आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभान: आशियातलं नाटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशियाई रंगभूमीला समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतातला तमाशा वा कथकली असो, चीनमधला बींजिंग ऑपेरा असो, जपानमधले बुनारकू, नोह आणि काबुकी वा व्हिएतनाममधली हाट बोई. या प्रयोग-कला जगभरातल्या प्रेक्षकांना आणि रंगकर्मींना आकर्षित करत आल्या आहेत. यातल्या अनेक रंगपरंपरांचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झाले आहे, तर काही अजूनही दुर्लक्षित आहेत.
एखाद्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवातल्या नाटकांचा कार्यक्रम पाहायला गेलो तर त्यात चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया अशा आशियाई राष्ट्रांतील नाटके फारच मोजकी असतात. जी काही नाटके पाहायला मिळतात, त्यांची चर्चा त्या-त्या देशात झालेली असते. पण, त्या देशाबाहेरच्या लोकांना त्या नाटकांबद्दल माहिती असेलच असे नाही. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी पदुचेरीला जगभरातील रामायणावर काम करणाऱ्या कलाकार आणि संशोधकांना भेटलो. तिथे जावामधले मुगियोनो कासिदो (मुगी) हे नृत्यमांडणीकार आले होते. मुगी ‘शिंताज मेमरी’ नावाच्या सुंदर नाट्य-नृत्य प्रयोगांतून जावा-रामायणातील सीता आणि रामाची गोष्ट सांगतात. या प्रयोगात, मुगी सीतेची गोष्ट तिच्याच शब्दात सादर करताना वायांग कुलीत हा शॅडो पपेट्री आणि तेंबांग या काव्यप्रकाराचा वापर करतात. जावातील नृत्याची नव्या संदर्भात पुनर्मांडणी करणारे आमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नव्हते. फेस्टिवलमध्ये येणाऱ्या पाश्चात्त्य देशातील नाटकांबद्दल आणि कलाकारांबद्दल मात्र असं होत नाही. ते येण्याआधी त्यांच्या कामाची चर्चा सुरू झालेली असते. रात्री होणाऱ्या जोरदार वाद-चर्चेवेळी हे मुद्दे येणे अपरिहार्य असतं. तिथे आलेल्या थायलंड, इंडोनेशियातल्या इतर कलाकारांनाही माझ्यासारखंच वाटत होतं. सगळ्यांना एक वाटलं की, आशियातल्या या देशातील बहुविध परंपरा आणि भाषा देशाबाहेर पडलेल्या नाहीत. ज्या भाषांतील लोकांचे मोठ्या प्रमाणात विस्थापन झाले आहे, ते दुसरीकडे जातात आणि त्यांची भाषा वापरतात, पण ती फक्त ‘संवादा’पुरतीच. त्याचे कलात्म रूप लोकांपर्यंत पोहोचत नाही.
आशियाई रंगभूमीला समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतातला तमाशा वा कथकली असो, चीनमधला बीजिंग ऑपेरा असो, जपानमधले बुनारकू, नोह आणि काबुकी वा व्हिएतनाममधली हाट बोई. या प्रयोग-कला जगभरातल्या प्रेक्षकांना आणि रंगकर्मींना आकर्षित करत आल्या आहेत. यातल्या अनेक रंगपरंपरांचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झाले आहे, तर काही अजूनही दुर्लक्षित आहेत. ज्या देशातले सरकार आणि समाज आपल्या कला आणि परंपराबद्दल संवेदनशील आणि जागरूक आहेत तिथे कलाकार आणि त्यांच्या कला चहुबाजूने विकसित होतात. त्यांचे जगभर प्रयोग होतात. शिवाय, उशिओ आमागात्सु सारखे जपानी कलाकार बुटोह सारख्या नृत्यातून नवनवीन प्रयोग आकाराला आणतात.
आशियातल्या छोट्या-छोट्या देशात सादरीकरण परंपरा समृद्ध करणाऱ्या आजच्या कलाकारांनी पारंपरिक कलारूपांचे गुंते ओळखत, कलामाध्यमांचे पुरेपूर आकलन करून घेत आणि अंतःप्रेरणांची हाक ऐकत परंपरेतील कला-प्रकारांना नवी रूपे देण्याचा प्रयत्न केला आहे. जावाच्या मुगींना सीतेच्या मनातला खोलवरचा संघर्ष भावला, त्यानंतरच त्यांची प्रयोग-प्रक्रिया सुरू झाली. त्यांनी पारंपरिक कठपुतळ्या आणि नृत्य कलांना समोर ठेवून शरीराच्या आणि संगीताच्या भाषेतून सीतेचे समकालीनत्व त्यांनी समर्थपणे मांडले. जावांमधले मुगियानो कासिदो असोत वा भारतातील चंद्रलेखा आणि आस्ताद देबूंसारखे काही कलाकार किंवा सुझुकी आणि ओटा ओशोगो सारखे जपानमधले रंगभूमीवरले नाटककार आणि दिग्दर्शक परंपरांचे गौरवीकरण करत नाहीत. तर, परंपरांना वेळोवेळी प्रश्न विचारतात. यातूनच, कलाव्यवहार प्रगल्भ अवस्थेला पोहोचतो.
