मुलामुलींशी तिची मैत्री वाढत होती. मोकळेपणाने घरी येणे, पुस्तके वाचणे, प्रश्न विचारणे यातून नाते तयार होत होते. प्रत्येकाची खास वेगळी पद्धत असायची. अनिता तिला नेहमी म्हणायची, ‘मैडम, तुम्ही फक्त माझ्या मैडम नाही. मी तुमची मुलगी आहे.’ असे अनिता म्हणाली की तिला अवघडल्यासारखे व्हायचे. कोणत्याही प्रकारे मुलामुलींचे अवलंबित्व तिला धोकादायक वाटायचे. एवढ्या मुलामुलींची अशा प्रकारे जवळिकीने जबाबदारी घेणे शक्य नाही, याची तिला कल्पना होती. ती अनिताला म्हणायची, ‘तू मला आवडतेस; पण
आपले आईवडील आपले असतात. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. त्या वेळी युक्ती करून प्रश्न सोडवावा लागतो. त्याबद्दल आपण वेळोवेळी बोलतो. तुला बरे वाटते. हो ना?’ अनिताचे पुरते समाधान झाले नसतानाही तिने मान डोलवत पुस्तकवाचन चालू ठेवले.
एक दिवस अनिता घरी आली आणि म्हणाली, ‘मैडम, माझी दहावीची परीक्षा झाली आहे. आता मला तीन महिने सुटी आहे. मला टायपिंगचा कोर्स करून प्रमाणपत्र मिळवायचे आहे. मी चौकशी केली. क्लासची फी एकूण ३९० रु. आहे. आईवडिलांचा विरोध आहे. मी गावी जाऊन शेतीचे काम करावे, असे त्यांना वाटते. त्यामुळे मला फीचे पैसे देत नाहीत. मला कसेही करून हे पैसे तुम्ही द्या.’ अनिताचा निश्चय पाहून तिचे मन द्रवले. स्वतःला निर्णय घ्यायला वेळ मिळावा म्हणून ती म्हणाली, ‘मी विचार करून तुला उद्या नक्की सांगते. कधीपर्यंत फी भरायची आहे?’ अनिताचा चेहरा थोडासा पडला. तरी सावरून घेत ती म्हणाली, ‘अजून दोन दिवस आहेत.’
तिने विचार केला. गेली अनेक वर्षे ती मुलामुलींबरोबर काम करत आहे. पैशाची मदत करणे तिने निश्चयाने दूर ठेवले होते. या वेळी मात्र तिच्या मनापर्यंत थेट पोहोचण्याच्या अनिताच्या खास रीतीला यश आले होते. दुस-या दिवशी कामानिमित्त तिला बाहेरगावी जायचे होते. अनिता नक्की घरी येणार हे तिला माहीत होते. तिने अनितासाठी पत्र लिहून ठेवले. ‘प्रिय अनिता, नमस्ते. वस्तीतील कोणाही मुलामुलीला पैशाची मदत करायची नाही असे पहिल्यापासून मी ठरवले होते. आतापर्यंत तशी मागणीही कोणी केली नाही. मी करत असलेले काम आणि वस्तीतील मुलंमुली यामध्ये पैशांच्या व्यवहाराचे अंतर मला तयार करायचे नाही. तुझ्या फीसाठी मी एका सामाजिक संस्थेला विचारले. तुझी गरज सांगितली. त्याप्रमाणे तुला एक अर्ज करावा लागेल. मग त्यांच्याकडून आर्थिक मदत तुला मिळेल. त्यांची एक अट असते. तुला नोकरी लागल्यावर हे पैसे त्यांना परत करायचे असतात. तुला हे मान्य होईल असे वाटते. तुझी अडचण होऊ नये म्हणून त्यांच्याकडून पैसे मिळेपर्यंत मी तुला पैसे देत आहे. सोबत ३९० रु. ठेवले आहेत. अचानक मला बाहेरगावी जावे लागत आहे. म्हणून हे पत्र. वस्तीत सर्वांना या रविवारी मी येणार नाही, असे सांग. क्लासचा अभ्यास नीट कर. नमस्ते. तुझी मैडम...’ टायपिंगचा कोर्स पूर्ण झाल्यावर अनिता प्रमाणपत्र दाखवायला घरी आली. ‘मैडम, मी तुम्हाला त्रास दिला; पण मला खात्री होती तुम्ही मला नाराज नाही करणार. काही तरी पर्याय काढाल. आता त्या क्लासमधे मी रोज संध्याकाळी शिकवण्याचे काम करणार आहे. आपल्याला संस्थेला पैसे परत करता येतील.’ अनिताने स्वतःच मार्ग काढला होता. तिची जिद्द वाखाणण्याजोगी होती. तिला नेहमी प्रश्न पडायचा, ‘कुठून शिकतात हे सारे अनितासारख्या मुली? अनिताला हे कसे उमगते, जर ती धडपडली नाही, तिने नोकरी केली नाही तर तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न करून दिले जाईल.’ कोणत्याही परिस्थितीत तिला लवकर लग्न करायचे नव्हते. ‘मैडम, केवळ तुमच्यामुळे मी प्रमाणपत्र मिळवू शकले. त्यामुळे मी म्हणते, मी तुमची मुलगी आहे.’ अनिताच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांतून आर्जव ओसंडत होते.
घरी आलेल्या तरुण मुलामुलींची ओळख करून देत ती म्हणाली, ‘अनिता, हे ताई-दादा जवळच्या दुस-या वस्तीत राहतात. त्यांनी असंख्य अडचणी पार करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आता नोक-या करतात. या धडपडणा-या तरुण मुलामुलींचा ‘स्पर्श’ नावाचा गट आहे. त्यांच्यासारख्या वस्तीतील इतर मुलामुलींचे अभ्यासातील प्रावीण्य वाढवावे म्हणून खास वर्ग ते आपल्या नोक-या सांभाळत गटातर्फे जवळच्या शाळेत संध्याकाळी चालवतात.’ अनिताच्या डोळ्यात अपार आदर उमटला.
कधी कधी ही तरुण उत्साही मुलंमुली चर्चा करायला तिच्या घरी येत. त्यांनी चालवलेल्या खास वर्गात इंग्रजी शिकवायला तिला बोलावीत. आपण समाजाचे काही देणे लागतो ही त्यांची भावना तिला मोलाची वाटायची. तिच्याकडील पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जायची. भरपूर वाचन करायची. त्यांच्यापैकी काही जणांचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
त्या ताई-दादांकडे उत्सुकतेने पाहणारी अनिता, तिने दिलेल्यातला थोडासा खाऊ आपल्या धाकट्या भावंडांसाठी घेऊन आनंदाने घरी परत जाताना म्हणाली, ‘मैडम, यांच्या संध्याकाळच्या वर्गाला मी, माझ्या वस्तीतील इतर मुलंमुली जाऊ शकतो?’ ताई-दादा लगेच म्हणाले, ‘हो जरूर.’ अनितासारखी धडपडणारी मुलंमुली मोठी होऊन असे काही काम पुढाकाराने करू शकतील का, हा विचार अनिताच्या मोकळ्या, धीट स्वभावाचे कौतुक वाटणा-या तिचा मनात उमटला. "मी तुमची मुलगी आहे, असे तुम्हाला म्हणणारी हीच का?' असे ताई-दादांनी तिला विचारत हसत म्हटले, ‘ही आमच्या गटाची भविष्यातील सदस्य आहे मॅम!’