आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होता वात्सायन?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कामसूत्रम’ या ग्रंथाचा रचनाकार वात्स्यायन हा एक भारतीय तत्त्वचिंतक होता, यावर मतमतांतरे दिसत नसली तरीदेखील, त्याच्या नेमक्या काळाबद्दल मात्र वेगवेगळी मते असल्याचे आपण मागील लेखात पाहिले आहे. वात्स्यायन हा विविध तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असला तरी वात्स्यायन हेच नाव सर्वपरिचित आहे. काही
जणांच्या मते, त्याचे मूळ नाव मल्लनाग असे असून गोत्र वात्स्यायन आहे. काही जणांच्या मते चाणक्य, विष्णुगुप्त, मल्लनाग, पक्षिलस्वामी, द्रामील, वररुचि, मेयजित, पुनर्वसु आणि अंगुल ही वात्स्यायनाचीच काही नावे आहेत. यामधील द्रामील किंवा मल्लनाग या नावांवरून वात्स्यायन हा दक्षिण भारतात होऊन गेला असावा, असा एक कयास आहे.

‘न्यायसूत्र’कार वात्स्यायन आणि ‘कामसूत्र’कार वात्स्यायन या पुन्हा दोन व्यक्ती की एकच, याचाही नीट उलगडा होत नाही. कामंदक हाच वात्स्यायन होता, असेही एक मत आहे. कौटिल्य अर्थशास्त्राच्या साहाय्याने त्याने न्यायसूत्राची रचना केली. कामंदक हा कौटिल्याचा शिष्य असावा. कारण न्यायसूत्रामध्ये सुरुवातीलाच त्याने कौटिल्याला अभिवादन केल्याचे
सांगितले जाते. येथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे, की वात्स्यायनाने त्याच्या ‘कामसूत्रा’मध्ये सुरुवातीला धर्म आणि अर्थ या दोन पुरुषार्थांचाही उचित असा उल्लेख केला आहे. म्हणजेच, वात्स्यायनावर धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचाही प्रभाव होता, हेही आपल्याला स्पष्ट होते. वर उल्लेख केल्याप्रमाणे कामंदकाला वात्स्यायन समजणे आणि याच कामंदकाने कौटिल्याला गुरू मानणे याचीही संगती लागते. वात्स्यायनाच्या सविस्तर चरित्राबद्दल फारसे वर्णन मला तरी मिळाले नाही.
एक तत्त्वचिंतक तसेच वात्स्यायन मुनी म्हणून त्याचे संस्कृत साहित्यात वर्णन आले आहे. मात्र, तो दक्षिण भारतात होऊन गेला असावा, अशी कल्पना केली तरीदेखील त्यातील नेमके कोणते राज्य किवा संस्थान, हे सांगता येत नाही. त्याच्या कालखंडाबद्दलही संदिग्धता आहे. त्याच्या वयाबद्दल नेमका संदर्भ सापडत नाही. अर्थात, अशी अपुरी माहिती उपलब्ध असली तरीदेखील त्याने लिहिलेल्या ‘कामसूत्रम’ या ग्रंथाचे आणि त्यातील विषयांचे महत्त्व कमी होत
नाही. त्याच्या ग्रंथरचनेवरून तो संस्कृत भाषेचा उत्तम जाणकार आणि कामशास्त्राचा ज्ञानी होता, असे विधान केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

पूर्वीची मौखिक परंपरा, छपाईची कला अवगत नसणे, देशावर झालेली परकीय आक्रमणे आणि त्या आक्रमकांनी साहित्यसंपदा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न या कारणांमुळे या सर्व शास्त्रांचे रचनाकार, प्रणेते यांचे कालखंड, त्यांच्याबद्दलची चरित्रात्मक माहिती अशी नेमकेपणाने आढळून येत नाही. परंतु विविध शास्त्रांवर जे प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांचे महत्त्व आजही टिकून आहे. वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’देखील त्याला अपवाद नाही. ‘कामसूत्र’वर ‘जयमंगला’ नावाची टीका यशोधर या विद्वानाने लिहिली. ही टीका बाराव्या किवा तेराव्या शतकात लिहिली
असावी. एखाद्या संस्कृत ग्रंथावर टीका लिहिण्याची परंपरा भारतीय साहित्यामध्ये आहे.

आयुर्वेदाच्याही अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते ग्रंथ समजण्यास सोपे झाले आहे. वात्स्यायनाच्या ‘कामसूत्र’वर यशोधराने लिहिलेली टीका ही या मालिकेतीलच एक होय. वात्स्यायानाचे महत्त्व पटण्यास आणखी एक कारण म्हणजे, ‘कामसूत्रम’ या त्याच्या ग्रंथाची विविध भाषांमध्ये झालेली भाषांतरे होय. ‘कामसूत्रम’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर सर रिचर्ड बर्टन आणि फिट्झजेराल्ड अर्बर्थनॉट यांनी १८८३मध्ये केले. १८८५मध्ये त्याचा फ्रेंच अनुवाद तर १९०७मध्ये जर्मन भाषेत याचे भाषांतर केले गेले. भाषांतर करणा-या विद्वानांनी त्यासाठी संस्कृतचेही ज्ञान मिळवले असले पाहिजे.

‘कामसूत्र’चे महत्त्व लक्षात घेऊन इतर देशांमध्येही या शास्त्राचा प्रचार-प्रसार व्हावा, हा हेतू असला पाहिजे. आज परदेशात कामजीवनाबद्दल जो स्वैराचार सुरू आहे, तो पाहता या भाषांतराची माहिती आणि ‘कामसूत्र’तील योग्य मार्गदर्शन त्या देशांमधील युवा पिढीला मिळाले, तर हा स्वैराचार कमी होण्यास मदत होईल, असे म्हणणे अनुचित ठरू नये.
‘कामसूत्र’ची हिंदी, मराठी, गुजराती या काही भारतीय भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत. या सर्व विवेचनामुळे एकूणच वात्स्यायनाच्या ‘कामसूत्रम’ या ग्रंथाची महती पटेल, आणि कोण होता हा वात्स्यायन? असा प्रश्न निर्माण होण्यास जागा शिल्लक राहणार नाही.

ayurvijay23@rediffmail.com