आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलनायकांमधील उपेक्षित नायक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात, कोल्हापूर सिनेटोन, हंस, न्यू हंस, नवयुग, मंगल पिक्चर्स अशा आद्य चित्रपट निर्मिती संस्था काढण्यामध्ये आणि चालवण्यामध्ये ज्यांचा हातभार होता आणि त्यामधील चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून ज्यांचा वावर होता, त्या आद्य बाबूराव पेंढारकर यांना हा शेवटचा लेख अर्पण...

बूराव पेंढारकरांच्या कारकीर्दीचा आढावा घेतल्याशिवाय ‘खलनायक’ लेखमालेचा निरोप घेता येणार नाही. हा ‘प्रथम’ खलनायक नेहमीच ‘अनसंग हिरो’ अर्थात उपेक्षित नायक राहिला. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी काही माणसे असतात, ज्यांना त्यांच्या पात्रतेनुसार श्रेय दिले जात नाही. त्यांच्यावर काही प्रमाणात प्रसिद्धिमाध्यमे आणि इतिहास अन्यायच करीत असतो. बाबूराव पेंढारकरांचे मराठी चित्रपटसृष्टीमधील, विशेषत: चित्रपट संस्था निर्माण करण्याचे कार्य नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. बाबूराव पेंटरांची महाराष्ट्र फिल्म कंपनी ते प्र. के. अत्र्यांची ‘अत्रे पिक्चर्स’पर्यंत म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या ‘पहिल्या पाळण्या’च्या काळातील इतिहासाचे ते केवळ साक्षीदार नव्हते, तर त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. अर्थात, हे विस्ताराने जाणण्यासाठी त्यांचे ‘चित्र आणि चरित्र’ हे आत्मकथन वाचणे गरजेचे आहे. ‘प्रभात’मध्ये मॅनेजर असताना "बजरबहू' या पहिल्या बालचित्रपटामध्ये त्यांनी दुष्ट दिवाणाची भूमिका केली.
मग आला ‘अयोध्येचा राजा’मधील गंगानाथ महाजन. ही व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी काय करावे, या विचारात असताना मित्राच्या बायकोचे निधन झाले. तिचे क्रियाकर्म करणारा भटजी ‘किरवंत’ पाहिल्यावर पेंढारकरांना गंगानाथ सापडला. किरवंताच्या थंड वृत्तीला जोड म्हणून ‘दामलेमामां’ची जानवे हातात घेऊन त्याच्याशी चाळा करण्याची लकब त्यांनी घेतली. शांतारामबापूंनी त्यांना चेहऱ्यावरील छपरी मिशीखालून बोटांची नखं फिरवण्याची सूचना केली. एवढ्या शस्त्रानिशी गंगानाथ महाराज खलनायकाचा अर्क म्हणून उभा राहिला.
कोल्हापूर सिनेटोनच्या ‘आकाशवाणी’ चित्रपटामध्ये कंसाचा सरदार ‘दिग्पाल’ त्यांनी नेहमीच्या खलनायकी पद्धतीने उभा केला. ‘अर्धांगी’ चित्रपटामध्ये झेड मारोतराव हे खलनायकी पात्र उभे करताना त्या काळातील फॅशनप्रमाणे हातामध्ये ब्लॅक अँड व्हाइट सिगारेटचा टिन आणि काखेमध्ये छोटी वेताची छडी ही अवजारे ‘प्रॉप’ म्हणून वापरली.

