आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jakhde Article On Lakshmipujan In Agrawal Community

अग्रवालांचे महालक्ष्‍मीपुजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अग्रवैश्यवंशानुकीर्तनम’ नावाच्या ग्रंथात राजा अग्रसेन, त्याचे वंशज आणि देवता महालक्ष्मी यांच्याविषयीचे काही संदर्भ आहेत. वैश्य राजा अग्र याने मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा करण्यास प्रारंभ केला. महिनाभर त्याने हे व्रत केले. महिनाभराच्या व्रतानंतर संध्याकाळी महालक्ष्मी प्रकट झाली. जिचे तेज करोडो चंद्रांच्या तेजासारखे होते. ती प्रसन्न होऊन अग्र राजाला म्हणाली, ‘‘हे राजा, तुला कोणता वर हवा?’’ राजाने म्हटलं, ‘‘इंद्र राजा सतत मला वश राहील, अंकित राहील, हा वर पाहिजे.’’

देवी म्हणाली, ‘‘जोपर्यंत या जगात चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मी तुझ्या कुळाला-वंशांना सोडणार नाही. सर्व देवता, त्याप्रमाणे आपल्या वाहनांसहित इंद्रही तुला मदत करण्यासाठी राहतील.’’
देवी महालक्ष्मीने राजाला उपदेश केला की, महिरथ नावाच्या राजाची कन्या अतिशय सुंदर आहे. ती तुझ्यासाठी तपश्चर्या करत आहे. महिरथ हा नागराजाचा अवतार आहे. त्याच्या मुलीपासून जे पुत्र होतील, ते अतिशय तेजस्वी असतील. घराकडे परतताना कोलपूरच्या महिरथ राजाच्या मुलीबरोबर त्याचा विवाह झाला. राजा महिरथने राजाला असंख्य घोडे, हत्ती, रथ, दास-दासी, सुवर्णमुद्रा, रत्ने, उच्च दर्जाची वस्त्रे प्रदान केली. हे सगळे वैभव घेऊन राजा आपल्या गावी परत आला.
ही गोष्ट नारदाला समजल्याबरोबर तो अग्रसेनाकडे आला. अग्रसेनाने त्याचे उचित स्वागत केले आणि विनंती केली की आपण काही मागावे, जे शक्य असेल ते मी देईन. या संधीचा फायदा घेऊन, नारद म्हणाला, ‘तू इंद्राचा द्वेष का करतो आहेस? यातून तुला कोणता फायदा होणार आहे?’ राजाने नारदाचे म्हणणे मान्य केले. नारद अग्रच्या सभेत इंद्राला घेऊन आले. अग्रने प्रेमाने इंद्राचे आलिंगन देऊन स्वागत केले आणि इंद्राची पूजा केली.
पुढे राजा अग्रसेन आपली मुख्य राणी नागकन्या आणि इतर सतरा राण्यांना घेऊन यमुनाकाठी आला आणि त्याने उग्र तपश्चर्या सुरू केली. दोन तपांच्या कठोर तपश्चर्येनंतर एकेदिवशी संपूर्ण अरण्य प्रकाशमान झाले, देवी महालक्ष्मी अवतीर्ण झाली आणि तिने राजाला सांगितले, ‘‘हे राजा, हे कठोर तप आता बंद कर. गृहस्थी हो. गृहस्थाश्रम हा मोठा सुंदर धर्म आहे. या गृहस्थी धर्माला समजून घे. तू माझ्या आज्ञेचे पालन कर, तुला वैभव आणि वृद्धी प्राप्त होईल. या सगळ्या पृथ्वीवर तुझे वंशज राहतील आणि आजपासून हा वंश तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. अग्रवंशी प्रजा त्रिलोकात प्रसिद्ध होईल. जिथे हा अग्रवंश, तेथे माझी पूजा होत राहील. नंतर राजाने हरिद्वारच्या पश्चिमेला आणि गंगा-यमुना नद्यांच्या मधल्या भूप्रदेशात ‘अग्रोकनगर’ हे शहर वसवले. हे अतिशय पवित्र व शुभ शहर मानले जाते. येथे अग्रसेनाला संतती होऊन त्याचा वंश वाढला. या शहराच्या मध्यभागी महालक्ष्मी मंदिर बनवले गेले.
