आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Woman World By Vrushalee Kinhalkar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देहातीत अनुबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण पिढीतल्या मुलामुलींचे बर्थडे सेलिब्रेशन. वेळ रात्री बारा. मुलीचा वाढदिवस उद्या आहे अन् रात्री बाराच्या ठोक्याला तीन-चार मित्र व दोन-तीन मैत्रिणी तिच्या घरी येतात. केक अगोदरच आणलेला आहे. मुले म्हणतात, ‘‘जरा हटके करेंगे सेल्ब्रिेशन.’’ मुलीची आई आनंदाने संमती देते. मुलीची आई माझी मैत्रीण. त्यामुळे मीही तिथेच होते. मग दोन मुली स्वयंपाकघरात जाऊन तेल, हळद, दही घेऊन येतात. एक मुलगा फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली आणतो. ‘बर्थडे गर्ल’ दचकून पाहत राहते! सगळे मिळून तिला हळद, दही, तेल, पीठ असे अजब मिश्रण लावतात. हातापायांना, केसांना पीठ, हळद लागलेली मुलगी मजेशीर दिसत असते...
मग तिला तशा अवतारातच केक कापायला सांगतात मुलं. ‘हॅपी बर्थडे’चे सूर आळवतात अन् मग तो केक खाण्यापेक्षा जास्त केक तिच्या गालांना, केसांनाच लावतात. पुन्हा थंडगार पाणी तिच्या केसांवर टाकतात. हसणं, ओरडणं चालूच असतं. नंतर ती मुलगी स्नान करून स्वच्छ होऊन येते. पुन्हा सगळ्यांना वाढदिवसाची मिठाई देते. हे सगळं वर्णन नव्या पिढीला नवलाचं नाही; जुन्या लोकांना मात्र हे पटण्यासारखं नाही. मलादेखील असंच वाटलं. केक खायचा सोडून अंगाला काय लावायचा? असं अन्नाचं वाटोळं करणं पटत नाही मनाला. पण या पार्टीतल्या एका प्रसंगाने मात्र मला खूप आश्वस्त केलं. पीठ, हळद, पाणी, तेल, केक हे सगळं फरशीवर सांडलं होतं. मुलगी अंघोळीला गेली होती. दोन मुली सोफ्यावर बसलेल्या. एक मुलगा मोबाइलवर मग्न. एक मुलगा मात्र उठला अन् त्याने फरशी पुसण्याचा कपडा स्वयंपाकघरातून शोधून आणून चक्क सगळी फरशी स्वच्छ केली! तो हे सगळं करताना दोन मुली निवांत सोफ्यावर बसून होत्या. माझ्या पारंपरिक मनाला क्षणभर हे खटकलं. मी त्या मुलाला म्हणाले, असू दे... परंतु तो म्हणाला, ‘हमने गंदा किया है तो, हमें ही साफ करना चाहिये.’
उच्चशिक्षित, उत्तम पगार असणारा, धिप्पाड शरीरयष्टीचा तो मुलगा शांतपणानं त्याच्या महिला सहका-यांसमोर फरशी पुसत होता. त्याचा पुरुषी अहंकार या कृत्याआड आला नव्हता, हे किती छान चित्र होतं! पुरुष किती छान पद्धतीनं बदलत आहे, याचं हे शुभचिन्ह वाटलं मला. स्त्री-पुरुष समानतेसाठी किती धडपड करावी लागली जगभरातील स्त्रियांना; अन् आता असं हे चित्र बघून माझं मन खूपच सुखावलं!

