आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अम्मा : झोपडपट्टीचा मानवी अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीवर कशीबशी रोवलेली फळकुटं, पुट्ठे म्हणजे भिंती आणि गोणपाटाचा दरवाजा याला झोपडी म्हणणं म्हणजे झोपडीचाही अपमान करणं आहे. अम्माच्या नशिबात अशीच झोपडी आहे.

‘चक्र’ ही महानगरातल्या एका झोपडपट्टीची कहाणी आहे. ती त्या झोपडपट्टीत राहणा-या अम्माची कहाणी आहे. चित्रपटाची सुरुवात होते ती अम्माच्या निद्राधीन चेह-याच्या क्लोज-अपवर. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झालेले आहेत. तिची झोप शांत नाहीय. तिला भूतकाळ स्वप्नांत दिसतोय. झोपेतही तिच्या मनात भूतकाळाच्या आठवणींचं काहूर कायम असतं. ते काहूर फ्लॅशबॅकमधून साकार होतं. या ‘डिव्हाइस’मधून दिग्दर्शक अम्मा या झोपडपट्टीत राहायला कधी आणि कशी आली, ती पार्श्वभूमी सांगतो आणि मग सुरू होतात चित्रपटाची टायटल्स- झोपडपट्टीतल्या सेपिया रंगातल्या विविध व्यवहारांच्या दृश्यांवर.

अम्मा मूळची दक्षिणेकडच्या विजापूर भागातली. नवरा आणि तान्हा मुलगा असं गरिबीतलं पण सुखा-समाधानाचं त्रिकोणी कुटुंब. पण अम्माच्या नव-याच्या संपर्कातला त्याला काम देणारा त्याचा मालक अम्माच्या अब्रूवर उठला आणि नव-यानं दगड घालून त्याचा खून केला. पोलिसांचा ससेमिरा चुकवत अम्मा आणि तिच्या नव-यानं तान्ह्या बेनवाला घेऊन पळ काढला. मुंबईच्या झोपडपट्टीत आश्रय घेतला. पण इथे झोपडी उभारण्यासाठी रेल्वे यार्डातून पत्रे चोरताना नवरा पोलिसांकडून मारला गेला आणि बेनवाला वाढवण्याची, त्याचं आणि आपलं पोट भरण्याची जबाबदारी एकट्या तरुण अम्मावर येऊन पडली. या जिण्यातल्या तडजोडी कधी स्वीकारत, कधी नाकारत अम्मानं बेनवा(रणजित चौधरी)ला वाढवलं.

