आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishali Patange Article About Preparing For Competitive Exams

परिश्रम: यशाचा राजमार्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम करिअरचा राजमार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा. गुणवत्ता व परिश्रमाची तयारी असेल तर ही परीक्षा नक्कीच मानाचे स्थान आणि जनसेवेची मोठी संधी मिळवून देते. आपल्या क्षमतांचा समाजासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. प्रश्न
सोडविण्याची क्षमता हीच हुशारीची जगातील सर्वात मोठी कसोटी असून एक उत्तम अधिकारी होण्यासाठीदेखील स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून याच पात्रतेची चाचपणी केली जाते.

ध्येयनिश्चिती
उत्तुंग यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे आपले ध्येय निश्चित असायला हवे. अनेक जण यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांचा एकत्रित अभ्यास करतात. एखादी तरी पोस्ट हाताशी असावी, यासाठी यूपीएससीची तयारी करत असताना एमपीएससीची परीक्षा देण्यात काही हरकत नाही. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर केले जात असल्याने योग्य नियोजन केले तर एकाच वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करता येणे शक्य आहे. मात्र ही परीक्षा देण्यामागे आणि अधिकारी होण्यामागील आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. केवळ पैसा, पद व प्रतिष्ठा यासाठीच आपण अधिकारी होणार असू, तर ते चुकीचे आहे; किंबहुना धोक्याचेच. परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याने प्रश्न सुटत नाहीत, तर खरे प्रश्न तिथून पुढे सुरू होतात. ते प्रश्न सोडविण्याची प्रज्ञा व पात्रता आपण आपल्यात विकसित केली पाहिजे. यूपीएससीच्या माध्यमातून आलेला अधिकारी हा परिवर्तनाचा पाईक आणि समाजातील शोषित, वंचित घटकांचा विचार करणारा असला पाहिजे. सर्व समाजघटकांना समान संधी प्रदान करणाऱ्या भारताचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे.
परीक्षेची तयारी
स्पर्धा परीक्षा ही केवळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची नव्हे तर गुणवत्तेचा कस लावणारी आहे. महाविद्यालयीन जीवनापासून योग्य अभ्यास केला तर बाह्य मार्गदर्शनाखेरीज स्पर्धा परीक्षांत यश मिळविणे अशक्य नाही.
सातारा जिल्ह्यातील कुंभारगाव हे माझे मूळ गाव. वडील नोकरीमुळे पुण्यात राहात असल्याने शालेय शिक्षण पालिकेच्या शाळेतून झाले. दहावीला मी बोर्डात आले असतानादेखील साहित्याची आवड असल्याने कला शाखेला प्रवेश घेतला. बारावीतही कला शाखेत राज्यातून प्रथम आले. दरम्यान कविता, लिखाणाची आवड लागली. पुढे काही दिवस मी आकाशवाणीवर निवेदिका म्हणूनही काम केले. वक्तृत्व, साहित्य, वादविवाद आदींचा मला या परीक्षेच्या तयारीसाठी बराच उपयोग झाला. पुढे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही विशेष प्रावीण्यासह केले. दरम्यान स्पर्धा परीक्षेची बऱ्यापैकी तयारी सुरू केली होती. पुढे लग्न झाले. लग्नानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. सासरच्या मंडळींचे मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा मिळाला. पती तुषार ठोंबरे यांचे व विविध शासकीय अधिकाऱ्यांचे‍ही मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे मला स्पर्धा परीक्षेसाठी शिकवण्या लावण्याची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर अधिक भर दिला. यूपीएससीच्या परीक्षेसाठी आवडीचे राज्यशास्त्र व मराठी साहित्य हे वैकल्पिक विषय निवडले. मराठी साहित्यासाठी मला मराठीचे जाणकार प्रवीण चव्हाण यांची मोठी मदत झाली. अभ्यासाचा, ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेतला. ओझे समजून अथवा तणावाखाली वावरून या परीक्षेची तयारी केली तर त्याचे‍ चांगले परिणाम दिसून येत नाहीत. २००६मध्ये एमपीएससीतून सातारा येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली. २००८मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवून भारतीय राजस्व सेवेत मी रुजू झाले. त्यानंतर २००९, २०११ व २०१३मध्येदेखील या परीक्षेत उत्तीर्ण झाले.आपल्यातील अधिकारी ओळखा
