आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Te Teen Divas Of Experience For Dattaprasad Dabholkar

ते तीन दिवस...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही सात भाऊ आणि तीन बहिणी. आजच्या मुलांचा विश्वासही बसणार नाही, पण एकाच आईच्या पोटात जन्मलेली! माझी आई एकूणच ग्रेट होती. ती नेहमी अभिमानाने सांगायची, ‘मला दहा मुले आहेत. एकासारखा दुसरा नाही-आणि माणसासारखा एकही नाही!’

हे जे काही असे झाले असेल, त्याला पूर्णपणे जबाबदार माझे आई-वडीलच. आज कुणाचाही विश्वास बसणार नाही, असे ते विलक्षण जोडपे होते. 1920च्या सुमारास माझे वडील कोकणातील खेड्यातून आपले कर्तृत्व दाखवायला सातारला आले असणार. प्रचंड कष्ट उपसून ते त्या वेळी एल.एल.बी. झालेले. सातारा शहरात त्यांनी नामांकित फौजदारी वकील म्हणून आपला जम बसवला. त्या वेळच्या किंवा खरं तर आजच्याही रिवाजाप्रमाणे ते दत्तभक्त होते. दररोज माळावरच्या दत्ताचे दर्शन, घरी स्वत:च केलेली पूजा, वर्षातून दोनदा घरी आणि एकदा गाणगापूरला जाऊन करावयाचे पारायण. पण यात बसणार नाही, अशी आमच्या घरात एक ग्यानबाची मेख होती. माझी आई कोल्हापूरची. ती फक्त मराठी चौथीपर्यंत शिकलेली. पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आलेली. तिच्यावरचे संस्कार राजर्षी शाहू महाराजांचे. तिचे घराणे प्रचंड बुद्धिमान. तो वारसा पण तिच्या आईकडून आलेल्या. तिच्या आईचे वडील तात्यासाहेब नाईक हे त्या वेळी जिल्हा न्यायाधीश होते. तिचा धाकटा भाऊ चक्क इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन आला. मुंबई उच्च न्यायालयाचे नावाजलेले हायकोर्ट जज्ज तेंडुलकर ते हेच. ते गेले, त्या वेळी आचार्य अत्रेंनी मराठाच्या पहिल्या पानावर आठ कॉलमचा भला मोठा मथळा टाकला होता. ‘दुर्दैवी महाराष्ट्रा तुझा न्यायमूर्ती रामशास्त्री आज गेला रे...’

मात्र माझ्या आईचा रामशास्त्री बाणा जरा जादाच असणार. त्या काळात तिने मंगळसूत्र घातले नाही. कुंकू लावले नाही. आमच्या घरात कधी सत्यनारायण, हळदीकुंकू असले कार्यक्रम झाले नाहीत. आपल्याला नीटपणे न येणारे इंग्रजी ही बाई कामाला आलेल्या बायांना शिकवत बसे. या बाईने अंगावर कधी सोने घातले नाही. त्यामुळे माझ्या बहिणींच्या अंगावरही कधी सोने नव्हते. घरात सोने अजिबात नव्हते आणि मुलींच्या अंगावर सोने असते, हे मला आणि नरेंद्रला भावांची (आणि नंतर आमचीही!) लग्ने झाल्यावर काही काळापुरते समजले. हे सारे पण समजण्यासारखे आहे. वयाच्या 94व्या वर्षी या बाईने शरीर दान केलेले होते. आम्हा सर्वांना तंबी भरलेली ‘मृत्यू नंतर एका तासात माझे शरीर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार. उगाच रडारड करत, धडपड करत अजिबात जमायचे नाही. शरीर गेले की शरीर संपले. त्या मेलेल्या शरीराला बघायचंय काय? सगळ्यांना सोयीची वेळ ठरवा. एकत्र जमा आणि हसतखेळत माझ्या आठवणी काढत बसा.’ खरं तर हे पण समजणारे आहे. मात्र एक गोष्ट समजावून घेणे खूप कठीण आहे, पण खूप गरजेची पण आहे. एवढे टोकाचे वैचारिक मतभेद असताना माझ्या आईवडिलांचे छोटे वादविवादसुद्धा आम्ही कधी पाहिले नाहीत. त्यांचे अगदी गुळखोबरे होते. वडिलांच्या पारायणाचे आई सर्व हसतमुखाने करायची आणि दररोज संध्याकाळी आम्हा भावंडाची जेवणे झाल्यावर दोघे अगदी निवांतपणे चुलीसमोर बसून हसतखेळत गुलूगुलू गोष्टी करायचे! विज्ञान आणि धर्म नीटपणे समजलेली माणसे समोरच्या माणसाचे अजिबात न पटणारे विचार शांतपणे ऐकून त्यांचा आदर करीत, ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. हे सारे समजले, पुढे विवेकानंद समजावून घेतल्यावर. त्यांनी सांगितलंय, ‘धर्म आणि विज्ञान माणसाला खर्‍या अर्थाने समजल्याची ही एकमेव खूण आहे.’
तर अशा या घरातले आम्ही दहा जण. देवदत्त सर्वात मोठे, नरेंद्र सर्वात लहान. नरेंद्र आणि देवदत्त यांच्यात 26 वर्षांचे अंतर. माझ्या आणि नरेंद्रमध्ये 8।। वर्षांचे अंतर. खट्याळपणे बोलण्याची सवय असलेला नरेंद्र सांगायचा, ‘देवदत्त माझे लांबचे सख्खे भाऊ आहेत आणि बंड्या (म्हणजे मी) जवळचे सख्खे भाऊ आहेत!’ पण खरी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. देवदत्त आणि नरेंद्र यांची वृत्ती आणि कार्यपद्धती अगदी सारखी होती. दोघेही स्वत:चे सारे उधळून समाजासाठी काही तरी करत असायचे. किंवा मी त्यांची चेष्टा करत त्यांना म्हणायचो, आपण करतोय ते सारे समाजासाठी, असे तुम्ही समजत असता आणि आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करता! देवदत्त म्हणजे दादा गेले, त्या वेळी मी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. नरेंद्रला तो जाम आवडला. म्हणाला, ‘बंड्या, आता खरेच चांगले लिहावयास लागलायस!’ मी शांतपणे म्हटले, ‘तू पण आता असे छान लिहावयास लाग. तुलापण माझ्यावर कधीतरी लिहावयास लागणार!’ माझ्याहून अधिक शांतपणे म्हणाला, ‘लिहावयास खरेच आवडेल रे. पण काहीतरी काम करायला लाग. नुसताच आपला टिवल्याबावल्या करीत भटकत असतोस.’

