आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी झाले श्रीमंत श्रीमंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही घरांतील लोकांना व बायकांना पाणी कमी वापरा असं सांगितलं तर पटत नाही व त्या ऐकत पण नाहीत व पुढील आयुष्याचा विचार करत नाहीत. यांच्यासारख्या लोकांसाठी अशा योजना अमलात आणणे आवश्यक आहे. बक्षीस मिळण्याच्या लालसेने का होईना असे लोक पाण्याचा गैरवापर करणार नाहीत.

अलका : बाई मी झाले श्रीमंत, श्रीमंत; नाही कुणाला जुमानत.
बनी : अगं, अगं हो. पण तू कशी श्रीमंत झालीस अचानक?
अलका : माझ्या घरी आली गोदावरी.
बनी : गोदावरी? कोणती गोदावरी? ती चेतनानगरमधली?
अलका : अगं! नाही, नाही.
बनी : मग? त्या भांडेवालीची मुलगी गोदावरी?
अलका : अगं! नाही, ही गोदावरी म्हणजे, जलदेवता, जलराणी आहे.
बनी : ‘जलदेवता?’ ती कशी आणि कुणी आणली तुझ्या घरी.
अलका : अग ऐक, सांगते. पालिकेने गोदावरीला एक इंच नलिकेतून माझ्या घरी आणले.
बनी : अगं! पण तुझ्या घरी तर एक गोदावरी आहे.
अलका : अग हो! पण तिच्या भावाला पालिकेला मी ब-याच दिवसात चिरीमिरीचा खाऊ दिला नाही. त्यामुळे पहिली गोदावरी रुसून बसली आहे.
बनी : असं का, मग?
अलका : आता तिचा भाऊ खाऊ खाल्ल्यामुळे खूष आहे. त्यामुळे त्यांनी दुसरी बहीण एक इंच नलिकेतून माझ्या घरी पाठवली आहे. व दोघी एकमेकीला भेटल्यामुळे खुश होऊन इकडून तिकडे धावत आहेत.
बनी : वा! वा! वा! छान.
अलका : आणि सांगते तुला बनी, या दोघी बहिणी आता वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर व बागेत, कारंजाशी खेळतायत, नाचतायत. कुंड्यांतील झाडांना गुदगुल्या करून हसवतायत, मोठ्या झाडांच्या पानांवरून घरंगळत खाली येतायत. आणि हे सर्व बघून मला फार प्रसन्न वाटतंय. हौदातील कासव, मासे कारंजाबरोबर डुलताना बघून मला छान वाटतय. श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. म्हणूनच म्हणते, बाई मी झाले श्रीमंत, श्रीमंत; नाही कुणाला जुमानत.
बनी : अरे वा! तुझ्याकडे आता दुसरी गोदावरी आली मग पार्टीबिर्टी देतेस का नाही?
अलका : पार्टी, अग ती तर देणारच. कारण पार्टीसाठी काही तरी कारणच पाहिजे ना? मग झालं तर, या सर्वजणी माझ्याकडे रविवारी.
बनी : हो, हो आम्ही येणारच.
अलका : माझ्याकडील चार गाड्या, घर, अंगण धुण्यासाठी आता नोकरांना कामास लावावे लागेल. आणि मी स्वत: पण तयारीस लागते.
लोक : (गाड्या धुतल्याचे पाणी रस्त्यावर वाहात असलेले बघून काही मुले व स्त्रिया, थांबून पाण्याकडे पाहत राहतात. व आवाज देतात) बाई! अहो बाई! साहेब! अहो साहेब! पाणी देता का थोडं? केव्हापासून रिकाम्या कळश्या घेऊन वणवण फिरतो आहोत. देता का पाणी? पिण्यासाठी पाहिजे हो!
अलका : (त्यांच्याकडे तुच्छतेने बघून) बाई मी आहे श्रीमंत, श्रीमंत; नाही गरिबांना बोलत, नाही कुणाचं ऐकत, नाही कुणाला जुमानत.
बनी : अगदी बरोबर आहे अलका तुझं. कशाला गरिबांकडे लक्ष द्यायचं आपण? कोण गरिबांकडे लक्ष देतो? ते जगोत नाही तर मरोत, आपल्याला काय त्याचं?
