आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिक, मेहनती आणि सर्जनशील...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोजागिरीचे सर म्हणाले, ‘आतापर्यंत तुला समविचारी संस्थांतील कामाचा अनुभव आहे. यापुढे तुला या वर्तुळाच्या बाहेर असणा-या बाजारपेठीय आस्थापनांमधे काम करायचे आहे. तिथली गणिते निराळी असतात. तू आदर्शवादी, मेहनती आणि सर्जनशील आहेस. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर आहेत. मिळालेल्या संधीचे तू नक्कीच चीज करशील.’ पाच वर्षे शिक्षण आणि त्यानंतर एक वर्ष तेथेच शिकविण्याचे काम, अशी गेली सहा वर्षे कोजागिरीचे दुसरे घरच झालेल्या ‘कला शिक्षण संस्थे’तला आज तिचा शेवटचा दिवस होता. कोजागिरी भावुक झाली होती. सरांना त्याची जाणीव होती. संस्थेच्या प्रवेशद्वारातील पारावर ती बसली. एकवार संस्थेच्या आवारावर नजर फिरविली.
तेथील सहा वर्षांचे संचित मनाच्या गाभ्यात हळुवारपणे तिने ठेवले. फॅकल्टी, सहाध्यायी, संस्था यांच्याबद्दल प्रेम, आदर, हुरहुर, ओढ, भविष्याबद्दलची अनिश्चितता हे सर्व कोजागिरीने बरोबर घेतले. प्रत्ययकारी क्षण होता तो!
बाजारपेठ, नोकरीसाठीचे तेथील पर्याय यांचा थोडाफार विचार कोजागिरीने केला होता. काही प्रमाणात तरी अभिव्यक्ती माध्यमांचा पर्यायी विचार करणा-या आस्थापना तिने शोधल्या. पगाराच्या रकमेपेक्षा चांगले काम करावयास मिळणे याला तिने महत्त्व दिले. तिचे काम चांगले असल्याने इच्छित ठिकाणी निवड सहज झाली.
नोकरीचा आज तिचा पहिला दिवस होता. ऑफिसची सजावट, त्यातील कलात्मक तपशील मुलाखतीच्या वेळी कोजागिरीने टिपला होता. सुरुवातीचे काही महिने कामाचे तपशील तिने अभ्यासले. तिची मैत्रीण अनघाला नोकरीबद्दल लिहिले, ‘नोकरी म्हटले की सगळेच मनासारखे कसे होईल. आमच्या ऑफिसमधे बहुराष्ट्रीय कंपनी आणि स्वयंसेवी संस्था या दोन्हीसाठी कामे करतात. मला स्वयंसेवी संस्थांचा अनुभव होता. त्यामुळे त्या प्रकारचे काम मला दिले. त्यास नम्रपणे मी नकार दिला. मला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामाचा अनुभव हवा होता. ही गोष्ट सहज मान्य झाली नाही. पण मी सुरुवातीलाच ठामपणा दाखवला. त्याचा उपयोग झाला.’ ऑफिसमधे बरोबरीच्या सहका-यांमधे कोजागिरीची पदवी वरच्या दर्जाची होती. शिवाय कौशल्य, कल्पकता, कष्ट यांमधेही ती सरस होती. याचा अंदाज कोजागिरीला पहिल्या काही दिवसांत आला. ती वरिष्ठांना म्हणाली, ‘माझ्या क्षमतांना योग्य असे अव्वल दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीचे काम मला दिले तर मला आनंद होईल. मी याची हमी देते की काम दर्जेदार होईल.’ वरिष्ठांना कोजागिरीच्या आत्मविश्वासाचे कौतुक वाटले. तेथे काम करणा-या ज्युनियर सहका-यांचे काम तपासण्याचीही जबाबदारी तिला दिली. हे कोजागिरीला अपेक्षित नव्हते. काही दिवसात तिच्या लक्षात आले की तिचा सर्व वेळ त्यांनी केलेले काम दुरुस्त करण्यात जात आहे. तिने स्वत: पुढाकाराने घेतलेल्या जबाबदारीला न्याय देणे तर सोडा, योग्य वेळही तिला देता येत नव्हता. कोजागिरीच्या सहनशक्तीची परीक्षा होती. स्टाफ मीटिंगमधे कोजागिरी म्हणाली, ‘इतरांनी केलेले काम तपासणे ही गोष्ट काही योग्य नाही. प्रत्येकाने आपल्या कामाची जबाबदारी घ्यावी. माझी अशी विनंती आहे की मला माझे मुख्य काम करायला पूर्णपणे मोकळीक द्यावी.’ यानंतर कोजागिरीने पूर्णपणे स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित केले.
‘कॅलेंडरच्या डिझाइनची तपासणी नीट न झाल्याने ऑगस्ट महिना 30 तारखेलाच संपविला. 31 तारीख छापली गेली नाही. आता पूर्ण बॅच रद्द करावी लागणार. मला वाटते तुला येते काही महिने पगार घेता येणार नाही.’ वरिष्ठ कोजागिरीला म्हणाले. ती
जरा गडबडली. पण शांतपणे म्हणाली, ‘मी माझ्या नोंदी पाहते. नंतर तुमच्याशी बोलेन.’ पण तिला आतून खूप वाईट वाटले. अशी चूक तिच्या हातून होणे अपेक्षित नव्हते.
नोंदी तपासल्यावर कोजागिरीच्या लक्षात आले, ज्युनियरनी हे काम स्टाफ मीटिंगनंतर केले होते. त्यावर ठरल्याप्रमाणे नजर फिरविण्याची जबाबदारी तिची नव्हती. ती दुस-यांना दिली होती. ही गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात आणून देत कोजागिरी म्हणाली, ‘तरी तुम्हाला वाटत असेल की हे नुकसान मी भरावे तर मी तयार आहे. पण ही माझी चूक नाही आणि माझी जबाबदारीही नाही. नोंदी आपण तपासाव्यात.’ वरिष्ठ विचारात पडले. ती म्हणाली, ‘चूक कोणाचीही असली तरी झालेले आर्थिक नुकसान सर्वांनी मिळून भरून काढू या.’ ऑफिसमधे कोजागिरीचे सौहार्दाचे संबंध सहज राहिले.
अव्वल दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी केलेले कोजागिरीचे काम कल्पकतेसाठी खूप नावाजले गेले. ते तसे होणार याची रास्त जाणीव तिला होती. व्यवस्थापनाने दिलेल्या प्रशस्तिपत्रातील, ‘अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि सर्जनशील....’ हे वरिष्ठांनी लिहिलेले शब्द तिच्यासाठी मोलाचे होते.