चित्रपट वर्तमानात येतो. वर वर्णन केलं ती अम्माची झोपडी. बेनवाच्या हातून भांडं फुटलं म्हणून नुकतीच त्याची किराणा मालाच्या दुकानातली हरकाम्याची नोकरी गेली आहे. याच झोपडपट्टीतला पण हल्ली तडीपार झालेला दादा- लुका (नसीरुद्दीन शहा) बरेच दिवसांनी झोपडपट्टीत येतो. तडीपार असला तरी अजून त्याची झोपडपट्टीत वट आहे. इथले दुकानदार त्याला मुकाट वस्तू पुरवतात, बेनवासारख्या तरुण मुलांना त्याची ही दादागिरी, हीरोगिरी भावते. तो त्यांचा रोल मॉडेलच असतो. झोपडपट्टीतल्या लोकांना लुकाचा आधारही वाटतो. निराधार अम्माला विशेषच! बेनवाला ज्या मायेनं जेवू घालते तितक्याच आस्थेनं ती लुकाला जेवू घालते, त्याच्याशी सुख-दु:खाच्या गोष्टी बोलते, बेनवासाठी नोकरी बघ म्हणून म्हणते, पण दारूच्या भट्टीवरचं काम किंवा दारू पोहोचवण्याचं काम मात्र बेनवाला देऊ नये असंही तिला वाटतं, कारण पोलिसांचा ससेमिरा मागे लागणं म्हणजे काय, हे तिनं तिच्या आयुष्यात भोगलं आहे. त्या प्राक्तनापासून तिला बेनवाला वाचवायचं आहे. ‘पुलिस का जोखम मेरेको नहीं होना’ असं ती वारंवार सांगते. जपच करते म्हणा ना. बेनवा रघुरामाबरोबर दारूच्या भट्टीवर कामाला जायचं म्हणतो तेव्हा ती त्याला विरोध करते. म्हणते, ‘पैसा नहीं भी होगा तो चलेगा, लेकिन अपनी इज्जत होना. कमीच खाकर जियेंगे. लेकिन पुलिस का जोखम नहीं मंगता.’ तारुण्यात पदार्पण केलेल्या बेनवानं झोपडपट्टीतल्या तडजोडी समजून घेतलेल्या आहेत. जेवून रात्री अम्मा आणि लुका झोपडीत एकमेकांसोबत असतात तेव्हा बेनवा समजूतदारपणे झोपडीबाहेर खाटेवर पडतो. ट्रकच्या येण्याची खबर तो तत्परतेनं अम्माला देतो. ट्रकवाला अण्णा (कुलभूषण खरबंदा) म्हणजे अम्माचा आणखी एक आधार. रात्री कुणी आलंच तर म्हणून जेवण राखून ठेवणा-या अम्माला ‘मेरे हटते ही दूसरे को लेके बैठ गई क्या?’ म्हणून डिवचणारा लुका ट्रक आला कळताच आणि अम्मानं त्याला निघून जायची घाई करताच मुकाट्यानं निघून जातो. मग अम्मा बायकोनं वाढावं तसं प्रेमानं अण्णाला वाढते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून विसावते. ‘कोई आया था क्या?’ या अण्णाच्या संशयाला ती ‘ना रे. कौन आता?’ म्हणून दाद देत नाही. लुकाचं येणं लपवते.

एकेकाळी जी अम्मा अब्रू वाचवण्यासाठी जिवाचा आकांत करत धावली होती, जिची अब्रू वाचवण्यासाठी नव-यानं खून केला होता, तीच ही अम्मा. पण निराधार अम्मा बाजारबसवी झालेली नाही. लुकाला ती म्हणते, ‘तू इदरीच रैता तो अच्छा हो जाता.’ ‘तो फिर उसको किदर रखेगी जो भाकरी खाने आ रहा है... वो है कौन’ म्हणून टोकणा-या लुकाला अम्मा स्पष्टच सांगते, ‘कोई तो सहारा होना लुका.’ लग्न केलंस तर तुझी एकट्याची होऊन राहीन, असं ती लुकाला म्हणते. पण लुका सडाफटिंग राहण्यात धन्यता मानत आलेला आहे, हेही तिला माहीत आहे. लग्न-संसाराची जबाबदारी लुकानं कायम टाळली आहे. त्यापायी झोपडपट्टीतल्याच छेन्ना (अंजली पैगणकर) या मुलीनं जगण्याचा नको तो मार्ग स्वीकारला आहे. म्हातारा, आजारी बाप पुन्ना आणि भाऊ नागू बूट पॉलिश करणारा. छेन्ना तारुण्याचा वापर करून घरात पैसे आणते, हे झोपडपट्टीत सगळ्यांनाच माहीत आहे. आणि ते झोपडपट्टीनं स्वीकारलं आहे. लुका जबाबदारीनं तिची साथ देता तर लुकाचा झाला तसा करुण अंत झाला नसता आणि छेन्नालाही वाममार्ग स्वीकारावा लागला नसता. पण कदाचितच! लुकाच्या गुन्हेगारीनं त्याला तो पर्याय तरी ठेवला होता का, हा प्रश्न डोकावतोच.

