Home | Magazine | Rasik | arun-sadhu-article-on-pak-america

गैरसमज नसावा

अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकार | Update - Jun 02, 2011, 12:20 PM IST

लोकसंख्या आणि भू-राजकीय स्थान यामुळे मुस्लिम जगतातही एकमेव अण्वस्त्रधारी असलेल्या पाकिस्तानला मोठे महत्त्व आहे. डझनावारी दहशतवादी संघटनांना अण्वस्त्रधारी पाकिस्तानवर ताबा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्याचीच जगाला भीती आहे. त्यामुळे शिकारी कुत्र्याप्रमाणे त्याच्या गळ्यात पट्टा घालून तो घट्ट हाती धरून ठेवणे हेच अमेरिकेच्या सोयीचे आहे.

 • arun-sadhu-article-on-pak-america

  पाकिस्तानात खोलवर घुसून अमेरिकेने ओसामा बिन लादेनची हत्या केली. त्यामुळे सर्व जगात पाकिस्तानची फजिती आणि नाचक्की झाली, तसेच अमेरिका-पाकिस्तानचे संबंध तुटण्यापर्यंत ताणले. याबद्दल आपल्याला हर्षवायू होता कामा नये. उलट हा प्रकार फारच गांभीर्याने घ्यायला हवा. पाकिस्तान हा द्विधा मन:स्थितीत सापडलेला अशांत व अस्वस्थ देश आहे. तेथील एका शांतताप्रिय राजकीय गटाला सुरळीत लोकशाही हवी आहे, तर दुसऱ्या लष्करी व मूलतत्त्ववादी गटाला आक्रमक हुकूमशाही. हा दुसरा गट देशाला दुष्ट अशा गुंड प्रवृत्तीकडे नेऊ शकतो. आपला शेजारी असा अस्थिर, आक्रमक आणि बेभरवशाचा राहणे परवडणार नाही. शिवाय त्याच्या हाती अणुबॉंब!
  जगात अणुशस्त्रागार सर्वात वेगाने वाढवणारा देश पाकिस्तानच. जाहीर नाचक्की आणि अपमानाने चिडू उठलेला विधिनिषेधशून्य गुंड पाकिस्तान मानभंगाचे उट्टे बलाढ्य अमेरिकेवर काढणार नाही. 'शेजाऱ्यानी अशी आगळीक केली तर त्यांना महाभयंकर उत्पाताला (कॅटेस्ट्रोफी) तोंड द्यावे लागेल.' अशी जाहीर धमकीच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानचा हा गुंड गट आत्महत्या करू शकणाऱ्या जिहादी मानसिकतेचा आहे, हे विसरता कामा नये. आपल्या घराचा शेजारी कसा असावा असे आपल्याला वाटते? तो आपल्यापेक्षा वरचढ नसावा आणि फार खालीही नसावा. शांत, सुसंस्कृत व मनमिळाऊ असावा. आपल्या संसारात फार लुडबूड न करताही मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याने वागणारा असावा. तसा पाकिस्तान आपल्याला हवा. मानभंगाच्या अवस्थेत त्याच्या जखमेवर मीठ चोळणे किंवा वाकुल्या दाखवणे शहाणपणाचे नसून धोकादायक आहे. ओसामाच्या रहस्यावगुंठित नाट्यमय हत्येनंतरचे कवित्व कित्येक वर्षे चालू राहील, एवढा गुंतागुंतीचा हा प्रकार आहे. खोलात न जाता एवढेच अधोरेखित करता येईल, की पाकिस्तान कसाही वागला, आयएसआय आणि पाक लष्कराने अमेरिकेविरुद्ध कितीही कारस्थाने केली, तरी अमेरिका-पाकिस्तान संबंध पूर्णपणे तुटतील (आणि अमेरिका भारताच्या बाजूने त्याच्यावर दडपण आणेल) अशी गोड स्वपने भारताने पाहू नयेत. पाकिस्तान हा चीन आणि अमेरिका या दोघांच्याही गळ्यातील ताईत आहे. अमेरिकेने १९५२ पासून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची व आर्थिक मदत सातत्याने केली आहे. अधली-मधली काही वर्षे सोडली तर पाकिस्तानात लष्करी हुकूमशाही चालते. (लोकशाहीचा उदोउदो करीत असली तरी अमेरिकेला दुसऱ्या देशांमध्ये हुकूमशाही असणे सोयीचे वाटते.) पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी सगळया मवाली राष्ट्रांना अण्वस्त्र तंत्रज्ञान विकले ते सारे अमेरिकेला ठाऊक आहे. इ. स. २ पूर्वीपासून पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या इस्लामी दहशतवाद्यांनी भारतासह कित्येक देशांमध्ये भयंकर हत्याकांडे घडवून आणली. फार काय, ९/११च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून रसद होती हेही ज्ञात आहे. त्यानंतरच्याही लंडन, माद्रीद, दिल्ली, मुंबई येथील हत्याकांडांमध्ये पाक दहशतवादी आणि आयएसआयचा हात उघड झाला. आरोपी पाकिस्तानात खुशाल हिंडताहेत. ओसामा अमेरिकेचा शत्रू क्रमांक १. तो चक्क इस्लामाबादजवळ लष्करी कॅन्टॉनमेन्मध्ये पाच-सात वर्षे राहतो. घर रहस्यमय. तरीही पोलिसांना, हेरयंत्रणेला, शासनाला पत्ता नाही, असे कसे? ज्यांना क्षमा नाही, अशा कित्येक आगळिकी करूनही अमेरिका पाकिस्तानच्या डोक्यावरील वरदहस्त काढणार नाही, हे जग जाणते.


