आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Varahadi Dictionary By Dr.Raosaheb Kale, Divya Marathi

व-हाडी बोलीचे तीन शब्दकोश पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व-हाडी शब्द, म्हणी, वाक्प्रचार कोश तयार करण्याचा प्रकल्प अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठाद्वारे डॉ. विठ्ठल वाघ (संशोधक), डॉ. रावसाहेब काळे (सहायक संशोधक) यांच्याकडे सोपविला. सतत तीन वर्षांपासून हाती घेतलेल्या या कामातून व-हाडी बोलीचे तीन कोश पूर्ण होत आहेत. अजूनही हे काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. कितीतरी शब्दांचे संकलन अजून बाकी आहे. यासाठी पुढेही हे काम आयुष्यभर डॉ. विठ्ठल वाघ व मी डॉ. रावसाहेब काळे म्हणजे आम्ही दोघे मिळून करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

व-हाडी बोलीच्या शब्दकोशाचे काम पुढेल महिन्यात पूर्ण होणार आहे. हा व-हाडी बोलीचा शब्द कोश नुसता शब्दकोश नाही तर तो संस्कृती कोशही आहे. कारण प्रत्येक व-हाडी शब्दाच्या अर्थासोबत तो शब्द चालून दाखवण्यासाठी महानुभाव साहित्यापासून तर आजच्या प्रतिमा इंगोलेपर्यंत सर्व साहित्यिकांच्या साहित्यातील संदर्भ दिले आहेत. जेथे संदर्भ मिळाला नाही तेथे एखादे वाक्य तयार केले आहे. हे संदर्भ देत असताना व-हाडी संस्कृती कशी व्यक्त होईल याकडे लक्ष दिले आहे. व-हाडी शब्द त्यानंतर त्याचा अर्थ. अर्थ झाल्यावर महानुभाव ग्रंथातील, ज्ञानेश्वरीतील, तुकोबांच्या गाथेतील, गाडगेबाबांच्या कीर्तनातील, तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील, आधुनिक व-हाडी कवितामधील ओळी तसेच आवश्यकतेनुसार म्हणही दिली आहे. त्यामुळे ह्या कोशाला काव्यात्मकतासुद्धा प्राप्त झाली आहे. उदाहरण म्हणून पुढील दोन तीन शब्द वाचून आपल्या लक्षात येईल. कूस स्त्री. ओटीपोट. ‘एकी कोठाचे बैल भांडति जुंझेति: परि कुसीसी कुस लाउनि बैसेति:’ ‘आम्ही चारी कुसा तंग अशी जेवण केली.’

म्हणीचेही काम पूर्ण झाले आहे. व-हाडी म्हण आणि यापुढे त्या म्हणीचा प्रमाण मराठीत अर्थ. एक असेल तर एक, दोन असतील तर दोन अर्थ दिले आहेत. प्रत्येक म्हणीचा विषय वेगळा, अर्थ वेगळा, शब्दकळा वेगळी. म्हण ऐकल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो. ‘कामाची म्हनून केली अन् कनगी घेऊन पान्याले गेली.’ अशी बह्याळ पत्नीचे वर्णन म्हण करते तर ‘हावसीनं केला पती अन् त्याले फुटली रगतपिती.’ नव-याचा महारोग पाहून निराश झालेली पत्नीही दिसून येते.
नवरदेव, नवरा, नवरी ह्यावरील म्हणी मजेशीर आहेत. नवरदेव बिचारा लग्न करण्यासाठी जातो तर व-हाड ‘नवरदेव जाते नवरीसाठी, व-हाड येते खाण्यासाठी.’,‘नवरदेव आला लग्नासाठी, व-हाड आलं पोटासाठी.’ लग्न म्हटलं की बॅँडबाजा पाहिजेच, वाजंत्र हवेच. ‘नवरदेवाचं लगन अन् मांगले हरीक.’ झाले एकवेळचं लग्न. नवरदेव नवरीन लग्न झाल्यावर एकामेकाची नवरा नवरी होतात.‘नवरा असातसा, बायको हाती ससा.’ असा संसार सुरू होतो. नव-याचे गुण हळूहळू माहीत होतात. ‘नवरा आये किसन, करते लय ठसन.’ ‘नवरा आला घराशी,वायगोर उराशी.’‘नवरा कमजोर, बायको शिरजोर.’ असे एकामेकाचे गुण अवगुण माहीत होत होत लेकरंही होतात. ‘नव-याच्यानं पोर झालं, देवाचं नाव झालं.’ ‘नवरा काळीमोळी, बायको हुलूपुलू, दोघाईले लेकरू झालं बांदराचं पिलू.’ दोनाचे चार हात झाल्यावर दोन वर्षे जात नाहीत तर चार अन् अजून दोन वर्षांनी आठ. मग होते आर्थिक ओढाताण ‘नवरा केला सुखाले, पैसा नाई कुकाले.’
हळूहळू काही घरात नवरा बायकोच्या मुठीत जातो. त्याचा नंदीबैल होतो. असे मी नाही म्हणी सांगतात त्या अशा - ‘नवरा गोठी गोठीत , जाते बायकोच्या मुठीत.’, ‘नवरा चुलचुल्या, बायकोले गुदगुल्या.’,‘नवरा झाला बैल, बायको म्हणते तेच होईल.’‘नवरा टोंगये फोळते, बायको मुंडकं मोळते.’, ‘नवरा - नवरा त्याचा केला भवरा.’, ‘नव-याची लाळकी, अंबाळी सळकी.’