कधी तरी येणारा ट्रकवाला अण्णा हाही अम्माचा मोठा आधार आहे, तो इथेच आपल्याबरोबर राहिला तर अम्माला त्याची म्हणून जगायला आवडेल, कारण त्यातून तिला स्थैर्य मिळेल. पण तो कधी तरी येतो, त्याची ट्रक ड्रायव्हरची नोकरी, शेठ सांगेल तिकडे जावं लागतं. ‘तुम सेठ को बोलको इदरीच बदली करा लो न जी’ असं त्यालाही ती सांगते. पण त्याचीही काही मजबूरी असावी. नोकरीची मजबूरी असतेच. त्याचं कुठे तरी इतरत्र मुंबईबाहेर घर असावं, संसार असावा हे त्यानं नाकारलं तरी अम्माला माहीत आहे. नाही तर मग त्यानं लग्नच नसतं का केलं तिच्याशी? अम्मा आहे ती परिस्थिती समजून घेऊन वागते. अण्णा ट्रक-ड्रायव्हर. त्याला सतत फिरावं लागतं, हेही खरंच. पण अम्माच्या गरजा अण्णा नक्की पुरवतो. अम्माने लुका आणि अण्णा या दोघांमध्ये मिळेल तेवढा आधार शोधला आहे.

अम्मा-लुका आणि अम्मा-अण्णा ही नाती म्हणजे, पोटाची आणि शरीराची भूक भागवणे एवढ्यापुरतीच सोय, असा निष्कर्ष काढून झोपडपट्टीबाहेरचं जग मोकळं होईल. पण त्या पलीकडेही हे नातं जातं. भावनिक पातळीवरही त्याचं अस्तित्व आहे. या दोन्ही नात्यांमध्ये सूक्ष्म फरकही आहे. लुकाशी अम्माचं नातं आहे ते जास्त मायेच्या अंगाने. आपला समवयस्क असला तरी आपल्या तरुण पोराचा जरा मोठा दोस्त असा तो तिला वाटत असावा, त्याच्या आजारात ती त्याच्या जखमांवर मायेनं लेप लावते, त्याच्या वेदनेनं कळवळते. अण्णामध्ये तिला ख-या अर्थानं आधार देऊ शकणारा पुरुष दिसतो. लुकाला ती प्रसंगी दमातही घेऊ शकते, पण अण्णापुढे आज्ञाधारक पत्नीप्रमाणे वागते. अम्माची ही नाती अगतिकतेतून जन्माला आली आहेत. तरी तिनं त्यांना सवंग होऊ दिलेलं नाही. झोपडपट्टीतल्या अगतिक जिण्यात निष्ठांचे अर्थ बदलतात. ते अर्थ समजून घ्यायची क्षमता झोपडपट्टीबाहेरच्या सुरक्षित, आश्वस्त जगातल्या नैतिकतेत नसते. इथे ते अस्तित्व टिकवण्याशी निगडित असतात.

अम्माच्या अंघोळीचं दृश्य हे असंच इथली अपरिहार्य अगतिकता अधोरेखित करणारं आहे. अम्माची अंघोळ झाडूवाला अधाशीपणे पाहतो. अम्माला त्याची कल्पना नाही असं नाही. परंतु ही अगतिकता हे आपलं वास्तव आहे, हे तिला माहीत आहे. अम्मानं त्याला पूर्णपणे दुर्लक्षितही केलेलं आहे. झाडूवाला पाहण्यापलीकडे काही करू शकणार नाही, कारण अम्मा सावध आहे. मुख्य म्हणजे, ती झाडूवाल्याला मर्यादा ओलांडू देणार नाही, ते तिच्या हातात आहे. झाडूवाल्याला चाळवण्याचा कोणताही प्रयत्न अम्मानं केलेला नाही. अंघोळ करून झोपडीत जाता जाता ती परत त्याला डाफरल्याशिवाय राहात नाही, ‘क्या बैठा है यहाँ हरामी सुबे सुबे. आँख फूट जाएगी तेरी.’ बस्स. यापेक्षा महत्त्व ती त्याला देतच नाही.

