आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी विद्या, मग अर्थ, नंतरच काम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वात्स्यायनाने केलेली कामशास्त्राची रचना ही मुळात ब्रह्मवचनापासून केली, असा इतिहास आपण पाहिला. या ब्रह्मवचनापासून श्री महादेवांचा अनुचर नंदी याने त्यामधील कामविषयक एक हजार अध्याय वेगळे करून प्रथम कामसूत्राची निर्मिती केली. नंदीच्या या कामसूत्राला उद्दालक पुत्र श्वेतकेतूने आणखी संक्षिप्त करून ते ५०० अध्यायांमध्ये बसवले. त्यानंतर पांचाल देशाच्या ब्रह्मपुत्राने १५० अध्यायांमध्ये संक्षेप केला. त्यामध्ये साम्प्रयोगिक, कन्यासम्प्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक, वैशिक, औपनिषदिक या अधिकरणांचा समावेश होता. यानंतर आचार्य बाभ्रव्य यांनी कामसूत्राच्या संपादनाची नवी परंपरा निर्माण करून अधिकरण आणि अध्यायांमध्ये त्याची रचना केली. यानंतर आचार्य दत्तक यांनी कामसूत्राचे संपादन केले. त्यानंतर चारायन, सुवर्णनाभ, घोटकमुख त्यानंतर गोनर्दीय, गोणिकापुत्र, कुचुमार या आचार्यांनी कामसूत्राच्या विविध अधिकरणांना वेगवेगळे केले. पण त्यामुळे कामसूत्राची रचना अखंड राहिली नाही. वात्स्यायनाने मात्र सामान्य लोकांना समजेल, अशा रीतीने सूत्रबद्ध अशा कामशास्त्राची रचना केली. हा सगळा इतिहास पाहिल्यावर वात्स्यायनाने रचलेल्या कामशास्त्राचे महत्त्व आपल्या लक्षात येते. ही रचना करताना वात्स्यायनाने आपल्या कामसूत्रात आवश्यक तेवढाच भाग घेतलेला आहे. कामशास्त्राच्या या रचनेत वात्स्यायनाने एकदम कामविषयक सूत्रांची मांडणी केली नाही, हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे वात्स्यायनाने धर्म, अर्थ आणि काम या तीन घटकांचा विचार ग्रंथाच्या सुरुवातीला केला. पण त्यापुढे वात्स्यायनाने असे सांगितले आहे की, मानवी जीवनात सर्वप्रथम विद्यार्जन करावे. त्यानंतर अर्थार्जन करावे आणि मग विवाह करून काम हा पुरुषार्थ साधावा. कामसूत्र या ग्रंथाच्या सुरुवातीला वात्स्यायनाने मंगलाचरण आणि मग पुढे ग्रंथात आलेल्या विषयांबद्दल माहिती दिली आहे. त्याला शास्त्रसंग्रह असे ग्रंथकाराने संबोधले आहे. प्राचीन ग्रंथांचे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल, की ग्रंथाच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायात त्या ग्रंथात पुढे येणा-या विषयांची सूची पाहायला मिळते. वाग्भट या आयुर्वेदीय ग्रंथकाराने लिहिलेल्या ‘अष्टांगहृदय’ या ग्रंथातही सुरुवातीला अशी श्लोकबद्ध विषयसूची आढळते.
वात्स्यायनाच्या कामसूत्रात आलेल्या विषयांबद्दल आपण पुढील लेखांकात माहिती घेणार आहोतच. तत्पूर्वी वात्स्यायनाने सांगितलेला विद्या, अर्थ आणि नंतर काम यांच्या अनुक्रमे प्राप्तीचा विषय आजच्या कालानुरूप आहे, हे मुद्दाम ध्यानात घेणे आवश्यक आहे. लैंगिक स्वैराचाराकडे झुकत चाललेली युवा पिढीची मानसिकता हा स्वाभाविक चिंतेचा विषय बनला आहे. युवा पिढीच्या या मानसिकतेला मर्यादा घालून आयुष्याच्या सुरुवातीला केवळ विद्यार्जन करण्याचा व्यावहारिक सल्ला जणू वात्स्यायनाने दिला आहे.

सध्याची युवा पिढी ही आयुष्याच्या सुरुवातीला विद्यार्जन करीत आहे. असे असले तरीसुद्धा या पिढीला योग्य दिशेने आणि योग्य प्रकारे लैंगिक शिक्षण दिले जात नसल्यामुळे विद्यार्जन करणारी ही युवा पिढी काम या विषयाकडे एका विकृत जिज्ञासेने बघते आहे की काय, अशी शंका घेण्यास पुरेशी जागा आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंटरनेट व सीडीच्या माध्यमातून युवा पिढीला कामासक्त बनवतील असे चित्रपट व अन्य गोष्टी अत्यंत कमी किमतीत सहजासहजी उपलब्ध होत आहेत. या गोष्टी त्यांच्या मनावर विकृत परिणाम घडवत आहेत. या पार्श्वभूमीवर सुमारे सतराशे-अठराशे वर्षांपूर्वी वात्स्यायनाने केलेले मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचे आहे. माध्यमिक शालेय स्तरावर आणि पुढे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर योग्य दिशेने अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण अर्थातच भारतीय स्वास्थ्य चिंतनाला अनुसरून देणे, ही काळाची गरज आहे.

वात्स्यायनाने या ठिकाणी कोणत्याही विषयाचे ज्ञान महत्त्वाचे मानले आहे. जसे मानवी जीवनात विद्या, अर्थ आणि काम असा क्रम ग्रंथकार सांगतो; त्याचप्रमाणे तरुण-तरुणींनी विवाह करण्यापूर्वी कामशास्त्राचे ज्ञान आत्मसात करावे, असा सल्ला त्यांनी कामसूत्र या ग्रंथाच्या सुरुवातीलाच दिला आहे. विवाह हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. पती आणि पत्नी यांचे वैवाहिक जीवन यशस्वी व्हावे, यासाठी या दोघांनीही कामशास्त्राचे अध्ययन करावे. असे केल्यास पती आणि पत्नी यांचे पुढील आयुष्य सुखकर होते, असे वात्स्यायन सांगतो. विशेष म्हणजे, वात्स्यायनाने कामशास्त्र हे पती-पत्नीच्या केवळ शारीरिक संबंधांपुरते मर्यादित न ठेवता पती-पत्नीने मनानेही एकत्र येण्याची गरज प्रतिपादन केली आहे. अशा प्रकारे एकूणच कामशास्त्राच्या ज्ञानाचे महत्त्व वाचकांच्या लक्षात आले असेल.

ayurvijay23@rediffmail.com