आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभोगाची फलश्रुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखांकात वात्स्यायनाने नायक आणि नायिका यांच्या गुप्तांगांचे प्रमाण तसेच संभोगाचे वेग यानुसार विविध प्रकार सांगितलेले आपण पाहिले. वेगानुसार संभोग प्रकार सांगितल्यावर वात्स्यायनाने त्यापुढे कालानुसार नायक-नायिकांचे भेद सांगितले आहेत. ‘कामसूत्रकारा’च्या मते, नायक आणि नायिका यांचे शीघ्र, मध्य, चिरकाल असे तीन प्रकार असतात. हे प्रकार कालानुसार पाडलेले आहेत. येथे काल याचा अर्थ स्पष्ट करताना, वात्स्यायनाने वीर्यस्खलनाचा काल, असे म्हटले आहे. ज्या नायकाचे वीर्यस्खलन लवकर होते, तो शीघ्र प्रकार, तर ज्याचे वीर्यस्खलन त्यापेक्षा थोड्या अधिक कालाने होते, तो मध्य प्रकार आणि ज्या नायकाची संभोग शक्ती अधिक असून त्याचे वीर्यस्खलन ब-याच कालाने आणि अधिक कालपर्यंत होते, तो चिरकाल प्रकारचा नायक होय.
याच प्रकारे नायिकेचेही शीघ्र, मध्य आणि चिरकाल असे तीन प्रकार असतात. शीघ्र वीर्यस्खलनाच्या नायकाचा, त्याच प्रकारच्या नायिकेशी संभोग होणे, याला ‘समरत’ असे म्हणतात. अशा प्रकारे समरताचे तीन आणि विषमरताचे सहा असे कालानुसार वात्स्यायनाने संभोगाचे नऊ प्रकार सांगितले आहेत. त्याचप्रमाणे गुप्तांगाचे प्रमाण, संभोगवेग आणि वीर्यस्खलन काल यांना अनुसरून नायक आणि नायिका यांच्या एकत्र येण्याचे म्हणजे पर्यायाने संभोगाचे एकूण २७ प्रकार वात्स्यायनाने सांगितले, हे सर्व वर्णन वात्स्यायनाच्या निरीक्षण क्षमतेची ग्वाही पटवून देते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या वर्णनातील वीर्यस्खलनाच्या संदर्भात आजच्या युवक-युवतींमध्येही मोठ्या प्रमाणावर जिज्ञासा, कुतूहल आणि अज्ञानही आढळून येते. आज पुरुषाचे वीर्य आणि त्यामध्ये असणा-या पुरुषबीजांची संख्या, गती हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष मोजता येते, परंतु त्यासाठी वीर्यस्खलन कालाची पूर्वपीठिका माहीत असणे आवश्यक असते. वात्स्यायनाने त्याचे नेमकेपणाने वर्णन कामसूत्रात केलेले आहे. ते शास्त्रीय आणि शाश्वत अशा दोन विशेषणांना नक्कीच पात्र आहे.

या २७ संभोग प्रकारानंतर स्त्री आणि पुरुष यांच्यात पुरुषाला अधिक प्रमाणात संभोग सुख मिळते, असे कामसूत्रकार सांगतो. स्त्रीला पुरुषाच्या मानाने कमी संभोग सुख मिळते, असे असले तरी चुंबन प्रहर्षन आणि प्रत्यक्ष संभोग यांची अनुभूती घेऊन स्त्री सुखावते, असेही वात्स्यायन पुढे सांगतो. वेगयुक्त पुरुषाबद्दल स्त्रीला स्नेह वाटतो. शीघ्रस्खलीत पुरुषाबद्दल मात्र स्त्रीला तितकासा स्नेह वाटत नाही, असे स्पष्ट निरीक्षण वात्स्यायन नोंदवतो. हे वात्स्यायनाचे निरीक्षण वैद्यकीयदृष्ट्यादेखील व्यावहारिक वाटते. आजच्या काळातही वीर्यस्खलनाच्या क्षमतेप्रमाणे पुरुषांचे तीन प्रकार आढळतात आणि शीघ्रस्खलीत पुरुष वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी, औषधोपचारासाठी दवाखान्यात येतो. वर नमूद केल्याप्रमाणे स्त्रीला शीघ्रस्खलीत पुरुषाबद्दल स्नेह वाटणे कमी होते. पुरुषांमध्येही यामुळे न्यूनगंडाची भावना निर्माण होते. काही वेळा या कारणामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्षही निर्माण होतो.

‘आयुर्वेदातील विचार’
मानवी शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र असे सात धातू असल्याचे आयुर्वेदशास्त्र सांगते. स्त्री आणि पुरुष या दोहोंमधील शुक्र धातू प्राकृत स्थितीत असला, तर त्यांचे परस्पर कामजीवन निरामय राहण्यास मदत होते. मात्र शुक्र धातू कमी बलवान झाल्यास त्या दोघांचीही संभोगक्षमता कमी होते. शीघ्र वीर्यस्खलीत पुरुषांमध्येही शुक्र क्षयामुळे हे घडते, यावर आयुर्वेदानुसार शुक्र धातूला बल देणारी आणि शुक्रधातूवर्धक अशी चिकित्सा द्यावी लागते. खरे तर आयुर्वेदात वाजीकरण ही एक स्वतंत्र शाखा अस्तित्वात आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे आयुर्वेदाच्याही कायचिकित्सा, बालचिकित्सा, शल्यचिकित्सा इ. अशा आठ शाखा आहेत. वाजीकरण चिकित्सा ही त्या आठमधील एक होय. या चिकित्सेमध्ये शरीरातील शुक्र धातू बलवान होण्यासाठी आणि पुढे उत्तम प्रजा निर्मितीसाठी अनेक उपयुक्त उपाययोजना आयुर्वेदाने सांगितल्या आहेत.
‘कामसूत्रा’तील संभोग प्रकारांच्या निमित्ताने आयुर्वेद शास्त्राच्या या उपयुक्त अंगाचा थोडक्यात परामर्श आपण या ठिकाणी घेतला आहे. या वाजीकरण चिकित्सेची पुढे यथावकाश विस्ताराने माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू.

वात्स्यायनाने कामसूत्रात बभ्रु आचार्यांच्या शिष्यांचे संभोगसुखासंदर्भातील म्हणणेे मांडले आहे. या शिष्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांचे वीर्यस्खलन झाल्यानंतर संभोगातील पुरुषांचा आनंद समाप्त होतो, परंतु स्त्रीला मात्र या आनंदाची अनुभूती, या सुखाचा आनंद संभोगाच्या सुरुवातीपासून अधिक काळपर्यंत घेता येतो. हे शिष्य पुढे म्हणतात की, भोगेच्छा आणि भोगानंद हे दोन्ही असतील तर गर्भ स्थिर राहू शकतो. म्हणजे, या ठिकाणी गर्भ स्थिर राहण्यासंबंधी स्पष्ट उल्लेख आलेला आहे.
भोगेच्छा आणि भोगानंद या दोन्ही गोष्टी त्यासाठी आवश्यक असल्याचे कामशास्त्रात म्हटले आहे. गर्भाची निर्मिती ही स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाची फलश्रुती आहे, असे कामसूत्रकाराला सुचवायचे आहे. आज अनेक कारणांमुळे गर्भस्राव, गर्भपात या समस्या वाढलेल्या दिसतात. त्या दूर करून गर्भ स्थिर राहावा आणि उत्तम व निरोगी संतती व्हावी, यासाठी कामशास्त्राचे वरील मार्गदर्शन उपयुक्त ठरावे.

ayurvijay23@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...