आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Missing Childhood, Madhurima

मणी-दरबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज पिंपळाच्या झाडाखाली वेगळे दृश्य होते. चटया घालून मुलंमुली आणि काही बायका मण्यांचे काम करत बसल्या होत्या. अतिशय छोटे रंगीबेरंगी मणी वाट्यांतून ठेवले होते. एक एक मणी बारीक कापलेल्या तारेत ओवून ५०चा एक झुपका बनवून बाजूला ठेवत होते. ती गेल्यावर त्यापैकी कोणीही नेहमीप्रमाणे रेघ ओढून रांगेत उभे राहिले नाही. ‘नमस्ते,’ म्हणून आपले काम चालू ठेवले. तिने सांगितले, ‘कोणाला पुस्तके वाचायची असतील तर मी थोडा वेळ थांबेन.’ त्याप्रमाणे मणीकामात न गुंतलेली मुलंमुली पुस्तके घेऊन वाचायला लागली. तीही तेथेच चटईवर निरीक्षण करत बसली. असे दोनतीन रविवारी लागोपाठ झाल्यावर ती एकदा म्हणाली, ‘असे समजा इथे मण्यांचा दरबार भरला आहे. तुम्ही त्या दरबारात आहात. त्याचे आपण ‘मणी–दरबार’ नावाचे नाटक बनवूया. आता तुम्ही एक-एक करून बोला. आपोआप संवाद तयार होतील. आपल्या सर्वांनाच ‘मणी-दरबार’ म्हणजे काय हे समजत जाईल.’
सुमन : मला मणी खूप आवडतात.
लीला : मणी बनवायला, भरायला आणि कापायला छान वाटते.
प्रिया : मण्याचे पैसे मिळतात. म्हणून छान वाटते.
गंगा : आम्ही मोजून मणी घेतो.
लक्ष्मी : माझे मणी भरणे सर्वात पहिल्यांदा
पूर्ण होते.
रितू : एका दिवसात मी १००० मणी बनविते.
गंगा : रविवारी मॅडम येतात, आम्हाला शिकवतात हे छान वाटते.
लक्ष्मी : बाई जेव्हा मणीकाम सोडून अभ्यास करायला सांगतात तेही आवडते.
(तिला खुश करायला हवे, याचे भान त्यांना होते हे पाहून तिला थोडेसे वाईट वाटले. कदाचित त्यांना खरोखर तसे वाटत असेल असेही वाटले.)
सुमन : मण्यांची तार कापायला आवडते.
राम : मण्यांचा गुच्छ बनवायला येते.
लक्ष्मी : आम्ही एकमेकींच्या घरी जाऊन मणीकाम करतो. ते आम्हाला आवडते. त्यातून वेळ काढून आम्ही शाळेचा अभ्यास पूर्ण करतो.
सुमन : कोण पहिल्यांदा संपविते अशी रेस लावायला मजा येते.
सगळे : रविवारी १० ते ६ मणीकाम करतो. एक एक करून आम्ही जेवण करून येतो. शनिवारी संध्याकाळी ४ ते ६ करतो. ज्यांना सकाळची शाळा असते त्या १२ ते ६ मणीकाम करतात. असा आमचा १५-१६ जणींचा गट आहे. अभ्यास सातनंतर करतो. कधी गृहपाठ पूर्ण होत नाही. शाळेत मार खावा लागतो.
दोघी : अभ्यासाचा कंटाळा येतो. शाळेतला अभ्यास येत नाही. तुम्ही सांगता ते समजते.
लक्ष्मी : ५ ते १० मिनिटांत ५०चा गठ्ठा बनवतो. कोणी १००० तर कोणी ४००० पूर्ण करते. मध्ये थोडे खेळतो. मी १० वाजता झोपते आणि चार वाजता पाणी भरण्यासाठी उठते.
सुमन : माझ्या आईने हे काम प्रथम सुरू केले. मणी प्लास्टिक, काच किंवा धातूचा असतो. काम खारमधून आणतो.
लक्ष्मी : आम्ही मणी पूर्ण करून पैसे आणायला जातो तेथे खूप गर्दी असते. कधी कधी पूर्ण पैसे मिळत नाहीत. मणीकाम देणारा हलीमभाई मुस्लिम आहे. आमच्या गल्लीत एक मुस्लिम बाई आहे. ती खूप चांगली आहे. मॅडम तुम्ही मुस्लिम आहात काय? (यावर सुमन तिला दटावते.)
रितू : कंटाळा आला तर आम्ही एकमेकींचे काम पूर्ण करतो. घरकाम आणि अभ्यास करतो.
आमचे वडील टॅक्सी, फळाची गाडी, रंगाचे, वेल्डिंग, गादी बनविणे, गॅरेज, फॅक्ट्री ही कामे करतात.
आया : माझ्या दोन मुली आणि मी असे काम केल्यावर महिन्याला ७००-८०० रुपये मिळतात. नाइलाज आहे. माझा नवरा दारू पितो. कर्ज काढतो. खर्च कसातरी भागवावा लागतो. आम्ही मोठ्या बायका काम करताना पाहून आमची लहानगी कामाला लागतात. काय करणार?
तिने मुलामुलींना विचारले, ‘समजा, तुम्हाला मणीकाम करून मिळणारे पैसे, ते काम न करता मिळाले तर त्या वेळात तुम्हाला काय करायला आवडेल?’ सुरुवातीला काम न करता पैसे कसे मिळतील असे त्यांना वाटले. ‘कल्पना करा. विचार करून सांगा.’ थोड्या वेळाने ती बोलायला लागली.
भावाबरोबर अर्धा तास तरी भांडेन; वेगवेगळी चित्रं काढीन; डिझाइन बनवेन; न येणा-या गोष्टी शिकेन; अभ्यास येत नाही, इंग्रजी येत नाही ते शिकेन; पुस्तके वाचेन; डान्स शिकेन; फिरेन; खेळेन; भांडेन; कॉम्प्युटर शिकेन... असे कितीतरी ती बोलत राहिली.
किती बालसुलभ आणि साध्या गोष्टी त्यांना हव्या होत्या. कराव्याशा वाटत होत्या. असे कितीतरी बालमजुरीचे दरबार वस्त्यांतून भरत असतात. अनेकांची बालपणं अशी करपून जातात. भावी पिढीची केवढी तरी ऊर्जा, क्षमता, सर्जनशीलता यांची उधळमाधळ होत आहे. तिचे विचार मध्येच थांबले. थोड्या दूर पुस्तक वाचत असलेला विनय म्हणाला, ‘बाई, मुलामुलींनी मणीकाम करू नये, त्याऐवजी आता सांगितल्या त्या गोष्टी कराव्यात असे तुम्हाला वाटते ना? मला समजला ‘मणी-दरबार’ या नाटकाचा विषय. हो ना?’
विनयला नजरेने होकार देताना, मोजावी लागणारी बालमजुरीची भयंकर किंमत समाजाला केव्हा कळेल, असे तिला वाटून गेले.