आज मुलामुलींची लगबग चालू होती. विकासने फाटकं पोतं आणलं होतं. वाळलेल्या झाडाच्या फांद्या जमिनीत रोवून आडोसा तयार करणं, एकाने कुत्र्याच्या पिलाला मांडीवर घेऊन बसणं, जमिनीवर वाळलेलं गवत पसरणं, खाऊच्या पैशातून दूध आणणं, त्यासाठी घरातील तुटकी बशी आणणं, अशा अनेक गोष्टी सुरू होत्या. या सर्व तयारीचा हक्कदार असणारं कुत्र्याचं पिल्लू ‘कुंई कुंई’ करत लाड करून घेत होतं. आज अर्थात मुलामुलींचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही. तिने विचारले, ‘हे कोण नवीन पाहुणे? पिल्लू कोणाचं आहे?’ तिचा आवाज ऐकताच जमेल तसे ‘नमस्ते’ म्हणत त्यांनी माहिती पुरविली.
‘बाई, काल भटक्या कुत्र्यांना नेणारी महानगरपालिकेची गाडी आली होती. याच्या आईला चार पिल्लं होती. बहुतेक दोन बहिणी आणि एक भाऊ होता. (हे तपशील थोड्याशा मोठ्या मुलांनी सांगितले.) हे एकटं आमच्या गल्लीत लपून राहिलं. बाकी सगळ्यांना पकडून गाडीतून घेऊन गेले. आता हा एकटाच उरला आहे. आम्ही सर्वांनी मिळून याला पाळायचं ठरवलं आहे.’ एकापाठोपाठ एक मुलंमुली सांगत राहिली. ‘बघा ना,
आपल्या भावा-बहिणीला, आईला शोधत आहे.’
‘माझ्या आईने ही बशी दिली,’ प्लास्टिकच्या पिशवीतील दूध बशीत ओतत सीमा म्हणाली. ‘बघा, किती भूक लागली आहे. लपलप दूध पितोय.’ दूध पिऊन झाल्यावर पिल्लाने कान झटकले. शेपूट हलवली. पुढील पायांनी तो मुलामुलींच्या पुढे केलेल्या हाताशी खेळायला लागला.
त्याची पंज्यात लपलेली नखं, दात, डोळे याचं निरीक्षण मुलामुलींनी सुरू केलं. काही लहान मुलीमुलं घाबरत होती. ‘बाई, याचे नाव अजून ठरत नाही. आम्हाला मोत्या, मोतीराम, टॉमी, ब्रूनो अशी किती तरी नावं चांगली वाटतात.’ विनीत सांगत होता. ‘हा लपून बसला. म्हणून आम्हाला मिळाला. त्यामुळे याचे नाव ‘लप्या’ ठेवावं असं वाटतं,’ असं सांगत संतोषने सर्वांना विचारलं, ‘चालेल? लप्या म्हणूया का याला?’ अनेक मुलामुलींनी होकार भरला. त्यानंतर ‘लप्या’, ‘लप्या’ असं अनेकांचं सुरू झालं.
‘बाहेर मोठी कुत्री असतात. लवकरच पावसाळा येईल. आपल्या लप्याला त्रास झाला तर?’ संतोष म्हणाला. ‘आपण शाळेत गेल्यावर याचं कोण बघणार?’ विनायकने विचारलं. मुलंमुली सामूहिक जबाबदारी कशी निभवायची याचा विचार करत होती. ‘सोपं आहे. रात्री याला मी माझ्या घराच्या पडवीत बांधेन.’ सकाळची आणि दुपारची शाळा असणारे आळीपाळीने दिवसा पाहूया. प्रत्येक अडचणीचा त्यांच्याकडे उपाय होता. ‘आज मी दूध आणलं. रोज मला पैसे मिळणार नाहीत,’ सीमा म्हणाली. ‘बरोबर आहे. आपल्याला त्यासाठी रोज एकाची पाळी लावावी लागेल. शिवाय आपण आपले खाऊचे पैसे बाजूला ठेवूया,’ लक्ष्मीने उपाय काढला.
