कच्चे मांस, मच्छी, मटन, पनीर, थंडपेये, बर्फयुक्त याद्वारे हे शरीरात जाऊन पोटदुखी, उलटी, जुलाब, चक्कर येणे अशी लक्षणे सुरु होतात आणि शरीरातील पाणी कमी होऊन रुग्ण गंभीर होतो. अतिसार, संग्रहनी म्हणजेच dysentery सुद्धा असाच पचनाचा विकार उन्हाळ्यात आढळतो.
यात पोट दुखून, जुलाब होणे, शौचास चिकट होणे, रक्त पडणे, मळमळ होणे ही लक्षणे आढळतात.
त्वचा काळवंडणे : ही सुद्धा चैत्र, वैशाखात आढळणारी सामान्य समस्या आहे. सूर्य प्रकाशातील अतितिक्ष्ण किरणे त्वचेला बाधक ठरतात. त्वचा काळी पडते, लाल चट्टे येतात. आग होते. याला sunburn असे म्हणतात. सर्वांनाच हा त्रास होत नसला तरी ब-याच व्यक्तींना हा त्रास
जाणवतो.
मुर्च्छा येणे : सामान्य तक्रार विदर्भात हे प्रमाण जास्त आहे. कारण तापमान ४० अंशच्या वर असते.
आपल्याकडेही हा प्रकार अशात आढळून येतो. फिरस्ती कामगार, शेतकरी, मजूर, फेरीवाले, सुरक्षारक्षक, खेळाडू यांना दिवसभर उन्हात घालवावा लागत असल्याने आणि पुरेसा आहार न घेता बाहेरील पदार्थ शीतपेये यांचे सेवन करण्याकडे कल असल्याने शरीरातील ऊर्जा कमी होऊन उष्णतेचा त्रास होऊन घाम येणे, चक्कर येणे, ताप येणे, मळमळ होणे आणि व्यक्ती बेशुद्ध पडणे ही लक्षणे आढळतात. ज्याला उष्माघात असे म्हणतात. उन्हाळ्यातील उकाड्याने तसेच घरबसल्या उन्हाच्या झळा लागल्याने सुद्धा अस्वस्थ वाटणे, सुस्ती येणे, डोके, अंग दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे ही लक्षणे आढळतात. कूलर, फ्रिज, एसी या उपकरणांचा अतिवापर उन्हाळ्यात अनेक आजारांना आमंत्रित करत असतो. कूलरचे पाणी वेळच्या वेळी
न बदलल्यास तसेच ही उपकरणे नियमित स्वच्छ न केल्यास डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरियासारखे आजाराही उन्हाळ्यात दिसून येतात.
उन्हाळ्यातील आहार
>आहार हलका असावा, फळांचे रस, पालेभाज्या गाजर, मुळा, काकडी यांचे सेवन करावे.
>दूध, दही, ताक घ्यावे.
>नारळपाणी, लिंबूपाणी घ्यावे.
>तेल, मसाला, तुपकट पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे.
>उघड्यावरील पदार्थ टाळावेत.
>उसाचा रस घेताना बर्फरहित घ्यावा. तसेच स्वच्छतेची खात्री करून घ्यावी.
उन्हाळ्यात आजारांना दूर ठेवायचे असल्यास आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात
>शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कायम ठेवणे गरजेचे असल्याने भरपूर पाणी प्यावे.
> फ्रिजऐवजी माठातले पाणी उत्तम. शीतपेये, बाहेरील बर्फाचे पदार्थ टाळा
> लिंबू सरबत, कोकम, कैरीचे पन्हे, ताजी फळे खावीत.
> फ्रिजमधील पाणी पिताना बाहेर काही वेळ ठेवून नंतर प्यावे.
> उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. काही वेळ विश्रांती घेऊन प्यावे.
> चेहरा, डोळे थंड पाण्याने धुवावेत.
> शारीरिक स्वच्छता ठेवावी. दिवसाआड तरी केस धुवावेत.
> उन्हात बाहेर जाताना पांढरे कपडे, पांढरा रुमाल, टोपी, गाॅगल वापरावा.
> शक्यतो कडक उन्हात जाणे टाळावे.
> बाहेर जाताना कांदा जरूर बाळगावा. कारण कांद्यातील तैलद्रव्ये हे उन्हाचा शरीरावर होणारा परिणाम टाळतात.
> मुर्च्छा आल्यास अथवा बेशुद्ध पडल्यास आपण कांदा फोडून हुंगण्यास देतो. जेणेकरून व्यक्ती लगेच शुद्धीवर येतो. म्हणून उन्हाची तीव्रता कमी
करण्यासाठी कांदा उपयुक्त आहे. तसेच उन्हाळ्यात कांद्याच्या सेवनाने हातापायांना मुंग्या येणे, थकवा येणे ही लक्षणेही कमी होतात.
> गुळ, पपई, आंबा, कैरी हे पदार्थ उष्ण आहेत, परंतु हे पदार्थ उष्णतेने शरीरातील उष्णता कमी करतात. म्हणून या पदार्थांचा वापर करावा.
> रात्रीच्या वेळी अंडी, मांस, मटन, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे.
स्वाइन फ्लू हा इतर थंडीतापासारखी लक्षणे असणारा आजार आहे. जो प्राणघातक आहे. हा आजार पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रसारित होतो. कडक ऊन पडल्यानंतर स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल. हा समज खोटा ठरला आहे. भर उन्हाळ्यातही या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
हा आजार जीवघेणा जरी असला तरी याबद्दल मोठा बाऊ केला जात आहे. वास्तविक पाहता योग्य काळजी आणि त्वरित उपचार घेतल्यास स्वाइन
फ्लू बरा होऊ शकतो. स्वाइन फ्लूचे रुग्ण जरी वाढत असले तरी हा फ्लू प्रत्येक व्यक्तीस होऊ शकत नाही. याचे प्रमाण इतर आजारांपेक्षा कमीच आहे. साध्या थंडीतापाप्रमाणे लक्षणे जरी असली तरी सर्दी तापाच्या इतर रुग्णांची विनाकारण घाबरण्याची गरज नाही, परंतु साधे थंडीताप अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. स्वाइन फ्लू हा प्रामुख्याने प्रतिकारक्षमता कमी असलेल्या व्यक्तींना होतो. ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि २ वर्षांखालील बालके गरोदर महिला, मधुमेह व हृदयविकाराने पीडित रुग्ण, न्यूमोनिया, टीबी, जुनाट आजारांचे रुग्ण हे स्वाइन फ्लूसाठी धोकाप्रवण आहेत. त्वरित उपचार घेणे गरजेचे असते. स्वाइन फ्लूला प्रतिबंध करायचा असल्यास बाहेर जाताना योग्य रुमाल अथवा मास्क वापरणे. ६ ते ८ तासांनंतर स्वच्छ धुवून ठेवणे, अस्वच्छ जागी जाणे टाळणे, साथीच्या दिवसांत गर्दीच्या जागी जाणे टाळणे, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे, खोकताना, शिंकताना तोंडासमोर रुमाल धरणे, सर्दी, खोकला अथवा ताप येऊ नये यासाठी काळजी घेणे. शारीरिक स्वच्छता ठेवणे, पाणी उकळून पिणे. उघड्यावरील पदार्थ, शीतपेये, बर्फाचे पदार्थ यांचे सेवन टाळणे गरजेचे आहे.