आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीचे बोहरा धोरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोहरा समाजाचे मुख्य गुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुर्‍हानुद्दीन (वय वर्षे 102) हे मुंबईतील त्यांच्या कार्यालयात असतात. त्यांचे सुपुत्र मुफ्फदल भाईसाहेब हेही आता 70 वर्षांचे आहेत आणि भविष्यात तेच पुढचे गुरू होण्याची शक्यता आहे. मुफ्फदल भाईसाहेब यांनी स्त्रीच्या प्रगतीत कोणते अडथळे येतात याचा तपास घेतला. मुख्य अडचण कुटुंबासाठी करावा लागणारा स्वयंपाक, त्याची पूर्वतयारी, मंडईतून भाज्या आणणे, दळण आणणे अशा अनेक कामांनी महिला गृहकृत्यात व्यग्र होतात. त्यामुळे त्यांना इतर कामांना वेळ देता येत नाही. स्त्रियांचा हा स्वयंपाक-पाणी व त्याच्या तयारीसाठी रोज द्यावा लागणारा वेळ वाचला, तर त्या आपल्या पतीला त्याच्या उद्योग- व्यवसायात मदत करू शकतील, मुलांचे शिक्षण व उत्तम संगोपन करण्यासाठी त्यांना वेळ देता येईल. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांचे भावी गुरू मुफ्फदल भाईसाहेब यांनी ‘हायटेक टिफीन’ची कल्पना मांडली व समाजानेही ती स्वीकारली आहे.
ही टिफीन कल्पना म्हणजे कोणत्याही महिलेने घरी स्वयंपाक करण्याची गरज नाही. कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना दुपारी टिफीन घरपोच मिळेल. त्यामुळे पुण्यात साधारण बोहरांची चार हजार कुटुंबे आहेत, तर मुंबईत अठरा ते वीस हजारच्या आसपास आहेत. या सर्वांच्या घरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी डबा जातो. अतिशय सर्वसाधारण, सवलतीच्या स्वरूपात या टिफीनचे मूल्य आकारले जाते. ते बर्‍याच वेळा ऐच्छिक असते, तरी या समाजातील बरेच लोक घरटी तीन हजार रुपयांच्या आसपास देणगी स्वरूपात पैसे देतात. ज्यांना हे शक्य नाही, त्यांच्याकडून कोणतीही आर्थिक अपेक्षा केली जात नाही. जे पैसे दिले जातात ते त्यांच्या डब्याचे नसतात, तर इतरांच्या टिफीनसाठी असतात. समाजात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, ही धर्मगुरूंची भावना यामुळे प्रत्यक्षात येते.
दुपारच्या जेवणाची जी कमिटी असते, त्या कमिटीला ऋटइ (ऋं्र९ं’ टं६ं्र िअ’ इ४१ंँंल्ल्रं) असे म्हणतात. आठवड्याभराचा टिफीनचा मेनू हा मुंबईतील कार्यालयात ठरतो. तो गुरुवारपर्यंत सगळ्या गावातच नव्हे, तर एकूण जगात जेथे जेथे बोहरी समाज आहे, तिथे पोहोचतो. हा मेनू सोमवार ते रविवार असा सात दिवसांसाठी ठरतो व तो प्रत्येकाला कळवला जातो. हे अन्न शास्त्रीय पद्धतीने बनवले जाते. ते आहातज्ज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने बनवले जाते. या टिफीनसाठी समाजातील प्रत्येक माणूस हा कार्यकर्ता बनतो. अनेक श्रेष्ठ व श्रीमंत उद्योगपतीही हे अन्न जिथे बनवले जाते, तिथे रोज सकाळी 7 ते 9 सेवा देण्यासाठी वेळ देतात. दहा-दहा कुटुंबांचे काही गट केलेले असतात. ते दर आठवड्याला बदलत असतात. चपात्यांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी कुटुंबातील काही व्यक्ती वेळ देतात. या गोष्टी सक्तीने केल्या जात नाहीत, तर सेवावृत्तीने केल्या जातात. टिफीनमध्ये आठवड्यातून तीन वेळा चिकन, मटण असते. एरवी गोड पदार्थही असतात. भात, आमटी, भाज्या, सूप असा परिपूर्ण आहार घरोघर पाठवला जातो.
नोकरी करणार्‍या वा आपल्या पतीला व्यवसायात मदत करणार्‍या स्त्रियांना यामुळे केवळ फुरसतच मिळते असे नाही, तर त्यांच्या रोजच्या जगण्यातील दगदग कमी होते. स्त्रियांचा वेळ वाचवणे, त्यांना आपल्या उद्योग-व्यवसायात सहभागी करून घेणे, समाजात प्रतिष्ठा देणे, ही बोहरी समाजाची भूमिका पाहता हा समाज यासंदर्भात खूप प्रागतिक आहे, असे म्हणावे लागेल. बोहरींच्या मुली अथवा स्त्रियांसाठी काही पोशाखही आजकाल वेगळ्या पद्धतीचे व रंगाचे डिझाइन्स केले जातात.
कोणत्याही समाजाचे स्त्रीधन म्हणजे सुवर्ण अलंकार. पुरुषांकडेही अलंकार असतात आणि काही वेळा गुंतवणूक म्हणूनही असे सुवर्ण अलंकार घरोघर असतात. बोहरी समाजात उद्योग-व्यवसायात अडचण आल्यास समाजाच्या पतपेढ्यांमध्ये सोने तारण ठेवले तर एकूण सोन्याच्या किमतीच्या 90% रक्कम त्या व्यक्तीला, स्त्रीला बिनव्याजी दिली जाते. यामुळे व्याजात जाणारा पैसा वाचतो, अन्यथा या व्याज-सावकारी पाशातून व्यवसायात बरकत येणे अवघड असते. बिनव्याजी कर्ज देण्याची प्रथा बोहरींमध्येच आहे. सोने तारण ठेवून मिळालेली रक्कम परत ठरलेल्या वेळी देण्याचे नैतिक बंधन सर्व समाजबांधव पाळतात. यामुळे स्त्रियांचे स्त्रीधन, अलंकार परत मिळतात. इतर समाजात आपण पाहतो की असे सोने तारण ठेवले तर परत मिळवणे अवघड झाले तर खरा अन्याय स्त्रियांवरच होतो, कारण बहुतांश दागिने स्त्रियांचे असतात. एकूणच बोहरी समाजाच्या प्रगतीत त्यांचे धार्मिक धोरण अंतर्भूत आहे, असे जाणवते.