आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदशिदोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुला आठवतेय, आपल्या लहानपणी दर रविवारी बाई आपल्याला गोष्टी सांगायला यायच्या. मला असे कळले त्या पुन्हा थोडे दिवसांसाठी येथे आल्या आहेत. त्यांनी आपल्या सर्वांना भेटायला घरी बोलावलेय,’ तिचा निरोप दिनू इतरांना सांगत होता. आनंदाने मुलंमुली तिला भेटायला आली. ‘नमस्ते. तुम्ही सर्व किती मोठे झालात. आपण पूर्वी दर रविवारी भेटत होतो. तुम्हाला ती वर्षे आठवताना मजा येईल. आता त्या वर्षांतील तुम्हाला काय आठवते, त्यातील कोणत्या गोष्टी व्यवहारात आणता येतात, याबद्दल तुमचा अनुभव जाणून घ्यावा असे मला वाटते. लिहाल?’ त्यांच्याकडे प्रेमाने पाहत ती म्हणाली. त्यांनी केलेल्या नोंदी ती वाचत गेली.

दिनेश : शाळेचा मला कंटाळा यायचा; पण रविवारच्या शाळेची आम्ही वाट पाहत असू. आता मी मोठा झालो आहे. बाईंनी आम्हाला काय शिकविले त्याचे मोजमाप करता येत नाही.

जयेश : नि:स्वार्थपणे समाजासाठी काही तरी करायला पाहिजे हे आम्ही बाईंकडून शिकलो. माझी चित्रकला चांगली असल्याने बाई मला स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन द्यायच्या. बक्षीस मिळायचे नाही. म्हणायच्या, ‘नाही मिळाले तरी तुझी चित्रकला चांगली आहे. बक्षीस मिळेल.’ आज मी अॅनिमेशनमध्ये करिअर करत आहे.

सुहास : मला नवीन माहिती मिळाली. सामाजिक परिस्थितीबद्दल जाणीव झाली. त्यातून मी लेख लिहिले. कविता रचल्या. खरा फायदा इंग्रजी पुस्तके वाचल्याने झाला. कठीण शब्दांचे अर्थ पाहण्याची सवय लागली. त्यामुळे शब्दांचा योग्य वापर करता येऊ लागला. याचा फायदा एक इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी म्हणून होत आहे. रविवारचे ते दोन तास संपूर्ण आयुष्याबद्दल खूप काही शिकवून गेले.

गणेश : मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तके वाचायला मिळाली. कॉलेजमध्ये याचा फायदा होतो. आपण मराठी माध्यमाचे विद्यार्थी, त्यामुळे इंग्रजी आपल्याला कसे जमणार, असे कोणतेही दडपण मनावर येत नाही.

विनायक : चांगले विचार आणि पुस्तके यांची ओळख झाली. वैज्ञानिकांची पुस्तके वाचायची आवड निर्माण झाली.

विक्रम : शिक्षण-अभ्यास यांची गोडी नसणारी, मस्ती करणारी, इकडे तिकडे भटकणारी मुलं...अशा मुलांना बाई एकत्र करायच्या. ज्या रस्त्यावर आम्ही भटकायचो त्याच रस्त्यावरील एका झाडाच्या सावलीखाली गोष्टी ऐकवायच्या. एक प्रकारे ती आमची शाळाच होती. बाई आम्हाला गोष्टींतून वक्तशीरपणा, सहनशीलता तसेच इतरांचा आदर करणे आणि अशाच काही भरपूर गोष्टी शिकवायच्या. दर रविवारी आम्ही भेटायचो. सर्व मुले त्या गोष्टींमधून बोध घ्यायची. त्यानंतर काही इंग्रजी शब्दांची उजळणी व्हायची. चित्रकला व्हायची. त्यातून आमचे विचार, आमचं मन त्या चित्रात यायचं. आमच्या बाई, त्यांचे पती आणि त्यांचे सहयोगी आमची शिबिरं घ्यायचे. त्यामध्ये विज्ञान, गणित, कविता यांची माहिती मिळायची. एकदा आमच्या शिबिरामध्ये एक मोठे कवी अनंत भावे आले होते. त्यांनी आमच्यासाठी कविता म्हटल्या. काही शिकविल्या. आमची विचारशक्ती वाढवली. एकदा आम्ही सहलीने नेहरू तारांगण पाहायला गेलो होतो. तेथे विज्ञानाची भरपूर माहिती मिळविली. मी तर म्हणेन, आमच्या बाईंमुळे आम्ही शिकलो, घडलो आणि आज एका वस्तीतला गरीब घरातला मुलगा महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकतोय केवळ त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे. प्रत्येकाला अशा ‘आमच्या बाई’ मिळाव्यात.

वर्षा : कधी कधी बाई शिबिर घेत असत. गोष्टी सांगत. गाणी शिकवीत. कंटाळा आला की खेळ घेत. आता मी मोठी झाले आहे. मी लहानपणी हुशार नव्हते. मला रविवारच्या बाई प्रेमानं वाचायला, लिहायला शिकवायच्या.

