मारिसा मेयर गुगलचे नुकसान, याहूचा फायदा
याहू या टेक्नॉलीजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गुगलच्या उपाध्यक्ष मारिसा मेयर (37) यांची नियुक्ती झाल्याने सिलिकॉन व्हॅली व अमेरिकेतील कॉर्पोरेट जगतातील एक महत्त्वाची महिला म्हणून मेयर यांची गणना झाली आहे
-
याहू या टेक्नॉलीजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गुगलच्या उपाध्यक्ष मारिसा मेयर (37) यांची नियुक्ती झाल्याने सिलिकॉन व्हॅली व अमेरिकेतील कॉर्पोरेट जगतातील एक महत्त्वाची महिला म्हणून मेयर यांची गणना झाली आहे. या नियुक्तीपाठोपाठ त्यांनी आपण गरोदर असल्याची गोड बातमीही सांगितली.
मेयर यांची झालेली ही नियुक्ती म्हणजे हे एक प्रकारचे कॉर्पोरेट बंडच म्हटले पाहिजे.
कारण सध्याच्या स्थितीत याहू आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी सतत धडपडत आहे. दोन वर्षांत त्यांनी नेतृत्वपदी तीन वेळा बदल केला, परंतु कंपनीच्या स्थितीत अपेक्षित असा काही बदल झाला नाही. आता मात्र याहू कंपनी गुगलसारख्या नामवंत कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी फोडण्यात यशस्वी ठरली आहे. आज याहूपुढे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. प्रामुख्याने गुगल व फेसबुक या कंपन्या त्यांच्या ब-याच पुढे गेल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत पुन्हा येण्याची जिद्द याहूची आहे आणि आता त्यांना मेयर हेच एकमेव आशास्थान आहे. गुगलने ज्या अनेक नवीन बाबी सरू केल्या.
प्रामुख्याने गुगल मॅप, गुगल अर्थ, स्थानिक सर्च यात त्यांचा मोलाचा वाटा होता. स्टँडफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मेयर यांनी त्याच विद्यापीठातून व्यवस्थापनाची पदवी संपादन केली. त्यानंतर त्या गुगलमध्ये दाखल झाल्या. त्या वेळी गुगल ही अतिशय लहान कंपनी होती. 1999 मध्ये त्या ज्या वेळी गुगलमध्ये दाखल झाल्या त्या वेळी गुगलमधील 20 व्या कर्मचारी होत्या आणि कंपनीतील पहिल्या महिला अभियंत्या. गेल्या 13 वर्षांच्या गुगलमधील आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदांवर काम केले. त्याच्याबरोबर त्यांनी न्यूयॉर्क टाइम्स, न्यूजवीक, बिझनेस वीक या मासिकांमध्ये लेखन केले आहे. फॉर्च्युन मासिकातील यादीत वजनदार महिलांमध्ये त्यांचे गेले तीन वर्षे सलग नाव प्रसिद्ध झाले आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ‘यंग ग्लोबल लीडर’ असा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. गुगलमधील 13 वर्षांत त्यांनी टेक्नॉलॉजी क्षेत्रात आपला एक ठसा उमटवला. मेयर यांच्या कामाचा झपाटा जबरदस्त आहे. दररोज 14 तासांहून जास्त काम करणा-या मेयर दर आठवड्याला 70 हून जास्त मिटिंग्ज घेतात आणि त्यांना एकादा मुद्दा पटला की क्षणात निर्णय घेतात. त्यांच्या या कामाची व निर्णय घेण्याच्या क्षमतेची सिलिकॉन व्हॅलीत जोरदार चर्चा असे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने गुगलचे नुकसान होणार आहे त्याचबरोबर याहूला एक उत्कृष्ट व्यवस्थापक लाभणार आहे. त्यांनी गुगलमधून राजीनामा दिल्यावर लगेचच दुस-या दिवशी त्या याहूमध्ये दाखल झाल्या. बाळंतपणाच्या रजेवरून पुन्हा कामावर आल्यावर त्या याहू या सुस्तावलेल्या टेक्नॉलॉजी जायंटला नवीन मार्ग दाखवतील.