आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Working Woman By Dr.Vrushali Kinhalkar

ती आणि मी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती असेल तिशीची. तिच्या घरी बायकांची प्रचारसभा ठेवलेली होती आणि मी उमेदवाराची पत्नी म्हणून सभा घेतली. तिची सासूच सगळं नियोजन बघत होती. ही आपली सासूच्या हुकमावरून काहीबाही करीत होती.
काटकुळ्या शरीरयष्टीची, साधारण चेह-याची आणि पॉलिस्टरचं नऊवारी पातळ नेसलेली ती... मला नमस्कार करून एक साडी तिनं दिली. ओटी भरली. मी खूपच संकोचले होते. अजून इतर दोन-चार सभा घेऊन रात्री तिच्या घरी जेवण. ती चुलीशी... घामेजलेली. जेवणासाठी बरेच लोक. बायकांची पंगत अर्थातच वेगळी. ‘पंजाचे’ पोस्टर्स घरभर, घराबाहेर, गल्लीत लावलेले. नंतर मी ‘आमदाराची पत्नी’ झाले. पुन्हा त्यांच्या घरी जाणं झालं. निमित्त आमदार साहेबांचा सत्कार! जेवणाची वर्दळ. खूप आनंद, उत्साह. हिचा नवरा-माझ्या पतीचा सच्चा कार्यकर्ता.
ही चुलीजवळ घामेघुम. पुन्हा मला खणानारळाची ओटी आणि साडी तिनं दिली. तीच मनोभावे माझ्या पाया पडली. मी अजून संकोचले. तिच्या चेह-यावर खूप आस्था, प्रेम, कौतुक.
आज या गोष्टीला २४ वर्षे झाली. आता तिला सून, जावई आलेत. सासू वारली. परवाच तिच्या मुलीचं लग्न झालं. पुन्हा तिनं माझी ओटी भरून मला साडी दिली. २४ वर्षांत किती बदल झाले! पण ती बदलली नाही. तशीच काटकुळ्या शरीरयष्टीची. पॉलिस्टरच्या नऊवार लुगड्यातली ती. फक्त थोडं वय वाढल्याच्या चेह-यावर खुणा. घट्ट आवळलेल्या अंबाड्यात दोन-तीन रुपेरी बटा.
मधल्या मोठ्या कालखंडात किती गोष्टी घडून गेल्या. तिच्या सासूचं मी ऑपरेशन केलं, तेव्हाही ही सतत सेवेत. माझ्याबद्दलचा अपार प्रेमाचा भाव चेह-यावर बाळगत नम्रपणानं वावरायची. पुढं माझा नवरा मंत्री झाला. हिच्या नव-याला अस्मान ठेंगणं झालं! पुन्हा सत्कार-जेवण-हिचं चुलीपाशी राबणं... माझ्यापेक्षा जास्त आनंद तिच्या चेह-यावर दिसे.

कधी दवाखान्याचं काम निघालं की येणं होई तिचं. माझ्या नव-याच्या कुठे किती सभा झाल्या, लोकांची किती कामं त्यांनी केली, याबद्दल तीच मला सांगे. जनता कशी ‘साहेबांवर’ खुश आहे, ते तिच्या डोळ्यांत दिसायचं. पुढं तीन-चार निवडणुका झाल्या. पक्ष बदलले. चिन्ह बदललं. पण हिचा उत्साह, कामाची लगबग तशीच. सभा घेण्याचा उत्साह तसाच. प्रत्येक वेळी मी तिच्या घरी जायची. एका निवडणुकीत माझ्या नव-याचं चिन्ह होतं कपबशी. तर या बाईनं घरोघर कपबशा वाटल्या! हे तर मलादेखील सुचलं नव्हतं! घरासमोर रांगोळी काढली होती - त्यातही कपबशी! खूप उत्साह. अपार आस्था. Theme किंवा Event managment हे शब्द कुठे तिला माहीत होते? पण तिने कृतीतून ते दर्शविलं होतं. निवडणुकीचा निकाल लागला. माझा नवरा पराभूत झाला. आमची दोघींची भेट झाली तर माणूस मेल्यासारखं रडली ती माझ्याजवळ...! मतदारांना दूषणं देत होती ती. मला ती खूप मोठी वाटली... मीसुद्धा तिच्याइतकी दुःखी झाले नव्हते; हे जाणवलं मला.