‘दो आँखे बारह हाथ’मधील जेलरचे अस्तित्व केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अधोरेखित केले होते. तालमीमध्ये कमावलेले कोल्हापुरी शरीर, भेदक नजर आणि पुरेपूर भरलेला आत्मविश्वास बाबूरावांना आयुष्यभर पुरला होता. एका टप्प्यानंतर त्यांना रंगभूमीनेही साद घातली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सादर झालेल्या नाट्य महोत्सवात त्यांनी ‘झुंझारराव’ नाटकात काम केले. १९५१ मध्ये ‘रंगमंदिर’च्या ‘शिवसंभव’ नाटकातही भूमिका केली. मधल्या काळात ‘महात्मा फुले’ या अत्रे पिक्चर्सच्या चित्रपटामधील फुलेंची भूमिकाही गाजली. ‘कीचकवध’मधील कीचक बाबूरावांनी उभा केला, आणि या चित्रपटामधील श्रवणीय गाणे कोण विसरेल...‘धुंद मधुमती रात रे नाच रे!’ काळानुरूप बदलणारे, भूतकाळात पाय न अडकवता सतत पुढचा, बदलाचा विचार करणारे बाबूराव चित्रपटसृष्टीचे चालतेबोलते उदाहरण होते आणि म्हणूनच- जो बदला नहीं, समझो रहा नहीं!
गेले वर्षभर ‘खलनायक’ सदरामधून आपण जवळपास ३० ते ३२ खलनायकांच्या करिअरबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल एकूण चित्रपट माध्यमावरील प्रभावाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली की, समाजातील वेगवेगळ्या प्रवाहांचा, प्रगतीचा, माध्यमांचा, नाटक-चित्रपटासारख्या जिवंत कलेवर तत्काळ परिणाम होतो आणि त्याचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसून येते. आम्हाला ‘हिस्ट्री ऑफ आर्ट‌्स’च्या अभ्यासक्रमामध्ये असे शिकवण्यात आले की, सभोवतालच्या वातावरणाचा, भूगोलाचा, निसर्गाचा कलेवर खोलवर प्रभाव पडतो. इजिप्तमधील वाळवंटाच्या सरळ आडव्या रेषांचा प्रभाव तेथील पिरॅमिड‌्सच्या सरळ रेषेतील त्रिकोणाकृती आकारात दिसतो. तर भारतातील निसर्ग, झाडे, फळे, पशू, पक्षी यांचा सभोवताल इथल्या मंदिरांच्या शिल्पांमधून प्रकट होतो. हेच तत्त्व चित्रपटांनाही आणि त्यामधील खलनायकांनाही लागू होते.

