आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Educating Street Children

युक्ती करूया !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलामुलींबरोबर कोणत्या विषयांवर गप्पा मारायच्या याचे विचार तिच्या डोक्यात चालू असायचे. त्याप्रमाणे काही चित्रं, कविता, मासिकं ती पिशवीत सोबत घेत असे. खेळ आणि वाचन झाल्यावर ‘उंदराला मिळाली पेन्सिल’ ही गोष्ट तिने एकदा सांगितली.
‘उंदीर पेन्सिलीला चावत असतो. सुटका करून घेण्यासाठी पेन्सिल उंदराला फसवत, गोड बोलत, अत्यंत धूर्तपणे मांजराचे चित्र काढण्याची युक्ती करते. चित्र पूर्ण होताच उंदीर घाबरून पळून जातो! पेन्सिलीची सुटका होते.’ गोष्ट झाल्यावर तिने ते पुस्तक सगळ्यांना हाताळायला दिले. ती म्हणाली, ‘कोणतेही संकट आले, अडचण आली, न आवडणारी गोष्ट घडली, कोणी रागावले, वाईट वाटले की पेन्सिलीसारखी युक्ती करून स्वत:ची सुटका करून घ्यायची. हो ना? जमेल?’ असे सांगितल्यावर त्यांचे चेहरे खुलले. डोळे चमकले. त्यांचे विचारचक्र सुरू झाले. ती म्हणाली, ‘पुढच्या वेळी भेटेपर्यंत कोणी कोणी कशी युक्ती केली याबद्दल गोष्ट सांगायची.’
तीदेखील या गोष्टीवर विचार करत राहिली. अडचणी आल्यावर तीसुद्धा अनेक प्रकारे युक्ती करत होती. मध्यमवर्गीय विचारसरणीची तिची रेघ ओलांडत तिने वस्तीतील मुलामुलींच्या मळ्यात उडी मारली होती. तेथील वाटा, खाचखळगे, दोस्तीचे अवकाश आणि इतर बरेच काहीबाही या सर्वांचा ती बारकाईने धांडोळा घेत होती.
वयाने लहान मुलंमुली तिच्या जवळजवळ मांडीवर येऊन बसण्याचा प्रयत्न करायची. किंवा खूप खेटून बसायची. गळणारी नाकं, डोक्यात उवा-लिखा, अस्वच्छ हातापायांची बोटं-नखं, लांब शर्ट असल्याने चड्डी नसणे, खरुज आणि अशा इतर गोष्टींसह आलेल्या त्या लहानग्यांकडे पाहिल्यावर तिचा जीव कासावीस व्हायचा. त्यावर तिने एक युक्ती केली. कळसूत्री बाहुल्या दोन्ही पंज्यांवर चढवत ती एकेदिवशी म्हणाली, ‘हिचे नाव आहे सुखी आणि हिचे आहे दुखी. सांगा पाहू सुखी कशी दिसते?’ असे विचारताच त्यांचा एकत्रित आवाज आला, ‘सुखीने केस विंचरून वेणी घातली आहे. बटणे नीट लावली आहेत. ती हसत आहे.’ ‘आणि दुखी?’ असे म्हटल्यावर, ‘तिचे केस स्वच्छ नाहीत. विंचरलेले नाहीत. दुखी रडकी दिसते.’ गोष्ट पुढे चालू राहिली : सुखी म्हणाली दुखीला, ‘हे बघ स्वच्छ राहिल्यावर आपल्याला छान वाटते. आपण हसरे होतो.’ कळसूत्री बाहुल्याच्या हालचालींकडे पाहणारे डोळे काही तरी समजल्यासारखे चमकले. बाहुल्यांचा संवाद ऐकून चेहरे वेगळेच काही वाचू लागले. त्यानंतर अनेक वेळा सुखी-दुखीची गोष्ट ऐकायला त्यांना आवडायला लागले. ‘बघा, मी सुखीसारखी आहे ना?’ असे विचारत जणू लहानगी तिच्याजवळ येण्याची परवानगी मागत. तिला जाणवायचे, त्यांना सुखीसारखे व्हायचे आहे; पण कसे, हे त्यांना कळत नाही. त्यांना हवे तसे तिने त्यांच्यात मिसळणे हा सहज मैत्रीचा भाग होता. त्यामुळे घरी गेल्यावर ती अंघोळ करायची. मुलामुलींवर तिचे प्रेम कमी दर्जाचे होते का, असा प्रश्न तिला सतावायचा; पण त्याचे उत्तर ती स्वत:साठी मनातल्या मनात देत असे, मला जर काही संसर्ग झाला, तर माझे काम थांबेल. घरच्या इतर सर्वांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे अंघोळ करून टाकल्याने आपल्या डोक्यातला संशय तरी राहणार नाही. त्या वेळी तिला आठवायचे मुलांना अंघोळी घालणारे गिजुभाई, अनुताई आणि ताराताई यांच्यासारखे थोर शिक्षणतज्ज्ञ. तिचे विचारचक्र थांबायचे नाही.
कोणतेही सण किंवा विशेष दिवस असले की मुलामुलींना हॅपी होळी, संक्रांत, न्यू इयर... असे म्हणत हस्तांदोलन करायचे असायचे. आपल्याकडे अशा दिवसांची भरपूर रेलचेल. 20-30 जणांना अशा शुभेच्छा देणे तिला बरोबर वाटेना. त्यासाठी रविवारचे एकत्र जमल्यावर सुरुवातीला रेघेवर उभे राहून एकमेकांना हात जोडून नमस्ते म्हणण्याची प्रथा तिने सुरू केली. मुलेमुली कोठेही भेटली तरी हीच पद्धत पाळायची सवय तिने सर्वांना लावली. काही महिन्यांत ही गोष्ट मुलामुलींच्या अंगवळणी पडली.
वस्तीच्या आतल्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत माणसं, रेडिओ, नळ, स्टोव्ह, टीव्ही आणि लहान मुलांचे रडणे असे अनेक आवाज धडकायचे. बालवाडीत रविवारी व्यायामशाळा चालायची. तेथे मोठ्या मुलांची फौज शरीर कमावण्याच्या मागे असायची. त्यांच्याबरोबर वेळ ठरवून बालवाडीत पर्याय शोधणे शक्य होते; पण बालवाडीची जागा छोट्या घरगुती कार्यक्रमांसाठीही वापरली जायची. त्याचे सामान रचलेले असायचे. शिवाय खेटून दाटीवाटीने घरे असल्याने आवाजाचा प्रश्न होता. त्यामुळे तिला तेथे मोकळेपणा आणि प्रसन्नता वाटली नाही. बराच विचार करून वस्तीबाहेर फारशी रहदारी नसलेल्या रस्त्यालगत एक पिंपळाचे झाड तिने हेरले. त्या झाडाखालची जागा तिला आवडली. वर निळे आकाश आणि झाडाची हिरवी छत्री. आणखीन काय हवे? जागा साफसूफ करून, चटई घालून तिथेच मुलंमुली तिच्यासह डेरेदाखल होत मुक्त संवादात रमायला लागली. अडचणी पार करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत एकमेकांना आनंद देत राहिली.

(क्रमश:)
aruna.burte@gmail.com