स्पर्धा परीक्षेत ग्रामीण-शहरी असा भेद मुळी होतच नाही. येथे पाहिली जाते ती गुणवत्ता आणि तुमच्यातील अधिकारीपदासाठीची पात्रता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी/विद्यार्थिनींनी कसलाही न्यूनगंड अथवा भीती बाळगण्याचे कारण नाही. आपली तीव्र इच्छा असेल तर लग्नानंतर करिअरला अडथळा येत नाही, हे विद्यार्थिनींनी कायम लक्षात ठेवावे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात यावे. कारण महिला अधिकारी प्रशासनाचा चेहरामोहरा बदलू शकते, हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळे आपल्यातील गुणवत्ता आणि परिश्रम आपण या माध्यमातून समाजासाठी उपयोगात आणू शकतो. ‍
नियोजन
नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. त्यामुळे तयारीदरम्यान नियोजनाला खूप महत्त्व आहे. काटेकोर नियोजनाचे तंत्र आपल्याला आले पाहिजे. मात्र सलग दहा ते पंधरा तास अभ्यास करावा, असा काही नियम नाही. आपल्याला जी पद्धत सोपी वाटत असेल ती आपण अवलंबू शकतो. गट चर्चा, स्वत:च्या नोट्स काढणे, माहितीपट पाहणे, बातम्या ऐकणे, ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तज्ज्ञांसोबत चर्चा करणे, महत्त्वपूर्ण व्याख्यान आदी माध्यमांतून अभ्यासात वेगळेपण आणून रटाळपणा बाजूला सारत चांगली तयारी करू शकतो.
अनेकांना प्रश्न पडतो की, काय वाचावे आणि काय नको. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक प्रकाशनांची असंख्य पुस्तके आणि मासिके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ती सर्व वाचण्याएवढा वेळ आपल्याकडे नसतो. शिवाय त्यातू्न एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती मिळेलच, याची शाश्वती नसते. यामुळे आपल्या वेळेचा अपव्यय होतो आणि तयारी पूर्ण झाली, असा आत्मविश्वासही येत नाही. त्यामुळे मूळ पुस्तकांचे वाचन करावे. एनसीईआरटीची पुस्तके, शासकीय प्रकाशनांची तसेच इतर खासगी प्रकाशनांची दर्जेदार पुस्तके व मासिके अधिक उपयुक्त ठरतात.
महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे, लेखांचे नियमित वाचन हवे. शिवाय मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला हवा. कारण दरवर्षी या परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल होत असतात. हे बदल आपल्याला प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासातून लक्षात येतात. यामुळे अभ्यासाची दिशा ठरवता येते.
इंग्रजीचा बाऊ नको
स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी ही अाडकाठी नाही. मराठी हा पर्याय या परीक्षेत असतो. भाषा कौशल्यपातळीवर शिकायची असते आणि ती सरावानंतर अवगत होते. लिखाण, वाचन, ऐकणे आणि बोलणे या प्रक्रियेतून ती समृद्ध करता येते.
मुलाखतीची तयारी
आतापर्यंत जे शिक्षण घेतले, जे ज्ञान मिळवले, त्याचा आपण कसा वापर करू शकतो, याची चाचणी म्हणजे मुलाखत. थोडक्यात आपण जे आहोत ते. त्यामुळे आपले आतापर्यंत जे शिक्षण झाले त्याची उजळणी, आपल्या सभोवतालीच्या प्रश्नांचे चिंतन आपण करायला हवे. बोलण्याचा सराव, मॉक इंटरव्ह्यूदेखील उपयोगी पडतात. मुलाखतीसाठी मला विविध आयएएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडले. त्यामुळे मुलाखतीला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास फायदा होतो.
आईवडिलांची सोबत
यशापयशाच्या प्रत्येक टप्प्यावर मला आई जयश्री व वडील शामराव पतंगे यांची खूप मोठी साथ मिळाली. मी परीक्षा देत असताना परीक्षा हॉलसमोर माझ्या बाळाला सांभाळण्यापासून किरकोळ गोष्टींची काळजी घेण्यापर्यंत त्यांची सोबत मला मिळाली. २०१०मध्ये मुलाखत आणि प्रसूतीची तारीख एकत्र आल्याने पॅनलला विनंती केली असता त्यांनी मुलाखतीचा दिनांक बदलून दिला. उमेदवारांप्रती पॅनलचे सहकार्य अधोरेखित करण्यासारखेच आहे.

(शब्दांकन : राजाराम देवकर, लोकराज्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई)
rajaramdeokar@gmail.com
vaishalispatange@ gmail.com