अगदी रामायण, महाभारतापासून चालत आलेले खलनायक आपण पाहिले. अगदी पुराणकाळात न जाता, अलीकडील खलनायकांकडे पाहिले तर लक्षात येईल की, गाव, वस्ती, खेडी यामध्ये समाज वसला होता, तेव्हा गावातील गुंड, जमीनदार, वतनदार, सावकार हे खलनायक म्हणून उभे रािहले. त्यामध्ये दरोडेखोर किंवा जमीनदाराची हत्यारी माणसे आदी फौजा, गोष्टींमधील काळी बाजू सांभाळीत. गावातील वतनदाराचा मुन्शी, लेखणीच्या एका फटकाऱ्याने नायकाला देशोधडीला लावणारा कारकून आदी पात्रे कन्हैयालाल, बी. एम. व्यास, नाना पळशीकर आदी नट ताकदीने साकार करीत. त्यानंतर स्वातंत्र्याच्या वाऱ्याबरोबर सत्तेची झूल पांघरलेले पांढरे बगळे राजकारणी आले. आशुतोष राणा, सदाशिव अमरापूरकर, दिलीप ताहिल, सयाजी शिंदे यांनी ताळतंत्र सोडलेले राजकारणी ‘उभे’ करताना आपला करिअरचा बराच काळ कारणी लावला. प्रेम चोप्रा, प्रेमनाथ, प्राण यांच्या खलनायकी पिढीनंतर सदाशिव, गुलशन ग्रोव्हर, अनुपम, कादर खान, शक्ती कपूर ही पिढी आली. त्यातला गुलशन आपल्या वेगवेगळ्या गेटअपमध्ये अडकला. कादर खान आणि शक्ती कपूर विनोदाच्या अंगाने खलनायकी करू लागले, पण कमरेखालच्या विनोदाने अत्यंत हीन पातळीवर नाचत राहिले. अनुपमने विचारपूर्वक भूमिका करीत आपला ट्रॅक बदलला आणि कॅरेक्टर अ‍ॅक्टर म्हणून स्थिरावला. मधल्या काळात सोज्वळ इमेज असणाऱ्या अमोल पालेकरांनीही खलनायकी भूमिका केल्या. पण त्याचे नावीन्य एक-दोन चित्रपटांपलीकडे टिकणारे नव्हते. इन्स्पेक्टरची इमेज असणाऱ्या इफ्तिकारने ‘खेल खेल में’ चित्रपटामध्ये हा प्रयोग केला होता. पुढे कुलभूषण, डॅनी, शत्रुघ्न सिन्हा खलनायक म्हणून आले खरे; पण एक शत्रू सोडला, तर बाकी दोघे नायक म्हणून पुढे आले नाहीत आणि कालानुरूप अंतर्धान पावले.
राजकारणी खलनायकांची नवीनता संपल्यावर अमरीश पुरी, मदन पुरी, अमजद खान यांच्या रूपातले स्मगलर, दारूचे अड्डेवाले, काळाबाजार करणारे शहरी खलनायक उदयाला येतच होते. हाही काळ गेला. मुलांच्या कलाने न घेता आपली अपुरी स्वप्ने त्यांच्यावर लादणारे पालक खलनायक झाले. गोड गुलाबी, चंट सेक्रेटरी व्हिलन झाल्या. अज्ञात अतिरेकी, टेररिस्ट नवा खलनायक म्हणून पुढे आला. पोलिसदादाला खरंच काळ्या धंद्यातील दादा बनवून ‘आता माझी सटकली’ म्हणत नायक उचलून फेकून देऊ लागला. मध्येच एखादा खलनायक विकृत सेक्स पर्व्हरचा अवतार घेऊन जवळच्या विश्वासाच्या नात्यामधील काका, मामाच्या नावाखाली आपली काळी बाजू प्रकट करू लागला.

आता चित्रपट कथा नीतितत्त्वे, बोधपर गोष्टी सांगत नाहीत, ‘मॉरल’ शिकवत नाहीत, त्यामुळे ‘व्हिलन’ ना रावण राहिला, ना नायक-नायिका राम आणि सीता. काळ्याविरुद्ध पांढरा संघर्ष संपला. चांगल्या नात्यामधील ग्रे शेड‌्स दिसू लागल्या आणि या करड्या छटा फक्त खलनायकांच्या भूमिकेत नव्हे, तर नायकांच्या भूमिकेतही िझरपू लागल्या.

मागे नाटकांच्या तालमीसाठी शाळेचा हॉल मागण्यासाठी मी धों. वि. देशपांडे सरांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी कुठला सिनेमा पाहिलास, म्हणून विचारले. मी ‘गॉडफादर’ मला फार आवडला, असे सांगितले. तेव्हा सरांनी ही एका ‘बास्टर्ड’ची गोष्ट आहे, आणि ‘शोले’मध्येसुद्धा गुन्हेगार हीरो आहेत, हे विश्लेषण करून सांगितले. ही समाजमन बदलत चालल्याची लक्षणे आहेत. पुढील काळात काय वाढून ठेवले आहे, ते सांगता येत नाही, म्हणून त्यांनी हताशा व्यक्त केली होती. आता यापुढील काळात काय येणार आहे, हे माहीत नसले तरी पूर्वी नामशेष होत गेलेल्या खलनायकांच्या यादीकडे नजर टाकली तर लक्षात येईल, जो बदलला नाही तो मेला. ‘जो बदला नहीं... समझो रहा नहीं...! (समाप्त)
raghuvirkul@gmail.com