आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Woman Problems Vrushalee Kinhalkar, Divya Marathi

दोष ना कुणाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1971 पासून भारतात गर्भपाताला कायद्याची मान्यता मिळाली. स्त्रीच्या आरोग्याच्या आणि अस्तित्वाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा होता. नंतर गर्भजलचिकित्सा करून गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार काही डॉक्टरांनी आरंभला आणि मुलगी जन्माला येण्यापूर्वीच नष्ट केली जाऊ लागली. शासनाच्या लक्षात हे सगळे आले नाही किंवा असेही म्हणता येईल, त्याकडे सोयीस्कर डोळेझाकदेखील केली गेली.
पुढे अल्ट्रासोनोग्राफी नावाचे तंत्र विकसित होऊन गावोगावी सोनोग्राफी यंत्र पोहोचले. प्रारंभी सोनोग्राफीचे तंत्र स्त्रीच्या आरोग्यासाठी फारच हितकारक ठरले. पण याच सोनाग्राफीतून गर्भलिंगनिदान होऊ लागले, आणि पुन्हा नकोशी मुलगी गर्भातच मारली जाऊ लागली. असे कृत्य करणारे डॉक्टर चक्क लोकप्रिय झाले. शासनाच्या अधिका-यांनी गर्भलिंगनिदान विरोधी कायदा पुस्तकातच राहील, याची काळजी घेतली. किती वर्षे हे असेच चालले? तर 2010ची जनगणना होऊन हजार मुलांमागे 86 मुली कमी आहेत, हे उघड होईपर्यंत! मग शासन खडबडून जागे झाले. ‘सब घोडे बारा टक्के’ हिशेबाने मग प्रत्येक सोनोग्राफी करणारा डॉक्टर गुन्हेगार म्हणूनच पाहिला जाऊ लागला. शासकीय यंत्रणेकडून खूप कडकपणाने मग कायद्याची अंमलबजावणी होऊ लागली.
2010 ते 2013मध्ये जरा जास्तच प्रमाणात शासन जागे झाले. पण याचमुळे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असाही प्रकार घडू लागला. या काळातली एक बोलकी घटना.

माझ्याकडे एक बाई आली, तिच्या मुलीला घेऊन. दोन महिन्यांचा गर्भ. सोनोग्राफी करायची होती. मी तिचे वेगवेगळे फॉर्म्स भरून घेऊ लागले. तिच्या मुलीचे नाव, जावयाचे नाव, सास-यांचे नाव, पूर्ण पत्ता, फोन क्रमांक वगैरे. परिस्थिती अशी होती की, ही बाईच मुलीचा सगळा खर्च करणार होती. जावई दारू पिऊन मुलीला मारत असे. घरात एकही रुपया देत नसे. त्यामुळे फॉर्म भरताना जावयाचे नाव सांग, म्हणाल्याक्षणी तिचा राग तिने व्यक्त केला तिच्या शब्दात. ‘त्येचं काय नाव इचारता बाई - मरो त्यो तिकडं - मुडदा बशिवते त्याचा बाई. त्येनं दोन पैसे देनार न्हाई, मलाच समदं सारायचं हाय - मजं नाव लिवा. मजा पत्ता लिवा की’, असं म्हणू लागली ती. नंतर ती म्हणाली की, ‘बाई मज्या वक्ताला तुमी इतकी चवकशी करीत नव्हत्या, ह्ये काय नवीन काडलं तुमी - किती इचारु लागलात, उगी पटकन करा ना. आन् सहीच पायजे, तर मजी घ्या. मजं नाव लिवा, मीच तर जिम्मेदारी घ्यायले समदी.’ तिच्या दृष्टिकोनातून ती योग्यच बोलत होती. जर तीच मुलीचा खर्च, गर्भपाताचा निर्णय, या सगळ्या जबाबदा-या पार पाडणार होती, तर दारू पिणा-या बेकार अन् बेजबाबदार जावयाची माहिती डॉक्टर विचारतात, याचा तिला सात्त्विक संताप आला होता! माझ्या भूमिकेतून सगळे कागद भरणं गरजेचंच होतं; कारण अपूर्ण कागदपत्रांमुळेदेखील सोनोग्राफी मशीन सील केल्या जात होत्या. माझ्यासारख्या कन्याभ्रूणहत्येला कडाडून विरोध करणा-या डॉक्टरला तर सोनोग्राफी मशीन सील होणं, हे मृत्यूपेक्षा भयंकर वाटलं असतं. आम्ही दोघीही आपल्या जागी योग्य होतो.