  त्याचे कारणही उघड आहे. १९७१ मध्ये अमेरिका-चीन यांचे हस्तांदोलन घडवण्यात पाकिस्तान मध्यस्थ होता. १९७८-७९ नंतर अफगाणिस्तानातील रशियन सैन्याला शह देण्यासाठी अमेरिकेने प्रत्यक्ष रणभूमीवर न उतरता पाकिस्तानी लष्करामार्फत तेथील आणि अफगाणातील इस्लामी मुजाहिदांना उठवले. पाकिस्तानमार्फतच अब्जावधी रुपयांची शस्त्रसामूग्री आणि पैसा पाठवला. जागतिक इस्लामी दहशतवादाचे पितृपद अशा प्रकारे अमेरिकेकडेच जाते. त्या काळातील असंख्य लष्करी व हेरगिरीची गुपिते आयएसआयला ठाऊक आहेत. अमेरिकेला व्हिएतनाममधून पराभव पत्करून अक्षरश: पळून यावे लागले. इराकमधून माघार कशी घ्यायची असा आता यक्षप्रश्र आहे. कोरियापासून जेथे म्हणून अमेरिकेने सैन्य पाठविले तिथे फजिती किंवा पराभव पत्करावा लागला. सध्या अफगाणिस्तानातील कारझाई यांचे बाहुले सरकार इस्लामी दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या छत्राखाली अमेरिका, ब्रिटन आणि काही युरोपियन देशांचे सैन्य अफगाणिस्तानात आहे.
  त्यात रसद-पुरवठा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इंधन पाठवण्याचा मार्ग फक्त पाकिस्तानातून जातो. त्या काफिल्यांवर पाकिस्तान-अफगाण सीमाभागात हल्ले होऊन अब्जावधी रुपयांच्या साधनसामग्रीची हानी होते. पाकिस्तानने मनात आणले तरच ही हानी थांबवता येते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही पाकिस्तानला हाताशी धरणे अमेरिकेला भाग आहे. पाकिस्तानला चुचकारून, मारून-झोडून, त्याला लाच देऊन शिकारी कुत्र्याप्रमाणे त्याच्या गळ्यात पट्टा घालून तो घट्ट हाती धरून ठेवणे हेच अमेरिकेला सोयीचे वाटते. मोकाट सोडले तर जागतिक इस्लामी दहशतवादी केव्हा डल्ला मारून अण्वस्त्रसाठा ताब्यात घेतील ते सांगता येत नाही. भारताची वाढणारी समृद्धी आणि बाजारपेठ एवढेच एक आकर्षण. पाकिस्तान गळपट्टा घालून जवळ बाळगता येतो, भारत नाही.

  हे सदर दर पंधरवड्याला प्रसिद्ध होईल

Trending