ज्या भाषेत सर्जनशीलता असेल ती भाषाबोली श्रेष्ठ
बोलीभाषा अशी केळीसारखी प्रसूत होणारी असते. ह्याला भाषेची सर्जनशीलता असे म्हणतात. ज्या भाषेत अशी सर्जनशीलता असेल ती भाषा बोली श्रेष्ठ ठरते. कारण त्या बोलीत कोणताही अर्थ व्यक्त करण्याची ताकद असते. त्या संबंधित भाषिकाला इतर भाषेची मदत घ्यावी लागत नाही. म्हणूनच मला व-हाडी भाषिक असल्याचा अभिमान आहे. ह्या व-हाडी बोलीने विठ्ठल वाघ, प्रतिमा इंगोले, सदानंद देशमुख, बाबाराव मुसळे, पुरुषोत्तम बोरकर यांना महाराष्‍ट्रभर प्रसिद्धी दिली. बोलीभाषेत किती दरारा असतो हे वसंतराव धोत्रे यांच्या बोलण्यातून सिद्ध होतेच. त्यांना वाघाची डरकाळी ह्या व-हडी बोलीने दिली.

डॉ. विठ्ठल वाघांचे बारा बारा तास काम
आज आम्ही दोघांनीच तीन वर्षांपासून अपार कष्ट सहन करत काम पूर्ण करीत आहोत. वाघ सर तर बारा बारा तास बसून काम करत. कंबरीचा त्रास सहन करावा लागे. मोठमोठ्या काव्य संमेलनाला, कार्यक्रमाला खो द्यावा लागला. पुण्यातील नातवंडांना सोडून अकोल्याला येऊन हे काम करावे लागले.
वाघ काकूलाही आमच्यामुळे अकोला येथेच राहावे लागले. आणि दिवसातून दोन तीन चहा, नाष्टा, जेवण आम्हाला करून देणे, काही शब्दांचे, म्हणीचे अर्थ सांगणे असे काम त्या करू लागत. कधीकधी तर अर्थ लिहिणे आणि मला संगणकावर मुद्रित करताना सांगणेही त्यांच्याकडेच असायचे.

आमचे प्रकल्प प्रमुख आदरणीय डॉ. मनोज तायडे ह्याचे कामही खूप मोलाचे आहे. व-हाडी बोली प्रकल्पाचा सर्व आर्थिक खर्च आमच्या चुका सहन करीत त्यांनी एकट्याने पाहिला. तसेच ह्या कामात व-हाडी बोली बोलणा-यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रा. नीळकंठ इंगळे सर, प्रा. नीलेश पाकधुने, विठ्ठल वाघांचे मित्र, कवी ह्यांची खूप मदत झाली.
व-हाडीबोलीतील वाक्प्रचार कोशाचे काम पूर्ण
वाक्प्रचाराचेही काम पूर्ण झाले आहे. ‘ व-हाडी बोलीतील वाक्प्रचार ’ असे ह्या कोशाचे नाव असून वाक्प्रचार व त्याचा प्रमाण मराठीतील अर्थ दिला आहे. म्हणीप्रमाणेच वाक्प्रचारही बोलीभाषेला सौदर्य प्राप्त करून देतात. अशा वाक्प्रचारांचा कोशही सौदर्याने नटलेला आहेच. एका शब्दाचे अनेक वाक्प्रचार होताना आढळतात. अक्कल म्हणजे बुद्धी. हा अक्कल शब्द घेऊन व-हाडी भाषिक वाक्प्रचार तयार करतो - अक्कल इकत घेणं, अक्कल गहान ठेवनं, अक्कल गुंग होणं, अक्कल घेणं, अक्कल चालीनं, अक्कल जानं, अक्कल देणं. असे एक नाही दोन नाही असंख्य वाक्प्रचार तयार करण्याची ताकद व-हडीत आहे.
असेच माणसाच्या एखाद्या अवयवावरही खूप वाक्प्रचार तयार होताना दिसून येतात. कान उघडे ठेवनं, कान उघाळनी करनं, कान उपटनं, कान किटनं, कान कारेनं, कान झाळनं, कान टवकारनं.