नरेंद्र म्हणाला, ते अगदी खरे होते. कोणतीही चळवळ, संघटना, विचारधारा, एवढेच काय विषय मला कधी बांधून ठेवू शकला नाही. मी आपला अळमटळम करीत भटकत राहिलो. आणि असे भटकता भटकता मी सोमवार 19 ऑगस्टला रात्री गोव्यात पोहोचलो होतो. 20 ऑगस्ट हा दिवस विवेकानंदांच्या आणि म्हणून या देशाच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे, असे मी मानतो. विवेकानंदांना पणजीबद्दल असलेले प्रेम पण मी जाणतो. परिव्राजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून 1890 ते 93 अशी तीन वर्षे विवेकानंदांनी भारत पिंजून काढला. या देशाची आजची भयानक परिस्थिती, त्यामागची कारणे, त्यावरची कायम स्वरूपाची उपाययोजना आपल्या मनात पक्की केली. त्या काळातील पत्रांमधून महात्मा फुलेंपेक्षा अधिक प्रखर शब्दांत हिंदू धर्मावर आणि ब्राह्मणशाहीवर आघात केले. पत्रातून लिहिले, ‘आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा आहे सैतानाचा बाजार.’ दुसर्‍या पत्रात अलमबझार मराठातील शिष्यांना कळविले, ‘आपले देव आता जुने झालेत. आपणाला नवा देव, नवा धर्म आणि नवा वेद हवा आहे. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.’ आणि या नरेंद्राने 20 ऑगस्ट 1892 रोजी जुनागडच्या नबाबाला पत्र पाठवून कळविले, ‘ज्यांच्या पाचशे पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे, हे पाहिलेले नाही, ते ब्राह्मण आज या देशाला वेद सांगताहेत-देवा ब्राह्मणांच्या रूपाने या देशात आज वावरणार्‍या राक्षसांपासून या देशाचे रक्षण कर!’ त्यानंतर पुन्हा बरोबर एक वर्षाने 20 ऑगस्ट 1893 रोजी नरेंद्र अमेरिकेत पोहोचलाय. सर्वधर्मपरिषदेचे आमंत्रण त्याच्याकडे नाही. त्याची खिल्ली उडविली जात आहे. त्याला त्याची चिंता नाही. आत्मविश्वास एवढा जबरदस्त, की ते आमंत्रण मी मिळवणारच आणि ती परिषदही जिंकणार, याची खात्री. पण 20 ऑगस्ट 1893च्या पत्रात याचा काहीही उल्लेख नाही. हा ठामपणे सांगतोय, ‘माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचे औषध मला तीन वर्षांच्या भटकंतीत समजलंय.’ पुढे मित्रांना लिहिलेल्या पत्रात, विवेकानंद म्हणजे विवेकात आनंद घेणारा म्हणून विवेकानंद. त्यामुळे नरेंद्र, विविदिशानंद, सच्चिदानंद, एक अनाम संन्यासी अशी अनेक नावे वापरून आणि नाकारून नरेंद्राने शेवटी विवेकानंद हे नाव घेतलेले. विवेकानंद सांगताहेत, ‘कालबाह्य रूढी, परंपरा, त्यातून येणारी पिळवणूक दूर करून आपणाला या देशाला विज्ञाननिष्ठ बनवायचंय. आपल्याला सुरुवात खेड्यापासून करावी लागेल.’
उद्या 20 ऑगस्टला मला पणजीमधील तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्रित मेळाव्यात खरे विवेकानंद समजावून घ्यायचेत. मी पणजी मुद्दाम निवडलंय. भारतभर हिंडताना विवेकानंदांना आवडलेले हे एकमेव शहर आहे. त्यांनी पत्रात लिहिलंय, ‘पणजी हे स्वच्छ, सुंदर शहर आहे. भारतातील प्रत्येक शहर असे बनविले पाहिजे. मात्र पणजीतील बहुतांश ख्रिश्चन सुशिक्षित आहेत आणि बहुसंख्य हिंदू अशिक्षित आहेत! त्यानंतर 21 ऑगस्टला पणजीत एका वेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन लेखक आणि प्रकाशन यांना फक्त माझ्याच हस्ते हवे आहे. परशुराम हे बहुजन समाजाला हिणवणारे एक भयानक प्रतीक आहे. त्यांचे पुनरुज्जीवन एका वेगळ्या प्रकारे आज केले जातेय. माशेलकरांनी त्याच्याबद्दल अतीव गौरवाने लिहिलंय. माधवराव चितळेंनी तर ‘भगवान परशुराम, नवनिर्माते’ म्हणून पुस्तक लिहिलंय. या सर्वाला उत्तर देणारे ‘अवतारी परशुराम हिंदू धर्म तारक की मारक?’ हे अर्जुन जयराम परब यांचे हे पुस्तक आहे.

