आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांसाठी फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तर बदलापुरात काप पंचायतीनं फतवा काढला. गावात सगळीकडं पोस्टर डकवली रातोरात. सखुबाईचा दोन्ही हात जोडलेला ओल्ड पुढारी स्टायलीतला फोटो. वरती अर्धवर्तुळात नारा : ‘पुरुष सबलीकरण!’
आणि खाली लिव्हलेलं का : ‘अयोग्य कपडे घालून बाहेर पडू नका!’
सविस्तर म्हाईती प्यांप्लेटांमधून छापून ती प्यांप्लेटं घरोघर वाटण्यात आली. त्यावर लिव्हलं हुतं की, यापुढं बदलापुरातल्या स्थायिक पुरुषांनी, बदलापुरातून इतरत्र जाऊन ऱ्हायलेल्या पण बदलापुराचे नागरिक आसल्याचा आणि बदलापुरातील संस्कृतिरक्षणाचे पाईक असल्याचा आभिमान आसलेल्या पुरुषांनी आणि बदलापुरात कामानिमित्त वा फिरायला वा अकारण येणार्‍या कोण्च्यायबी पुरुषांनी जीन्स आणि शॉर्टप्यांट घालण्यास बंदी घालण्यात येत आहे.
सुमनमावशी म्हण्ली का, ह्ये ब्येस झालं. आता त्या अस्वलांच्या क्येसाळ मांड्या येताजाता दिसतात, त्या दिसणार नाईती. आणि पोरायच्या जीन्स धुतल्या तरी प्रॉब्लेम, ना धुतल्या तरी प्रॉब्लेम… आसा समद्या आयांचा प्रश्नच सुटंल येकदाचा. माझ्या आंकुशनी तर नवी प्यांट पाच घंटे बडवायला लावली हुती धोपटीनं आणि पुन्हा चार जागी कापून ठिवली हुती ब्लेड लावून. ह्ये आस्ले धंदे तरी बंद हुतील.”
सीताबाई म्हण्ली का, हा फतवा काई पुरा वाटत नाई बगा. अयोग्य कपडे घालून भायेर पडू नये, म्हण्जे घरात तस्ले कपडे घालून बस्लं तरी चालंलच की. ह्ये काई खरं नाही. घरातबी समद्या पुरुषांनी पूर्ण कपडे घालून बस्लं पायजे. घरातल्या बायकांनी तरी आसं वाईटवक्टं का बगावं म्हण्ते मी! जीन्स आणि शॉर्टला बदलापुरातल्या घरांमध्येपण बंदी घातली पायजे. आमचे ह्ये नगा-येवढं पोट उघडं ठेवून फिरत्येत बारा म्हयने वरतून उघडे आणि खाल्ती लुंगी फोल्ड मारून न्येसल्येली. त्ये लोंबणारं पोट पार लुंगीच्या खाली गुडघ्यापस्तोर लोंबतंय. डोळे गेले आसं रोजरोज पाहण्यापरीस तर बरं आसं वाटतंया.”
आस्मिता टीचरचा मुद्दा येगळाच हुता… “आता ही बंदी पुरुषांपुरती हये, तर बायायच्या जीन्स आणि शॉर्ट चोरूचोरू घातल्या बाप्यायनी, तर त्यावर आंकुश कसा ठिवायचा?”
गोंधळच गोंधळ माजलेला. बदलापुराला तीन वेशी. तिन्हींवर नाके लावले आणि चार-चार पोरी तिथं चेकिंग करायला थांबू लागल्या. त्यातून आजून निराळ्याच समस्या उपस्थित व्हयाला लागल्या…
बदलापुरात येरवी पाव्हण्यांचं स्वागत व्हयाचं, त्येंचं गाडीतून उतरवून च्येकिंग व्हयाला लागलं. तरण्याताठ्या पोरी बारक्या पोरायपास्नं त्ये म्हता- बाप्यायपर्यंत ज्याला-त्याला नखशिखान्त न्याहाळून बगू लागल्या. सुरेशभावजी येकडाव धोतराच्या आतून जीन्स घातलेले पकल्डे ग्येले आणि बदलापुराच्या जावयालेबी नियम मोल्डा म्हूण वेशीवरून परत जावं लाग्लं. राधिकानं सखुवहिनीबाईकडं कुरबूर क्येली, पण आता मनसे डाउन झाल्यापास्नं तिची म्हायेरची वट येकदम कमी झालेली. सखुवहिनीबाईनं उलट चान्स घिऊन नण्देला झापलं की, आपल्याच घरातले लोकं नियम मोडू लागले, तर जनतेनं कोणाचे आदर्श ठिवावेत? सांगून ठिवा सुरेशभावजींना का आसं बदलापुरात तर चालायचंच न्हाई म्हणावं! खरंतर त्यांनी आता तिकडंयबी बदलापुरातले जावई म्हणून रोजच्यालेच आस्ले अयोग्य कपडे घालणं बंद करून टाक्लं पायजे. तुमचा काई वचकच न्हाई बगा राधिकावन्स नव-वर! बदलापुरातली ल्येक आसून आशा कशा हो गुळूमुळू वाळू चाळू वागता तुमी?”
