आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमगाईड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रविवार असल्याने बाबा घरी होते. दुपारी जेवण झाल्यावर म्हणले, ‘मला वाटतं आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. तर थोडं थंड वाटण्यासाठी आपण कुठली नवीन वस्तू घेऊया मिहीर?’

हे ऐकताच मिहीरचे डोळे चमकले. तो मनातल्या मनात यादी करू लागला. इतक्यात आजी आली. मिहीरकडे पाहत म्हणाली, ‘अंहं. यादी मनात नको. आम्हाला ऐकू येईल अशी तरी करा की. आम्ही पण सुचवू की एक-दोन गोष्टी. काऽऽय?’
मिहीर आजोबांच्या मांडीवर बसला. मिहीरच्या डोक्यावर हात फिरवत आजोबा म्हणाले, ‘चल, उन्हाळ्यात कुठल्या गोष्टींमुळे थंड वाटू शकतं, याची आपण यादीच करूया.’

‘कूलर, एअरकंडिशनर, बर्फ, पंखा...’ मिहीरला थांबवत आजी म्हणाली, ‘मला तर चिक्कार गोष्टी माहीत आहेत. तुझ्यापेक्षा जास्त! लावतोस पैज?’
आजीकडे डोळे मोठे करून पाहत आजोबा म्हणाले, ‘उगाच पैजा लावून माझं डोकं गरम करू नकोस. सांग बरं कुठल्या वस्तू ते.’
‘चंदन आणि धणे-जिरे,’ असं आजीने म्हणताच मिहीर चक्रावला. त्याला काही कळेचना हा काय प्रकार? बाबा, पण आजीकडे पाहू लागले. आजोबांच्या नाकपुड्या फुलल्या.

‘उन्हाळ्यात कपाळावर चंदनाचा लेप दिला तर शरीराला बाहेरून थंडगार वाटतं. धणेजि-याचं पाणी प्यायलं तर आतून थंडगार वाटतं!’ आजीचं हे बोलणं ऐकताच आजोबा म्हणाले, ‘चला बरं झालं. उद्यापासून मी सकाळ संध्याकाळ चंदन उगाळत जाईन.’
आता आजी काही बोलण्याआधीच बाबा म्हणाले, ‘आज संध्याकाळी मी फ्रिज आणायला जाणार आहे. तेव्हा...’
बाबांना थांबवत मिहीर ओरडला, ‘तेव्हा मी पण तुमच्या बरोबर येणार आहे.’
मिहीरकडे पाहून बाबा हसले.

‘बाबांच्या बरोबर तू नक्की जा, पण एका अटीवर. दुकान गेल्यावर तू त्या फ्रिजबद्दल हज्जार प्रश्न विचारले पाहिजेस. ओके?’
आजीचं हे बोलणं मिहीरला काही कळलंच नाही. प्रश्न कुणाला विचारायचे? का विचारायचे? कसले प्रश्न विचारायचे? आणि असे हज्जार प्रश्न आपण जर कुणाला विचारले तर तो माणूस आपल्यावर रागावणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न मिहीरच्या डोक्यात गरगरू लागले.

मिहीरकडे पाहत आजी म्हणाली, ‘मला समजतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय ते? अरे, तुम्ही जेव्हा फ्रिज घ्यायला दुकानात जाल तेव्हा तिथे फ्रिजची तांत्रिक माहिती सांगणारा एक माणूस तिथे असेल. तू जितके प्रश्न विचारशील तितकं तू अधिक शिकशील हे लक्षात ठेव. मनात येणारी प्रत्येक गोष्ट त्याला विचार.’

‘म्हणजे तो डिफ्रॉस्ट कसा करायचा? दरवाजा उघडल्याबरोबर त्याचा लाइट कसा काय लागतो? आणि हा लाइट बदलायचा कसा? थंडीत त्याचं तापमान किती ठेवायचं? आणि चुकीचं तापमान ठेवलं तर काय होईल? बर्फ लवकर व्हायला पाहिजे असेल तर काय करायचं? फ्रिज पुसायचा कसा? असेच प्रश्न विचारायचे ना आजी?’ असं मिहीरने म्हणताच आजीने समाधानाने मान डोलावली.

इतक्यात बाबा एक पाठकोरा कागद घेऊन आले. तो मिहीरच्या हातात देत म्हणाले, ‘अरे तुझे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मला पण इतके सुचले नसते रे. या कागदावर तुझ्या बारीक अक्षरात प्रश्नांची एक यादीच तयार कर. म्हणजे ऐन वेळी कुठला प्रश्न विसरायला नको. आणि या सगळ्या प्रश्नांची तू जर का नीट उत्तरं लिहून ठेवलीस तर तुझ्याकडे फ्रिजचं एक गाइडच तयार होईल. उद्या आपल्या फ्रिजला काही झालंच तर या तुझ्या गाइडचा आपल्याला फायदा होईल.’
मिहीर पेन सरसावून बसला. आजी, आजोबा, आई व बाबा या सगळ्यांनी मिळून प्रश्नांची एक भलीमोठी यादी तयार केली. संध्याकाळी खिशात यादी ठेवूनच मिहीर आईबाबांसोबत दुकानात गेला.

आज मिहीरकडे फ्रिज, मिक्सर, पंखा आणि इस्त्री यांची गाइड आहेत. आता यात काही बिघाड झाला तर बाबा मिहीरचं गाइड वाचतात. मिहीरला विचारतात.
मला सांगा, तुमच्याकडे आहेत का अशी तुम्ही बनवलेली ‘होम गाइड’? घरात काही बिघडा-बिघडी होण्याअगोदरच तुम्ही बनवणार का होम गाइड?
इतरांना मदत करायला खूप उपयोगी पडतात ही होम गाइड! म्हणून हज्जार प्रश्न तयार करा आणि कामाला लागा. मी तुमच्या गाइड पत्रांची वाट पाहतोय.