आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्‍याग्रही रोझा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका ही स्वातंत्र्यभूमी म्हणून स्वत:चा गौरव करत आली आहे. तथापि अमेरिकेच्या घटनाकारांनी गुलामगिरी नष्ट केली नव्हती. त्यांच्यापुढे तो प्रश्न आला असता पुढच्या पिढ्या त्याचा विचार करतील, असे म्हणून त्यांनी गुलामगिरीची प्रथा चालू ठेवली. पुढे अब्राहम लिंकनने गुलामगिरीविरुद्ध युद्ध केले. परंतु गो-या अमेरिकनांनी काळ्यांना दुय्यम नागरिकत्व देऊन वर्णश्रेष्ठत्वाचे धोरण अमलात आणले. पहिल्या व दुस-या महायुद्धात गो-यांच्या बरोबरीने काळेही युद्धात मरण पावले. पण काळ्यांचे दुय्यम नागरिकत्व लगेच संपुष्टात आले नाही. यामुळे त्यांना अनेक सार्वजनिक ठिकाणी मज्जाव होता. शाळाही दोन्ही वर्णीयांसाठी वेगळ्या होत्या. इतकेच काय, बसमध्ये वा आगगाडीत बसण्याच्या जागाही वेगळ्या होत्या. काही गो-या वर्णद्वेष्ट्यांनी संघटना स्थापन करून काळ्यांची मारझोड, लूटमार व खून यांचा अवलंब केला होता.

यातून बराच रक्तपात तेव्हा होत असे. काळे किंवा आज ज्यांना आफ्रो-अमेरिकन म्हणून ओळखले जाते, त्यांतल्या काहींनी जशास तसे हे धोरण स्वीकारले होते. पण मार्टिन लुथर किंग यांनी महात्मा गांधींना आदर्श मानण्याचे ठरवून सविनय कायदेभंगाचा मार्ग अवलंबला. मार्टिन ल्यूथर किंग हे 26 वर्षांचे तरुण धर्मगुरू होते, तेव्हा एका काळ्या महिलेने सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून मार्टिन ल्यूथर यांना स्फूर्ती दिली. तिचे नाव रोझा पार्क्स. तिचा शंभरावा जन्मदिन 4 फेब्रुवारीला होता, त्या निमित्ताने अमेरिकेत अनेक ठिकाणी समारंभ झाले. तिच्या नावाचे टपालाचे तिकीट प्रसृत झाले. रोझा 92व्या वर्षी म्हणजे 24 ऑक्टोबर 2005 रोजी निधन पावली. ती अलाबामा राज्यात राहत होती. अलाबामा, जॉर्जिया आणि इतर दक्षिणी राज्ये श्वेतवर्णीयांच्या प्रभावाची म्हणून ओळखली जातात. तिथे वर्णभेद पराकोटीचा होता. तिथे गो-या व काळ्यांसाठी शाळेच्या स्वतंत्र इमारती होत्या. गो-यांतले काही हिंसाचारी वृत्तीचे होते. रोझाने हे सर्व लहानपणापासून पाहिले होते. त्यामुळे तिच्या मनावर जे पहिले संस्कार झाले त्यातून प्रतिकाराची भावना प्रबळ होणे साहजिक होते.

रोझा तिच्या परीने कृष्णवर्णीय समाजात जेवढे सामाजिक कार्य करता येईल तितके करत होती. आजूबाजूच्या वातावरणामुळे संताप येत असला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यास ती शिकली होती. एका कपडे शिवण्याच्या कारखान्यात ती नोकरीला लागली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी रेमंड पार्क्स याच्याशी तिने विवाह केला. विवाहापूर्वी तिचे नाव होते रोझा मॅकॉले. रोझाचा पतीही आफ्रो-अमेरिकन आणि सामाजिक कार्यकर्ता होता; अर्थात कामधंदा सांभाळून. त्या वेळी आफ्रो-अमेरिकनांनी आपल्या समाजाची प्रगती व्हावी म्हणून एक संघटना चालवली होती. ‘नॅशनल असोसिएशन फॉर दि अडव्हान्समेंट फॉर दि कलर्ड पीपल’ असे त्या संघटनेचे नाव. रेमंड व रोझा या संघटनेची विविध कामे करत. पुढे रोझा पदाधिकारीही झाली आणि मग त्या संघटनेच्या अध्यक्षाची सचिव म्हणून काम करू लागली. वर्णभेदाच्या धोरणामुळेच अलाबामातील बसमध्ये प्रवाशांचे दोन वर्ग केले जात. बसच्या पुढच्या भागातल्या बाकांवर गोरे प्रवासी बसत आणि मागच्या भागातल्या बाकावर काळे. बसमध्ये तिकीट ड्रायव्हरकडून घ्यावे लागत असल्यामुळे पुढच्या दरवाजानेच चढणे भाग असे. तिकीट काढल्यावर पुढच्या भागात एक जरी गोरा बसलेला असेल तर काळ्या प्रवाशाने खाली उतरायचे आणि मागील दाराने बसमध्ये शिरायचे, असा दंडक होता. बसच्या मधल्या भागात काळ्यांना प्रवेश होता, पण गर्दी झाल्यामुळे गो-या प्रवाशाला पुढे जागा मिळणार नसेल तर तो मधल्या रांगेतल्या बाकावर बसत असे. पण तो ज्या बाकावर बसला असेल त्यावर चार जागा असल्यास एक जागा मोकळी करून काळ्याची जबाबदारी संपत नसे. गो-या प्रवाशाच्या बरोबरीने एकाच बाकावर बसण्यास काळ्यांना मनाई असल्यामुळे इतर तिन्ही प्रवाशांनी जागा खाली करण्याची सक्ती होती. या स्थितीत 1 डिसेंबर 1955 रोजी रोझा पार्क्स आपली नोकरीची वेळ संपल्यावर घरी जाण्यासाठी बसमध्ये चढली आणि काळ्या लोकांसाठी असलेल्या रांगेतील जागेवर बसली. तथापि एक गोरा प्रवासी उभा असल्याचे बघताच ड्रायव्हरने रोझाला जागा खाली करण्यास फर्मावले. अलाबामातील माँटगोमरीच्या बस ड्रायव्हरला काळ्या प्रवाशास जागा नाकारण्याचा अधिकार होता. त्याने तो बजावून रोझास आदेश दिला, तो तिने नाकारला. मी कशासाठी जागा खाली करून उभे राहायचे, असा तिचा प्रश्न होता. मग तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रीतसर चौकशी वगैरे होऊन फिर्याद झाली आणि 5 डिसेंबर 1955 रोजी खटला सुरू झाला. त्या दिवशी काळ्या लोकांनी बसने प्रवास केला नाही. न्यायालयाने रोझास दहा डॉलर्स दंड म्हणून आणि न्यायालयाचा खर्च म्हणून चार डॉलर्स भरायला सांगितले. तेव्हा काळ्यांचा बहिष्कार बेमुदत झाला. माँटगोमरी शहरात जवळजवळ चाळीस हजार काळे प्रवासी रोज बसने प्रवास करत. त्यांनी बसवर बहिष्कार टाकला. तो 381 दिवस चालला. ते प्रवासी सामूहिकरीत्या टॅक्सीने प्रवास करत किंवा मिळेल ते वाहन वापरत. काही तर वीस-वीस मैल चालत जात.