19 ऑगस्टला मी अगदी निवांत आहे. महाराष्ट्रात भाषणे देत मी सर्वत्र हिंडलोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत! मात्र, गोव्यात ज्या आपुलकीने, घरचा पाहुणा म्हणून संयोजक तुमची जी काळजी घेतात त्याला तोड नाही. भ्रमणध्वनी जणू तुमचा पाठलाग करत असतो आणि आपण पोहोचण्याच्या वेळी खोली सजवून, नाष्टा घेऊन कार्यकर्ते तुमची वाट पाहात असतात. 19 ऑगस्टला एका शांत प्रसन्न मन:स्थितीत मी झोपी जातो.

20 ऑगस्टला फोनची घंटा पुन:पुन्हा वाजत असल्याने मला जाग आली. कोणत्यातरी वाहिनीचे लोक जयंतराव साळगावकर गेल्याची बातमी देऊन माझी ‘बाईट’ मागत होते. मी अवाक. धक्का अपेक्षित नव्हता. माझा भविष्यावर अजिबात विश्वास नाही. देव ही संकल्पना आहे, त्या स्वरूपात मला मान्य नाही. गणपती प्रतिष्ठापना वगैरेचा मग प्रश्न नाही. पण जयंतराव माझे जवळचे मित्र. ते मला धाकटा भाऊ मानायचे. त्यांच्या घरी गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना होताना बाहेरचा म्हणता येईल, असा मी एकटा असायचो. त्यानंतर जेवणाची पंगत बसली की जयंतरावांच्या नंतर माझा पाट. मग क्रमाने त्यांची मुले. दरवर्षी कालनिर्णयला त्यांना माझा लेख अपरिहार्य आणि त्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, काहीतरी खुसपट शोधून आम्ही दोघांनी एकमेकांशी हल्ली काही काळ पूर्ण अबोला धरलेला.

यातून मी थोडा सावरलो. तोवर कार्यक्रमाचे आयोजक येतात, सांगतात ‘सर तुमच्या भावाचा खून झालाय. आम्ही भाषण रद्द करतोय. तुम्ही लगेच परत निघा.’ ते नक्की काय सांगताहेत हे समजावयास थोडा वेळ जातो. मात्र, त्यातून सावरायला अजिबात वेळ लागत नाही. आईने लहानपणापासून मनावर एक विचार पक्का केलेला. ‘मृत्यू हे जगातील एकमेव सत्य आहे. मृत्योत्सव साजरा करावयास शिका.’ म्हणजे मी अगदी निवांत. मी म्हटले, ‘अरे भाषण झालेच पाहिजे. मी भाषण रद्द केले असे समजले तर जिथे असेल तेथून येऊन नरेंद्र माझी चेष्टा करेल.’ माझे बोलणे त्यांना गोंधळात टाकते. त्यांना वाटले असणार, मी फारच घटिया विनोद करतोय. किंवा माझे मानसिक संतुलन पार बिघडलंय. ते म्हणतात, ‘सर भाषण बंद करणे बरे. कारण गोवा हा सनातन प्रभातचा बालेकिल्ला आहे. तुमच्या भाषणाच्या वेळी प्रखर निदर्शने किंवा घोषणा देतील.’ मी आयुष्यात एवढा बदनाम किंवा लोकप्रिय झालोय, हे मला आयुष्यात प्रथमच कळले. मी म्हटले, ‘मी औरंगाबादलाही भाषणे देऊन आलोय. परिवारातील डॉ. माधवराव चितळे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्या भाषणाचा अजिबात प्रतिवाद केला नाही. आणि आज मी भाषणात जे सांगणार आहे, ते विवेकानंदांनी काय सांगितले तेवढेच सांगणार आहे. सनातन प्रभातला विवेकानंदांचे विचार जाळावयाचे असतील, तर आपण काय करणार? आपण एवढेच म्हणू, विवेकानंद त्यांनी वाचलेले नाहीत.’ विवेकानंद म्हणालेत, ‘विचार फक्त विचारानेच कोरता येतो आणि विचारानेच पुसता येतो.’