झोपडपट्टीतल्या शेजारधर्माचा खास पोत आहे. इथली सगळीच माणसं कुठून कुठून, वेगवेगळ्या प्रांतांतून येऊन इथे राहिली आहेत, ती तिथे जगणं कठीण, नव्हे; अशक्य बनलं म्हणून. जेमतेम आडोसा असा निवारा, आवश्यक नागरी सोयींचा अभाव आणि उत्पन्नाचे स्रोतही आहेत-नाहीतच्या सीमेवरचे, सदैव अपुरे, त्यामुळे नुसत्या जीव-धारणेसाठी करायच्या धडपडीतच जगणं अडकलेलं. मग शिक्षण, आरोग्य या गोष्टी इथे कधी फिरकणार? परिणामी जगण्यासाठी गुन्हेगारी किंवा अनैतिक मार्गांचा वापर करावा लागणं, त्यामुळे बाहेरच्या जगाचा अविश्वासच नशिबी आलेलं आणि म्हणून चांगल्या जगण्याचे किलकिले मार्गदेखील बंद होत जाणारं असं हे या जगाचं रूप आणि प्राक्तन. सारेच हे समजून असतात, ते त्यांच्या परस्पर संबंधातही दिसतं. ही माणसं भांडतात, प्रसंग येताच एक होतात, आपल्या फाटक्या झोळीतूनही शेजा-याला मदत करतात, शेजा-याचे तथाकथित अनैतिक व्यवहारही माफ करून चालतात. कुठून कुठून आली असली तरी या माणसांनी झोपडपट्टीतल्या समाजाची म्हणून एक संस्कृती बनवलेली दिसते. पुन्ना म्हणजे छेन्ना आणि नागूचा बाप मरतो तेव्हा हीच फाटकी माणसं पैसे गोळा करून त्याचा अंत्यसंस्कार करतात आणि मग प्रथेचा भाग म्हणून नागूनं सर्वांना दारू पाजली पाहिजे, म्हणून हट्टही धरतात. अम्मा या सगळ्याचा भाग असते. दारू प्यायला तीही सगळ्यांच्या बरोबर बसते. (चित्रपटाची नायिका म्हणून ती कुठे नेतागिरी करायला पुढे येत नाही, वस्तीला प्रवचन देत नाही, की सुधारणा राबवायचा प्रयत्न करत नाही.)

अम्माच्या स्वप्नांचं पर्स्पेक्टिव्ह तिचा परिसर ठरवतो. नीटनेटकी झोपडी असावी, ज्यात गुन्हेगारी आणि म्हणून पोलिसांची कटकट नाही अशी एखादी नोकरी बेनवाला मिळावी, त्याचा संसार थाटून द्यावा असं तिचं स्वप्न आहे. अण्णाबरोबर तिला स्वत:ला संसार थाटता आला असता तर तो तिला हवा होता. पण ते शक्य नाही हे जाणून तिनं आपल्या स्वप्नाला आवर घातलेला आहे. अण्णापासून तिला दिवस जातात, तेव्हाची अण्णाची प्रतिक्रिया सकारात्मक आहे, स्वागताची आहे. बेनवाचं लग्न करायचं तर धड झोपडी हवी, शिवाय ‘अपनाभी तो बच्चा होगा. उने इस गटर में आँखें खोलना मेरेको नहीं अच्छा लगेगा’ अशी इच्छा ती व्यक्त करते आणि अण्णा तिला आपल्या ओळखीच्या शेठच्या गोदामाच्या जागेत झोपडीसाठी जागा आणि ती उभी करायला लागणारं सामान आणून देतो. तेवढ्यातही ती समाधानी आहे. नव्या झोपडीपुढे ती तुळशीचं रोप लावते, त्याची पूजा करते, रांगोळी काढते. बेनवाचं लग्न करते, नव्या सुनेचं कौतुकानं स्वागत करते. स्वच्छ, चांगल्या जगण्याच्या आकांक्षेची ती प्रतीकं आहेत. पण अर्थातच झोपडपट्टीतल्या घटना ती जपू शकत नाहीत.


