आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहजीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मला वर्गातील एक मुलगा खूप आवडतो. तो अनेक गोष्टी वाचतो. त्यावर आम्ही बोलतो.’ ही डायरीतील नोंद कोजागिरीने खूप वर्षांपूर्वी आईला वाचायला सांगितली होती. त्यानंतर आईने त्याच्यासह अनेकांना सहलीला नेले आणि मजा आली होती. ‘मुलगा आवडतो’ म्हणजे धूसर काहीतरी खूप चांगले असे वाटायचे. त्या भावनेला नाव देता आले नाही. तेव्हा आणि नंतरही. ‘त्याच्याकडे जरा लक्ष देऊन पाहा.’ समोरून येणा-या ग्रुपमधील मुलाबद्दल तिने कला शिक्षण संस्थेत भेटीला आलेल्या आईला सांगितले होते. तिने डायरीत लिहिले होते, ‘अलीकडे त्याला नेहमी भेटावेसे वाटते. त्याचे विचार अनेक बाबतीत जुळतात. कामासंदर्भात आम्ही अनेक वेळा भेटतो. ही खास भावना त्याचीही असेल असे मला जाणवते.’ त्या वेळी आई म्हणाली होती, ‘याला प्रेम म्हणायचे की नाही हे ठरवायला थोडासा अवकाश स्वत:ला दे. पण प्रेम करण्याच्या कल्पनेच्या मात्र तू नक्कीच प्रेमात पडली आहेस!’ घरापासून दूर राहताना मैत्रीचे अनेक ताणेबाणे कोजागिरीने अनुभवले. जिवापाड प्रेम केले. अपेक्षाभंगाचे दु:ख रिचवले. नंतर काही दिवस कॅम्पसमध्ये जास्वंदीच्या फुलातील मध नाजूकपणे पिणारे इटुकले सूर्यपक्षी, हातावरून फिरणारी खार, मोराचे अचानकपणे थुईथुई नाचणे या गोष्टी कोजागिरीवर आनंदाची शिंपण करेनाशा झाल्या. अशा वेळी भीमाशंकरच्या जंगलात अवचित भेटलेले, काजव्यांनी विभोर उजळलेले झाड तिला आठवायचे. तिचे काम तिला त्या झाडावरील काजव्याप्रमाणे वाटायचे. गच्च अंधारात आपोआप प्रकाश दाखविणारे, नेहमीच साथीला राहणारे!
नोकरीच्या ठिकाणी ती रुळायला लागली. आईने पत्रात विचारले, ‘लहान असताना तू मला विचारले होतेस माझे कोण आहे? आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर याचे उत्तर प्रत्येकाला शोधावे लागते. अनेक जण भेटतात. मैत्रीही होते. जीवनाचा जोडीदार कधी आपसूक सापडतो. कधी असे सहज होत नाही. त्यामुळे जोडीदाराच्या शोधासाठी आम्ही तुला मदत करावी असे वाटते. मोकळेपणाने कळव.’ कोजागिरीने पुन्हा एकदा आपल्या डायरीतील नोंदी पाहिल्या. तिच्या लक्षात आले, वाटेवरील अनेक अवघड वळणावर तिने आई-बाबाचा आधार गृहीत धरला होता. जोडीदाराबद्दल असणा-या तिच्या या अपेक्षांसह तिने आईला जोडीदार शोधासाठी संमती कळविली : ‘विचार, आवडीनिवडी, जीवनातील अग्रक्रम जुळणे महत्त्वाचे. जातधर्म, मिळकतीचा आकडा, देणीघेणी, दागदागिने याला काहीही महत्त्व नाही. पत्रिका, मुहूर्त गोष्टींवर विश्वास नाही. साधेपणाने नोंदणी विवाह करावा.’
त्यानंतर जोडीदार शोधाच्या रम्य आणि सुरस कथांचा संग्रह काढता येईल एवढे अनुभव मुख्यत्वे कोजागिरीच्या आईच्या खात्यावर जमा झाले. विवाह मंडळ चालकांचे सल्लेही मिळाले. ‘मुलीचा एवढा साधा फोटो कसा चालेल. मेकअप, दागिने हे काहीच कसे नाही. तुमच्या मुलीने साधे आयब्रोही केलेले नाही.’ ‘तुमचा पत्रिकेवर विश्वास नाही. पण समोरच्यांचा असतो. त्यासाठी तरी पत्रिका तयार करावी लागेल.’ ‘जात, धर्म याचे तुम्हाला महत्त्व नाही. पण समाजात असे चालत नाही.’ ‘कन्यादानाला विरोध, हे भलतेच’. या सर्व गोंगाटात सर्वात उच्च स्वर ‘गोरा रंग, नितळ स्किन, त्यासाठी पार्लर, स्किन ट्रीटमेंट’ याचा होता. याबाबतीत परंपरावादी, कर्मठ, धार्मिक आणि पुरोगामी या कोणाचाही अपवाद नव्हता! ‘आपल्याला जायचे आहे सिंगापूरला पण आपण जातोय मात्र व्हाया पंढरपूर!’ असे विनोदाने म्हणत आईने Suitable Boy चा शोध जारी ठेवला.
‘एक गोष्ट सोडून सर्व मान्य आहे. मला वैदिक पद्धतीने विवाह करायचा आहे. त्यातील मुहूर्त, भटजी आणि कन्यादान या गोष्टी वगळूया. पण संस्कृतमध्ये मंत्र आणि होम हवे.’ कोजागिरीची याला संमती होती. पण तिला मंत्र मराठीतून हवे होते. या सर्वाची सांगड घालत आईने मूळ श्लोकात संस्कृत भाषातज्ज्ञांच्या मदतीने योग्य बदलासह त्याचे मराठीतून भाषांतर करून खास कोजागिरीच्या विवाहाची संहिता तयार केली. त्यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत केवळ मदतनिसाची भूमिका कोजागिरीच्या आई-बाबाने केली. मैत्रिणीनेच विवाहाचे पौरोहित्य केले. त्यानंतर अधिका-यांच्या समक्ष विवाह नोंदणी केली. अत्यंत जवळच्या आप्तेष्टांच्या सहभागातून कोजागिरीचा मनोज्ञ विवाहसोहळा संपन्न झाला!
मित्रमैत्रिणींसह विवाहाचा व्हिडिओ पाहत असताना एके ठिकाणी पॉज घेत कोजागिरीचा जोडीदार म्हणाला, ‘हे बघ, या वेळी डोक्याला डोके लावले असताना, बहीण पानाने पाणी शिंपत होती तेव्हा तुझ्या गालावर लाजून लाली उमटली आहे! पाहिलीस? आता तुम्हीच पाहा.’ असे म्हणत क्लोजअप शॉटवरही पॉज घेतला. त्या वेळी मात्र कोजागिरी पुन्हा खरंच लाजली! जोडीदार प्रेमभरे तिच्याकडे आणि इतर सर्व त्यांच्याकडे पाहत राहिले. कोजागिरीच्या सहजीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव झाला!