राजाने महायज्ञ करून विष्णूलाही प्रसन्न केले. एकदा यज्ञात बळी देताना घोड्याचे मांस अचानक बोलू लागले, म्हणाले, ‘‘हे राजा, मांस आणि मद्य यांचा वापर करून तू स्वर्गात जाऊ नकोस. या दोन गोष्टींमुळे जीवन कधीच पापमुक्त होत नाही.’’ या यज्ञामुळे राजाला अठरा पुत्र व कन्या झाल्या. त्या सर्व रूप, धन, संपत्ती समृद्धी घेऊनच आल्या होत्या. त्यांचे रूप पाहून प्रत्यक्ष देवताच पृथ्वीवर आल्याचा भास झाला. राजाला ज्या राण्या होत्या त्यांची नावे - मित्रा, चित्रा, शुभा, शीला, शिखा, शांता, रजा, चरा, शिरा, शची, सखी, रंभा, भवानी, सरसा, समा व माधवी ही होती. माधवीला मुख्य राणीचा मान होता. या सर्व राण्यांना या यज्ञाच्या प्रारंभी जे पुत्र झाले, त्या पुत्रांच्या नावांवरूनच गर्ग, गोयल, गावाल, वान्सिल, कासिल, सिंहल, मंगल, भंदल, तित्तल, एरण, धेरण, ढिंगल, तिंगल, गोभिल, मीतल, तायल, तुंदल, आधा ही गोत्रनामे तयार झाली. अग्रसेन राजाला 49 पुत्र व 18 कन्या झाल्या. त्याचा संसार आणि राज्य सुखा-समाधाने चालू होते. एकेदिवशी
राजा लक्ष्मीची पूजा करत असताना, लक्ष्मीदेवी त्याला म्हणाली, ‘‘हे राजा, आता स्वधर्माचे पालन करून आपल्या पुत्राला सिंहासनावर बसव.’’
लक्ष्मीमातेच्या आज्ञेनुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमेस त्याने आपला पुत्र विभू याचा राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवले आणि आपले कुटुंब, प्रजा यांची परवानगी घेऊन आपल्या पत्नीबरोबर त्याने वनाचा मार्ग स्वीकारला; तेथेही त्याने पुन्हा तपश्चर्या केली. एकेदिवशी महालक्ष्मीच्या आज्ञेने तो पत्नीसह सदेह स्वर्गात गेला.
पुढे अग्रसेनाच्या वंशजांनी राज्य चालवले. या वंशाला महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे ते सतत वैभवसंपन्न राहिले.
अग्रसेन राजा आणि महालक्ष्मी देवी यांचे संबंध या कथेतून व्यक्त होतात. अग्रसेन राजाला महालक्ष्मीदेवी म्हणाली होती की, ‘‘राजा, हे माझे व्रत केल्यामुळेच राजा हरिश्चंद्राला सुख-संपत्ती, वैभव प्राप्त झाले. हे विधिवत व्रत करूनच पांडव हस्तिनापूरला परतले. त्यामुळे तुला मी हे सर्वश्रेष्ठ व्रत मुद्दाम सांगितले आहे. ही गोष्ट येथे संक्षिप्त स्वरूपात दिली आहे. त्यावरून अग्रवालांचा मूळ पुरुष अग्रसेन याचे चरित्र समजते. यज्ञातील पशुबळींमुळे दु:खी झालेला अग्रसेन आपले कुटुंबीय, बंधू, पुत्र, कन्या यांना उपदेश करतो- ‘यापुढे पशुहिंसा करू नका.’ अग्रवाल समाजात हिंसा, मांसाहार, मद्यपान त्यामुळेच निषिद्ध आहे. अग्रसेन राजाची ही माहिती अग्रवालांचा इतिहास व जीवनपद्धती समजून घेण्यास उपयुक्त आहे.

arunjakhade@padmagandha.com