लुकाला पोलिसांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात अम्माच्या नव्या बाळाच्या स्वप्नाचा गर्भपात होतो, लुकाबरोबरच बेनवालाही पोलिस बेड्या घालून घेऊन जातात. देऊ केलेल्या जागेत गुंडे जमा कर रखे हैं, म्हणून शेठचा माणूस अण्णाला धमकावून जातो आणि पोलिस वस्ती खाली करायला लावतात. जिथे नवी, नीटनेटकी झोपडी उभारली, बेनवाचा संसार मांडून दिला, तिथे सरकारचा बुलडोझर येऊन दाखल होतो. स्थैर्याची अम्माची स्वप्नं पुन्हा बेघर होतात, अम्माचं जगणं पुन्हा बेघर होतं, पुन्हा उघड्यावर येतं. पुन्हा संघर्ष करण्यासाठी, पुन्हा नव्यानं तडजोडी करण्यासाठी, पुन्हा जगू पाहण्यासाठी ते पुन्हा दुष्टचक्राच्या नव्या फे-याबरोबर गरगर फिरू लागणार आहे... काय माहीत, एव्हाना अम्माची कोवळी सून - बेनवाची नववधू -अमली (अलका कुबल)- अम्माच्या भूमिकेत जगत असेल...!

झोपडपट्टीतल्या सा-याच स्त्री व्यक्तिरेखांची गोळाबेरीजही अम्मामध्ये होते. वेडसर तरुण मुलाला प्रसंगी करवादून चोपणारी आणि त्याला इतरांपासून वाचवण्यासाठी धडपडणारी, त्याच्यासाठी भांडणारी शेजारीण (सविता बजाज) अम्मामध्ये आहे. ती बेनवाला प्रसंगी डाफरते आणि त्याच्या भल्यासाठी धडपडते. अंगावर पिणा-या बाळाच्या आईची- लक्ष्मीची (रोहिणी हट्टंगडी)- काळजी घेते ती अम्माच्या आतली आईच. त्या बाळाच्या मृत्यूचं दु:ख समजून घेणारी अम्माच शोक करणा-या आईला ‘बस हो गया. कायको रोती?’ म्हणून डाफरते ते वडीलधारेपणाच्या अधिकारानं आणि वास्तवाच्या भानातून. भांडण होतं तेव्हा शेजारीण तिला छिनाल म्हणूनही संबोधते. परंतु तीच शेजारीण बेनवाच्या लग्नात अम्माच्या खांद्याला खांदा लावून उत्साहानं आणि आनंदानं सहभागी झालेली असते. छेन्नाचं वर्तन सगळ्यांना माहीत असतं, तरी कुणी तिला वाळीत नाही टाकलेलं. या सा-यांच्याच जगण्यातली अपरिहार्यता सा-यांनाच माहीत आहे. गुप्तरोग झालेल्या लुकालाही अम्मासह इथले लोक पूर्वीच्याच मायेनं स्वीकारतात. निष्ठांचे अर्थ इथे जगण्याच्या अतीव धडपडीनुसार लागतात.


अम्मा म्हणजे झोपडपट्टीचा मानवी अवतार आहे. आपलं व्यक्तिरेखापण राखूनही अम्मा झोपडपट्टीची प्रतीक बनली आहे. महानगरातली झोपडपट्टी जे जे म्हणून सामावून घेते, ते सारं सारं अम्माच्या जीवनात सामावलेलं आहे. दारिद्र्य आहेच, जेवणाची भ्रांत आहेच, निश्चिंतपणाचा पूर्ण अभाव आहेच, अभावातून, अगतिकतेतून अपरिहार्यपणे तथाकथित अपराधाकडे, अनैतिकाकडे वळण्याची आणि प्रयत्न करूनही त्या दलदलीतून बाहेर येता न येण्याची अगतिकता आहे. त्याचबरोबर पुन्हा पुन्हा वाटणारी आशा आहे, भले ती वांझ ठरत असली तरी! पण या दलदलीतही माणूसपणाची धुगधुगी जीव धरून असते. अम्माच्या हतबल, निराश डोळ्यांच्या अखेरच्या क्लोज-अपमध्ये ती धुगधुगी हतबलतेत आणि निराशेत मिसळलेली दिसते...