आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Villain Cruella De Vil By Raghuvir Kul

क्रुयेला डे विल: एक लाडकी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बच्चे कंपनीचा आवडता चित्रपट ‘१०१ डालमेशियन्स’ सर्वांना माहीत आहे. या चित्रपटामधील मुख्य व्हिलन क्रुयेला नावाची बाई आहे. डोदी स्मिथ नावाच्या लेखिकेने या क्रुयेलाला जन्माला घातले. तिच्या ‘१०१ डालमेशियन्स’ कादंबरीमध्ये प्रथम हिचा अवतार झाला. आजतागायत झालेल्या अनेक ‘ग्रेटेस्ट व्हिलन ऑफ वर्ल्ड’ चाचण्यांमध्ये क्रुयेला पहिल्या दहा नंबरात झळकली आहे. डिस्नेचे अ‍ॅनिमेशनपट, लाइव्ह अ‍ॅक्शनपट, टीव्ही शोज, ब्रॉडवेवरील म्युझिकल्स या सर्व माध्यमांतून क्रुयेला छा गयी है. एवढेच नाही तर फोर्ब्ज मॅगझिनच्या सर्वात श्रीमंत अ‍ॅनिमेशन कॅरेक्टरच्या यादीतसुद्धा क्रुयेला आठव्या नंबरवर आहे. (अमेरिकन मासिके कोणकोणत्या चाचण्या घेतील, काही सांगता येत नाही.)

क्रुयेलाच्या नावापुढे डे-विल हा जो पदवीसारखा अक्षर समूह जोडला गेला आहे, तो एकत्र वाचला तर त्याचा उच्चार ‘डेव्हिल’ असा होतो. थोडक्यात, ‘चेटकीण’. काळ्या-पांढ-या रंगाची वेणी असलेल्या या बाईचे वेड पराकोटीचे आहे. संपूर्ण अंगभर सॅटिनचा गाऊन, गळ्यात रंगीबरंगी मोठमोठ्या किमती रत्नाच्या माळा, डोक्यावर भांगाच्या मधोमध दोन्ही बाजूला जाणारे लांबलचक केस-एका बाजूला पांढरे तर दुस-या बाजूला काळे. त्यावर घातलेला पायघोळ गाऊन किंवा लाँगकोटही तसाच अर्धा पांढरा, कधी काळा. हातामध्ये लांब निमुळत्या सिगरेट होल्डरमध्ये जळणारी सिगरेट आणि त्या सिगरेटचा निघणारा हिरवा धूर!
हिरवा रंग विषाचा रंग आहे. आपल्याकडे तसेच जगभरात रंगांना वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले आहेत. अर्थात, ते प्रांतानुसार, देशनिहाय काही वेळा बदलतात. जसा भारतात लाल रंग सौभाग्याचे लक्षण मानतात, तर तोच लाल रंग रशियामध्ये क्रांतीचे प्रतीक ठरतो. जर्मनी देश पिवळ्या रंगाशी निगडित झाला आहे; तर निळ्या, लाल रंगाचा वापर अमेरिकन वाटतो. पण हिरवा रंग मात्र सर्वत्र विषाचा किंवा अमानवी मानला जातो. रासायनिक प्रक्रिया होऊन निर्माण झालेला ‘हंक’ किंवा काही विचित्र प्राणी हिरव्या रंगात पाहिल्याचे आठवत असेल.

तर अशी ही हिरव्या रंगाचा धूर सोडणारी सिगरेट पिणारी ‘क्रुयेला’ अमानवी आहे, हेच सूचित करावयाचे आहे. हिची मोठी किमती गाडीसुद्धा काळ्या-पांढ-या पट्ट्यापट्ट्याने रंगवलेली आहे. ती जेव्हा रस्त्यावरून पळू लागते, तेव्हा रस्त्यावर रंगवलेला झेब्राक्रॉसिंग पळू लागला आहे का काय, असे वाटू लागते.

आपल्या अंगावर डालमेशियन कुत्र्याप्रमाणे काळे डाग यावेत, म्हणून क्रुयेला एकदा काळी शाईसुद्धा पिते. अर्थात, या उद्योगामुळे तिला बडतर्फही व्हावे लागले. काळ्या रंगाचा एवढा हव्यास की सर्व खाद्यपदार्थांमध्ये काळी मिरपूड प्रमाणाबाहेर वापरत असल्यामुळे तिखटाशिवाय जेवणाला दुसरी चव नाही. हिने पाळलेली मांजरसुद्धा उंची, दुर्मीळ जातीची असून पूर्ण पांढरी आहे. बाईला गरम हवेतसुद्धा नेहमी थंडी वाजत असते, म्हणून जाडा फरचा ओव्हरकोट ती वापरते. काळ्याकुट्ट रात्री संचार करणे हिला आवडणारच, कारण रात्र काळी असते ना?

