आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा नवीन काय वाचणार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी साहित्य संमेलन हा दरवर्षी न चुकता होणारा एक ‘इव्हेंट’. साधारणपणे महाराष्‍ट्रातच होणारा, मधूनच कधी तरी राज्याबाहेर इतर जिथे मराठी माणसं मोठ्या संख्येने आहेत, तिथे होणारा. तीन दिवस चर्चा, काव्यसंमेलनं, ग्रंथदिंडी यांचसोबत महत्त्वाचा घटक असतो पुस्तक प्रदर्शन. या तीन दिवसांतली पुस्तकविक्री काही लाखांचा पल्ला गाठत असते. या सगळ्यात आपणही सहभागी व्हावंसं आपल्याला वाटत असतं, मात्र जमत नसतं. एक दिवस फक्त पुस्तकांच्या सान्निध्यात, ती हाताळण्यात, चाळण्यात घालवावा, असं वाटणारे आपले अनेक वाचक मित्रमैत्रिणी आहेत. त्यांना आज सासवडकडे जायला उद्युक्त करायचा हा प्रयत्न. आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी घरी बसूनच काय वाचावं, यासाठी काही पर्याय. आपल्या काही मैत्रिणींनी सांगितलंय सध्या वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल आणि नवीन वर्षात वाचायचंच आहे, अशा पुस्तकाबद्दल.
‘माणसाचे मन अजूनही एक न उलगडलेले कोडे आहे. त्यातून बायकांचे मन ओळखणे ही तर अनेकांना अशक्य गोष्ट वाटते. याच मनाला केंद्रस्थानी ठेवून माणसाच्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी आपल्या मानसिका या पुस्तकात खूप सुंदर पद्धतीने केला आहे. सरत्या वर्षात मला वाचायला मिळालेले ते एक सुंदर पुस्तक होते,’ असे औरंगाबादेतील निवृत्त शिक्षिका कमल सप्तर्षी यांनी सांगितले. ‘माणसाचे मन हा एक गूढ विषय असला तरीही डॉ. बर्वे यांनी आपल्या खास शैलीत तो अतिशय सुटसुटीत करून मांडला आहे. संवादात्मक लिखाण आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे, आपल्याला माहीत असलेल्यांचे दाखले देऊन डॉ. बर्वे यांनी मन हा विषय छान फुलवला आहे. प्रत्येकीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे,’ असा आग्रह त्यांनी केला.
‘सुमती क्षेत्रमाडे यांचे सीतेवरील पुस्तक मैथिली नवीन वर्षात नक्की वाचायचे आहे,’ असे मराठीच्या प्राध्यापक डॉ. वृंदा देशपांडे-जोशी यांनी सांगितले. टीव्हीवर रामायण मालिका पाहून आणि घरातील वडीलधा-या माणसांकडून सीतेबद्दल बरेच काही ऐकले होते, मात्र या पुस्तकातून सीतेच्या व्यक्तिमत्त्वावर विविध दृष्टिकोनांतून प्रकाश टाकण्यात आला असल्याने ते आवर्जून वेळ काढून वाचायचे आहे, असे त्या म्हणाल्या.
दैनंदिन कामे सांभाळताना वाचनासाठी वेळ काढणे सहज शक्य आहे. वाचनाची आवड जोपासण्यासाठी वाचनालयांची मदत मिळते. ब-याच वेळा आपल्याला वाचायचे तेच पुस्तक मिळत नाही आणि दीर्घकाळापर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, प्रतीक्षेनंतर वाचनात वेगळीच मजा असते, असं अकोल्यातील काही मैत्रिणी म्हणाल्या. शिल्पा आवंडेकर यांच्या मते पुस्तकं म्हणजे सर्वात जवळची मैत्रीण.
