आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burate Article About Overcoming Limitations

ओढ असीम अवकाशाची, सीमोल्लंघनाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकटी कोजागिरी कॉलेजमधून बाहेर पडली, तेव्हा रस्ता ओस होता. अलीकडे दंगली, कधीही कर्फ्यू, बस-गाड्या बंद पडणे सतत व्हायचे. स्टेशनवर शुकशुकाट होता. दुस-या गाडीतून कोणी उतरतात का, याची वाट पाहत ती थांबली. येणा-या गाडीतून फक्त एक बाई उतरल्यावर कोजागिरीने त्यांना त्या कोठे जाणार आहेत, हे विचारले. त्या तिच्या घराजवळ राहणा-या होत्या. पुलावर मिलिटरी, बंदूकधारी सैनिक; पुलाखालील बेहरामपाडा चिडीचूप; न बोलता चालणा-या त्या दोघी. लहानपणी दाखविलेला धीटपणा, शाळेतील बार्इंबरोबर झालेले संभाषण चालताना तिची सोबत करीत होते :
‘कुंकू लावून ये. आपण भारतीय आहोत.’
‘ख्रिश्चन आणि मुस्लिम मुलीपण भारतीय आहेत. त्या कुठे कुंकू लावतात?’
‘तू हिंदू आहेस. बाकीचे तुला काय करायचे?’
धैर्य गोळा करून ती म्हणाली, ‘मी कुंकू लावणार नाही.’
कधीतरी ‘आपण कोण आहोत?’ असे विचारल्यावर आईने तिला उत्तर दिले होते, ‘मी आणि बाबा जन्माने हिंदू आहोत. आपण जात-धर्म मानत नाही. आपण भारतीय. खरं म्हणजे फक्त माणूस.’
समोरून बाबा येताना पाहून कोजागिरीला आश्चर्य आणि हायसे वाटले. ‘आई, तू मला अजून लहान समजतेस? मला शोधायला बाबाला पाठविलेस ना? स्टेशनजवळ राहणा-या तुझ्या मैत्रिणीचा आणि कॉलेजजवळ असणा-या बाबाच्या मित्राचा फोन होता माझ्याकडे. गाडी मिळाली नसती, तर मी ठरविल्याप्रमाणे त्यांच्याकडे गेले असते.’ कोजागिरी स्वत:च्या शूरपणाच्या रम्य आणि सुरस कथा सांगत अस्वस्थपणे म्हणाली, ‘एक तर हे लोक मशिदी पाडतात. दंगली करतात. किती दिवस आम्ही अभ्यास-कॉलेज सोडून घरी बसायचे? त्यात सर्वजण आईसारखे घाबरणारे असले, म्हणजे दंगली करणा-यांना आणखी जोर येईल. मीही अंदाज घेत घेत आले.’ कोजागिरीला सुखरूप पाहून आईचा जीव भांड्यात पडला होता. शांताला आठवले, रविवारी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याची बातमी थडकली. सोमवारी ऑफिसमधे गेल्यावर ती सहज म्हणाली होती, ‘हे बरे झाले नाही. मनातील माणुसकी नष्ट केल्याने फक्त द्वेष वाढणार.’ त्यानंतर सहका-यांनी तिच्याबरोबर बोलणेच टाकून दिले होते.
अलीकडे कोजागिरीला तिचे आईबाबा नेहमीसारखे वाटत नव्हते. ‘आज मी शांतता कमिटीच्या कामासाठी येते,’ एकदा ती बाबाला म्हणाली. छोटी छोटी मुस्लिम मुले शाळेत जायला भीत होती. त्यांच्या वाटेवर हातात हात धरून बाबा आणि त्याचे मित्र उभे होते आणि मुले शाळेला जात होती. कोजागिरीला वाटले, ‘कोणाची भीती वाटते आहे या मुलांना? भीती घालणारे कोण आहेत? तुम्ही असे करू नका, हे त्यांना सांगता येणार नाही का?’ पण आजकाल ती आईबाबाला कोणतेच प्रश्न विचारत नव्हती. बारावीच्या वार्षिक परीक्षेचा अभ्यास तिला करायचा असायचा.
‘26 जानेवारी 1993 प्रजासत्ताक दिन बेहरामपाड्यात करायचा आहे. बाबा आमटे येणार आहेत,’ आई सांगत होती. ‘बाबा आमटे’ या नावाने कोजागिरीचे कान टवकारले. ‘मी येणार. बाबा आमटेंना मला बघायचे आहे.’ कोजागिरीने त्यांना पाहिले. बंडी आणि अर्धी विजार, कमरेला आधारासाठी बेल्ट, नजरेत निश्चय आणि प्रेम, आवाज थेट पोहोचणारा. ‘भारत जोडायचा आहे. तरुण पिढीवर माझा विश्वास आहे. धर्म, जात, भाषा, देश, प्रदेश, वर्ग आणि वर्ण हे भेद मिटले तरच...’ कोजागिरीला सर्व गोष्टी कळल्या नाहीत. पण तिला खूप बरे वाटले.