भाषणाला तुडुंब गर्दी. सभागृह खचाखच भरलेले. आंदोलनकर्ते कुठेच नाहीत. ते बहुधा आनंदोत्सव साजरा करत असणार. मात्र सभागृहातील काही मुले-मुली चक्क हुंदके देत होती. नरेंद्र लोकांच्या एवढा मनात पोहोचलाय, याचे मला नवलच. माझा परिचय करून देणारा प्रा. कामतांसारखा नावाजलेला वक्ता गहिवरून मधेच थांबलेला. माझे एक दीड तासाचे भाषण पार पडले. तोवर फोन आला. ‘नरेंद्रने शरीरदान केले होते, पण पोस्टमार्टम झालेले शरीर तेथे दान म्हणून घेत नाहीत. त्याचा देह सातारला हलवताहेत. सातारला लोक मोठ्या संख्येने जमलेत. किमान त्यांना भेटायला या.’ दुसर्‍या दिवशी पुस्तक प्रकाशन संध्याकाळी 5 वाजता होते. आता सातारला जाऊन दुसर्‍या दिवशी गोव्यात परत येणे सहज शक्य होते.

परतीच्या प्रवासात पुन:पुन्हा वाजणारा आणि तेच ते बोलणारा फोन मी बंद केला. नरेंद्रशी याबाबत झालेली बोलणी मला आठवायला लागली. नरेंद्र लोकांत रमलेला माणूस होता. दिवसभर त्याचा फोन वाजत असायचा. पण मी त्याच्या फोनला कधी हात लावला नाही. कारण दिवसातला एकतरी फोन आईबहिणीवरून शिवी घालून सज्जड दम भरलेला असायचा. फुकटात असल्या तरी आपण कशाला शिव्या ऐकायच्या? दम भरणारी निनावी पत्रे तर ढीगभर. सरकारने एकवेळी दिलेली सुरक्षा त्याने नाकारली होती. एकदा मी त्याला झाडलेच. विचारले, ‘तू संरक्षण का घेत नाहीस?’ तो शांतपणे म्हणाले, ‘मी झेड ग्रेड सुरक्षा घ्यावी म्हणून देव पाण्यात घालून बसलेले अनेक आहेत. पण मला संपवता आला नाही तर माझ्या कुठल्यातरी कार्यकर्त्याला संपवतील.’ मात्र त्यानंतर तो जो म्हणाला, ते विलक्षण होते. तो म्हणाला, ‘या देशातील परिवर्तन, सतीपासून संमतीवयापर्यंत फक्त हा देश त्या वेळी पारतंत्र होता म्हणूनच झाले. हे परिवर्तन स्वतंत्र भारतात व्हावे, असे वाटत असेल तर काही जणांना बलिदान देण्यास तयार राहावे लागेल!’

‘काका उतरा’ असे ड्रायव्हर म्हणाला, तेव्हा मी भानावर आलो आणि गोंधळलो. घर तर कुठेच नव्हते. उतरलो तेव्हा लक्षात आले. प्रचंड गर्दी म्हणजे काय हे प्रथमच पाहात होतो. घरापासून अर्धा किलोमीटरवर गाड्यांचा खच, मोटारी, मोटार सायकली, सायकली. लोक बेभान होऊन घोषणा देत होते. काही जण रडत होते. नरेंद्र एवढ्या लोकांपर्यंत, एवढ्या जवळ पोहोचलाय, याची मला खरंच कल्पना नव्हती. बहुधा नरेंद्रलाही नसावी. या देशातील परिवर्तनाची चळवळ एवढी पसरलेली आहे. याची या चळवळीलापण कल्पना नसावी...

रात्री 10-11च्या सुमारास दमून घरी पोहोचलो तर लोकसत्तेचे दिनकर झिंब्रे माझी वाट पाहात ताटकळत होते. हे मी विसरूनच गेलो होतो. सकाळपासून लोकसत्ता माझा तगडा पाठलाग करीत होती. नरेंद्रच्या आठवणींचा माझा लेख वा टिपण त्यांना रविवारच्या अंकासाठी हवे होते. कार्यक्रमात गुंतलोय म्हटल्यावर शब्दांकन करायला गोव्याचा प्रतिनिधी आला होता. मी सातारला पोहोचल्यावर शब्दांकन देईन, असे सांगितल्यावर तो घरी पोहोचला होता. मी फार दमलोय, उद्या सकाळी परत गोव्याला जायचंय, ही माझी अडचण त्याने समजून घेतली. म्हणाला, ‘उद्या बुधवार, म्हणजे तुम्ही गुरुवारी परत येणार. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पोचा. रविवारच्या अंकाच्या लोकांनी गुरुवारी दुपारी तीनपर्यंत सर्व अडचणी सोसून थांबायचं ठरवलं.’ म्हटले, ‘पहाटेच निघतो. 12 वाजेपर्यंतच पोचतोय. आयुष्यात प्रथमच दिलेला शब्द मोडतोय. समजून घे.’- निघताना कल्पनाही नव्हती, हा शब्दही मोडावा लागणार!

