आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रवालांच्या रूढी आणि परंपरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अग्रवाल समाज हा हिंदू समाजाचा एक भाग असल्यामुळे अग्रवालांमध्ये फारशा वेगळ्या चालीरीती, रूढी किंवा परंपरा नाहीत. महाराजाधिराज अग्रसेन राजा हा मूळ पुरुष मानला जातो. अग्रसेन राजाला महालक्ष्मीचे वरदान असल्यामुळे अग्रवाल श्रीमहालक्ष्मीचे उपासक आहेत. परंतु त्यांचे कुलाचार, कुलधर्म किंवा कुलदैवता ही फक्त महालक्ष्मी नाही. प्रत्येक घराण्यात प्राचीन काळी त्या कुटुंबातील सती गेलेल्या सतीमातेला ते आपले कुलदैवत मानतात. अशा सतीमातांची मंदिरे राजस्थानात जास्त प्रमाणात आहेत. इतर ठिकाणीही आहेत. राणी सतीमाता, जीनमाता, बालासुंदरी माता अशा सतींची मोठी मंदिरे व ट्रस्ट झुणझुणं व राजस्थानच्या काही गावांत आहेत. ज्या कुटुंबातील सती होत्या, त्या कुटुंबाचे ते दैवत ठरते. प्रतिवार्षिक कुलाचार, कुलधर्मासारखा विधी होत नसला तरी तेथे दर्शनाला जाणे व मुलग्याचे जावळ काढण्याचा विधी सती मंदिरात केला जातो. पुण्यातही कात्रजजवळ नारायणी धाम हे असेच सतीमंदिर आहे.
पोळ्याच्या दिवशी सतीची ‘जात’ भरली जाते. म्हणजे त्या दिवशी नारळ, दिवा अर्पण करून तिचे स्मरण केले जाते. आता हा समाज देशभर विखुरला आहे आणि त्या-त्या भागातील सण, परंपरा, उत्सव अग्रवाल आनंदाने करतात. उदा. काही कुटुंबात गणेशोत्सवही साजरा केला जातो, किंवा इतरही छोटे-मोठे उत्सव ते घरात व बाहेरही साजरे करतात. अग्नी, नाग, लक्ष्मी अशा अनेक देवतांचे पूजन अग्रसेनाच्या काळापासूनच होत आहे.
घरात मूल जन्मल्यावर छटी पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी त्यांच्या मूळ पूर्वजांच्या गावी, मुख्य म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे त्या कुटुंबातील सतीमातेच्या दारात मुलाचे केस काढून जावळ केले जाते. ‘परोजत’ हा सोळा संस्कारांचा एक भाग मानला जातो. त्यासाठी मुलाचे वय नक्की किती असावे, असा दंडक नाही; परंतु लग्नाच्या अगोदर हा विधी केला जातो.
विवाह समारंभात आजकाल खर्चाचे प्रमाण वाढले आहे. हौस आणि आर्थिक सुबत्ता हे त्यामागचे कारण असू शकते. आपल्यापेक्षा लग्नपद्धती फार वेगळी नाही. प्रथम ‘रोकना’ म्हणजे लग्न जमण्याची किंवा निश्चित झाल्याची गोष्ट. त्यानंतर लग्नात ‘सगई’ हा एक महत्त्वाचा विधी आहे. आपल्याकडील वाङ्निश्चयासारखाच हा कार्यक्रम असतो. ‘बारात’ हा लग्नविधीतील महत्त्वाचा विधी. यासाठी मुलीचे मामा वराकडील मंडळींना निमंत्रण द्यायला जातात. तेथे मिलनी-जीवनी कार्यक्रम होतो. चार रुपये मुलीच्या मामाने मुलाच्या मामाला व इतरांना द्यायचे, तसेच वराकडील लोकही वधूकडील मुख्य लोकांना चार रुपये देतात. एका अर्थाने हे दोन कुटुंबांचे मिलन असते आणि ते जेवण्यासाठीही निमंत्रण असते. लग्नातील मुख्य कार्यक्रम म्हणजे वरातीचे व वराकडील लोकांचे स्वागत झाल्यानंतर सुमुहूर्तावर ‘फेरे’ आणि कन्यादान हा कार्यक्रम होत असतो.