अलाबामाच्या जिल्हा न्यायालयाने रोझाच्या बाजूने निकाल देऊनही सरकार बधले नाही. मग अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकरण गेले. 13 डिसेंबर 1956 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रोझाला निर्दोष ठरवले. हा मोठाच विजय होता. हे सर्व अधिकृतरीत्या माँटगोमरीस कळण्यास काही दिवस लागले आणि 20 डिसेंबर 56 रोजी बसचा संप काळ्या प्रवाशांनी अधिकृतपणे संपुष्टात आणला. मधल्या काळात रोझा व तिचा पती यांच्या नोक-यांवर गदा आली. मग त्यांनी अलाबामाची रजा घेतली आणि मिशिगन राज्यातल्या डेट्रॉइट इथे मुक्काम हलवला. पुढे रोझाने आपली आत्मकहाणी लिहिली. ती चांगल्यापैकी खपली. रोझा राजकीय कार्यात मात्र सामील झाली नाही. शिक्षणप्रसार, निराधार स्त्रियांना मदत इत्यादीत ती रस घेत होती.

नंतरच्या काळात अमेरिकन काँग्रेसने सुवर्णपदक देऊन रोझा पार्क्सचा गौरव केला आणि बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी देशातले सर्वोच्च मानण्यात येणारे अध्यक्षीय पारितोषिक देऊन बहुमान केला. या दोन्ही प्रसंगी क्लिंटन यांनी सुंदर भावपूर्ण भाषण केले. त्यांनी सांगितले की, कोणाला अगोदर कसलीच कल्पना नसताना एखादी व्यक्ती विलक्षण कार्य करते. तेव्हा आपण सर्वांबद्दल आदराची भावना बाळगणे चांगले. रोझा पार्क्सचा खटला चालू होता तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो. शाळेला बसने जात असल्यामुळे मी व माझे दोन मित्र बसमध्ये काळे प्रवासी बसत त्यांच्यात बसण्यास सुरुवात केली. या स्त्रीने स्वाभिमानाची वात पेटवली. नागरी हक्काचे आंदोलन अनेक वर्षे चालले. जॉन व रॉबर्ट केनेडी यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून नागरी हक्कांची पायमल्ली करणारांचा बंदोबस्त केला आणि लिंडन जॉन्सन यांनी धाडसी पावले टाकून नागरी हक्कांना कायदेशीर पाठबळ मिळवून दिले.

वृद्धापकाळ शारीरिकदृष्ट्या रोझाला चांगला गेला नाही. मिळकत नव्हती, औषधांचा खर्च होता आणि शारीरिक व बौद्धिक विकलांगपणा आला होता. ती राहत होती त्या इमारतीचा मालक भावनाशील व कृतज्ञ होता. त्यामुळे रोझाकडून तो घरभाडे घेत नसे. अशा या ख-या सत्याग्रही महिलेची आठवण 4 फेब्रुवारी रोजी, तिच्या शंभराव्या वाढदिवशी अनेक समारंभांद्वारे जागृत ठेवून लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली, हे स्पृहणीय आहे.

‘दिव्य मराठी’च्या 19 फेब्रुवारीच्या ‘रसिक’ पुरवणीत ‘विघटनाच्या दिशेने’ या मथळ्याचा लेख मी लिहिला होता. त्यात रा. स्व. संघाचे प्रमुख श्रीयुत मोहन भागवत यांनी भारत व इंडिया यातील सांस्कृतिक तफावतीसंदर्भातील केलेल्या मतावर टीका होती. पण भागवत यांनी तसे काहीच मत व्यक्त न केल्याचे पुराव्यानिशी जाहीर झाल्यामुळे माझी टीका मागे घेणे आवश्यक आहे.
- गोविंद तळवलकर