खरंच सांगतोय. रात्री मला अगदी शांत स्वस्थ झोप आली. सकाळी अगदी प्रसन्न वाटत होते. चहा घेता घेता मनात म्हटले, ‘परलोक, मृत्यूनंतरचा प्रवास असे काही असेल तर आई, वडील, दादा, नरेंद्र तिकडे चहा घेता घेता माझी फिरकी ताणत असणार. समजा असे नसेल, विचार वेव्हज म्हणजे लहरींच्या रूपात विश्वात हिंडत असतील, तर योग्य अ‍ॅण्टेना मिळतोय का, हे शोधत त्या लहरी हिंडत असणार. तोवर आमचा गुरू आईनस्टाईन आठवला. तो म्हणालाय, ‘देव आहे का नाही? मरणोत्तर अस्तित्व आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे देण्याइतपत मानवी मेंदू अजून विकसित झालेला नाही. धर्म, विज्ञान, तत्त्वज्ञान फक्त हवेत इमले उठवतात किंवा कविता रचतात. त्यापेक्षा या कल्पना विसरून, मेंदूला प्रमाण मानून, आपल्या भोवतालच्या माणसांना अधिक सुखी करायला आणि भोवतालचे जग अधिक सुंदर करावयास लागा...’

आईनस्टाईन मनातच राहिला. तेवढ्यात समोरच्या बंगल्यातील कुचेकर घाईघाईने माझ्या घरी आले.कुचेकर हे इंजिनिअर. पण अफाट वाचन असलेले. अरुण टिकेकरचे मित्र. काल कुचेकरांनी 8-10 वर्षांपूर्वी सांगितलेली एक गोष्ट मला आठवली होती. ती त्यांना आता आठवत असेल का, हा माझ्या मनातील प्रश्न होता. पण तीच गोष्ट मला पुन्हा आठवण करून देण्यासाठी ते आले होते. ही गोष्ट आहे नरेंद्र आणि आमचा एक भोळाभाबडा, प्रामाणिक पण परिवारात असलेला मित्र रमेश वेलणकर यांच्यामधील संवादाची. हा संवाद कुचेकरांच्या समोर घडला होता. संवाद असा. रमेश नरेंद्रला म्हणाला, ‘डॉक्टर, तुमचे मित्र काही तुमची साठी करतील असे दिसत नाही. तो सत्कार समारंभ आम्ही केला तर तुम्हाला चालेल का?’ नरेंद्र शांतपणे म्हणाला, ‘अरे साठ हे फार लहान वय आहे. मी गांधीजींना मानतो. माणूस 125 वर्षे जगतो, असा त्यांचा पूर्ण विश्वास होता. मी सकाळी तीन वाजता उठून तासभर योगासने करतो. नंतर इतर व्यायाम, नंतर चालणे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही कार्यक्रमामुळे यात खंड पडला नाही. त्यातून मी शाकाहारी आणि दारू अजिबात न पिणारा. मी नक्की 125 वर्षे जगणारेय. आता तुमच्या परिवारातील कुणी त्यांच्याप्रमाणेच मला कधी संपवला तर गोष्ट वेगळी!’

परतीच्या प्रवासात नरेंद्रच्या अनेक आठवणींचे ट्रेलर मनात येत होते. ‘गुरुचरित्रात एवढ्या भयानक गोष्टी आहेत. स्त्रियांची विंटबना आहे. मग तू पारायणाचे जेवण का करतेस, म्हणून आईशी भांडणारा. आई त्याला त्या वेळी उत्तर देत नसे. नुसती हसत असे. आता वाटते आई मनात म्हणत असणार, ‘अरे रज:स्वलेने केलेले जेवण त्यांच्या देवाला चालत असेल, तर मला काय अडचण आहे?’ आणखी एक गोष्ट. भुते खरेच असतात का, हे पाहावयास त्याने रात्री 12 वाजता मित्रांच्याबरोबर माहुलीच्या स्मशानभूमीत जाऊन बसायचे ठरवले. मी साफ नकार दिल्यावर म्हणाला, भुते नसतात हे समजावून घ्यायला अमरला सांगू का? ती आमच्या दोघांच्यामधली बहीण. जाम हुशार. आमच्या दोघांच्यातील न मिटणारी भांडणे मिटविण्याचा आटोकाट प्रयत्न करणार.

एकदा मात्र माझे आणि नरेंद्रचे कडाक्याचे भांडण होणार, असे सार्‍या सातारा शहराला वाटले होते. सातारला तेव्हा दोन बलाढ्य अशी क्रीडा मंडळे होती. एक ‘श्रीकृष्ण क्रीडा मंडळ’ दुसरे ‘शिवाजी उदय मंडळ’. खरे तर दोन्ही मंडळात सर्व धर्मांचे, सर्व जातींचे आणि सर्व विचारधारांचे लोक होते. हुतूतू व इतर देशी खेळांचा प्रसार याच कामात दोन्ही मंडळे सर्वशक्तीनुसार काम करणारी. पण दोघांच्यात विळीभोपळ्याएवढे वैर. प्रचंड खुन्नस. मी कृष्णक्रीडेचा खेळाडू. मुंबई राज्य क्रीडा महोत्सवात शिवाजी उदय मंडळाच्या नाकावर टिच्चून सातारा जिल्हा हुतूतू संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेलेला. नरेंद्रने कृष्णा क्रीडा मंडळात यायला पाहिजे की नाही? हा आपला सरळ शिवाजी उदय मंडळात गेलेला. घरी काही बोलायची सोय नाही. आईवडिलांनी सर्वांना सांगितलेले ‘तुम्हाला प्रत्येकाला जे पटते व आवडते ते अगदी आम्हाला न विचारता करा. म्हणजे शिकायचे तर शिका, नसेल शिकायचे तर नका शिकू. लग्न वाटले तर करा, नाही वाटले तर नका करू. शिक्षण कोणत्या विषयाचे घ्यायचे आणि लग्न कुणाशी आणि केव्हा करायचे हा फक्त तुमचा प्रश्न आहे.’ आता या घरात नरेंद्रने शिवाजी उदय मंडळात जाणे चुकीचे आहे, हे माझे कोण ऐकणार?