हिच्या ‘क्रुयेला’ या फ्रेंच उच्चारासारख्या नावामुळे अनेक गाणीही झाली आहेत. डेव्हिलऽऽऽ डेव्हिलऽऽऽ अशा आलापांनी भरपूर असलेल्या गाण्यांबरोबर या गाण्यांची विडंबनेही अनेक आहेत. अमेरिकन प्रसिद्ध सिटकॉम ‘सिमसन’मध्येसुद्धा क्रुयेलावर एपिसोड गाजलेले आहेत.
क्रुयेलाचा जिताजागता अवतार म्हणावे अशा लेडी गागालाही हिच्यासारखी वेशभूषा करण्याचा मोह आवरला नाही. संपूर्ण काळ्या-पांढ-या वेषात, काळ्या-पांढ-या केसांचा विग आणि पायातील जोड्यांसकट ही गागा हातामध्ये बंदूक घेऊन एकदा अवतरली होती.
या सर्व घटनांमधून एकच गोष्ट सिद्ध होते. ती म्हणजे, क्रुयेलाचे गारूड अमेरिकन आणि युरोपीय जनमानसावर केवढे मोठे आहे आणि तिला टाळून ‘खलनायक’ नावाला वजन किंवा भीतीचा पदर लाभणार नाही.

१९५६ मध्ये अवतरलेल्या १०१ डालमेशियन्स कादंबरीची रूपरेखा काहीशी अशी आहे. अनिता आणि रॉबर्ट हे एक जोडपे आहे. त्यांच्या घरातील डालमेशियन कुत्रीला आठ पिल्ले होतात. क्रुयेला आपल्या काळा-पांढ-या वेडापायी ९९ कुत्र्याच्या पिल्लांना (अर्थात डालमेशियन) मारून स्वत:साठी गाऊन शिवणार असते. कारण त्यांच्या अंगावर पांढ-या रंगावर काळे शाई शिंपडल्यासारखे डाग असतात. आणि पिल्लेच का? तर त्यांची फर (केस) मुलायम असते. ती मोठी झाली की केस राठ होतात आणि अंगाला टोचतात (मोठी नाजूक नार ही). घरातील पिल्ले देणार नाही, असे म्हटल्यावर क्रुयेला रागाने रॉबर्टच्या अंगावर पेनमधून काळी शाई शिंपडते. लहान पिल्ले पांढरी शुभ्र असतात. आठवडाभराने मोठी झाली की मग त्यांच्या अंगावर काळे डाग येऊ लागतील, असे सांगितल्यावर सर्व पिल्ले आताच म्हणाल त्या किमतीला घेण्यास ती तयार असते. पण पिल्ले देणार नाही, सांगितल्यावर बाईचा पारा चढतो आणि मग ती ही पिल्ले आपल्या दोन गुंड हस्तकांद्वारे पळविण्याचा कट रचते.

हे दोन मूर्ख हस्तक आणि भान हरवलेली, हव्यासाने आंधळी झालेली क्रुयेला, तिचा उतावळेपणा यामधून धमाल घटना घडत जातात आणि शेवटी क्रुयेलाच्या पराभवाच्या घटनेपर्यंत बच्चेमंडळी सतत हसत किंवा घाबरत उसळत राहतात. सरळ-साध्या काळ्या-पांढ-यांच्या या संघर्षनाट्याने क्रुयेलाला जागतिक व्हिलन्सच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. खलनायिकेचे सर्व रंग, ढंग, विचित्रपणा, खुनशीपणा ठासून भरलेल्या क्रुयेलाचा अभ्यास करून कोणी नटाने वा नटीने खलनायक रंगवला तर तो कधीच अपयशी होणार नाही. अर्थात, नट म्हणून तो यशस्वी तेव्हाच होईल, जेव्हा त्याने साकारलेला खलनायक अपयशी पाहून बच्चेकंपनी टाळ्या वाजवेल!

raghuvirkul@gmail.com