आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Channelising Youth, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमच्या देवाचा अपमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज मुलामुलींचा मूड वेगळा होता. मोठी मुलं एकमेकांशी जोरजोरात बोलत होती. सुमीत तावातावाने म्हणाला, ‘बस आणि कारच्या खिडक्यांवर दगड फेकून काचा फोडल्या.’ मोठी मुलं एखादा पराक्रम गाजवल्याप्रमाणे बढाया मारत होती. आपण काहीतरी चुकीचे केले आहे, याची पुसट जाणीव त्यांना नव्हती. ‘आम्ही का चिडू नये? त्यांनी आमच्या देवाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे.’ रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपरमधील आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलांची माळ घातल्याने झालेल्या निदर्शनांच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 11 दलित ठार झाले होते. याचा संतप्त उद्रेक त्या वेळी मुंबईत ठिकठिकाणी झाला होता. दगडफेकीला याचा संदर्भ असणार हे तिने ओळखले. त्यांचा आविर्भाव पाहून ती म्हणाली, ‘आपण सर्वजण गोल करून खाली बसूया. म्हणजे आपल्याला नीट बोलता येईल.’ गोलात बसल्यावर ती पुढे म्हणाली, ‘आता नीट सांगा काय झाले ते.’

त्यांच्यापैकी एकाने बोलणे चालू ठेवत म्हटले, ‘आम्ही सर्वजण काल सकाळी चौकात गेलो. दगडफेक, टायर पंक्चर दोन्ही केले.’
‘तुमच्याबरोबर कोणी मोठी माणसं होती का?’
‘वस्तीतील बाया व माणसं होती.’
रागाचा भर ओसरल्यावर ती म्हणाली, ‘बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी किती कष्ट केले हे माहीत आहे का?’
‘हो. बाई, आम्हाला डॉ. आंबेडकरांच्या लहानपणाबद्दल खूप गोष्टी माहीत आहेत. त्यांच्यापासून आम्हाला खूप स्फूर्ती मिळते. आंबेडकर हे आडनावदेखील त्यांच्या शिक्षकांचे होते.’
‘लहान असताना त्यांनी कधी दगडफेक केली नाही. मोठेपणी नेता झाल्यावरही दगडफेकीला चांगले म्हटले नाही.’
‘बाई, आम्ही चिडलो होतो. आम्ही बंदमधे सामील व्हा अशी विनंती करत होतो. पण ते फर्रकन समोरून निघून जात.
‘अनेक गोष्टींची माहिती मिळवत सामाजिक प्रश्न तुम्ही समजून घ्यायला हवेत. मग चांगला नेता बनता येते.’ तिच्या बोलण्याचा काय परिणाम होतोय याचा अंदाज घेत म्हणाली, ‘दगडफेक बरोबर नाही. डॉ. आंबेडकर सांगतात ‘‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.’’
‘माझे वडील दारू पितात आणि मारामारी करतात. मी माझे शिक्षण कसे पूर्ण करणार?’ असे अत्यंत गरीब परिस्थितीतील संतोषने म्हटल्यावर या मुलामुलींची नेतेगिरी करणारा मोठा राहुल म्हणाला, ‘आमचे शिकलेले नेते आमच्या प्रश्नांकडे काही लक्ष देत नाहीत. महागाई, बेरोजगारी, गरिबी हे प्रश्न तसेच आहेत. खरंच आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं ते.’ जी दलित मुलं-मुली होती ती लक्ष देऊन ऐकत होती. संभाषणातील इतरांचा रस संपला. त्यांना नेहमीचा खेळ सुरू करायचा होता. हे तिच्या लक्षात आले. ‘तुमचे प्रश्न बिकट आहेत. पण दगडफेक करून ते सोपे होणार नाहीत. दगड उचलण्याआधी आपल्याला विचार हा करायलाच पाहिजे. तुम्ही घरी या. आपण सविस्तर बोलू,’ असे म्हणत त्यांचे समाधान करण्याचा तिने प्रयत्न केला. त्यानंतर ती नेहमीच्या कामाकडे, गटाकडे वळली. खेळ, गाणी, इंग्रजी बोलणे झाल्यावर मुलंमुली पुस्तके घेऊन बसली.

तिच्या मनात विचार सुरू होते. मुलामुलींना दगडफेकीसाठी मोठ्यांनी प्रोत्साहन दिले. मुंबईतील प्रत्येक वस्तीत राजकीय पक्ष, गुंड, गुन्हेगार, दादा यांचे झेंडे रोवून राज्य असते. परिस्थितीशी दोन हात करत वस्तीत राहणारी जनता ब-याचदा नाइलाजाने अशा राज्यकर्त्यांना शरण असते. कुटुंबातून, शिक्षणातून बाजूला पडलेल्या, कठीण परिस्थितीबद्दलचा राग ठासून भरलेल्या तारुण्याच्या उंबरठ्यावरील राहुलसारख्या मुलांना हे राज्यकर्ते आरक्षित फौजेत सामील करतात. कोणताही सामाजिक प्रश्न असो, राडा करण्यासाठी हॉकीस्टिक, ट्यूबलाइट आणि सोडावॉटर बाटल्या घेऊन या मुलांचा बारूद म्हणून उपयोग केला जातो. जेवढा तुमचा आर्थिक स्तर कनिष्ठ तेवढी तुमची बारूद परिणामकारक! चर्चेत सहभागी झालेली मोठी मुलं आजूबाजूला होती. तिने त्यांनाही बोलाविले. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार’ या पुस्तकातील काही भाग वाचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत म्हणाली, ‘तुम्ही या आणि आपण हे वाचूया.’ त्यांच्यापैकी एकाने पुस्तकातील खूण केलेला भाग वाचायला सुरुवात केली, ‘कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे. तुम्हा सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मीही करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल!’ ती त्यांचे चेहरे न्याहाळत होती. त्यांच्या चेह-यावर परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकल्याची भावना होती. राहुलसारख्या मुलांना बारूद होण्यापासून वाचवण्यासाठी घरी बोलवून त्यांच्याशी संवाद चालू ठेवणे हा मार्ग तिच्या हातात होता.
(क्रमश:)
aruna.burte@gmail.com