अजून एक घटना अशीच. एक पेशंट. तिला दोन मुली. तिसरा गर्भ पोटात. तीन महिने झालेले अन् तिचे खूपच पोट दुखत होते. माझ्याकडे येऊन ‘सोनोग्राफी करा, खूप पोट दुखतं आहे’ म्हणाली. मी गर्भलिंग निदानाला विरोध करणारी डॉक्टर. मी पूर्वग्रह मनात ठेवून म्हणाले तिला, ‘तुला मुलगा असावा, असे वाटतेय अन् मुलगी असेल का, याची भीती वाटतेय, तुझं दुखणं मला मानसिकच वाटतंय.’ हा मी तिच्यावर अन्याय करीत होते. पुढे तिची सोनोग्राफी केली आणि दिसले मला, की तिच्या पोटातल्या बाळाला एक मोठा ट्यूमर होता, त्यामुळे हिचे पोट दुखत होते! गर्भपात करावाच लागणार होता, पण मला फार अपराधी वाटले. तिच्या भूमिकेतून ती बरोबर होती, अन् ‘मुलगी नकोच’ म्हणणा-या सर्व स्तरातल्या बायका दरदिवशी तपासून पूर्वग्रह दूषित झालेली, मीदेखील योग्यच होते. पुढे या मुलीला गर्भपात करताना खूपच अडचणी आल्या, कारण शासनाची कडक कारवाई मोहीम चालू होती. त्यामुळे पूर्वी दोन मुली असणा-या पेशंटचा गर्भपात करणे म्हणजे भरमसाठ कागदपत्रे भरणे आणि काही कमी-जास्त झाले तर पोलिस कारवाई, चौकशा, बदनामी या सगळ्यांना सामोरे जाणे होते! खूप डॉक्टर्सनी ती केस नाकारली. त्या कुटुंबाला खूप मानसिक, आर्थिक झळ सोसावी लागली अन् शासकीय रुग्णालयात तिला गर्भपात करावा लागला.
या संपूर्ण घटनाक्रमात कुणीच चुकले नव्हते. प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिकेत योग्यच होता, तरीही त्या मुलीचे हाल झाले, याला जबाबदार कोण? म्हणजे पुन्हा असं वाटतं, की सोनोग्राफीमुळे मुलगी गर्भावर अतोनात अन्याय झाला, तिला जन्मच नाकारला गेला; ही एक बाजू. शासनाला जाग आल्यावर अस्तित्वात असलेल्याच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागल्यावर आता अशा स्त्रियांवर अन्याय होतो आहे. म्हणजे, गर्भपाताचे स्वातंत्र्य असणारी स्त्री आता वेगवेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य हिरावून बसली आहे. खूपशा डॉक्टर्सनी गर्भपात केंद्रे बंद करून टाकली. कायद्याच्या अंमलबजावणीत ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार गावोगावी घडला. त्यामुळे गर्भपात करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे, असे काही डॉक्टरांना वाटले, तर त्यांचा किती दोष मानावा? तळहातावर इंग्रजी ‘6’ लिहिलं तर समोरच्या व्यक्तीला तो आकडा इंग्रजी ‘9’ सारखा दिसतो. काढणा-याने ‘6’ आकडा काढलेला असतो. समोरच्याला ‘9’ दिसतो. दोघेही बरोबर असतात. आयुष्यात अनेक असे प्रसंग आपण अनुभवत असतो. वस्तुस्थिती तीच. जागा बदलली की अर्थ बदलतो.

vrushaleekinhalkar@
yahoo.com