आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहधर्मचारिणीची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरक हा विवाहाची इच्छा करणारा असा गृहस्थ आहे, जो कामसूत्रात नायकाच्या भूमिकेत आहे. आता त्याला नायिकेचा शोध घ्यावयाचा आहे. ही नायिका विविध प्रकारच्या ६४ कलांनी अवगत असावी, असे वात्स्यायनाने सांगितल्याचे आपण यापूर्वीच जाणले आहे. नागरकवृत्त प्रकरणानंतर त्याने ‘नायकसहायदूतकर्मविमर्श’ या प्रकरणात नायिका कशी असावी, यासंबधी विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच वात्स्यायनाने ज्या नायिकेशी विवाह करायचा, ती स्ववर्णाची असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्यापेक्षा उच्च किंवा कमी अशा वर्णाची ती नसावी, असेही तो सांगतो.
‘नागरकवृत्ता’त नागरकाच्या एकूण आचरणात त्याच्या कामजीवनाची साधारण पूर्वतयारी करण्यासाठी काही मार्गदर्शन मिळते. पुढे विवाहानंतर पती आणि पत्नी या दोघांचेही जीवन सुखकर होण्यासाठी त्यांचे कामजीवनही निरामय असले पाहिजे, अशा स्पष्ट जाणिवेतून वात्स्यायनाने नागरकाची पत्नी होणारी स्त्रीदेखील कामचतुर असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरकाची होणारी पत्नी ही त्याच्या वर्णाची असावी, हे वात्स्यायनाने का सांगितले, याचे स्पष्टीकरण त्याने दिलेले दिसत नाही; परंतु त्या काळच्या समाजरचनेतही वर्णव्यवस्था असली पाहिजे, हे मात्र यावरून स्पष्ट होते. नागरकाने स्वतःच्या वर्णातील स्त्रीशी विवाह केल्यास एकूण वैवाहिक जीवन सुखी होईल, असे त्याला वाटत असावे. मात्र वात्स्यायनाने कामशास्त्राच्या दृष्टिकोनातूनच पती-पत्नी हे एकाच वर्णातील असावे, असे मत व्यक्त केले असावे, असे वाटते. पुढे त्याने या जोडप्याने लोकधर्मपालनासाठी संतती निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली दिसते आहे. खरे तर आपला वंश पुढे चालू राहावा, तसेच योग्य ती कुटुंब व्यवस्था निर्माण व्हावी, या दृष्टीने संतती निर्माणाकडे पहिले जाते आणि ते गैर नाही. परंतु वात्स्यायनाने लोकधर्मपालन हा या संतती निर्माणाचा हेतू सांगून, पुढे आश्चर्यचकित करणारे विधान केलेले आहे. खरे तर संतती निर्माण होणे, हा पती-पत्नीच्या विवाहानंतर शारीरिक एकत्रीकरणाचा परिणाम आहे, हेदेखील विसरून चालणार नाही. पती आणि पत्नी हे दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे, त्यांचे वय योग्य असणे, स्त्री बीज आणि पुरुष बीज योग्य गुणाचे असणे अशा विविध गोष्टी संतती निर्माण होण्यासाठी आवश्यक असतात. वात्स्यायनाला पती आणि पत्नी योग्य प्रकारे कामचतुर असावेत, हे सांगण्यामागे त्यांच्या निरोगी असण्याचेही संकेत द्यावयाचे असावेत. या प्रकरणात वात्स्यायनाने तीन प्रकारच्या नायिकांचे वर्णन केले आहे.
(१)कन्या, (२)पुनर्भू, (३)वेश्या. कामसूत्राच्या टीकाकारांनी यात तिन्ही प्रकारच्या नायिकांची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये कन्या सर्वश्रेष्ठ मानली आहे. येथे कन्या म्हणजे अविवाहित असलेली आणि कोणाशीही शरीरसंबंध न केलेली अशी कुमारिका होय. नागरकाने म्हणजे, नायकाने अशा कन्येशी विवाह करावा. पुनर्भू हा नायिकेचा दुसरा प्रकार. विवाहापूर्वी स्त्रीने एखाद्या पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवले असल्यास, त्या नायिकेला पुनर्भू असे म्हणतात. तर देहविक्रय करून अनेक पुरुषांशी शरीरसंबध करणारी स्त्री म्हणजे, वेश्या होय. वात्स्यायनाच्या वरील कथनावरून त्या काळच्या समाजरचनेचे चित्र प्रतिबिंबित होते आहे, असे म्हणता येईल.
याच अध्यायात कामसूत्रकाराने संभोगाला अयोग्य अशा तेरा प्रकारच्या स्त्रियांचेही वर्णन केले आहे- १)कुष्ट झालेली स्त्री २)वेडी
३)समाजाकडून पतिता ४)रहस्याला लपवू न शकणारी ५)लज्जा नसणारी ६)अधिक वय झालेली ७)अतिश्वेत वर्णाची ८)अति कृष्ण वर्णाची ९)जिचे शरीर दुर्गंधी आहे, अशी १०) नातेवाईक असणारी ११)सखी १२) संन्यासी १३) राजघराण्यातील स्त्री. अशा तेरा प्रकारच्या स्त्रियांशी शरीरसंबध न ठेवण्याचे वात्स्यायन सांगतो. कारण तसे केल्यास त्याने कदाचित त्या नागरकाच्या शरीराला/मनाला हानी पोहोचेल, असे त्याला वाटत असावे. या ठिकाणी कुष्ट पीडित, तसेच दुर्गंधीयुक्त इत्यादी विशेषणे असलेल्या स्त्रियांशी संबंध टाळण्यामागे नागरकाचे आरोग्य हा वात्स्यायनाचा केंद्रबिंदू असावा. सखीशी शरीरसंबंध टाळण्यामागे काय कारण असावे, हे त्वरित लक्षात येणे कठीण आहे. कारण विवाहापूर्वी भावी पत्नीशी मैत्री करावी, असे वात्स्यायनाने म्हटल्याचे आपण पूर्वी पाहिलेले आहे. अर्थात, ही सखी पुढे पत्नी झाल्यावर शरीरसंबंध हा ओघानेच आला, परंतु ती पत्नी होण्यापूर्वी सखी असताना तो टाळला पाहिजे, हे नैतिक बंधन नागरकाने पाळले पाहिजे, असे कामसूत्रकाराला सुचवायचे तर नाही ना?

ayurvijay23@rediffmail.com