कधी-कधी आईबाबा एकमेकांत तिच्या दृष्टीने ज्याला ‘हॉरर स्टोरी’ म्हणता येईल, अशा गोष्टी बोलायचे : ‘मी भाजी घेऊन येत असताना कॉलेजच्या प्रवेशद्वारात गर्दी दिसली. पाहिले तर रक्ताच्या थारोळ्यातील तरुण मुलगा पाणी मागत होता. कोणीतरी त्याला भोसकले होते. माझ्यासमोर त्याचा प्राण गेला. कोणीही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. तो मुस्लिम होता.’
परिसरातील सर्व दुकाने, हॉटेले बंद असायची. बोलणे टाकलेले असूनही बँकेच्या वॉचमनसाठी शांता जेवण नेत होती. परिसरातील मुस्लिम कुटुंबांची आवर्जून चौकशी करत होती. स्वत:ची अस्वस्थता कमी करण्याचा तोच एक मार्ग तिला सुचत असे.
कोजागिरीचा पेपर संपवून परतीची वेळ झाल्याने शांता वाट पाहत होती. तेवढ्यात फोन खणखणला, ‘मी फोर्टमधून बोलत आहे. इथे अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. मला कदाचित घरी येता येणार नाही. आमच्या घरचा फोन लागत नाही. घरी निरोप दे.’ फोन ठेवल्यावर शांताचे डोके सुन्न झाले. मैत्रिणीचा नवरा सांगत होता, बांद्रा पश्चिम पूर्ण बंद आहे. तिथेच कोजागिरीचे परीक्षेचे सेंटर होते. डिसेंबरपासून सुरू असणारे दंगली-जाळपोळ-लूटमार-खून यांचे सत्र जणू कमी होते की काय, असे म्हणून आता हे बॉम्बस्फोट झाले होते. तेवढ्यात रिक्षेचा आवाज झाला. ‘आई, हे काय चाललंय, गं? पेपरनंतर आम्ही बाहेर आलो.
कोणताच रिक्षावाला इकडे यायला तयार होईना. बसेस पण बंद. हे रिक्षावाले या भागात राहणारे होते. त्यांना आमची दया आली.’ कोजागिरीला डोळाभरून पाहिल्याने तिला क्षणभर काही सुचले नाही. अलीकडे आई अशी आपल्याकडे पाहतच का राहते, असे कोजागिरीला वाटायचे. शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध माणसांचे आकडे आणि प्रतिमा मनावर आघात करत होत्या. ‘आई, मला खूप राग येतोय. आमची परीक्षा का पुढे ढकलली? कोण करतेय हे सगळे? सरकारला, पोलिसांना कळत कसे नाही?’ रडवेली कोजागिरी शांताला विचारात होती. ‘चांगली कविता वाच. एखादे चित्र काढ. मन रमविण्याचा प्रयत्न कर,’ आतून कोसळलेली शांता शिवण करायला लागली.
कोजागिरीने माती कालविली. कार्ड पेपर, कटर, पट्टी, फेविकॉल असे साहित्य घेऊन काही वेळ त्याकडे ती नुसती पाहात राहिली. मातीतून माणसांचे हात, पाय, डोकी आणि कार्ड पेपरमधून उद्ध्वस्त इमारतींचे ढिगारे तयार झाले. ढिगा-यांच्या तळाशी अडकलेले पाय होते. ढिगा-याच्या सर्वात वरच्या टोकातून आकाशाच्या दिशेने पसरलेले दोन हात होते. ते कधी दया भाकत, कधी पंख पसरून झेप घेत आणि कधी आर्जवी प्रेमवर्षाव करत होते. शिल्प तयार करण्यात तन्मय झालेल्या कोजागिरीला आई-बाबा पाहत राहिले.
ते सारे कुटुंबच जणू म्हणत होते : धर्म, जात, भाषा, देश, प्रदेश, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे, स्त्री-पुरुष या भेदभावांच्या सीमारेषा आहेत. अमर्याद माणुसकीच्या प्रेमाचा प्रत्ययच भेदभावांच्या सीमारेषा पार करायला आपल्याला निर्भय बनवेल. सीमोल्लंघन प्रतीकात्मकतेच्या सीमा ओलांडेल, तेव्हा कोजागिरीची पिढी आकाशाच्या दिशेने पंख पसरेल!