी आर्थिकदृष्ट्या गाळात गेलेल्या अमेरिकेच्या अंगातली रग जिरलेली नाही, तसेच शीतयुद्धपश्चात देशाची शकले होऊनही रशियाची मस्ती उतरलेली नाही. उलट रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन सोविएट विघटनानंतर वेगळे झालेले शेजारी देश गिळंकृत करण्याचा म्हणजेच जगाचा समतोल बिघडवणारा धोकादायक खेळ खेळू पाहताहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी युक्रेनचा स्वायत्त प्रांत असलेल्या क्रिमियावर घुसखोरी करण्याचा डाव खेळून पाहिला. आता ते आंतरराष्ट्रीय संकेत झुगारत किव आणि खारकिव ही युक्रेनची दोन महत्त्वाची शहरे ताब्यात घेऊ पाहत आहेत. तसे करताना दादागिरीच्या बळावर त्यांनी मोठ्या प्रमाणात रशियन सैनिक या शहरांमध्ये घुसवले आहेतच; पण, युक्रेनमधल्या फुटीरवादी संघटनांना हाताशी धरून युक्रेन समर्थकांशी रक्तरंजित संघर्षही आरंभला आहे. रशियाच्या दांडगाईला आवर घालण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्हिक्टर यांकोविच यांनी युरोपियन युनियन आणि अमेरिकेला मदतीची हाक दिलेली आहे. मात्र त्यापुढे पुतीन नमते घेतील, अशी सध्या तरी परिस्थिती नाही.

गेले तीन महिने जो काही संघर्ष सुरू आहे, त्यात युक्रेनचा पूर्व भाग रक्तबंबाळ झाला आहे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पेट्रोल
बॉम्बमुळे सगळीकडे आगीचे लोळ उठताहेत. सरकारी इमारती, घरे, रस्त्यावरील गाड्या आगीचे भक्ष्य ठरताहेत. लष्कर आणि विरोधी संघटनांमधल्या धुमश्चक्रीत चिलटं मरावीत त्याप्रमाणे माणसं मरताहेत. ढासळत्या इमारती, पेटते टायर्स, जळती वाहने, रक्ताने माखलेली माणसे हे नित्याचे दृश्य बनले आहे.

ज्वाळांनी वेढलेला युक्रेन सध्या विविध जहाल गटांत विभागला गेला आहे. त्यात रशिया समर्थकांचा युक्रेन सरकारला विरोध करणा-यांचा एक गट आहे. युक्रेनला समर्थन देणारा दुसरा गट आहे. यातल्या रशिया समर्थक गटांना रसद पुरवण्यासाठी रशियाने उघडपणे लष्करी शिरकाव केला आहे, आणि या सगळ्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावलेले युक्रेनचे पोलिस चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव घेत आहेत. स्वातंत्र्यानंतर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी युक्रेनला रशियावर विसंबून राहावे लागले आहे. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेत, रशिया युक्रेनला वारंवार गुडघे टेकायला भाग पाडत आहे. रशियात सामील होऊ इच्छिणा-यांचा एक गट सध्या युक्रेनमध्ये खूप प्रभावी बनला आहे. एका बाजूला हिंसाचार, जाळपोळ आदी घटना घडत असताना निषेध मोर्चे काढून युक्रेन सरकारवर दबाब आणणे, हे या गटाचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे.

याच युक्रेनविरोधी गटाचा आंदोलक दिमित्रो बुलाटोव्ह. मोटारसायकलस्वारांच्या सरकारविरोधी आंदोलनादरम्यान अचानक गायब झाला. आठवडाभराने त्याचे दर्शन झाले, तेव्हा त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. एक कान कापलेला होता आणि शरीर काळेनिळे पडलेले होते. घडल्या प्रकाराबद्दल बोलताना त्याच्या चेह-यावरचे भय लपत नव्हते. ‘ऑटो मैदान रॅली’ सुरू असताना त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याचा शारीरिक छळ करण्यात आला. हातांवर खिळे ठोकण्यात आले आणि त्याच अवस्थेत आठ दिवसांनी जंगलात सोडून देण्यात आले. बुलाटोव्हची अवस्था पाहून देशातली परिस्थिती आणखीनच बिघडली. तो अस्वस्थतेचे प्रतीक बनून गेला.
हॉटेल युक्रेन हे किवच्या मध्यवर्ती चौकात वसलेले हॉटेल. या हॉटेल परिसरात डोक्यावर हेल्मेट, हातात शस्त्रे अशा पूर्ण तयारीनिशी आलेले पन्नास-एक आंदोलक आणि स्निपर रायफलधारी पोलिसांत धुमश्चक्री माजली. आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी तुफानी गोळीबार सुरू केला. त्यात आठ जण जखमी झाले. जखमींना जवळच्याच हॉटेलमध्ये नेण्यात आले. रक्ताने माखलेल्या लॉबीमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू झाले. एक पाद्री स्वत:ला वाचवण्यासाठी म्हणून लॉबीत शिरला. एका माणसाच्या अंगावर रेलला. त्याने सहज त्या माणसाची नाडी तपासली. तो मेल्याचे त्याच्या ध्यानात आले. लॉबीसमोरच्या एका खोलीकडे त्या पाद्रीचे लक्ष गेले. तेथे सहा मृतदेह ठेवलेले होते. मृतदेहांच्या हाताला नाव, जन्मगाव आणि वय लिहिलेला कागद दो-याने बांधलेला होता. इकडे बाहेर जमलेले आंदोलक आणखी आक्रमक बनले होते. त्यांनी हॉटेलच्या खिडक्यांवर पेट्रोल बॉम्बचा मारा सुरू केला. तासाभराने काही पत्रकार घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हॉटेल लॉबीमध्ये 12 मृतदेह त्यांच्या नजरेस पडले. काहींनी हा आकडा 60 असल्याचे सांगितले. परंतु युक्रेनियन डॉक्टरांनी 20 जण मरण पावल्याचे जाहीर केले. किव प्रशासकीय इमारतीबाहेरच्या संघर्षात जखमी आंदोलकांना उपचारासाठी नजीकच्या उपचार केंद्रात नेण्यात आले तेव्हा, त्यातल्या तिघांचे डोळे गेले होते, एका माणसाचा हात तुटला होता आणि 60हून अधिक पोलिसही गंभीररीत्या जखमी झाले होते. अर्थातच, युक्रेनचे जगापुढे आलेले हे केवळ एक भीषण रूप आहे. माणुसकी, सामंजस्य आणि सौहार्द हे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ कुणाला कळू नयेत, अशी सध्याची ही अवस्था आहे. या अवस्थेतून युक्रेनचे बाहेर पडणे आणि सावरणे हे या घटकेला तरी दिवास्वप्नच आहे.