आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वात्स्यायनाची सौंदर्यदृष्‍टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वात्स्यायनाने कामसूत्रामध्ये कन्येला विवाहापूर्वी ६४ कला अवगत असाव्यात, असे सांगितले आहे. या ६४ कला वैवाहिक जीवनात उपयोगी पडतात, असे वात्स्यायन सांगतो. त्याने आपल्या कामसूत्रातील नागरकवृत्तनामक चौथ्या अध्यायात गृहस्थी मनुष्याबद्दल विस्ताराने वर्णन केले आहे. त्या मनुष्याला वात्स्यायन नागरक असे संबोधतो. या नागरकाचे घर कसे असावे, कुठे असावे, त्या घरात काय काय असावे याचे वर्णन वात्स्यायन या अध्यायात करतो. त्याचप्रमाणे त्या नागरककडून अपेक्षित असलेल्या दिनचर्येचेही सविस्तर वर्णन वात्स्यायनाने या अध्यायात केले आहे. या ठिकाणी नागरक याचा अर्थ गृहस्थ आश्रमात प्रवेश करणारा, विवाहाची इच्छा करणारा असा रसिक मनुष्य असा अभिप्रेत असावा. या मनुष्याने कामशास्त्राचे शिक्षण घेतल्यावर अर्थार्जन करून मग गृहस्थ होण्यास तयार व्हावे. विवाह केल्यानंतर त्याला आवश्यक असणारे घर (निवास) हे नगर, खरवट, पत्तन यामध्ये तसेच सज्जनाच्या संगतीत असावे, असे वात्स्यायन सांगतो. खरवट म्हणजे, दोन पर्वतांच्या मध्ये वसलेले गाव, असा त्याचा अर्थ सांगतात. हे घर अत्यंत रम्य अशा ठिकाणी असावे म्हणजे त्याचा आसपास हिरवीगार झाडी, नदीचा किनारा, डोंगर असे स्वरूप असावे. या घराचे बाहेरचे आणि आतले असे दोन भाग असावेत. घरामध्ये अत्यंत सुंदर, सजवलेले असे शयनगृह आणि त्यामध्ये शय्या असावी.
या शयनगृहात भिंतीवर वीणा तसेच रम्य चित्र असावे. बिछान्यासाठी सुंदर वस्त्र असावे. या घरात सुवासिक पुष्पमाला असाव्यात. आपल्या देवदेवतांची चित्रे असावीत. त्या घरामध्ये सुगंध दरवळण्यासाठी योग्य अशी अत्तरदाणी असावी, चंदनाचाही उपयोग सुगंधासाठी करावा. या घरामध्ये विविध पक्ष्यांचे पिंजरे असावेत. महाळुंगाची सालदेखील त्या घरात असावी.
नागरकाच्या घराचे वात्स्यायनाने केलेले वर्णन बघितल्यास असे लक्षात येईल की, विवाहानंतर प्रत्येक जोडप्याने प्रसन्न अशा ठिकाणी एकत्र राहावे म्हणजे, त्या दोघांचे मन आणि शरीरही प्रसन्न राहील. त्यांचे कामजीवनही त्यामुळे निकोप राहील, अशी कामसूत्रकाराची धारणा यामागे दिसते.
आज वाढत्या शहरीकरणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक नागरकाला कायमस्वरूपी राहण्यासाठी असे रम्य निवासस्थान उपलब्ध होणे शक्य नाही. परंतु काही काळापुरते तरी विवाहानंतर नवीन दांपत्याचे वास्तव्य अशा रम्य ठिकाणी असावे. त्यामुळे त्यांचे पुढील वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकेल. आजच्या काळात विवाहानंतर मधुचंद्र साजरा करण्याची जी परंपरा सुरू झाली आहे, ती अनाठायी नसून वात्स्यायनाने कामसूत्रात केलेल्या मार्गदर्शनावर आधारलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वात्स्यायनाने कामसूत्राच्या या अध्यायात नागरकाच्या अपेक्षित दिनक्रमाचे वर्णनदेखील केलेले आहे.

