आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीचा ताणाबाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘समिता माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. ती खूप चांगल्या कादंब-या वाचते. त्यावर आम्ही बोलतो.’ कोजागिरीने पत्रात लिहिले होते, ‘माझ्या रूम पार्टनरचा आणि माझा डिव्होर्स झाला आहे. मुलांच्या प्रेमात पडणे आणि इतरांची कोणती प्रकरणे चालू आहेत, यावर गप्पा मारणे हाच तिचा आवडता छंद आहे. माझे-तिचे अजिबात पटेना.’ वाचताना कोजागिरीची मैत्रीण अनघाला हसू येत होते. ‘माझी मैत्रीण शामली वरचेवर विमानाने मुंबईला येत असते. तिच्याबरोबर माझी ती दोन पुस्तके पाठवून दे,’ कोजागिरी फोनवर सांगत होती. ‘शामली माझी फास्ट फ्रेंड आहे. तिला तिच्या आईने कसे नीट वागवले नाही याबद्दल ती मला नेहमी सांगते.’
साधारण गेल्या वर्षभरात कोजागिरीच्या जवळच्या म्हणून असणा-या मैत्रिणींची नावे गळून नवीन लिहिली जात होती. याचे गौडबंगाल न कळल्याने अनघाने म्हटले, ‘सर्वात आधी समिता, मग हिमाली, पूजा, मंगला, उर्वशी... अशी रांग दिसते. जवळच्या मैत्रिणींचा ग्रुप मोठा झाला तर हरकत नाही; पण हे आधी चांगल्या वाटलेल्या मैत्रिणी एकदम बाद कशा ठरतात, हे मला कळत नाही.’
‘खरं सांगू का, मी इकडे खूप एकटी पडते, असे मला वाटायचे. माझ्या विचारांशी जुळणा-या फारच कमी. मुख्य म्हणजे त्या जशा आहेत म्हणून दाखवतात, तशा त्या नसतात, हे मला कळले की मी मैत्री ठेवूच शकत नाही. खूप स्पर्धा, फसवणे आणि खोटे बोलणे असे करतात. त्याचे कारण कळत नाही. मी एकेकीचा किस्सा सांगते. बघ तुला काही कळते का,’ कोजागिरी मोकळी होत होती. ‘समिताने माझा चक्क वापर करून घेतला. ती स्वत: काम करत नसे. आयत्या वेळी माझ्याकडून अपेक्षा करत राहिली. शामली सतत रडण्यासाठी माझा खांदा गृहीत धरायला लागली. एवढे की कोणत्याही वेळी ती मला डिस्टर्ब करू लागली. पूजा तर जो कोर्स चालू असेल, त्याप्रमाणे वेगवेगळ्या मुलांबरोबर फ्लर्ट करते. करिअर करण्याचा तो जणू भाग असल्यासारखे. मंगलाने कळस केला. तिने सांगितले होते की, तिच्या आईवडिलांचा घटस्फोट होतोय. तिच्या मनाविरुद्ध तिला आईबरोबर अमेरिकेत जावे लागणार आहे. ती मला खूप मिस करेल. तिचा शाळेपासूनचा खास मित्र दुबईला असतो... असे भरपूर काही. ती कोर्स सोडून पुण्यातच राहतेय आणि खोटे बोलण्यात तरबेज आहे, हे इतरांच्याकडून मला नंतर कळले.’
‘माझ्या ब-याच मित्रमैत्रिणींचे आईबाबा खूप श्रीमंत आहेत. पालकांनी संस्थेतील अतिथीगृहात राहणे त्यांना आवडत नाही. त्यांची मुलांबरोबरची मैत्री पालकांना माहीत होण्याची त्यांना भीती वाटते. मुलांबरोबर अतिशय वरवरची नाती ठेवतात, असे वाटते. इथे पे्रमात पडून अनेकांच्या जोड्या जुळलेल्या असतात. तसे नसेल तर तुम्हाला मागासलेले समजतात.’ कोजागिरी पुढे म्हणाली, ‘माझी सुरुवातीला खूप पंचाईत झाली. या वातावरणाबरोबर जुळवून घेताना खूप जड गेले. आपण एकटे पडू अशी भीती वाटल्याने सर्वांबरोबर वेगवगळ्या वेळी मिक्स होत होते. त्यात दिवसाचे एकदोन तास सहज निघून जायचे. थोड्या दिवसांनी लक्षात आले, मी जशी आहे तशी ज्या मित्रमैत्रिणी स्वीकारतील त्यांनाच जवळ करायचे. आपल्याला लोकांनी स्वीकारावे म्हणून स्वत:ला न आवडणा-या गोष्टीत वेळ घालवल्यावर मला कळलं, की हे काही तरी चुकतेय.’ अनघाला हे सर्व नवीन होते. कोजागिरीला एखादी जवळची मैत्रीण लवकर मिळो, असे तिला मनापासून वाटले आणि तिचे डोळे पाणावले.
समानधर्मी कोणी लवकर न सापडल्याने कोजागिरीला गोंधळल्यासाखे झाले. एकटे वाटले. हळूहळू समजत गेले. वाईट अनुभव आला तरी ती व्यक्ती सर्वस्वी टाकाऊ नसते. दरवेळी वेगवेगळ्या मुलाबरोबर फ्लर्ट करणा-या पूजाचे काम चांगले होते. लावालावी करणारी शामली प्रेमळ होती. कामाच्या अनुषंगाने नाते ठेवणे आणि सर्वांबरोबर काम करण्याची कला कोजागिरीला अवगत होत गेली.
कदाचित तरुण पिढी या अशा धडपडीतून चुकतमाकत शिकत असेल. साधारण उच्च वर्गातून आलेल्या सहाध्यायांमध्ये प्रचंड मानसिक असुरक्षितता असल्याने जवळची मैत्री सहज होणे दुर्लभ होत असावे. कुटुंबातून मानसिक सुरक्षिततेचा पाया रचला गेला, तर घरापासून दूर राहून शिक्षण घेणा-या तरुण पिढीचे आयुष्य निर्व्याज मैत्रीने फुलेल. नाती तयार करताना प्रगल्भता असेल. तरुण पिढी आणि समाज संपन्न होईल. मैत्रीचा ताणाबाणा उबदार असेल!