अलका : हो गं! अगदी खरं आहे तुझं, कुठे पाटबंधारे खात्यातील लोक, नगरपालिकेचे लोक, पुढारी, गरिबांकडे लक्ष देतात. त्यांचे सर्व यथासांग चाललेले असते. लग्न काय की वाढदिवस काय? हे लोक कुणी लक्ष देतात का? उद्याचा विचार करतात का? मग आपण तर सर्वसामान्य लोक आपण याचा का विचार करावयाचा? जाऊ दे चल!
बनी : अगं, अलका! ते बघ तिकडे तुझा मुलगा त्या गरिबांना वॉटरबॅग भरून भरून पाणी आणतोय व देतोय. किती हा पाण्याचा अपव्यय करतोय.
अलका : जाऊ दे त्याला काय करायचं ते करू दे, चल मी आता मस्त शॉवरखाली उभी राहते, फ्रेश होते. बरं का बने, माझ्याकडे आहे शॉवर आणि टब बाथ. त्यात मी खेळते एक एक तास. डोक्यावर शॅम्पूचे बुडबुडे करून त्यात मी खेळते, लोळते, मज्जा करते, म्हणूनच तर म्हणते बाई मी श्रीमंत श्रीमंत; नाही कुणाला जुमानत.
बनी : अगं! अलका किती पाण्यात खेळलीस, ताप-सर्दी झाली वाटते तुला?
अलका : अगं, होणारच त्यावर संध्याकाळी उपाय करीन औषध घेईन.
बनी : औषध? काय घेशील?
अलका : त्यावर औषध म्हणून मी घेईन बिअर, फोडेन शॅम्पेन, पण एन्जॉय करीनच करीन. कारण माझ्याकडे आहे खूप पाणी, पैसा आणि पॉवर. म्हणूनच म्हणते बाई मी श्रीमंत, श्रीमंत; नाही कुणाला जुमानत.
बनी : अगं अलका, तू खूप श्रीमंत व नव्या विचाराची आहेस म्हणून तू स्वत: एन्जॉय करतेस व दुस-यांना पण एन्जॉय करण्यास प्रवृत्त करतेस, वा! वा! ग्रेट आहेस तू.
काशी : अग! बनी, अलका ऐकता का? काल मी मॉलमध्ये गेले होते. तर तिथे एक जाहिरात लागली होती. व अनाउन्समेंट पण चालू होती.
अलका : अग, पण कशाची जाहिरात, कशाची अनाउन्समेंट?
काशी : ऐक! सांगते. ‘मे महिन्यात जे कुटुंब सर्वात कमी पाण्याचा वापर करेल त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी एप्रिलअखेरपर्यंत आपली नावे मॉलमधील ऑफिसमध्ये नोंदवावीत.’
अलका : असे कोणते मोठे बक्षीस देणार आहेत?
काशी : पहिल्या क्रमांकास युरोपला जाण्याची दोन व्यक्तींची तिकिटे व तेथे राहण्याची जेवणाची सोय करणार आहेत. व दुसरे बक्षीस म्हणजे सिंगापूरची दोन व्यक्तींची तिकिटे व राहण्याची जेवणाची सोय करणार आहेत.
अलका : पण या मॉलमधील लोकांना कसे कळणार कुणी किती पाणी वापरले ते?
काशी : ज्यांनी या स्पर्धेसाठी नाव नोंदवलंय त्यांच्या घरी मॉलमधील लोक पाण्याचे मोजमाप करणारे मीटर लावणार आहेत. त्यावरून त्यांना कोणी, किती, पाणी वापरले ते कळेल व ज्यांनी सर्वात कमी पाणी वापरलेले असेल त्यांना बक्षीस मिळेल.
अलका : असं आहे काय? खूपच छान योजना आहे. असे आजपर्यंत कुणीच आणि कधीच केलेले नाही. वा! वा! चल बनी, आपण आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन जाऊ व नाव नोंदवून येऊ, चल लवकर.
बनी : काही घरांतील लोकांना व बायकांना पाणी कमी वापरा, असं सांगितलं तर पटत नाही, व त्या ऐकत पण नाहीत व पुढील आयुष्याचा विचार करत नाहीत. यांच्यासारख्या लोकांसाठी अशा योजना अमलात आणणे आवश्यक आहे. बक्षीस मिळण्याच्या लालसेने का होईना असे लोक पाण्याचा गैरवापर करणार नाहीत व पाण्याची बचत होईल. ज्यांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही त्यांना थोडे तरी पाणी मिळेल. पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. मॉल जिंदाबाद.