नीता : नाडीचे ठोके मोजणे, श्वास घेणे-सोडणे, खेळ, गोष्टी, पुस्तके. लहानपण म्हणजे रविवारचे हे सर्व. आम्हाला कागदाच्या वस्तू म्हणजे मासा, फुलं, डबी अशा वस्तू बनवायला शिकवल्या. आता मोठे झाल्यावर कंटाळा आला तर मी त्या वस्तू बनवते.

उज्ज्वल : शाळेच्या बाई आणि रविवारच्या बाई यामध्ये एक फरक होता. रविवारच्या बाई आमच्याकडून काही चूक झाली तर न ओरडता ती समजावून सांगत असत. पुस्तके घरी वाचायला देत. त्याची नोंद आम्ही वहीत करत असू.

रजनी : मी रागीट होते. तुम्ही माझा राग शांत केलात. आता नोकरीत एकमेकांना समजून घेणे जमते. अजून मला चित्रं काढायला, गोष्टी वाचायला खूप आवडते. अजूनही तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल, असे वाटते.

अंजू : आई रागावली तर तुम्ही आईला प्रेमाने समजावून देत होतात. तुमच्या प्रेमाची आठवण येते. चित्रकला आणि वाचन याची आवड तयार केलीत.

आशा : तुम्ही मला सांगितलेत, ‘मुलगी असणे म्हणजे काही कमीपणा नव्हे.’ तुम्ही आईला सांगितले, मुलींना शिकविणे किती महत्त्वाचे आहे. केवळ तुमच्यामुळे, वडिलांनी विरोध केला तरी आईने माझी बाजू घेतली आणि मी शिकू शकले. आज मी नोकरी करते. तुम्ही सांगितलेल्या अनेक गोष्टी मी माझ्या भावंडांना आणि आजूबाजूच्या लहान मुलामुलींना सांगते. मी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविते. बरोबर-चूक यांची पारख करायला तुम्ही शिकविलेत. माझी गोष्ट अजून पूर्ण नाही. तुमची रोज आठवण करते.

सुनीता : आता मी वेगवेगळ्या संघांतून खेळते. माझी निवड महाराष्ट्राच्या संघातून झाली आहे. नववीत मुंबई उपनगर या संघात पहिल्यांदा महिला संघात खेळले.

आपल्याला येत असलेली गोष्ट इतरांना कशी शिकवावी हे मला तुमच्याकडून समजले. आता मी महात्मा गांधी स्पोर्ट््स अकादमीमध्ये शिबिर घेते. लहान मुलांना वेगवेगळे खेळ शिकविते. नुकत्याच झालेल्या शिबिरात मी लहान मुलींना मल्लखांब शिकविले.

तिला वाटले, ‘तिने मुलामुलींना खूप काही दिले, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. तो त्यांच्या मोठे होण्याचा, निरागसतेचा भाग आहे.’ तिला आठवत राहिले : त्यांनीही तिला कितीतरी दिले आहे. कचरा म्हणून टाकून दिलेल्या गोष्टीतून तयार केलेल्या खेळण्यांतून आनंद मिळविणे; आपल्या धाकट्या भावंडाला सांभाळत, वडिलांना व्यवसायात मदत करत, घरकाम करत अभ्यास-खेळ दोन्ही जमविणे; पोरक्या कुत्र्याच्या पिलाला गटाने जबाबदारी घेत प्रेम देणे; चित्रकला-गाणी-कविता-वाचन-हस्तकला यामध्ये प्रतिकूल परिस्थितीतही रमणे; अपमान-अपयश-मार-गरिबी याचे दुःख सहजपणे झेलणे आणि यासारखे कितीतरी मुलामुलींच्या जगण्याचा भाग होते. जगण्यातील चिवटपणा, उत्साह, आपुलकी अशा ओलाव्याचा मुलेमुली जणू जिवंत झरा होती. हे सारे आणि त्यांचे निर्व्याज प्रेम त्यांनी तिला भरभरून दिले होते.

तिने दिलेल्या खाऊचा मुलामुलींनी चट्टामट्टा केला. चिवचिवाट करणार्‍या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे मुलंमुली आयुष्याच्या वाटेवर मार्गस्थ झाली. तिच्याबरोबर जोडल्या गेल्याच्या, तिला प्रगल्भ केल्याच्या कितीतरी खुणा त्यांनी मागे ठेवल्या.

शिकण्या-शिकविण्यातील आनंदशिदोरी त्यांनी एकमेकांच्या हाती आयुष्यभरासाठी ठेवली होती!
(या शिकण्या-शिकविण्यातील आनंदशिदोरीत सहभागी होत दिलेल्या सहकार्याबद्दल मधुरिमाच्या संपादक मृण्मयी रानडे आणि आपण सर्व वाचक या सर्वांची मी मनापासून आभारी आहे.)

अरुणा बुरटे, सोलापूर
aruna.burte@gmail.com