सध्या त्या चेतन भगत यांचे वन नाइट अ‍ॅट अ कॉल सेंटर वाचत आहेत. नॉट विदाउट माय डॉटर हे शिल्पा यांना आवडलेले पुस्तक आहे. ‘व. पु. काळेंचे वपुर्झा हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी न सोडवणारे असेच आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘नवीन वर्षात सर्वात आधी इंदिरा गांधी यांचे आत्मचरित्र वाचायला आवडणार,’ असे त्या म्हणाल्या.
अ‍ॅड. मंगला पांडे म्हणाल्या की, ‘मी नेहमी पर्समध्ये पुस्तक घेऊन फिरते आणि वेळ मिळेल तेथे वाचते.’ अगदी आध्यात्मिक विषयापासून फॅशनच्या विषयाचे वाचन करते. एक होता कार्व्हर हे आवडलेले पुस्तक. नुकतंच त्यांनी विजया वाड यांचे ‘आपल्या मुली वाढवताना’ हे पुस्तक वाचून बाजूला ठेवलंय. नवीन वर्षात तसं तर बरीच पुस्तकं वाचायची आहेत; पण त्यातल्या त्यात पर्यावरण रक्षणावरील पुस्तकांवर अधिक भर देणार आहे, असे त्या म्हणाल्या.
नाशिकच्या अनिता कोल्हे यांना वाचायची लहानपणापासूनची आवड. ‘लग्नानंतरही वाचण्याची आवड टिकवायचा अट्टहास मी जपला आहे. मुली मोठ्या झाल्यात, त्यामुळे दुपारी हमखास एकांत व निवांतपणा मिळतो.
घरी कुणीच नसतं. वाचायला पुरेसा वेळ असतो. वाचण्यातून ऊर्जा मिळते, माणूस एका वेगळ्याच विश्वात गुंतून राहतो याचा मला पुरेपूर अनुभव आला आहे. नुकतंच मी गिरीश कार्नाड यांचं ‘खेळता खेळता आयुष्य’ हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं. कार्नाड यांच्या नाटकांविषयी ऐकून होते. पुण्यात त्यांचा ‘एक अधिक उणे’ या नाटकाचा प्रयोगही खास पाहण्यासाठी म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची खूप उत्सुकता होती. मात्र, अपेक्षेइतके मला ते भावले नाही; पण तरीही त्यातील काही अनुभव मला खूप काही देणारे ठरले. आता मी अमिता नायडू यांचं ‘प्लॅटफॉर्म नंबर झीरो’ वाचायला घेतलंय. नुकतीच सुरुवात केलीय. मुंबईचा एक वेगळा चेहरा या पुस्तकात मांडलाय हे ब्लर्बवरून लक्षात आलंय. एकंदर हे पुस्तकदेखील एक वेगळा अनुभव देईल याची मला खात्री आहे.
नाशिकच्याच सुवर्णा कुलकर्णी यांना मात्र नोकरीमुळे वाचायला फारसा वेळ मिळत नाही. ‘बँकेत नोकरी करत असल्याने घर आणि ऑफिस यातच बराचसा वेळ जातो; पण तरीही अधूनमधून वाचण्याचा प्रयत्न करीत असते. महिन्या-दोन महिन्यांत एक तरी पुस्तक वाचायचं असं मी ठरवूनच टाकते. नुकतंच विजय तेंडुलकरांचं ‘तेंचे दिवस’ वाचलं. पुस्तकातील अनेक गोष्टी फारशा कळत नसल्या तरी तेंडुलकरांची नाटकांव्यतिरिक्तची शैली या पुस्तकात बघायला मिळाली. त्यामुळे पुस्तक एकहाती वाचून काढण्यात मजा आली. एका रात्रीत हे पुस्तक संपवल्याचं समाधान आजही आहे. सध्या अरुण शौरी यांचं ‘वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवू शकेल काय?’ वाचायला घेतलंय. विषय माझ्या आवाक्यातला नाही, पण कुतूहलाचा आहे. वाचताना कंटाळाही येऊ शकतो; पण तरीदेखील माहिती मिळते म्हणून मी वाचणार आहे.’