लोकपरंपरा वा पारंपरिक कला आणि ‘आधुनिक’ कलारूपे वेगळी अशी दोन तुकड्यांमधली मांडणी आशियाई नाट्यपरंपरांबद्दल करता येणार नाही. इथले समुदाय जेवढे गुंतागुंतीचे आहेत तेवढेच नाट्यकलाकार, त्यांच्या कला आणि त्यांचे संदर्भही गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे, पाश्चात्त्य समीक्षा पद्धतीच्या आधारे इथल्या आधुनिकीकरणातील गुंत्यांचे गोळीबंद आकलन मांडता येत नाही. आशियाई प्रयोग रूपांचे आकलन मांडताना परंपरा म्हणजे काय, परंपरांचा शोध घेतो म्हणजे कलाकार काय करतो? या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आशियातली रंगभूमी ‘नटाची रंगभूमी’ नसते तर ती भवतालाची-समाजाची आणि संस्कृतीची असते. आशियातल्या नाटकात ‘निव्वळ’ आशियाई संस्कृतीचे प्रतिबिंब कसे पडते, हे गोळीबंद रीतीने सांगणे कठीण काम आहे. वसाहतीकरणामध्ये पाश्चात्त्य रंगभूमीच्या प्रारूपांचा प्रभाव घेत आधुनिक आशियाई रंगभूमीत अनेक नवे बदल झाले. ‘भूमिपुत्रां’चे नाटक दाखवणे अवघड आहे.
जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सौंदर्यदृष्टी प्रचंड वेगाने बदलत चालली आहे. आशियातला प्रत्येक देश बदलाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उभा आहे. मग तो इंडोनेशिया असो, चीन वा पाकिस्तान. प्रत्येक जण आपली सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख ठेवायचा प्रयत्न करत असला तरी देश म्युटेट होत आहेत. ‘ओळख’ नावाचे एका टप्प्यावर हवेहवेसे वाटणारे सामान कधी कधी जड होतानाही दिसते. नाना तऱ्हेच्या ओळखी आशियाई समाजावर स्वार होत राहतात. मग, ओळखीच्या राजकारणात पडताना आपलीच ओळख खरी, हे सिद्ध करण्यासाठीची समुदायांची अहमहमिका लागते. राष्ट्रवादाची तीव्रता वाढत असतानाच त्याला आव्हानसुद्धा दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार, समाज आणि राज्यसंस्था यांच्यामधल्या गुंतागुंतीचा काळ आशियाई कलाकार अनुभवत असतो. कलाकाराच्या स्वायत्ततेला सतत आव्हान दिले जाते. तर, त्याच वेळेस, स्वातंत्र्याच्या संकोचाला प्रतिक्रिया देत कलाकार स्वतःच्या समाजाबरोबर असलेल्या आपल्या नात्याची पुनर्मांडणी करताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून मुगियानो कासिदो यांच्या ‘काबार काबूर’ या नाटकाकडे पाहता येईल. यामध्ये मुगियानो स्वतःच्या विस्कटलेल्या शरीरातून सुहार्तो या हुकूमशहाच्या इंडोनेशियातील कारकिर्दीकडे टीकात्म रीतीने आणि उपहासाने पाहतात. हेच आई वेईवेई या दृश्यमाध्यम आणि प्रयोग कलांमध्ये काम करणाऱ्या चिनी कलाकारांचे काम पाहताना म्हणता येईल. अलीकडे प्रकाशात आलेल्या वेईवेई यांचेही उदाहरण घेता येईल. चिनी सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध वेईवेई आपल्या प्रयोग-कलेतून किंवा संकल्पनात्मक कलेतून आवाज उठवतात. मुगियानो किंवा वेईवेईंसारख्या आशियाई कलाकारांच्या कामातून एक जाणवते की, आजचे नाटक लिहिणारा नाटककार आणि प्रयोग बसवणारा दिग्दर्शक यांच्यातच नाट्य फिरत नाही तर त्या पलीकडे राज्यव्यवस्था आणि समाज यांच्यातल्या संबंधावर मार्मिक भाष्य करणारा तो दस्तऐवज बनतो. आशियाई नाट्यकलाकार ओळख कमावतोय, पण आशिया-अंतर्गत नव्या अर्थव्यवस्थेमुळे अस्वस्थ करणाऱ्या व्यवस्थेकडे कलाकार जागरुकतेने पाहतायत का? जागतिकीकरणाच्या पाण्यात कलाकार हात धुऊन घेताना दिसतात. कलाकारांना जगभरात फिरण्यासाठी अमाप पैसा दिला जातो, पण तिथे होणाऱ्या सांस्कृतिक आणि कलात्म संकोचाकडे आशियाई कलाकाराने डोळसपणे पाहायला हवे. परंपरांचे भान, कलाकाराचे आत्मिक बळ, आधुनिकीकरणाचा रेटा आणि बरोबरीने पर्यायी आधुनिक रूपे उभे करण्याची इच्छा यामध्ये आशियाई नाट्य-नृत्य परंपरा तावून-सुलाखून निघणे आवश्यक आहे. आशियाई परंपरा म्हणून यथेच्छ गौरवीकरण केले जाते; पण त्याचबरोबर सोयीनुसार इथल्या परंपरेमध्ये असलेल्या शोषित व्यवस्थेकडे कानाडोळा केला जातो. नाटके निर्माण केली जातात ती आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महोत्सव गाजवण्यासाठी. अत्याधुनिक दृक‌्श्राव्य माध्यमांचा वापर आणि गुंगवून टाकणारी दृश्य रूपे उभी करून चकचकीत नाट्यप्रदर्शन केले जाते. पण, कलाकाराचे तिथल्या स्थानिक संस्कृती व्यवहाराशी काहीएक नाते असते, याचे भान न ठेवता तो स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांबरोबर जोडून घेण्यासाठी धडपडू लागतो. यातून सफाईदार नाट्यनिर्मिती होते, पण आत्मभान नसलेली कला आकाराला येते. अशा वेळेस, आपला आतला आवाज कलाकाराला स्वतःला ऐकू यावा आणि मग तो इतरांना ऐकू जावा, यासाठी तो कलाकार स्वतः सजग राहणे महत्त्वाचे ठरते.
आशुतोष पोतदार
potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...