मुलामुलींची लगबग जणू लप्याला कळत होती. ‘लप्या’ या ध्वनीला तो प्रतिसाद देऊ लागला होता. थोड्या वेळाने तो मुलामुलींनी तयार केलेल्या गवताच्या बिछान्यावर झोपला. त्याच्याकडे पाहत सर्व एकदम शांत झाले. तिने म्हटले, ‘चला. लप्या आता थोडा झोपला आहे. तुम्हाला झोपलेल्या लप्याचं चित्र काढावंसं वाटतंय का?’ चित्रकलेची आवड असणा-या विकासला ही कल्पना आवडते. लगेच तो कामाला लागतो. विकासचे पाहून दोन-चार जण कामाला लागतात. झोपेत लप्याने अंग दुमडलं. काहींनी चित्रात बदल केले. मुलामुलींमधील प्राणीप्रेम पाहून तीही लप्याचे निरीक्षण करणा-या त्यांच्याकडे पाहू लागली. पाळीव प्राण्यांच्या सहसा वाट्याला ती जायची नाही. कठीण परिस्थिती असूनही मुलंमुली लप्याची काळजी घ्यायचा एकत्र विचार करत होती. याने तिचे मन भरून आले. ‘कोणाची तरी काळजी घेणे,’ ही भावना मुलामुलींच्या मनात किती सहज उमटते. प्राणी आणि माणूस यांच्या परस्परप्रेमाच्या अनेक गोष्टी तिला आठवल्या.
लप्या अजून झोपला होता. त्यांची रेखाटनं पूर्ण होत आली होती. तिने गोष्ट सांगायला सुरुवात केली. ‘जपानमधील टोकियो विश्वविद्यालयातील प्रोफेसर उएनो उपनगरात राहत. उपनगराचे नाव शिबुया. १९२४ मध्ये त्यांनी कुत्र्याचे पिल्लू पाळले. नाव ठेवले हाचिको. प्रोफेसर उएनो संध्याकाळी ट्रेनने परत येत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हाचिको रोज शिबुया स्टेशनवर उभा असे. दोघे एकत्र घरी येत. १९२५मध्ये उएनो यांचा अचानक मेंदूच्या रक्तस्रावाने मृत्यू होतो. त्यानंतर ते शिबुया स्टेशनवरून घरी कधी परत येत नाहीत. तरी हाचिको आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९३५पर्यंत रोज गाडीच्या वेळी स्टेशनवर जात राहिला. आजूबाजूचे लोक त्याला काही खायला द्यायचे. प्रोफेसर उएनो यांच्यावरील प्रेम पाहून लोक हाचिकोचा काशाचा पुतळा १९३४मध्ये स्टेशनवर बसवतात. त्या कार्यक्रमाला हाचिको उपस्थितअसतो. दुस-या महायुद्धात हाचिकोची मूर्ती वितळवून लढाईची हत्यारे बनवली जातात. युद्ध थांबल्यावर लोक पुन्हा एकदा हाचिकोची मूर्ती बसविण्याची मागणी करतात. १९४८ मध्ये हाचिकोची दुसरी मूर्ती बसवली जाते. ती आजतागायत शिबुया स्टेशनवर आहे. हाचिको आणि उएनो यांच्या मैत्रीची आठवण ती मूर्ती आजही करून देते.’
गोष्टीत रमून गेलेली मुलंमुली. किलकिल्या डोळ्यांनी मुलामुलींच्या शांततेचा कानोसा घेणारा लप्या. गोष्ट सांगणारी ती. क्षणभर सर्व जण जणू जपानमधील शिबुया स्टेशनवरील हाचिकोची मूर्ती पाहत होते.
‘बाई बघा ना, आमचा लप्या गोष्ट ऐकतो आहे,’ असे सीमाने म्हटल्यावर सर्व लप्याकडे वळले.