अजून एक अशीच बाई. प्रत्येक निवडणुकीत मी पाहते; तिच्या घरी लग्नासारखा गोंधळ चालू असतो. अष्टौप्रहर चूल पेटलेलीच असते. घराबाहेर गाड्यांचा ताफा, पोस्टर्स, बॅनर्स, दुधाचे मोठेमोठे कॅन्स, चिवड्याच्या बशा सतत भरत असते ती. पोळी-भाजीचे डबे भरत असते. चहा, कॉफी, दुधाचा यज्ञ तर दिवसरात्र अखंडच सुरू असतो. इतक्या धावपळीतदेखील अंगणात रांगोळी नक्की असतेच! अंगण स्वच्छ सारवलेलं! संध्याकाळचा तुळशीजवळचा दिवा - काही विसरलेलं नसतं.

सतत स्वयंपाकघरात ती काहीतरी करतच असते. माझ्याबरोबर सभांना येते. तोडकं-मोडकं भाषण करते. आवर्जून साहेबांनी केलेली विकास कामं सांगते. मी अचंबित होत असते. सभा आटोपून मी निघताना हळूच लोणच्याची बाटली माझ्याजवळ देते, तर कधी लोणी! एकदा रात्री माझी गाडी बंद पडली. मी रात्री दीड वाजता तिच्याकडे गेले. निवडणुकीचा काळ. ती पण काम करून थकलीच असणार. कार्यकर्ते होतेच इकडे तिकडे पसरलेले. तेवढ्या रात्री तिनं मला गरम ताजं जेवायला दिलं. वर आणखी हळदीचं दूध! ‘भाषणं करून घसा दुखत असेल, घ्या जरा!’ इतकं आर्जव, इतकी माया!

ही बायकांची जात दुर्लभ आहे! अशा कितीतरी जणी आहेत. यांना नावच नाही. अस्तित्व नाही. यांचं आयुष्य काही बदलत नाही. यांचे कष्ट संपतच नाहीत. फक्त देणं त्यांना ठाऊक असतं. निष्ठा हा शब्द त्यांच्याकडूनच नीट समजतो. त्यांना खरं तर निष्ठा हा शब्द माहीतदेखील नसतो; पण त्या अक्षरशः जगतात तो शब्द. निवडणुका येतात, जातात. सत्ता येते, जाते. यांच्या अंगावरच्या लुगड्याचा पोत बदलत नाही. यांच्या चुलीवर शेकणा-या पोळीची खुमारी बदलत नाही. महिला आरक्षणामुळे, अपघातानेच कधी कधी त्या खुर्चीवर बसल्या; पण भोगली नाही सत्ता त्यांच्या मनाने कधीच! रामायणातला ‘भरत’ त्यांना छान उमजलेला असावा. खुर्चीची ऊब मात्र नाही कळत त्यांना. ‘अंगठा’ करण्यापुरती खुर्ची त्यांच्यासाठी. सडा-सारवण, लोणची-पापड, सणवार... काही सुटत नाही. टीव्ही, मोबाइल, संगणकाचं वारं त्यांच्या नऊवारी लुगड्याची ठेवण जरादेखील उकलत नाही. यांनी कधीतरी आत्मकथन करावं...कसं असेल ते? मला वाटतं, ‘आत्म’ या शब्दाशी त्यांची ओळखच नसावी. त्यांचं जगणंच नव-यासाठी! प्रपंचात विरघळून जाणं, असे शब्द त्या वापरत नाहीत. ‘साहेब’ ज्या पक्षात; त्या पक्षात यांचा नवरा, आणि तीच निष्ठा यांच्यात उतरत येते. मला अशा खूप जणी भेटल्या आहेत. खूप प्रेम, माया, आदर त्यांनी मला दिलाय. मी त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीये. तशी खूप अलिप्त आहे मी राजकारणापासून. पण, या बायकांचं ऋण आहे माझ्या मनावर. त्यांच्या प्रेमाचं, कौतुकाचं ओझं वाटतं मला. मी हे लिहिलेलं त्या वाचणार नाहीत. ब-याच जणी निरक्षर आहेत. काही जुजबी शिकलेल्या. स्त्रीवाद त्यांना माहीत नाही. ‘स्व’ची जाणीव नाही. ओळख नाही. पण चेह-यावर अलौकिक असं समाधान दिसतं त्यांच्या. कुठेच तणाव नसतो. त्यामुळे तशा त्या निरोगी असतात. असतं एखादीचं हिमोग्लोबीन प्रमाणापेक्षा कमी - पण अंगभूत प्रेम त्यांना काम करण्याचं बळ देत असतं. कदाचित त्या जीवनावरच प्रेम करतात... त्यामुळं अस्सल जिणं जगतात. त्यांच्या दुर्लभ स्नेहामुळं मी वाकून गेलेय. त्यांनी दिलेल्या अनेकानेक रेशमी साड्या माझ्या ओटीत आहेत. आता, माझे हे चार शब्द त्यांच्या ओटीत टाकतेय मी. त्यांना कळणार नसले तरीही...
vrushaleekinhalkar@yahoo.com