अर्थात, एक मुलगा फरशी पुसतोय अन् दोन बारीक अंगकाठीच्या मुली पाय पसरून सोफ्यावर निवांतपणानं हे पाहत आहेत, याचं मला जरा वैषम्य वाटलं. क्षणभर मुलींचा रागसुद्धा आला. पण पुन्हा मी विचार केला, की समान पातळीवर असणं यांना जमलंय! का म्हणून फरशी पुसणं आणि बाई, असं समीकरण आपण लावून टाकायचं? शतकानुशतकं बाईच सगळं करत आलीय, अन् पुरुष निवांत बाजेवर पडून असतो की अनेकदा... मग कुठे बिघडलं ती जरा निवांत बसली तर? माझ्यासारख्या स्त्रीवादी किंबहुना समानतावादी विचारांच्या स्त्रीलादेखील क्षणभरासाठी त्या मुलींचे निवांत बसणे खटकलेच की! म्हणजे, आपल्या विचारांच्या चौकटीत असंच असतं, की कोणत्याही पदावरची, कोणतीही स्त्री असो, तिने आपलं पदर खोचून काम करायलाच हवं घरातलं.

पण आजची आणि उद्याची जी बाई आहे, ती अशी सहजपणानं हे स्वीकारू शकते, की घरकाम हा केवळ बाईचाच प्रांत नाही. अन् विशेष असं, की आजच्या पुरुषानंदेखील हे सहज स्वीकारलं आहे. खरी समानतेची सुरुवात झाली आहे, असं मला वाटून गेलं. खूप अशी चित्रं डोळ्यांपुढे येऊन गेली, की नव-यानं मित्र घरी आणले आहेत; पत्ते खेळणं, भजे, पापड, चिवडा खात, दारू पीत, मजा करणं चालू आहे. अन् उशिरा रात्री सगळी पांगापांग झाल्यावर, बायको सगळा पसारा आवरून थकून गेली आहे. तिची दखल घेण्याचीदेखील नव-याला शुद्ध नाहीय.
चोवीस तास कष्ट करून, मनाचा तोल ढळू न देता काम करते बाई; पण पुरुष मात्र तिला अबलाच समजत आलेला आहे आजवर. एक कविता आठवून गेली... मनाचा आत्यंतिक संयम गोळा करून कष्ट करणा-या बाईला दुर्बल समजणा-या पुरुषजातीवर नेमकं बोट ठेवणारी -
‘उस ऊँची पहाडी पगडंडी पर,
जहां दो कदम चलते हांफते हैं
एक बडा सा पेड चलता सा
दिखाई देता है
एक दुबली पहाडी लडकी सर पर सैंकडों किलो का समूचा पेड लिए
धीरे-धीरे आंखों से ओझल
हो जाती है
घर पर चूल्हा जलाना है...
जानवरों को चारा खिलाना है...
एक घर के दरवाजे पर,
बीडी के सुट्टे लेते जवान पुरुष मश्गुल हंै बातों में...
बडी कमजोर होती है
औरत जात...’
मुलामुलींनी एकत्र येऊन, तेदेखील भर रात्रीच्या बारा वाजता सेलिब्रेशन करणे, आपल्या जुन्या लोकांना पटणार नाही. केकचे वाटोळे करणेही आवडणार नाही. पण या नव्या मुलांमधील ही स्वाभाविक स्त्री-पुरुष समानता मात्र आवर्जून कौतुक करण्यासारखी आहे. आणखी एक गोष्ट या प्रसंगात मला भावली ती अशी की, या मुलामुलींच्या वागण्यात कुठेच वासना जाणवली नाही. मुलामुलींचे एकमेकांना स्पर्श करणे सहेतुक नव्हते. अत्यंत सहज, मैत्रभाव जागवणारे स्पर्श वाटले.
मला हा स्त्रीजातीचा सन्मान वाटला! स्त्रीकडे माणूस म्हणून
पाहण्याची दृष्टी पुरुषाला येत आहे, असं जाणवलं. माझ्या एका कवितेत मी म्हटलं होतं की-
‘मित्रा आज असा एक क्षण हवा
जिथे तुझा माझा अनुबंध देहातीत व्हावा...’
माझ्या कवितेत व्यक्त केलेला आशावाद साकार होताना जाणवला...
मन प्रसन्न झालं.

vrushaleekinhalkar@yahoo.com