झालं. राधिकावन्संच्या अहंकारालाच ठेच लागली की येकदम. सुरेशभावजी बदलापुराच्या वेशीवरून घरी परत पोचेतो राधिकावन्सनी त्यांच्या सगळ्या जीन्स आणि शॉर्टची आंगणात होळी क्येलेली.
गावात ह्ये धिंगाणा माजला. दुस- दिवशी रातोरात पुरुषांची खाप पंचायतीची मीटिंग लागली.
चर्चा सुरू झाली, की आपण ह्ये सहन करायचं नाई, बायकांचे आसले फतवे मान्य करायचे न्हाईती, शतकानुशतके आम्ही उघडेबंब वावरत आलोत आणि आता या कोण लागून गेल्या आम्हांला आंगभर कपडे घाला आणि उघडेवाघडे फिरू नका म्हणणा-? उद्या फुलबाह्यांचे शर्ट कंपल्सरी करतीला, परवा शर्टाचं वरचं कॉलरजवळचं बटणपण बंद क्येलं पायजे म्हणतीला, तेरवा डोक्यावर टोपी – मुंडासं – रुमाल कायबी घालून – बांदून क्येस झाकून फिरा म्हणतीला, नेरवा बुरखेबी घालाया लावतीला… या बायायचं काई खरं नाई. आपण ह्ये आयकलं नाई पायजे. याचा तीव्र निशेद क्येला पायजे.
आता यावर समद्यायचं येकमत व्हतं. पण निशेद करायचा तर कसा करायचा? उद्या बायकोनी, आईनी घरातच घितलं नाई, जेवायलाच वाडलं नाई तर काय करणार? दोन-दोन बायका आसून येकीनंयबी आरुणआप्पांना बिछान्यात यायला बंदी घातली, तर तेयनी काय करायचं? लईच कालवा वाडला.
आक्षयचा डौट तर आजून फुडचा व्हता. या बायायनी पुरुषांना जीममध्ये जायला कंपल्सरी क्येलं आणि गल्लोगल्ली पुरुषांचे ब्युटीपार्लर सुरू करून ‘येथे सवलतीच्या दरात वॅक्सिंग करून मिळेल’ आशे बोर्ड लावले, तर काय हुयाचं?
कोण्तरी मध्यस्ती क्येली पायजे. गावात बायायहूनयबी जास्ती बोलणारा पुरुष येकच. यांकर प्रभंजनकुमार. त्येच्या गळ्यात ह्ये मांजरीच्या गळ्यात घंटा बांधण्याचं काम बांधण्यात आलं.
सकाळी प्रभंजनकुमार सखुबाईकडे जाऊन मांडवली करून आला. मग रीतसर पुरुषांचं शिष्टमंडळ सखुबाईला जाऊन भ्येटलं. सखुबाईनं उदार मनानं काडलेला फतवा मागं घितला. फकस्त तिलाच ह्ये म्हाईती हुतं की, आदी खापपंचायती आस्ले फतवे काडायच्या, आता गुजरातच्या सरकारनंबी खाप पंचायतीवानी वागायले सुरुवात क्येली. त्येबी बाई मुख्यमंत्री आस्तांना! त्ये लोण हितं येण्यापास्नं आडवायचं, तर आधीच आपण उल्टा वार करायला पायजे होता. तो क्येला आणि सक्सेसफुलबी झाला!