‘निकाशी’ या विधीत वराच्या हस्ते लिंबाच्या फांदीने तोरण मारणे कार्यक्रम होतो. घरावर पाच चिमण्या लटकवलेल्या असतात आणि तोरण असते. एखाद्या कुटुंबात व्यक्तीचे निधन होते, तेव्हा तिस-या दिवशी सावडण्याचा विधी असतो. त्या दिवशी संध्याकाळी ‘उठावणा’ केला जातो. समाजातील प्रमुख पंचमंडळी ज्याच्या घरात निधन झाले आहे, त्यांना बरोबर घेऊन दुकानात जातात. दुकान उघडून देतात व आता व्यवहार सुरू करण्यासाठी मानसिक पाठबळ देतात. हा विधी किंवा बाराव्या दिवशी होणारा ‘पगडी’ कार्यक्रम हे त्या समाजाचे सामाजिक दायित्व समजले जाते. कुटुंबातील वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या थोरल्या मुलाच्या डोक्यावर पगडी घालतात. आता घराण्याचा वारसा तू पुढे समर्थपणे चालव, अशी त्यामागची भावना आहे.
अग्रवाल समाजातील मुख्य उत्सव म्हणजे श्री महाराजाधिराज अग्रसेन जयंती, होळी आणि दीपावली. अग्रसेन जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक गावात अग्रसेन भवन आहेत. पुणे शहरात 12 ते 13 अग्रसेन भवन आहेत, तर महाराष्‍ट्रातील सर्व जिल्ह्यांत व ज्या गावात अग्रवालांची कुटुंबे आहेत, तिथे अग्रसेन भवन असतात. तेथे राजा अग्रसेन जयंतीच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा व व्यक्तींचा गौरव केला जातो. अग्रसेन भवनाऐवजी अनेक वेळा मोठ्या कार्यालयात किंवा नाट्यगृहातही असे समारंभ होतात. अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. समाजातील सभासदांचे गुणदर्शन, कलाप्रदर्शन याबरोबरच बाहेरचे मोठे कलावंतही बोलावले जातात. मुख्य म्हणजे प्रीतिभोजन व समाजाचे एकत्रित संमेलन हा उद्देश आहे. हाच उद्देश दीपावली साजरी करताना असतो. होळी व रंगपंचमी हा पारंपरिक व सर्वच समाजात साजरा होणारा सण अग्रवालांत एक महत्त्वाचा सण मानला जातो.
विभागवार रचना करून ‘अग्रसेन भवन’ ही केंद्रे त्या-त्या भागात असतात. पुणे जिल्ह्यात 44 विभाग आहेत. तसेच इतरही जिल्ह्यात आहेत. ‘अग्रसेन भवन’ आणि ‘अग्रवाल फेडरेशन’ यांच्या द्वारा अनेक ठिकाणी शाळा, हॉस्पिटल्स, दवाखाने, समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत; ज्याद्वारे त्यांचे समाजकार्य चालते. समाजाची वधू-वर सूची प्रसिद्ध करणे किंवा वधू-वर मेळावे भरवणे, हेही काम अग्रसेन भवनमधून चालते. त्यासाठी समाजातील योग्य व प्रतिष्ठित व्यक्तींची कार्यकारिणी बनवली जाते.
आज अग्रवाल समाज अनेक गावांत सुस्थिर झाला असला, तरी राजा अग्रसेनचा एक आदेश होता तो म्हणजे, कोणी अग्रवाल एखाद्या गावात नवीन आला, तर प्रत्येक अग्रवालने त्याला एक रुपया व एक वीट द्यायची; जेणेकरून त्याचे घर होईल. एका अर्थाने अग्रसेनचा हा साम्यवादी विचार होता. आज हा तंतोतंत पाळला जात नसला तरी अग्रवाल समाज नेहमीच आपल्या समाजबांधवांच्या अडचणीच्या काळात पाठीशी राहतो.