माझी अडचण वेगळी होती. तुझा भाऊ फितूर किंवा गद्दार झालाच कसा, म्हणून मंडळातील मित्र मला हिणवायचे. माझ्या मनात नरेंद्रची काळजी. ही शिवाजी उदय मंडळाची माणसे काही खरी नाहीत. मी त्यांच्यात माझा खबर्‍या पेरलाय, असे मानून त्याला बिचार्‍याला धडा शिकवणार! झाले वेगळेच, प्रचंड कष्ट, प्रामाणिक पारदर्शक स्वभाव, असामान्य संघटन कौशल्य त्यामुळे तो शिवाजी उदय मंडळाचा हिरो झाला. शिवाजी उदय मंडळाचाच नव्हे, तर शिवाजी विद्यापीठाच्या हुतूतू संघाचा तो सलग तीन वर्षे कर्णधार होता. त्याने त्या विद्यापीठास आंतरविद्यापीठीय चषक मिळवून दिला आणि भारताचा पहिला कबड्डी संघ ज्या वेळी निवडला गेला तेव्हा त्यात त्याची निवड झाली! झाले ते खरे एवढेच. शिवाजी उदय मंडळ महाराष्ट्रातील एक बलाढ्य क्रीडा मंडळ म्हणून उभे आहे. नरेंद्र म्हणजे नरूभाऊ हे त्यांचे आयकॉन आहेत. कृष्ण क्रीडा मंडळ जवळजवळ संपलंय आणि मी हुतूतू खेळायचो हे सातार्‍यात आता कुणालाही आठवत नाही!

... दोन वाजताच प्रवास संपवून गोव्याला पोहोचलो आणि एक वेगळेच त्रांगडे माझ्यासमोर उभे राहिले. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पाच वाजता. पण गोव्याच्या ‘अंनिस’ने दुपारी तीन वाजता शोकसभा ठेवली होती. मी तेथे हजर असेन, म्हणून पत्रके वाटली होती. तसे फलक लावले होते. मला तर अंनिसमधले ठोसुद्धा माहीत नाही. त्यांचा एकही कार्यक्रम मी अजून दुरूनही पाहिलेला नव्हता. मला वाटले असतील 8-10 म्हातारी माणसे. पण सभेला गेलो आणि उडालो. पणजी येथील विलक्षण सुंदर असलेल्या, ‘न्यू आर्ट अ‍ॅण्ड कल्चर बिल्डिंग’चे प्रशस्त, वातानुकूलित सभागृह गर्दीने तुडुंब ओसंडून वाहात होते. मी नरेंद्रचा भाऊ म्हणून मला व्यासपीठावर बसवले. एकापाठोपाठ एक श्रोते बोलत होते. त्यात स्त्री-पुरुष, म्हातारे सर्व होते. महत्त्वाचे म्हणजे वक्ते कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांत बोलत होते. त्यांचे विचार समजत होते. या देशात भाषांचे भांडण खरेच आहे कुठे? न समजणारी गोष्ट म्हणजे बोलताना वक्ते संतप्त आणि गहिवरलेले होते. काही जण तर चक्क रडत बोलत होते. नरेंद्र एवढ्या लोकांपर्यंत इतक्या त्यांच्या मनात आणि काळजात पोहोचला कसा? सभेत माजी कायदा मंत्री रमाकांत खलप, खासदार अ‍ॅड. अमृत कासार, गोवा कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ असे अनेक नामवंत श्रोते म्हणून उपस्थित होते. वक्ते बोचरे, भेदक प्रश्न विचारत होते. येथे पर्रिकर, त्यांचे मंत्री का नाहीत? कामात असतील. आम्ही समजू शकतो. पण या सरकारने या खुनाचा अजून निषेध केला नाही. दाभोळकरांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. मात्र सनातन धर्मसंस्थेच्या कार्यक्रमाला त्यांचे गुणगान करीत ही मंडळी का उभी असतात?

