आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा महोत्‍सव: परंपरा आणि नवतेचा संगम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिढ्यान्पिढ्यांच्या संस्कारांतून कलाक्षेत्रात आगळीवेगळी परंपरा आकारास येते. ही परंपरा भीमा-इंद्रायणी अथवा गंगा-यमुना या नद्यांसारखी प्रवाही राहते. भारताच्या लोकसंस्कृतीत ग्रामीण जीवनात रुजलेल्या लोककला या एकेकाळी आध्यात्मिक उद्बोधन, समाजप्रबोधन आणि मनोरंजनाचे साधन होत्या. त्या दैनंदिन जगण्याशी जोडलेल्या होत्या. आजच्या युगात जगणेच प्रदर्शनीय झाले असेल, तर लोककला प्रदर्शनीय होणार नाहीत, हे तरी कसे संभवते? एकीकडे अंगण, प्रांगण आणि मंदिरातल्या कला आता मंचीय स्वरूप धारण करू लागल्या आहेत. या मंचीय लोककलेतील विविधता आणि ऊर्जेचा शोध युवा पिढीने घेतला, तर प्रयोगात्म कलांच्या क्षेत्रात ही पिढी मोठी भरारी घेऊ शकेल, या उदात्त हेतूने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे 6 ते 8 फेबुवारीदरम्यान परंपरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने आयोजित या परंपरा महोत्सवात लोकगीत गायन, लोकनृत्य आणि लोकनाट्य असा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. विद्यानगरी कालिना परिसरातील फिरोजशहा मेहता भवन हे जणू या तीन दिवसांत लोकसंस्कृतीच्या जत्रेचे ठिकाण झाले होते. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचा-यांनी उदंड प्रतिसाद या महोत्सवाला दिला.

केवळ महाराष्‍ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांतील लोककलांचे दर्शन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या परंपरा महोत्सवाच्या निमित्ताने झाले. राजस्थानचे भपंग हे लोकगीतगायन रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘भपंग’ हे वाद्य आपल्या चौंडक्यासारखे. भपंग, ढोलक, हार्मोनियम या वाद्यांच्या साथीने सादर झालेली राजस्थानी मेवाती बोलीतील लोकगीते जुम्मे खान मेवाती यांनी सादर केली, तेव्हा त्यात त्यांनी ‘टर-टर’चे जे लोकगीत सादर केले, त्यावर रसिक चक्क ताल धरून नाचू लागले. परंपरा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लोककलावंतांनी जी तालवाद्य कचेरी सादर केली, त्यावर ठेका धरून ज्येष्ठ गायक शंकर महादेवन, गायिका इला अरुण, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचेही पाय थिरकू लागले. सनई, संबळ, ताशा आणि हलगी या तालवाद्यांनी परंपरा महोत्सव अक्षरश: दुमदुमून निघाला. तबाजी खरात, रवींद्र लांडगे आदी लोककलावंतांनी ढोलकी फडाच्या तमाशातील वादनाची आठवण करून दिली. ‘बावरली कशी, गवळण राधा बावरली’ या गवळणीचे सूर त्यांनी सनईतून काढले. त्या वेळी आपले गावपण विसरून शहरात आलेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर जणू आनंदाचे रोमांच उभे राहिले.

गुजरातचे सिद्धीधमाल नृत्य, उत्पातांचे लावणी गायन, लोककला अकादमीच्या विद्यार्थिनींचा मुजरा, लोककला अकादमीचे सहायक प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी शिक्षकांबरोबर सादर केलेला गण परंपरा महोत्सवाची उंची वाढवणारा होता. सीमा कौशिक यांचे भरतारी गायन छत्तीसगढी बोलीचा ठसा उमटवून गेले. लोककलांवर आधारित लोकनाट्ये हे या परंपरा महोत्सवाचे सूत्र होते. त्यामुळे दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांनी आपल्या सिद्धिविनायक मंडळातर्फे सादर केलेला राजा रुक्मांगदाचा खेळ, लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरतर्फे गोंधळावर आधारित नंदेश उमप यांनी सादर केलेले ‘जांभूळआख्यान’, शाहीर दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या सुयोग निर्मित दिगंबर नाईक यांनी सादर केलेल्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याने परंपरा महोत्सवाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला, तर लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या उपस्थितीने महोत्सवात जान आणली.

लोककला अकादमीच्या हेमाली म्हात्रे, मदन दुबे, विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, योगेश चिकटगावकर, या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांकरवी पारंपरिक लोककलेचे सार्थ दर्शन या महोत्सवात घडवले. ‘लोककला अकादमी अनुदानावर घेण्याची घोषणा शासनाने अनेकवार केली, त्याची अंमलबजावणी व्हावी.’ असे आवाहन समारंभाचे अध्यक्ष बीसीयूडीचे संचालक डॉ. राजपाल हांडे यांनी उद्घाटक सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्याकडे केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, कुलसचिव डॉ. कुमार खैरे, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक डॉ. कमलाकर सोनटक्के यांचे मार्गदर्शन या महोत्सवास नेहमी लाभले. पुढील वर्षी आंतरराष्‍ट्रीय पातळीवर लोककला महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केला.