या नागरकाने दररोज पहाटे उठावे. उठल्यावर मलमूत्र विसर्जन करावे. मलमूत्र विसर्जन करून शरीर शुद्ध करावे. त्यानंतर दात घासावेत. डोक्याला सुवासिक धूप लावावे, त्यामुळे केस उत्तम राहतात. शरीराला चंदनाचे लेपन करावे. शरीरावर फुलांच्या माळा धारण कराव्यात. त्याने आरशात स्वतःचे प्रतिबिब पाहावे. सुगंधी विडा सेवन करावा आणि रोजच्या कामाला लागावे.
या नागरकाने दररोज स्नान करावे. एक दिवसाआड अंगाला तेलाने मालिश करावी. दर तिस-या दिवशी अंगाला साबण लावावा (फेस होईल असे पदार्थ). दर चौथ्या दिवशी त्याने दाढी करावी आणि मिशांचे केस कापावे. दर पाचव्या दिवशी गुप्तांगाचे केस काढावेत. काखेतील घामाचा दुर्गंध टाळण्यासाठी सुगंधी चूर्णाचा उपयोग करावा.

नागरकाच्या वरील दिनक्रमात वात्स्यायनाची एकूणच सौंदर्यदृष्टी नक्कीच दिसून येते; पण त्याबरोबरच त्याने नागरकाच्या आरोग्याकडेही पुरेसे लक्ष दिलेले दिसते. भारतीय मूळ असलेल्या आयुर्वेद शास्त्राशी वात्स्यायनाचे हे वर्णन बरेचसे मिळतेजुळते आहे. आयुर्वेद शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सकाळी लवकर उठून मलमूत्र विसर्जन, मग दंतधावन, स्नान इत्यादीचा उल्लेख केलेला आहे. वात्स्यायनानेदेखील या ठिकाणी तशाच प्रकारचे वर्णन केले आहे. अर्थात, आयुर्वेदाने अभ्यंग (मालिश) रोज करावे, असे म्हटले आहे. हा एक फरक या दोन शास्त्रांमध्ये दिसतो.
कारण कामसूत्रकार अभ्यंग हे दर दुस-या दिवशी करावयास सांगतो आणि आयुर्वेदाने मात्र ते नित्य करावे, असे सांगितले आहे. याच दिनचर्येमध्ये वात्स्यायनाने नागरकाला सुवासिक चंदनाचा लेप अंगाला लावण्यास सांगितला आहे. येथे मात्र वात्स्यायनाने आयुर्वेदशास्त्राचा संदर्भ घेतल्याचे जाणवते. कारण आयुर्वेदाने उत्साह वाढवण्यासाठी तसेच शरीराची कांती सुधारण्यासाठी अभ्यंगाप्रमाणेच विविध वनस्पतीची चूर्णे एकत्र करून ती शरीराला लावण्यास सांगितले आहे. यालाच व्यवहारात उटणे असे म्हणतात. चंदन ही वनस्पती अत्यंत सुवासिक, शीतल गुणाची आणि कोणाचेही मन मोहून टाकणारी अशी आहे. त्यामुळे कामशास्त्रात या चंदनाचा उपयोग वात्स्यायनाने विशेष करून सांगितलेला दिसतो. यानंतर नागरकाच्या
दिनचर्येत भोजनविधीचे वर्णन आहे. भोजनानंतर नागरकाने आपल्या घरातील पोपट, मैना यांना शिकवावे आणि त्यांच्याशी बोलावे. तसेच त्याने कला, क्रीडा, विनोद यांचाही आस्वाद घ्यावा आणि मग निद्रा घ्यावी, असे वात्स्यायन सांगतो. हे सर्व वर्णन पाहिल्यावर वात्स्यायनाची असलेली आरोग्यदायी सौंदर्यदृष्टी यामधून आपल्याला दिसते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ayurvijay23@rediffmail.com