दुसर्‍या एका वक्त्याने विचारले, ‘परिवाराचा गांधी नेहरू यांच्यावर राग आहे. मात्र ते तसे पटेलांना मानतात. पटेलांनी गोळवलकरांना पाठविलेल्या पत्रात लिहिले होते, ‘संघाचा या खुनात हात होता की नव्हता ते नंतर ठरेल. मात्र, तुम्ही देशात जे वातावरण निर्माण करत होता, त्या विषारी वातावरणामुळे हा खून झालाय हे आपणाला नाकारता येणार नाही.’ मग हा खून ‘सनातन प्रभात’ ज्या विखारी भाषेत दाभोळकरांवर लिहीत होता ते अयोग्यच होते. धर्मकृत्य म्हणजे काय? हे अनुयायांना सनातन प्रभात शिकवत होता आणि दाभोळकरांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी जो बिभत्स मजकूर लिहिला आहे, त्याचा हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांचे रक्षण करावयास कटिबद्ध असलेला संघ, भा.ज.प., वि.हिं.प. किमान निषेध का नाही करत?’

एक शिक्षिका फार पोटतिडकीने बोलली. तिने जे नेमके भेदक विधान केले त्यामुळे शोकशभा असूनही क्षणभर हास्याची लकेर पसरली. ती म्हणाली, ‘महाराष्ट्रातील नेते येथे आले की एका दमात ‘शाहू, फुले, आंबेडकर’ असे म्हणतात. आमच्या शाळेतल्या अनेक मुलांना हे एकाच माणसाचे नाव आहे असे वाटते. नंतर माझ्या लक्षात आले, या नेत्यांचीही अशीच समजूत आहे! मी एकदा एकाला विनंती केली. शाळेसाठी पुस्तके खरेदी करायचीत. ‘शाहू, फुले, आंबेडकर’ यांच्या एका पुस्तकाचे नाव सांगा. तो म्हणाला, तिकडे गेल्यावर कळवतो! आज बनवलेला ‘जादूटोणाविरोधी कायद्याचा’ मसुदा या तिघांपैकी एकालाही दाखवला असता, तर त्यांनी तो फाडून हवेत उडवला असता. एवढा सौम्य पचपचीत कायदा! ’
मलालाच्याच वयाच्या एका हिंदू मुलीने सांगितले, ‘मलालावरील हल्ला आणि दाभोळकरांवरील हल्ला ही एकाच तालिबानी वृत्तीमधून निर्माण होतात. आम्ही सांगतो तो धर्म, आम्ही सांगतो तो धर्मग्रंथ, आम्ही सांगतो तो त्या धर्मग्रंथाचा अर्थ. तो निमूटपणे मान्य करा. नाहीतर कुत्र्याच्या पिलाच्या मौतीने मरावयास तयार व्हा. मलालाच्या वेळी गळा काढणारे भारतातले सारे नेते आज शांत का आहेत? भारतीय संसदेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ संमत करावा, असे म्हणत पुढे का येत नाहीत?- पाकिस्तान आणि भारत यातील तालिबानी मंडळी आणि राजकर्ते अगदी सारखेच कसे?’

नंतरचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अधिक ज्वालाग्राही होता. ‘परशुराम म्हणजे बहुजन समाजाला अवमानित करणारे एक प्रतीक. 21 वेळा नरसंहार करून आम्ही तुमचा वर्ण नामशेष केला, म्हणून सांगणारे. तुमचा वर्ण कायमचा संपावा, म्हणून आमच्या या प्रतीकाने गर्भवती मातांची पोटे फाडून त्यातील जीवसुद्धा चेचले. मातृसत्ताक कुटुंबपद्धती आता कायमची संपली. आता पितृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. वडिलांनी सांगितले तर आईचे डोके उडवले जाते, हे लक्षात ठेवा...’
‘ही तुमची महाभयानक प्रतीके तुम्ही फक्त साहित्य संमेलने आणि अखिल आर्यावर्त ब्राह्मण संमेलनात मिरवून थांबत नाही. माशेलकरांचे लेखन आणि माधवराव चितळेंचे पुस्तक यातून पुन्हा प्रस्थापित करताय... माधवराव चितळेंनी पुस्तक लिहिलेय- ‘भगवान परशुराम नवनिर्माते’ चितळे, माशेलकर यांचे या विषयातील ज्ञान काय?- वक्ते बोलत होते ते भयावह आणि विलक्षण होते. पण त्यानंतर आणखी एक विलक्षण गोष्ट घडली. मी अनेक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला, या ना त्या कारणाने उपस्थित राहिलोय. पण मी पाहिलेला हा पहिला प्रकाशन समारंभ, जाण्यापूर्वी श्रोत्यांनी गर्दी करून, पुस्तके विकत घेऊन पहिली आवृत्ती संपवली होती.’

दोन कार्यक्रम, खोपडी आऊट करणारे. रात्रभर एकदम अस्वस्थ झोप. त्यातून सकाळी उठून लवकर सातारला जायचे होते. दिनकर झिंब्रेला 12 वाजताचा वायदा केलेला. पण भल्या पहाटे माजी केंद्रीय कायदा मंत्री खलपांचा फोन ‘असा भारतीय कायदा होऊ शकतो, झाला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, गोव्याच्या पेडणे भागात, मांजरे गावाच्या खेडेगावात मी कॉलेज चालवतो. तेथील मुलांना तुमचे पणजी येथील कॉलेजातील भाषण मित्रांनी सांगितलंय. सकाळी 8 वाजता सर्व विद्यार्थी जमणार अहेत. तुमचे विवेकानंद त्यांना समजावून घ्यायचे आहेत.’

