आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणानंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर! महात्मा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यातच मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा झालेला अपरिमित त्रास या द्वयीने सोसत खरे महिला सक्षमीकरण केले. असाच प्रयत्न पुण्यातील हवेली तालुक्यात ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकवासला शाळा नं. २ मुलींची’ येथे कार्यरत असलेल्या रेश्मा महंमद रफीक शेख मुलींना शिक्षणात अग्रेसर ठेवण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत आहेत.

रेश्मामॅडमचे वडील महम्मद रफीक शेख पुणे जिल्हा शिक्षण मंडळात सिनिअर कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख तर आई शिक्षिका. रेश्माच्या जन्मानंतर नोकरीनिमित्ताने होणारी धावपळ वाढली आणि घरी मुलींसाठी वेळ मिळेना म्हणून आईने नोकरीचा राजीनामा दिला. मात्र आईचे शिक्षकी पेशातले अपूर्ण राहिलेले काम रेश्माने पूर्ण केले. या कामी पती मुश्ताक सय्यद व दोन मुले त्यांच्या मदतीला धावून येत असतात.

खडकवासला धरणाजवळच निसर्गाच्या सन्निध्यात असलेली मॅडमची शाळा म्हणजे टागोरांचे शांतिवनच वाटते. धरणावर भेळ, कणसं विकणारे, शेतकरी, शेतमजूर, कामगार, काही वाहनचालक, पेंटरांच्या मुलीच या शाळेत आहेत. पाच हजाराच्या आसपास लोकसंख्या, सर्वच गरीब नाहीत. मॅडम इथे येण्यापूर्वी सकाळी मुलींची व दुपारी मुलांची शाळा भरत असे. त्या वेळच्या प्रभारी मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम सांगत, की मुलींची उपस्थिती कमी अाहे. अाता उपस्थिती वाढली आहे. १५२ पर्यंत पट असायचा, आता १७२ झाला असून उपस्थिती ९५% झाली आहे. मी या शाळेत आल्यापासून माझ्या वर्गाची १००% उपस्थिती असते, असं रेश्मामॅडम आनंदाने सांगतात. १७२ विद्यार्थिनी, पाच शिक्षक व एक मुख्याध्यापिका, असे शालेय कुटुंब आहे.

मॅडमनी शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदाच लेझीमचा संघ तयार केला. केंद्र स्तरापासून तालुका स्तरापर्यंत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. पालकांचे त्यासाठी मोठे सहकार्य मिळाले. त्यांनी लेझीम संघासाठी एकसारख्या २५ साड्या दिल्या, वाद्ये दिली, शिवाय मुलींचे कौतुक करण्यासाठी जेथे स्पर्धा असेल तेथे पालक येत.

मॅडम विद्यार्थिनींना वक्तृत्व स्पर्धेकरिता वेगवेगळ्या संस्थांच्या ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्या ठायी सभाधीटपणा वाढला. मंथन संस्थेकडून प्रज्ञा शोध परीक्षेचे नियोजन करून केंद्रातील १२० विद्यार्थ्यांना संधी मिळवून दिली. शाळेत पहिल्यांदाच बुलबुल पथक स्थापन केले. यंदाही पहिलीचे बुलबुल पथक स्थापन केले आहे.

पालकांचे उद‌्बोधन केल्याने त्यांनी पहिला संगणक शाळेस भेट दिला व प्रत्येक वर्गास भिंतीवरील घड्याळ भेट दिले. ‘प्रत्येक महिन्याला माझ्या वर्गाच्या पालकांची सभा घेते. त्यामध्ये पाल्याची प्रगती व सराव याविषयी त्यांना कल्पना देते.’ शाळेत आल्यानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा सुरू केल्याचं मॅडम म्हणाल्या.

आनंददायी शिक्षण
शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला. शिक्षकांनी आनंदी वातावरणात मुलांना ज्ञानदानाचे काम केल्यास निश्चितच मुलांच्या मनावर तो घटक चांगल्या प्रकारे बिंबवला जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत लहान मुलांना शाळेची, शिक्षणाची गोडी लागावी म्हणून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साधनांचा उपयोग केलेला असतो. हाच धागा पकडून मॅडमनी पहिलीच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केला. यात त्यांनी अत्यंत सुंदर वर्गसजावट केली. यात विविध फलक, तक्ते, तरंग पताका यासह विविध साधनांचा उपयोग करून सजावट केली. पहिलीची लहान लहान मुलं आजमितीस खूप आनंदाने शिक्षणप्रवाहाशी जोडली गेली व शाळा म्हणजे घरच, असा त्यांचा समज झाला आणि ही मुले या साधनांद्वारे मूलभूत संबोध अगदी हसतखेळत शिकत आहेत.

जीवन शिक्षण
शिक्षणाचं मानवी जीवनाशी असलेलं नातं, महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलांना स्वानुभूतीद्वारे शिक्षणाचा जीवन जगण्याशी असलेला सहसंबंध समजावा, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश. यासाठी मॅडमनी मुलांना भाजी मंडई दाखवणे, परिसरातील विविध दुकानांत पाठविणे, पोस्ट ऑफिस, सरकारी दवाखाना, पोलिस स्टेशनला भेट देणे यांसोबतच निसर्गानुभूती मिळावी यासाठी गवत, दवबिंदू, चिखल यांचा स्पर्शाद्वारे अनुभव देणे, यासारख्या बाबींचा समावेश केला.

भावनांची दखल
मानवी जीवनात भावनांना खूप महत्त्व आहे. हाच धागा पकडून मॅडमनी वर्गातील मुलांना आपापल्या मैत्रिणीस वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश पत्र देणे, कोण विद्यार्थिनी आजारी असेल तर मैत्रिणीच्या घरी जाऊन भेट घेणे व लवकर बरे होऊन शाळेत येण्याचे संदेश देणे सुरू केले. यामुळे मुलींत आपुलकीचे व प्रेमाचे नातेसंबंध प्रस्थापित झाले.

बिनदप्तराची शाळा
मुलांच्या दप्तराची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे. यावर उपाय म्हणून मॅडमनी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. यात सोमवार ते शुक्रवार वर्गातच दप्तर ठेवले जाते. फक्त गृहपाठाची एक वही दररोज घरी घेऊन जायची व दिलेला अभ्यास घरून करून आणायचा. यामुळे मुलांच्या मनावरील अभ्यासाचे दडपण दूर झाले.

टाकाऊपासून टिकाऊ
मॅडमनी या उपक्रमांतर्गत पाण्याच्या रिकाम्या बाटलीपासून फुलदाणी, कुंड्या, काड्यापेटीपासून घर, मेणबत्तीपासून टिकल्या तयार करणे, टूथपेस्टच्या रिकाम्या टोपणांपासून विविध रचना तयार करणे मुलांना शिकविले.

मॅडमना भरपूर लेखन करायचे आहे. म्हणजे मुलांसाठी पुस्तके लिहायची आहेत. त्या अनाथाश्रमास दरमहा भेट व मदत देतात. वर्गातील प्रत्येक मुलीस वाढदिवसाला पुस्तक भेट देतात, वर्गाच्या सर्व मुलींचे Email ID त्यांनी तयार केले आहेत. प्रत्येक राज्यातील शिक्षणप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी त्या दौरा काढतात. शाळेच्या ISO मानांकनासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
santoshmusle1515@gmail.com