आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्माइली बोहरांचे योगदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाऊदी बोहरा हा समाज शियापंथी आहे आणि प्रेषित महंमदाची कन्या फातिमा व जावई अली यांच्यापासून आध्यात्मिक व धार्मिक परंपरा घेऊन पुढे चालत आला आहे. त्याचप्रमाणे इस्माइली समाजाची समांतर वाटचाल झाली आहे.
इस्माइलींची राजेशाहीची व धार्मिक आध्यात्मिक वाटचाल फातिमापासून चालत आली. या फातेमाई साम्राज्यात व्यापार, विज्ञान, कला या गोष्टींना प्रतिष्ठा देण्यात आली. ‘कैरो’ ही त्यांची राजधानी. नंतर ते इजिप्तमधून सिरियात आणि नंतर पर्शियात स्थलांतरित झाले. पर्शियामधील त्यांचे केंद्र तेराव्या शतकात मोगलांनी जिंकले. त्यानंतर हा समाज पर्शिया, मध्य आशिया, सिरिया आणि भारत व अन्य काही देशांत विखुरला गेला. शिया परंपरेनुसार ‘इमाम’ हे सर्वोच्च पद मानले जाते. इ. स. 1830 मध्ये हसन अली शाह या 46 व्या इमामांना पर्शियाच्या शाहाने ‘आगाखान’ हा किताब बहाल केला. 1843 मध्ये पर्शियातून पहिले ‘आगाखान’ भारतात आले. या काळात भारतातील विखुरलेला इस्माइली समाज आगाखान यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आला. पुढे ‘आगाखान’ची ही परंपरा भारतात चालत राहिली. इस्माइली समाजाने ‘आगाखान विकास उपक्रम’ सुरू केले. या उपक्रमांच्या माध्यमांतून आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण व अशा अनेक समाजोपयोगी कामाच्या संस्था सुरू केल्या.
तिसरे आगाखान सर सुलतान महंमद शाह यांनी राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर सेवा केंद्रे सुरू केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावताना 1930मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेस ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
आगाखान यांचे बंधू प्रिन्स अमीन हे हार्वर्डचे पदवीधर. त्यांनी ‘आगाखान फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ संस्था सुरू केली. आगाखान यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ‘आगाखान फौंडेशन’, ‘आगाखान विद्यापीठ’, ‘आगाखान फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ या संस्था स्थापन झाल्या. ‘आगाखान ट्रस्ट फॉर कल्चर’, ‘हेल्थ अँड एज्युकेशन’द्वारा विविध समाजोपयोगी कामे केली गेली. इ. स. 1850 मध्ये इस्माइलींचे 46वे इमाम शाह हसन अली शाह जे पहिले आगाखान होते, ते पुण्यात आले. 47वे इमाम म्हणजे दुसरे आगाखान व सुलतान महंमद शाह म्हणजे तिसरे आगाखान यांचे केंद्र व कार्यक्षेत्र पुणे व मुंबई झाले. पुण्यातील सुप्रसिद्ध आगाखान पॅलेस ही इमारत याच काळात म्हणजे 1887 या वर्षी बांधली गेली. इराणी कलाकुसर आणि इस्माइली पंथाची चित्रे, उंची गालिचे आणि प्रकाशमान झुंबरांनी हा पॅलेस एक आकर्षक व ऐतिहासिक वास्तू झाला. या पॅलेसमध्ये आगाखान कुटुंबीय व त्यांचे वंशज राहिले.
1942 मध्ये म. गांधी यांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनानंतर आगाखान पॅलेस प्रसिद्धीच्या झोतात आला. म. गांधी, कस्तुरबा आणि गांधीजींचे सचिव महादेवभाई आणि प्यारेलाल, गांधीजींच्या शिष्या मीराबेन यांना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते.
1942 मध्ये महादेवभाई यांचे व नंतर 22 फेब्रुवारी 1944ला कस्तुरबांचे निधन याच पॅलेसमध्ये झाले. याच वास्तूच्या परिसरात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजरत इमाम सुलतान महंमद शाह यांनी या दोघांची समाधी येथे बांधली. पुढे या वास्तूस केवळ इस्माइली समाजाच्याच दृष्टीने नव्हे तर संपूर्ण देशासाठीच पवित्र वास्तू म्हणून ओळखले जाऊ लागले. आगाखान यांनी हा पॅलेस 22 फेब्रुवारी 1969 म्हणजे कस्तुरबांच्या 25व्या पुण्यतिथीस राष्टÑाला अर्पण केला.
एकूणच इस्माइली समाज हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतीय संस्कृतीशी एकरूप झाला. पूर्वीचे इमाम व आगाखान यांनी घालून दिलेल्या परंपरा हा समाज आजही जतन करून आहे. या समाजातील पद्मसी परिवाराचे उद्योग क्षेत्रातील योगदान प्रसिद्ध आहे. तळेगाव (पुणे) येथील त्यांची ‘ईगल फ्लास्क’ कंपनी जगप्रसिद्ध आहे. मेसंग इंडस्ट्रीजचे फारूक मर्चंट यांना ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चा उत्तम उद्योजकतेचा पुरस्कारही मिळाला आहे. आगाखान परिवाराचे काही खानदानी छंद व त्यातून पुण्याच्या शाही क्रीडा संस्कृतीला एक वेगळे रूप मिळाले आहे, ते अश्वशर्यतींमुळे. घोड्यांचे पालन, संगोपन व अश्वशर्यती यांमुळे पुण्यात अनेक श्रीमंत व्यक्तींचा राबता सुरू झाला. अश्वशर्यतींसाठी ‘आगाखान कप’ आणि हॉकी स्पर्धेसाठी ‘आगाखान कप हॉकी स्पर्धा’ या पुण्यातील प्रतिष्ठित स्पर्धा आगाखान कुटुंबीयांमुळेच सुरू झाल्या. पुण्यातील आगाखान संघाने भारतीय हॉकीला अनेक नामवंत हॉकी खेळाडूही दिले.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील इस्माइली समाजाचे योगदान वगळून विशेषत: पुण्याचा इतिहास लिहिता येणार नाही. झरीनताज इराणी या भारतीय संसदेच्या हिंदी समितीच्या सदस्य होत्या. आजवर अनेक इस्माइली बंधूंनी रोटरी व लायन्स क्लबच्या प्रमुखपदी राहून विविध प्रकारचे सामाजिक कार्य केले आहे. त्यात अझिझ मदानी, आसिफ मर्चंट, बचुभाई मर्चंट, नुरुद्दीन मुलाणी अशी अनेक नावे आहेत. अश्रफ चिनॉय यांनी पुण्यात अनाथालय काढले आहे. अली सोमजी यांनी पुण्याचे महापौरपदही भूषवले आहे. इस्माइली समाजात अनेक डॉक्टर्स, वकील आहेत. ‘आगाखान एज्युकेशन बोर्ड’ तर्फे अनेक शैक्षणिक संस्था व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. इस्माइली समाज हा शांतताप्रिय आहे. महिलांना यथोचित स्थान देऊन उत्कर्ष करणारा हा समाज जेथे जेथे स्थायिक झाला, तेथील स्थानिक समाज आणि संस्कृतीशी एकरूप होताना मौलिक योगदान देत आला आहे.
arunjakhade@padmagandha.com
(पुढील आठवड्यापासून अग्रवाल समाजाच्या योगदानाची मालिका)