हा कार्यक्रम आयुष्यातील एक सुवर्णयोग. मी भारतातील व भारताबाहेरच्याही अनेक कॉलेजचे परिसर पाहिलेला. निसर्ग सौंदर्याने उधळण केलेला असला दुसरा परिसर मी पाहिलेला नाही. गोव्यात जाणार्‍या प्रत्येकाने हा परिसर पाहायलाच हवा. महत्त्वाचे म्हणजे मुले आणि मुली सारख्याच संख्येने होती. भाषणानंतर भेटून मुलींनी केवळ नेमके प्रश्न विचारले नाहीत, चक्क माझा ‘आय. डी.’ मागितला. नंतर त्यांना नेटवर माझ्याशी सविस्तर चर्चा करावयाची होती. बदलणार्‍या भारताचे ते मोहक आश्वासक दर्शन होते.

मात्र, आता परत निघायला बारा वाजले होते. गाडीत बसायला गेलो तोवर पाठोपाठ दोन विनोदी घटना घडल्या. या भाषणाला म्हणून मुद्दाम डॉ. दुभाषी आले होते. ते मला प्रथमच भेटत होते. ते आठवड्यातून तीन दिवस गोव्यात आणि तीन दिवस दुबईत प्रॅक्टिस करतात. त्यांनी मला बाजूला घेतले. म्हणाले, ‘पटत नाही. पण माझी बायको म्हणते, नरेंद्रची बायको मुसलमान असणार. नाहीतर आमच्या ‘कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राह्मण’ जातीतील पुरुष मुलाचे नाव हमीद ठेवणार नाही!’ मी हसलो. म्हटले, ‘त्यांचा नंबर द्या. शैलावहिनी गायनॅकॉलॉजिस्ट आहेत. पण त्यासुद्धा ‘कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राह्मण’ या जगातील सर्वश्रेष्ठ जातीत जन्मल्यात. त्याच तुमच्या बायकोला फोन करतील.’ मला दादा आठवले. आपल्या भावाबहिणींनी धर्माबाहेर किमान भाषेबाहेर लग्न करावीत, असे त्यांना मनापासून वाटे. फक्त मी त्यांची इच्छा थोडीफार पुरी करू शकलो. माझी बायको शास्त्रज्ञ होती. पण मराठी न येणारी सिंधी होती आणि माझा हा आनंद पण नरेंद्रने मला उपभोगायला दिला नव्हता. तो दादांना म्हणाला होता, ‘बंड्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. त्याच्याशी लग्न करण्याचा वेडेपणा करायला कुठलीही मराठी मुलगी तयार नव्हती. फक्त सिंधी मुलगीच हे वेडे साहस करू शकते.!’

गाडीत बसलो आणि एका पाठोपाठ तीन भयाण विनोदी ‘एस. एम. एस.’ आले. पहिला सांगत होता. ‘आता तरी पटले ना? आपले धर्मग्रंथ बरोबर आहेत. कोणतेही चांगले किंवा वाईट काम नरबळी दिला तर लगेच पार पडते. जय सियाराम.’ हा डिलीट केला. पुढचे डिलीट केले नाही, ते बरे झाले. दुसरा सांगत होता, ‘आता खालील वेबसाईटवरचे हे पान पाहा. तुमच्या नावासमोर दोन फुल्या टाकल्यात. त्याचा अर्थ समजता ना?’ तिसरा सांगत होता, ‘गोव्यात येऊन धर्मविरोधी बोलताय. तुम्हाला काय भावाच्या मार्गाने जायचंय?’ मी लगेच ते दोन संदेश माझा मित्र सदानंद दाते याला फॉरवर्ड केले. त्याचा लगेच एस. एम. एस. आला- ‘डोन्ट वरी.’

गाडीत बसलो आणि लगेच सुरेश द्वादशीवारांचा फोन आला. ते भरभरून बोलत होते. ते म्हणत होते, ‘काल, आज असे दोन अग्रलेख मी नरेंद्रवर लिहिलेत. नक्की वाचा. दाभोळकर, मी पत्रकार म्हणून चाळीस वर्षे महाराष्ट्रात सर्वत्र हिंडलोय. या वेळी प्रथमच काही वेगळं घडलंय. आमच्या गडचिरोलीपासून सर्वत्र एक अस्वस्थ वेदना बरोबर घेऊन लोक आपोआप रस्त्यावर येताहेत. प्रत्येक गावात घरातील कोणीतरी गेला म्हणून हुंदके देत हिंडणारे तरुण, म्हातारे, स्त्रिया, पुरुष आहेत. हे खरेच आहे काय? मी मनात म्हटले, ‘परिवर्तनासाठी अस्वस्थ आणि आतूर असलेली परिवर्तन आणि विवेकवादी माणसे आपल्या भोवती प्रत्येक ठिकाणी भरभरून वाहताहेत आणि आपले दुर्दैव हे की, ‘शाहू, फुले, आंबेडकर’ आणि हो, लिमये, एस. एम. डांगे यांच्या या महाराष्ट्रात या महामानवांच्या उंचीचा राहू दे; त्यांच्या जवळपासही जाऊ शकेल, आम्हा सर्वांना एका सूत्रात गोवेल, असे नेतृत्व आमच्यासमोर कुठेच नाही.’