पुण्यातल्या अंजली कुलकर्णी काहीशा गंभीर वाचन करणा-या. त्या म्हणतात, ‘अमेरिकन निग्रो : साहित्य आणि संस्कृती’ हे डॉ. जनार्दन वाघमारे यांचे पुस्तक विषयाच्या वेगळेपणाने मला लक्षणीय वाटले. ‘अमेरिका खंडातील निग्रो लेखकांनी केलेल्या ललित लेखनाचा मागोवा, त्यामागील प्रेरणा शोधण्याचा हा प्रयत्न अतिशय वाचनीय आहे. निग्रो मंडळींचे गुलामगिरीचे जगणे, त्यांच्यामध्ये कालांतराने आलेली जागृती, त्यांनी केलेले संघर्ष, दिलेले लढे, उभारलेल्या चळवळी आणि त्यातून जागे झालेले स्वत्व यांचा लेखाजोखा डॉ. वाघमारे यांनी या पुस्तकात उलगडला आहे.’ नव्या वर्षात त्यांनी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेले गांधीजी आणि डॉ. आंबेडकर - तुलनात्मक अभ्यास हे पुस्तक वाचण्याचा संकल्प केला आहे. गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात वैचारिक पातळीवर काही मतभेद होते का की त्यांच्यामध्ये आंतरिक सुसंबद्धता होती, असा तुलनात्मक विचार या पुस्तकात मांडल्याने ते वाचायची त्यांना उत्सुकता आहे.
पुण्यातल्याच आश्लेषा महाजन यांनी विदूर महाजन यांनी लिहिलेले शोधयात्रा हे पुस्तक नुकतेच वाचले. ‘लेखक स्वत: उत्तम सतारवादक आणि उद्योजक आहेत. मात्र, ऐन भरात पुत्रनिधनाचे दु:ख वाट्याला आल्यावर त्या आघातातून सावरताना जे मनात आले, ते शब्दरूपात व्यक्त झाले आहे. अतिशय साधे, सोपे निवेदन पण काळजाला भिडणारा आशय, ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये जाणवली. नव्या वर्षात गिरीश कार्नाड लिखित ‘खेळता खेळता आयुष्य’ वाचण्याचा संकल्प केला आहे. गिरीश कार्नाड यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कसे घडले, विकसित झाले, ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
जळगावच्या सुलभा कुलकर्णींना इतिहासात रुची आहे. तसेच लिहायलासुद्धा आवडते. संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई यांच्यावर त्या सध्या संशोधन करत आहेत. त्यांच्याशी निगडित पुस्तके, चरित्रांचा अभ्यास त्या करत आहेत. ‘सध्या वा. सी. बेंद्रे यांचे राजाराम महाराजांचे चरित्र मी वाचतेय. तसेच अच्युत गोडबोले यांची मी फॅन आहे. त्यांचे प्रत्येक पुस्तक मी वाचले आहे. त्यामुळे त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘गणिती’ मला नवीन वर्षात वाचायला आवडेल,’ असे त्या म्हणाल्या.
शिल्पा बेंडाळे यांनी नुकतीच सुधा मूर्ती यांची ‘अस्तित्व’ ही कादंबरी वाचली. ‘मनाला भावणारी कादंबरी आहे. दुरावा निर्माण होत असेल तर दोष न देता, भांडण न करता व्यवस्थित पद्धतीने समजून घेत नाते टिकवणे म्हणजे काय हे यातून कळते. पुस्तक वाचताना उत्सुकता शिगेला पोहोचते आणि मग सर्व प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळतात,’ असे त्या म्हणाल्या. नवीन वर्षात त्यांना संजय जोशी यांचे ‘आहे कॉर्पोरेट तरी’ वाचायचे आहे.
तुम्हाला काय वाचायचंय नवीन वर्षात? सांगणार ना आम्हाला?
madhurimadm@gmail.com